Showing posts with label गावाकडच्या गोष्टी. Show all posts
Showing posts with label गावाकडच्या गोष्टी. Show all posts

01 June, 2025

मी मलाच हरवून बसलो

 

मी मलाच हरवून बसलो

या निखळ निर्झरापाशी

सय येते आणि भिडते

स्मरणात किती या राशी

 

संगीत  सरींच्यामधले

मज कानी पडते आहे

कोसळती धारा इथल्या

तो नाद निनादत आहे

 

जल निर्मल वाहे पुढती 

जणू अधिर मिलनासाठी

ते सागर झाले आहे अन्

घागर माझ्या हाती

 

ही धारच अवखळ आहे

जणू जीवन धावत राहे

मुरलेल्या आठवणींचा

मी दर्या झालो आहे

 

या सागरतिरीच्या लाटा

फेसाळत येती कधी अन्

कधी संथ पसरती भवती

हलकेच लागते ध्यान

 

नरेंद्र प्रभू

20 October, 2024

सोनेरी क्षण

 


असा विसावा मनास लाभे
तनास करीतो शांत निवांत
पुन्हा एकदा पुढती नेतो
करण्या कामे अविश्रांत
 
पायामध्ये मासोळीची
लाडीक हुळहुळ पुन्हा एकदा
कानांमध्ये नाजुक गुंजन
झुळूझुळू वाहे अखंड सरिता
 
निळ्या आभाळी मेघ विहरती
हिरवळ ल्याली श्रुष्टी भवती
निल समुंदर अवचित भेटे
गलबत होते खाली-वरती
 
शंख भेदीतो निरव शांती
दुरून कानी पडते हलगी
असते रानी चिवचिव हळवी
झुळूक करीते नाजूक सलगी
 
फुले माळूनी पतीर येते
गोसाव्यांची असते लगबग
आमंत्रण करी भंडार्‍याचे
मनात पडले मागे हे जग
 
क्षण सोनेरी वेचित होतो
प्राजक्ताची होती सोबत
माड पोफळी डोलत होते
ओंजळीतही फुले न मावत

 

नरेंद्र प्रभू

२०/१०/२०२४










27 August, 2022

असा खयंच नाय खावक

Audio Link असा खयंच नाय खावक



 

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

 

घावणे, आंबोळ्यो, खापरोळी आणि ताटाभोवतीची रांगोळी

नारळाचो रस, वाटाण्याचा सांबार बगून आंघोळीक मारतलस गोळी

आवशीच्या हातचा कुळताचा पिठला आणि तांदळाची भाकरी

अरे नाष्टो काय खायत रवलस फुडे गम्मत आसा खरी

ती विचारतली... आता काजी भाजूया काय कलिंगण व्हया खावक

उताणी पडान म्हणशीत आवशी पोटात जागा नाय गे रवाक

म्हणान, मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

 

दुपारच्या जेवणाक गोलम्याची कोशंबीर आणि बांग़ड्याचा तिकला

भाताबरोबर भुरकूक कर्लीचा निसत्याक आणि वांग्या पण भरला

ताजो फडफडीत इसवण आजून वाट बगतलो तव्यार

अर्दाच जेवन झाला तरी येतला ता आंगार

ती म्हणतली इतक्याय जमणानाय तर इलं कित्या झकमारूक

आणि मगे तेच्यार जिरवणी म्हणान देतली सोलकडी पिऊक

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

 

आरावलेलो कोम्बो अचानक गप जातलो

सागोती म्हणान वड्याबरोबर ताटात येतलो

दुपारी इतक्या जोवलस तरी आडवो हात मारतलस

पोटाकडे बगून आता खुप झाला म्हणतलस

आजून आये बगतली वाकान तूका वाडूक

चवच तशी म्हणत चघळत रवतलस हाडूक

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

 

कितीय रवलस तरी म्हणतली आणखी दोन दिवस रव

आजून खय बगलस तू जत्रा आणि फिरान ह्या गाव

जत्रेतला खाजा आणि लाडू देतली बांदून

परड्यातली ताजी भाजी देतली कुशीक सारून

म्हणतली परत येशीत तेवा मात्र दिवस काड रवाक

ह्या पावटी इलस तरी कायच नाय खावक

म्हणान तुका सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय खावक

  नरेंद्र प्रभू    



04 December, 2021

असो माजो सिंधुदुर्ग

Audio Link: असो माजो सिंधुदुर्ग




काय काय दाखव तूमका असा झाला आता माका

सिंधुदुर्गात उडान येवया चला लावा ही पाका

पाचू कवडो, राखाडी धनेश, सर्प गरूड आणि डिचो

पक्षी किती, प्राणी किती पत्तो नाय लागाचो

गवो रेडो, बिबळो, वाघ, झाडार शेखरू खाली साळींदार   

रात्री उठान गेलात रानात तर दिसता उद मांजार

हिरण्यकेशीच्या कुशीत आंबोलीक कावळे साद आसा

थंड हवेतसून इल्यार देवबाच्या येळेवर जरा बसा

भगवतीच्या पायाकडे धामापूरचा तळा

होडयेत बसान बगा दिसतत पांढरी कमळा

भोगव्याचो दर्या दाखवता किल्ले निवती

दुपार झाली तरी जावा देवराय डुंगोबावरती

केरळ कित्या व्हया तूमका बॅकवॉटर फिराक

वालावल-काळसा-भोगव्या खाडीतसून जावा तुमी घराक

चिंब भिजाक नांगरतास, सावडाव आणि नापण्याचो धबधबो

भुक लागली तर खयय घेवयामहो खानावळीत थांबो

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगड किल्लो

म्हाराज्यांच्या पदस्पर्शान पावन झाल्लो

कुणकेश्वर, रामेश्वर, वेताळ आणि काळकाय

मालवणीच्या या भूमीर कसलीच कमी नाय 

खाण्यापिण्याची चंगळ हयसर, सगळी करूया सोय    

बारमाही पर्यटन आसा बाबानू कदीय येवा हय

 

नरेंद्र प्रभू










04 August, 2020

वनात येता


कोकणाकडे नेणारा रस्ता आणि आत्माने (Atmaram Parab) काढलेले फोटो पहाता पाहाता त्याची कविता बनून गेली...

आठवणीने शहारले मन कधी जावे त्या गावात

धरला रस्ता धावतसे मन गातो मी आनंदात


हलके झाले गात्र गात्र हे सोपी वाटे ही वाट

वार्‍यावर मग स्वार होऊनी इंद्राचा हो हा थाट  

 

विहंग दर्शन दूर दिसे मज हिरवे तळ कोकण माझे

आतुरले मन कधीच गेले निसटून हो हे तन माझे 

 

पाचूने हा हार घातला की घाटामधली ही वाट?

जलदांनी बघ धाव घेतली गर्दी केली हो दाट

 

चितारला हा कुणी देखावा कुणी ओतली बघ रास

कितीक वळणे जरी घेतली तरीही वाटे ती खास

 

इथे थाबूंनी आकाशाने रूप अपुले पाहिले जरी

जळही पाहे रूप कालचे भेटे त्याला उरोउरी


मनातले वन वनात येता उसळे ते कवितेतून

किती पाहिले तरीही उरते त्याचे हे निज दर्शन   



सर्व छायाचित्रे: आत्मारम परब


03 May, 2020

कुत्रे बिस्कीट



कुत्रे बिस्कीट... खुप दिवसांनी आठवली ही बिस्कीटं. तळ कोकणात त्या काळी (आता खरं तर त्याला कोणे एके काळी असंच म्हटलं पाहिजे) पाववाला सकाळीच शहरवजा गावामधून पाव, बिस्कीटं विकण्यासाठी सायकलने फेरी मारायचा. त्याच्या सायकलला घंटी ऐवजी ट्रकला असायचा तसा हॉर्न असायचा. तो पॉsss पॉsss करीत गावभर फिरायचा. पाववाल्याजवळ गिर्‍हाईक यायच्या अगोदर गावातले तमाम कुत्रे जमा व्हायचे. सायकलपासून थोडं  अंतर ठेवून मागून धावत रहायचे. बेकरीतल्या ताज्या पाव-बिस्कीटांचा दरवळ कुत्र्यांना मॉर्निग वॉक करायला भाग पाडायचा. पाववाला पाव-बिस्कीटं विकायला थांबायचा, मध्येच कधीतरी कुत्र्यांच्या दिशेने काही बिस्किटं फेकायचा. पुन्हा सायकलचा पॅडल मारून पॉsss पॉsss करीत रस्त्याला लागायचा.

आता यात कुत्रे बिस्कीटांची महती अशी की ती माणसाला आणि कुत्र्यांना दोघांनाही आवडायची. कुत्र्याला पावही आवडत असणार पण त्याला तो कोण देणार? रुपयाच्या नाण्याएवढीच असलेली ही बिस्कीटं मात्र कुत्र्यांना पाववाल्याकडून किंवा गाववाल्यांकडून मिळायची.

काल ही गोष्ट घरात सांगितली तेव्हा माझी मुलगी विचारायला लागली कुत्र्यांसाठी होती म्हणून त्या बिस्कीटांना कुत्रे बिस्कीटं म्हणायचे का? म्हटलं नाही, तेव्हाचे कुत्रे एवढे माजलेले नव्हते आणि गाववाले श्रीमंत नव्हते. कुत्र्यांना द्यायला ती इवलीशी बिस्कीटंच परवडायची, पाववाल्यामागे बिस्कीटांच्या वासामुळे कुत्रे फिरत रहायचे त्यामुळे असेल किंवा त्याच्याकडून त्यांना ती बिस्कीटंच मिळायची म्हणून असेल त्या छोट्या बिस्कीटांना कुत्रे बिस्कीटंअसं नाव पडलं.

आताचे कुत्रे माणसांनी खायच्या बिस्कीटांना हुंगून बघतात आणि तुम्हालाच लखलाभ होवो अशी चर्या करून निघून जातात. वक्त वक्त की बात है, काळाचा महिमा अघाद आहे. कुत्रंपण खात नाही ते माणूस खातो.                

07 April, 2020

चांदणवेडा गाव




हिर्‍यासारखा हिरवळीतला हवाहवासा गाव
टिपूर चांदणे अजून पडते, हलते आहे नांव

कशी कुणी अन कधी खोदली इवलीशी ही बाव
डोंगर कापीत कुणी काढला रस्ता इथला राव?

खळखळ वाहे निर्झर इथला नाही त्याला ठाव
तळ्यात डुंबत असती कमळे हसत खेळती डाव

आनंदाने आंबा डोले नाही त्याला हाव
स्वागत करतो सकल जनांचे रंक असो वा राव

माड-फोफळी चवर्‍याढाळीत म्हणती पणती लाव   
देवळातली घंटा जागवी मनातला सद्भाव

धुक्यात दडला असे पहुडला चांदणवेडा गाव
मनात हुरहुर, करतो काहूर  हवाहवासा गाव


28 May, 2017

यांदा स्वर्गत जावक नाय!



आये  : अरे मेल्या पाकरांका कित्या गुंडे मारत ?

बाबलो : तर....., रातभर निज नाय आणि सकाळच्याक जरा निजतलय तर हेना नुसतो जिव खाल्ल्यान.  नुसता          कुहू...... कुहू...... कुहू...... काय चल्ला.... काय?

आये  : आरडाने होती बाबडी, तुज्या कित्या पोटात चावता?      

बाबलो : ही बाबडी कोण?    

आये  : मेल्या तुच आता म्हणा होत मा? नुसता कुहू...... कुहू...... कुहू...... काय चल्ला....  म्हणान. ती कोण कोकीळा आराडता हा.    

बाबलो : (चमकान) अगे खय? खय आसा कोकीळा?     

आये  : अरे ती कोण मेल्या, तुका आता आयकाक येणाहा नाय? आता टाळो पडाक ईलो तिचो!    

बाबलो : अरे कर्मा, अगे आये ती कोक़ीळा नाय, कोकीळ तो...., कोकीळ.   

आये  : अरे कायतरी काय सागतंह, कोकीळ खयचो.    

बाबलो : खयचो, म्हन्जे आराडता तो.

आये  : आ....?

बाबलो : अगे आ.. काय. व्हयतो आराडता मा तो कोकीळच. कोकीळा कदी अशी आरडणा नाय.

आये  : ह्या मी काय आयकतय?  

बाबलो :  ताच ता.

आये  : काय?

बाबलो : कोकीळ आराडता...

आये  : मेल्या सारख्या सांग बगुया, तुझी भगल नको.

बाबलो : अगे आये, कुहू...... कुहू...... कुहू म्हणान यदळदर आराडता मा ती कोकीळा नाय. कोकीळ तो. तो...... बग काळो काळो कावळ्यासारखो दिसता मा त्या फादयेर तो कोकीळ. तोच फाटपटी पासून आरडता. रोज रोज ची ही कटकट झाल्या माज्या मस्तकाक.

आये  : कायतरी मेल्याचा.  तुका रे कसली कटकट?   

बाबलो : त....र, अगे आंबे म्होवारले तेवा पासून बगतय. ह्यो नुसतो आराडता..., आराडता...... आता पावस इलो तरी हेचा आराडणा संपणा नाय.

आये  : माजो बाबा इतको लक्ष नाय ? कित्या आरडता रे ती कोकीळा.  

बाबलो : अगे कोकीळ आराडता..., कोकीळा न्ह्यय.

आये  : ताच ता. कित्या आराडता?   

बाबलो : कित्या काय, यंदा तेची स्वर्गत जावक नाय.

आये  : अरे कोणाची स्वर्गत? काय बडबडतह काय?  

बाबलो : अगे तो कोकीळ आराडता... मा...? तेची स्वर्गत.

आये  : आ? काय? कोकीळ आराडता तेची स्वर्गत? बाबल्या राती कपाळार पडल की काय मेल्या?      
बाबलो : हो...! मे कित्या कपाळार पडतलय? निज खय येता? निजलय तर पडतलय मा?

आये  : असांदे सारक्या कायता सांग.  

बाबलो : अगे, आता आयक्शी माजा? कोकीळ आराडता मा तो कोकीळेक बोलवता. तशी एकादरी इली तर तेचा लगीन जमतला मा? तीन म्हयने गेले तरी कोण फीरकाक नाय म्हणान आजून ह्येचा आराडणा चालूच आसा. यांदा स्वर्गत काय जमणा नाय बहुदा. होय उन्हाळो गेलो.

आये  : अरे तेची कसली स्वर्गत. काय तोडाक येयत ता काय बडबडतह?  

बाबलो : अगे आये, कोकीळ  कुहू...... कुहू...... कुहू...... आराडता नाय ता समजा खयच्या तरी कोकीळेक आवाडला तर मगे ती जवळ येता. तेंची स्वर्गत जमता. आणि मगे लगीन जाता. कोकीळ आरडाचो बंद होता. माका राती नाय पण सकाळी तरी निज येता. समाज्ला तुका....?

आये  : माका बाबा तुजा काय कळणा नाय आणि तुजा लक्षणय बरा दिसणाहा हाय. मरांदे आरडांदे त्या कोकीळेक. आता उठलं मा, चाय पी आणि ती कवळा मळ्यात टाकून ये. पावस येतलोसो दिसता.     
बाबलो : येवंदे पावस, तो काय दरवर्षी येता. आमचा काय? तो मेलो कोकीळ आसा म्हणान लाज सोडून आराडता तरी.

आये  : शिरा पडो मेल्या तुज्या तोंडार. तू बडबडत रवलस आणि माका उशीर झालो. मी चललय मळ्यात. (आये तरातरा चलत रवता)       

बाबलो : जा मळ्यातच जा. मी रवतय हयच कोकीळ आराडता तसो बोंबलत. आमची स्वर्गत यंदाय नाय. तो कोकीळ तरी आराडता. मी तसो आराडलय तर आवस ठेवची नाय. मोठ्ठी मानकरीण नाय ही, होकले रांगो लावतले म्हणान वाट बगताहा. किती वर्सा झाली, आता काय, यंदाचो मिरगय गेलो हातचो.

आराड बाबा आराड
तुजी तरी स्वर्गत जमांदे            
खय आसली कोकीळा
तर घरा येंवदे.

आ...रा...ड         

     
   

  

  
  


    
    


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates