25 July, 2017

स्मिता – लडाखची रणरागीणी



‘लडाख’चं रुप कोणत्याही स्वरुपात पाहिलं तरी पहाणारा त्याच्या प्रेमात पडतोच. फोटो आणि व्हिडिओमध्ये पाहिलेलं लडाख पत्यक्ष पहाण्याची आस मनात बाळगणारी व्यक्ती जेव्हा लडाखला पोहोचते तेव्हा ती हरकून जाते. न्युनगंडाने पछाडलेला त्यातून बाहेर पडतो आणि हवेत उडणार्‍याचे पाय अलगद जमिनीला लागतात. लडाखच्या हवेत ऑक्सिजनची थोडी कमी असली तरी माणसाला जाणीवेच्या पातळीवर लडाखवारी समृध्द करतेच करते.

मित्रहो लडाखला जायचं तर आत्माराम परब यांच्या बरोबर हे समजायच्या आधिच आम्ही आत्माराम बरोबर लडाखला जाऊन पोहोचलो होतो ‘तो दिवस’ आजही लख्ख आठवतो. त्यानंतर या आत्माच्या कृपेने अनेकदा लडाखवारी झाली ती गृप-लिडर म्हणून. हे गृपलिडर म्हणून जाणं म्हणजे खुप जबाबदारीचं काम असतं, निदान लडाखला तरी. अशा या लडाख सफरीवर आज स्मिता ५० व्या (पन्नासाव्या) वेळी जात आहे हे सोपं काम नाही महारजा. आज मी सोबत नसलो तरी मनाने त्या सफरीवरच आहे. आणि अशा सफरीवर असलो की आम्ही गृपलिडर वैगरे असलो तरी आमचा लिडर स्मिताच असते. सकाळी लडाखचं जग जागं व्हायच्या आधी उठायचं आणि रात्री सगळं लडाख झोपी गेलं की झोपायचं यामध्ये अनेक गोष्टींचा सामना गृपलिडरला करावा लागतो. यात स्मिता आघाडीवर असते. ‘ही’ हसतेय म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाणार्‍यालाही टेंशन येत नसतं. सतत चैतन्यमय रहाणं तीच्या कडून शिकावं. या लडाखच्या टुरवर सारखं काहीतरी घडत असतं. जसा तिथला निसर्ग क्षणोक्षणी बदलत असतो तसा तिथे गेलेला माणूसही. या बदलाला सामोरं जाताना खमका गृपलिडर सोबत असणं खुप आवश्यक आहे. गेल्या अनेक सफरीवर लडाखला असताना तीने असे अनेक प्रसंग अशाप्रकारे हाताळले आहेत की समर प्रसंगी काय करावं याचा तो वस्तूपाठ म्हणता येईल. 

प्रत्येक वेळी वेगवेगळी माणसं, त्यांच्या समस्या, निसर्गाचा खेळ, हवामान, रस्ते असे अनेक अडथळे यावर मात करत सहल यशस्वी करण्यासाठी आत्मारामच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाणार्‍या ‘टीम ईशा’चं नेतृत्व आज स्मिता करते तेव्हा  हे रसायन काही वेगळंच आहे याची जाणीव होते. यासाठी झोकून द्यायची वृत्ती लागते. २०१३ साली लेहला आम्ही आत्मारामची १०० वी सफर साजरी केली तेव्हा अनेक आठवणींना उजाळा मिळाला होता. लडाखची ढगफुटी, आयत्या वेळी अडवणार्‍या  तिथल्या खिंडी, काश्मिरमधला उपद्रव अशा अनेक समस्या असताना आजतागायत ईशा टुर्सने लडाखचा वसा सोडलेला नाही.  आता जगभरात सहलींचं यशस्वी आयोजन होत असताना ‘लडाख’कडे दुर्लक्ष होऊ दिलेलं नाही. हे सगळं शक्य होतं ते स्मितासारख्या जिवलगांमुळे. कैलास-मानससारखी सर्वार्थाने कठीण असलेली टुर संपवून लगेच दुसर्‍या दिवशी लडाख टुरवर निघायला फक्त आणि फक्त धैर्य लागतं. बाकी मग शरीर मागून येतंच. प्रसंग कोणताही उभा ठाकू शकतो. ४४० किमिचं डायव्हर्शन घ्याव लागेल किंवा एखाद्या खिंडीत कडाकाच्या थंडीत रस्त्त्यावर रात्र काढावी लागेल किंवा मध्यरात्रीत मैलोंमैल अडकलेला ट्राफिक सोडवावा लागेल. तुम्हाला तिथे मनाने ठामपणे उभं रहावंच लागतं, शरीर मग तुमचं गुलाम बनतं. हे आत्माराम करतो पण स्मिताने तोच कित्ता गिरवावा म्हणून तिला सलाम...!

लडाखला जावं आणि आपल्या मोठ्ठ्या वाटणार्‍या समस्या छोट्या-छोट्याहोत नाहीशा व्हाव्यात हे खुपदा अनुभवलंय. माझ्या छोट्याशा वर्तूळाला छेद देणारं मोठ्ठ वर्तूळ आत्मा मुळे निर्माण झालं. अनेक मित्र, जिवलग भेटले. लडाख आपलंच गाव वाटायला लागलं, या  प्रवासात जी माणसं गवसली त्यात स्मिताची आकृती ठळक आहे. लडाखच्या उंचीवर स्थिरावण्यासाठी मनानेही तेवढंच उंच व्हावं लागतं. पन्नासाव्या सफरी आधीच स्मिताने ती उंची नक्कीच गाठली आहे. या प्रवासात अनेकदा सहभागी होता आलं. हा एक मैलाचा दगड आज पार होत आहे. पुढच्या खुणेवर पुन्हा भेटूच. कारगील विजय दिन आणि त्याच्या पुर्व संधेला येणारा स्मिताचा वाढदिवस तिकडे या सफरीवर साजरा होण्यालाही खास महत्व आहे. स्मिता वाढ दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

                                                                                           

         

15 July, 2017

मन पाऊस-पाऊस


मन पाऊस-पाऊस
चिंब-चिंब रान ओलं
इथे मायेचा आसरा
उबार्‍यात न्हातं झालं

मन पाऊस-पाऊस
ढग_ढग एक होती
सरीवर सरी आल्या
आली उराला भरती   

मन पाऊस-पाऊस
धारा झर-झर येती
पूर सर्वांगाला आला
आठवणी वाहताती

मन पाऊस-पाऊस
अवचीत सांज झाली
अशी पावसाची याद
येता-येता रांग झाली  


नरेंद्र प्रभू  

१५/०७/२०१७  

04 July, 2017

विठ्ठल-विठ्ठल













































तुळस साजिरी कपाळी घेऊन
चालली गोजिरी सान्वी पुढे
मेळा गोपाळांचा मागून चालला
गजर विठूचा कानी पडे   

आषाढ मेघांचा वरुनी वर्षाव
आनंदा या पार नाही असा
नामाचा गजर, डोळा पंढरपूर
विठ्ठल-विठ्ठल हृदयी वसा

उधळीत रंग अबिर-गुलाल
पडती नाचत पाउले मंदिरी
कसा शिल्पाकार ठाकलेला विठू
प्रसाद सर्वांना देई करी  

दयेचा सागर, प्रेमाचाच भार
कृपाळू ही माय हात धरी
करी वारंवार प्रेमाची सावली
ताप हा सर्वथा दूर करी   
   

नरेंद्र प्रभू
०४/०७/२०१७


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates