31 December, 2019

नवीन वर्षा तुझ्या स्वागता




उलटी होती पाने झटपट
उकलत जातो असाच हा पट
कुणी कितीही केली खटपट
नाही थांबत उधळे चौपट 

येती लाटा भरतीच्याही
परतून जाती ओहोटी ही  
सुख-दु:खाची वीण तर ही
सागर, तीरी जपतो तरीही

दिवसामागूनी दिवसही सरले
ऋतूमागूनी ऋतू चालले
कुणी मांडीला असेल हा पट?
नाटक करतो कुठला हा नट?

रडवी कधी हा हसता हसता
कोठे जावे? कुठला रस्ता?
माहीत नाही... तरी चाललो
नवीन वर्षा तुझ्या स्वागता 

नरेंद्र प्रभू
३१/१२/२०१९

24 December, 2019

स्वप्नातील नंदनवन - अ‍ॅप्रिकॉट ब्लॉसम




स्वप्न गुलाबी हळवे फुलते हळूच धरतीवर
मग्न सकाळी अंबर उलटे तरुच धरती वर
अशा उमलल्या कोमल कलिका वाटा वाटांवर
कुणी पसरली अथांग येथे दुलई ही सुंदर

जर्दाळूची झाडें वेडी साज ल्याइली किती
कशी न त्यांना जरा भीतीही पानांवाचून रीती
गूज फळांचे उरी दाटले कसे करू स्वागत
अंगरखा हा शुभ्र फुलांचा वाटाही अनवट

कसें करावे कथन तुम्हाला मज न लागला ठाव
हिमालयाच्या कुशीत सजला असा परीचा गाव
सृष्टीचा हा चमत्कार हो पहा इथे येऊन
स्वप्नातील हो नंदनवन हे हरखून जाईल मन


लडाख प्रांतातील कडाक्याची थंडी ओसरून आता वसंताची चाहूल लागणार असं वाटत असतानाच एवढे दिवस निश्पर्ण असलेली जर्दाळूंची झाडं उत्सव साजरा करतात. उघड्या बोडक्या झाडांवर पालवी फुटायच्या आतच  फिकट गुलाबी फुलं उमलू लागतात आणि बघता बघता ही झाडं नुसत्या फुलांनी डवरून जातात. लडाख राज्यामधलं कारगील गाव सोडलं की लेह या राजधानीच्या शहराकडे जातानाचा राष्ट्रीय महामार्ग क्र. १ दुतर्फा जर्दाळूंच्या झाडानी वेढलेला आहे, पण तिथली डहा आणि नू ही गावं तर यासाठी खास प्रसिद्ध आहेत. साधारण एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात पृथ्वीवरचा हा अनोखा नजारा पहायला मिळतो. मैलोंमैल पसरलेली शुभ्र फुलांची चादर, फांदीफंदीवरून फुटून निघालेली गोजीरी फुलं, काटा आणणारी थंडी आणि लडाखचा मनमोहून टाकणारा निसर्ग. हाडं गोठवणार्‍या थंडीमधून जागं होत असताना लडाखला पडणारं हे स्वप्न अनुभवायचं असेल तर ईशा टुर्ससह या वर्षीच चला या बहारदार सफरीवर...




17 December, 2019

स्टॅच्यु ऑफ युनिटी


ईशा टुर्ससोबत नुकत्याच भेट दिलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल:
  

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि एकात्म भारताचे प्रणेते भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा आहे. गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला असून १८२ मीटर (५९७ फूट) उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांची १८२ मिटर उंचीची भव्य प्रतीमा, वॉल ऑफ युनिटी, प्रदर्शन हॉल, संग्रहालय, १३५ मीटर उंचावर असलेली २०० पर्यटक क्षमता असलेली दर्शक गॅलरी ( पुतळ्याच्या पायथ्यामधून दोन लिप्टव्दारे या ठिकाणी पोचता येतं.), कॅफेटेरीया, सिविनीयर शॉप, लाईट अ‍ॅन्ड साऊंड शो, २३० हेक्टर्वर पसरलेली व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अशी अनेक आकर्षणं असलेल्या या ठिकणी ८०० वाहनांची पार्किंगची व्यवस्थाही आहे.

लेजर शो
भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केली होती. ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन ॲन्ड ट्यूब्रो यांच्याशी केला होता. पुतळ्याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू झाले आणि ऑक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण झाले.  आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले.

७०,००० टन सिमेंट, १८,५०० टन रीइनफोर्समेंट स्टील,,७०० टन कांस्य आणि ६,००० टन स्टॅकचरला स्टील यांचा वापर करून साकर झालेल्या या पुतळ्यासाठी भारतातील १,६९,०७८ गावांमधून लोखंड आणि माती जमा केली गेली.

सोमवार वगळता सर्व दिवशी सायंकाळी ७ ते ८ मधल्या अर्ध्यातासात स्टॅच्यु ऑफ युनिटी वर एक लेजर शो आयोजित केला जातो. सरदार पटेलांचं जीवन चरीत्र, ब्रिटीशांविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष आणि संस्थांनांचं भारतात केलेलं विलिनीकरण असे विषय या शोमध्ये अंतर्भूत केले गेले आहेत. उच्च प्रतीचं तंत्रज्ञान, भारदस्त आवाज, प्रेरणादायी विवेचन आणि एकात्मतेची भावना निर्माण करणारा हा लेजर शो अवश्य पहावा असाच आहे. शो संपल्यावर उत्स्पूर्तणे भारत मातेचा जयजयकार करत जाणारी जनता त्याची साक्ष असते.          

सातपुडा आणि विंध्याचल पर्वतमाला यांचं मनोहर दृश्य असलेलं गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातल्या केवडीया (बडोद्यापासून ९० किमीवर) या गावातून इथे पोचता येतं.  

१३५ मीटर उंचावर असलेली २०० पर्यटक क्षमता असलेली दर्शक गॅलरी

   

      

16 December, 2019

जीव वाचला अन् घासही मिळाला




पेटीत अडकला एक साप
म्हणाला; काय झाले हे बाप रे बाप!
बाहेर पडायची केली खुप धडपड
वळवळला, सरपटला, लोळला गडबड
थकून गेला, पडून राहिला
आले ना कुण्णी मदतीला
म्हणतो असाच लागलो लोळायला
तर किती वेळ लागतो मरायला?
लागला विचार करायला
कसं होईल तरायला.....?
एवढ्यात; झाला थोडा खडखडाट
फटीतून एक उंदीर आला आत
पेटीतलं खाणं खाणार म्हणून
पाहू लागला ऐटीत बसून
समोर पाहतो तर काय
थरथरू लागले त्याचे पाय
काळसर्प समोर उभा
पळायची पण नाही मुभा
सर्प आता खाणार मला
चिमुरडा उंदीर अधिकच भ्याला
सापाने थोडा विचार केला
काम करेल हा या समयाला 
मग, साप त्याला हळूच म्हणाला
मदत कर बाहेर पडायला
कुरतडून टाक पेटीला
अपाय नाही करणार तुला
उंदीर पटकन तयार झाला
म्हणाला जिवावरचा घाला गेला
भोक पाडलं त्याने पेटीला
साप पेटीतून बाहेर आला
उडी मारून उंदीरही पळाला
साप त्याला पकडता झाला
पेटीतून साप सुटला
शिवाय उंदीर मिळाला खायला
जीव वाचला अन् घासही मिळाला

असा अर्थ आहे या पुराण कथेला 

11 December, 2019

अक्षरधाम मंदीर – गांधीनगर, गुजरात


अक्षरधाम मंदीर – गांधीनगर, गुजरात

ईशा टुर्ससोबत नुकत्याच भेट दिलेल्या अक्षरधाम मंदीराबद्दल:  

गुजरातमधील प्रमुख सांकृतीक केंद्रांपैकी एक मानलं गेलेलं अहमदाबाद जवळच्या गांधीनगर इथलं अक्षरधाम मंदीर म्हणजे आधुनीक काळात साकार झालेली सुंदर कलाकृती आहे. भगवान स्वामीनारायण यांना समर्पित केलेलं हे मंदीर बांधण्याआधी संबंधीत साधुंच्या कमिटीने जगभरातील ऐतिहासीक तसंच पुरातन इमारतींचा आणि देवळांच्या बांधणीचा, स्थापत्यकलेचा, ठेवणीचा सखोल अभ्यास केला. सदर भगवान स्वामीनारायण मंदीर बांधताना त्या सर्वांचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला. १४.८ एकर जमिनीवर ६००० मेट्रिक टन लाल बलुआ दगडाचा वापर करून साकार झालेलं हे मंदीर १३ वर्षात बांधून तयार झालं.

भगवान स्वामीनारायण यांची सात फुट उंच सोन्याची बैठी मुर्ती
स्वामीनारायण घनश्याम पाण्डे तथा स्वामीनारायण तथा सहजानन्द स्वामी (२ एप्रिल १७८१ – १ जून १८३०), हे हिंदू धर्माच्या स्वामिनारायण संप्रदायाचे संस्थापक होते. स्वामिनारायण संप्रदायाचे अनुयायी त्यांना भगवान स्वामिनारायण म्हणून ओळखतात. वडील श्री हरिप्रसाद आणि माता भक्तिदेवी यांच्या पोटी जन्मला आलेल्या या बालकाच्या हातावर पद्म आणि पायावर बज्र, ऊर्ध्वरेषा तसंच कमळाचं चिन्ह पाहून ज्योतिषाने हे बालक लाखों लोकांच्या जीवनाला योग्य मार्ग दाखवेल अशी भविष्यवाणी केली होती जी तंतोतंत खरी ठरली.

स्वामीनारायण पाच वर्षांचे असताना त्यांना अक्षर ओळख करून देण्यात आली. आठव्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी शास्त्रांचा अभ्यासा सुरू केला. लवकरचात्यांनी घराचा त्याग करून पुढची सात वर्षं देश्भर भ्रमण केलं. लोक त्यांना  नीलकंठ म्हणून ओळखू लागले. उत्तरेला हिमालय, दक्षिणेत कांची, श्रीरंगपुर, रामेश्वरम् अशा स्थानांचा त्यानी वेध घेतला. नंतर पंढरपुर, नासिक करत ते गुजरातमध्ये पोचले. स्वामीनारायण सम्प्रदायाचे लाखो अनुयाय्री असून हा सम्प्रदाय वेदांवर आधारीत आहे.

तीन मजल्यांवर विस्तार असलेल्या अक्षरधाम मंदीराच्या मुख्य इमारतीत भगवान स्वामीनारायण यांची सात फुट उंच सोन्याची बैठी मुर्ती असून, शेजारीच राधा-कृष्ण, राम पंचायतन, पार्वती महादेव अशा मुर्तीही शुशोभीत करण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर मंदीर निर्माणाविषयीची दृश्य आणि चित्र गॅलरी असून तळ मजल्यावर स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक स्वामीनारायण तथा सहजानन्द स्वामी यांच्या वापरातील वस्तू आणि जीवन चरीत्राचा आढावा घेणारं प्रदर्शन मांडलं आहे. मंदीराच्या प्रशस्त आवारात उजव्या बाजूला तीन मोठे हाईटेक प्रदर्शन हॉल असून त्यात ध्वनी-प्रकाशाच्या सहाय्याने भगवान स्वामीनारायण यांचं जीवन चरीत्र दाखवलं आहे. पुढे एका आलिशान चित्रपटगृहात चित्ताकर्षक सिनेमा दाखवला जातो जो तांत्रीक दृष्ट्या आणि आशयानेही अतिशय चांगला आहे.
    
सत् चित् आनंद लेसर शो

अक्षरधाम हे ते स्थान आहे जिथे कला चिरयुवा आहे, संकृती असीमित आहे आणि मुल्य कालातीत आहे असं म्हटलं जातं. संपुर्ण २३ एकर परिसर हिरवागार असून बाग-बगीच्या आणि कारंज्याने सजवलेला आहे. रेस्टोरंटच्या जवळच असलेल्या भव्य पटांगणात सायंकाळी ७.३० वाजता (सोमवार खेरीज)  दाखवण्यात येणारा सत् चित् आनंद लेसर शो हा जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून सादर केलेला ४५ मिनिटांचा वॉटर शो आहे. नचिकेत आणि यमराज यांच्या मधला संवाद आणि पौराणीक कथा ही मुळातूनच पहाण्याजोगी असून हा मनमोहक लेसर शो जागतीक दर्जाचा आहे.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates