Showing posts with label मुंबई. Show all posts
Showing posts with label मुंबई. Show all posts

09 February, 2019

दोन वर्षांत १२५ पादचारी पूल





१ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वे हद्दीत येणारे उड्डाणपूल व पादचारी पुलांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.


एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर झालेली चेंगराचेंगरी आणि अंधेरी गोखले उड्डाणपुलावरील पादचारी मार्गिका कोसळल्याच्या घटनेनंतर पुलांची डागडुजी व नवीन पुलांच्या उभारणीला प्राधान्य दिले जात आहे. याच योजनेचा भाग म्हणून येत्या दोन वर्षांत उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या मार्गावर १२५ पादचारी पूल उभे केले जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. केंद्रीय हंगामी अर्थसंकल्पात मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या महत्त्वाच्या कामांची माहिती गोयल यांनी दिली.

१ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वे हद्दीत येणारे उड्डाणपूल व पादचारी पुलांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यात पश्चिम रेल्वेवर ४२ पुलांची दुरुस्ती व नवीन पुलांच्या उभारणीसाठी १०० कोटी ८७ लाख रुपये आणि मध्य रेल्वेवरही याच कामांसाठी ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नवीन पुलांच्या उभारणीची माहिती दिली आहे. पुलांच्या कामांसाठी तरतूद करतानाच दोन वर्षांत एकूण १२५ पूल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात २०१९ मध्ये डिसेंबपर्यंत ७० पूल आणि जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत ५५ पूल असल्याचे गोयल यांनी सांगितले आहे. यात जुने पूल पाडून नव्याने उभारले जातील, तर काही स्थानकांत प्रत्यक्षात नवीन पुलांची उभारणी होईल. यामध्ये काही स्थानकांत पुलांची कामेही वेगाने सुरू आहेत. अर्थसंकल्पात सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील पादचारी पूल, फलाट, पादचारी मार्गिकांना प्राधान्य देण्यात आल्याचे गोयल म्हणाले. त्यासाठी तरतूदही केली आहे.

२०१४ पासून ते आतापर्यंत ८७ पूल बांधण्यात आले. यामध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ४४ पूल बांधण्यात आले आहेत. आता आणखी १२५ पुलांची उभारणी दोन वर्षांत होईल. पूल उभारणीसाठी लागणारा कालावधीदेखील आठ ते नऊ महिन्यांनी कमी होऊन तीन महिन्यांपर्यंत आला आहे.


गेली अनेक दशकं मुंबई उपनगर वाहतूक व्यवस्थेवर अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आलं होतं. मोदी सरकार आल्यानंतर यात फरक पडला आहे.    

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.

16 January, 2017

सावरकर स्मारकात लाईट ऍन्ड साऊंड शो



दादर, मुंबई येथील वीर सावरकर स्मारकात नुकताच लाईट ऍन्ड साऊंड शो पाहिला. शिवाजी पार्कला लागून असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरच्या सावरकर स्मारकात दर शनिवार आणि रविवारी सायंकाळी आठ वाजता हा शो आयोजित करण्यात येतो. संपुर्ण भारतातील सर्वात मोठा असा हा 3D wall mapping equipment चा वापर करून दाखवण्यात येणारा शो आहे. वीस मिनिटाच्या या शो मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अमुल्य क्रातीकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. 

हा कार्यक्रम तरुणांपर्यत  पोहोचल्यामुळे अनेक स्वातंत्र्य सैनिकांच आणि क्रातीकारकांच  जीवन आजच्या पिढीला दृकश्राव्य स्वरूपात सहज पाहता येईल आणि देश प्रती असलेली प्रेमाची भावना अधिक वृद्धींगत होईल. कला आणि विज्ञान याचा संगम असलेला हा शो असून या दोन्ही क्षेत्रात पारंगत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना ही खरी श्राद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. दिग्दर्शक ओम राउउत यांनी दिग्दर्शीत केलेला हा भारतातला पहिलाच 3D शो आहे. असे शो परदेशात दाखवले जातात, परंतू भारतातला हा अशा प्रकारचा पहिलाच शो आहे.   


तात्रीक दृष्ट्या उच्च दर्जाची अशी असलेली ही सकस कलाकृती करमणूकीच्या अतिरेकात झाकोळली जाता कामा नये. शिवाजीपार्कवर येणारा जनसमुदाय या तिर्थक्षेत्राकडे वळला पाहिजे. मुंबई दर्शन करणार्‍या अनेक सहलींचा विराम घेण्याआधी सहलीची उच्चतम पातळी गाठण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. स्वातंत्र्य सग्राम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ज्वलंत इतिहास इथे थोडक्या वेळात प्रभावीरित्या मांडला गेला आहे. प्रत्येक मुंबईकराने स्वत: पहावा आणि आलेल्या पाहुणे मंडळीना आवर्जून दाखवावा असा हा खेळ आहे.              

02 March, 2016

पोर्ट्रेट पेंटींग इन आउटडोअर लाईट




पोर्ट्रेट आर्टीस्ट ग्रुपचा दुसरा वार्षिक सोहळा ‘पोर्ट्रेट पेंटींग इन आउटडोअर लाईट’ हा विषय घेऊन बोरिवली यथील वनविहार गार्डन, देविदास मार्ग, ओम शांती चौक, बोरिवली (प.) येथे दिनांक ५ आणि  ६ मार्च २०१६ रोजी संपन्न होणार आहे. दिनांक ५ मार्च २०१६ रोजी सकाळी १० वाजता चार प्रस्थापित कलाकारांची पोर्ट्रेट पेंटींगची प्रात्यक्षिकं एकाच वेळी चालू होतील. यात चित्रकार वासुदेव कामत जलरंगात, प्रा. प्रणाम सिंग (बनारस) हे स्वॉप्ट पेस्टलस, शिलाकार चंद्रजीत यादवे हे शिला घडवतील आणि गतवर्षीच्या पोर्ट्रेट आर्टीस्ट ग्रुपच्या स्पर्धेतील अंतीम विजेत मनोज साकले हे तैलरंगात पोर्ट्रेट साकार करतील. दुपारनंतर चित्रकार वासुदेव कामत, प्रा. प्रणाम सिंग, शिलाकार चंद्रजीत यादवे यांचं पोर्ट्रेट या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होईल. दिनांक ६ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत २०१५-२०१६ वर्षभरातील व्दिमासिक व्यक्ति चित्रण स्पर्धेचे सहा विजेते राजेश सावंत, अमीत धाने, अजय देशपांडे, स्नेहल पागे, नानासाहेब येवले आणि अक्षय पै यांची प्रत्यक्ष अंतीम स्पर्धा ‘पोर्ट्रेट पेंटींग इन आउटडोअर लाईट’ घेतली जाईल. या स्पर्धीतील सर्वोत्तम चित्रास ‘चित्रकार वासुदेव कामत ग्रॅण्ड प्राईझ ट्रॉफी आणि रुपये ७५,००० प्रथम विजेत्यास रुपये ५०,००० व्दितीय विजेत्यास रुपये २५,००० आणि उर्वरीत तिघांना प्रत्येकी रुपये १५,००० ची पारितोषिकं देऊन सन्मानीत करण्यात येईल.
चित्रकार वासुदेव कामत

सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत आणि कलामित्र यांच्या पुढाकाराने २०१३ साली पोर्ट्रेट आर्टीस्ट ग्रुपची थापना करण्यात आली. व्यक्ति चित्रण आणि यथार्थवादी शैलीत कलानिर्मिती करणार्‍या कलाकारांना ‘विचार आणि अभिव्यक्ति मंच’ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पोर्ट्रेट आर्टीस्ट ग्रुपचा ही चळवळ सुरू करण्यात आली. क्यक्ति चित्रण, निसर्ग चित्रण आणि सजिवाकृतींच्या चित्रनिर्मितींची कमी होत जाणारी संख्या लक्षात घेऊन त्याला पुन्हा संजिवनी देण्याचा पोर्ट्रेट आर्टीस्ट ग्रुपचा निर्धार आहे.         

या दोन्ही दिवसातील सर्व कार्यक्रम कलाजगतातील विद्यार्थी तसेच सर्व कलारसिकांना पर्वणीच ठरणार आहेत. या कार्यकरमाला सर्वांना विनामुल्य प्रवेश दिला जाईल. अधिक माहितीसाठी सौ. भारती वासुदेव कामत 022-28456613, 9820797956 या क्रमांकावर संपर्क साधावा.
            

    

17 November, 2015

आत्मानंद



 
    
बोरीवलीच्या वन विहारमध्ये पोहोचल्यावर आनंदाची अनुभूती घेण्यासाठी जमलेल्या अनेकजणात मी ही सामील झालो. बोरीवली सांस्कृतीक केंद्राने संस्कार भारती आणि पोट्रेट आर्ट ग्रुपच्या सहयोगाने आयोजित केलेल्या आर्ट फेस्टिवलचा हा जंगी कार्यक्रम होता. माजी महापौर विनोद घेडीया यांच्या कल्पक नेतृत्वाखाली साकार झालेल्या वन विहारात अनेक चित्रकार चित्र काढण्याचा आनंद घेत होते आणि माझ्यासारखे अनेक त्याच्या फुकट आस्वाद घेत होते.

एखादी कलाकृती साकार होताना पहाण्यात जी मजा आहे त्याला उपमा नाही. कोर्‍या कागदावर हळूहळू साकार होत जाणारं समोरचच दृष्य पाहताना त्या चित्रकाराची त्याच्या कुंचल्यावर असलेली हुकमत जाणवत होती. चित्रकला ही सादरीकरणाचीही कला आहे, चित्र तयार होत असताना पाहिलं म्हणजे त्या कलाकाराची त्या मागची तपस्या लक्षात येते. चित्रकार शरद तावडे नारळाचं छोटं झाड साकार करताना वापरत असलेले ब्रश, रंग, त्यांचे फटकारे हे सगळं चित्राच्या वेगळ्याच दुनियेची सफर घडवत होतं.
वीस-पंचवीस चित्रकार चित्रकारीतेचं सादरीकरण करीत होते आणि त्यांच्याबाजूला घोळका करून कलारसिक त्याचा आस्वाद घेत होते. दुपारी सुप्रसिद्ध चित्रकार विजय आचरेकर यांनी ‘पोर्ट्रेट पेंटीगचं’ प्रात्यक्षिक सादर केलं आणि सगळेच हरखुन गेले. चौथ्या-पाचव्याच फटकार्‍याला समोर बसलेल्या मॉडेलचा चेहरा कागदावर बोलका झाला. हळूहळू त्यात रंग भरत गेले आणि ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ म्हणजे काय याचा अनुभव
आला. दरम्यान चित्रकार वासुदेव कामत चित्र, चित्रकार आचरेकर यांच्या विषयी बोलत होते. सगळं कसं अनौपचारीक होतं आणि मनमोहकही. पोर्ट्रेट साकार झालं आणि मग चित्रकाराशी गप्पाही रंगल्या. त्या समारंभाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सगळेच जमिनीवर होते, श्रोते तर असणारच पण कलाकारही होते, हे विशेष !

अजून त्या सोहळ्याचा कळसाध्याय बाकी होता. सुप्रसिद्ध चित्रकार आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. वासुदेव कामत त्यांच्या ‘मोगरा फुलला’ या चित्रमालिकेवरचा ‘स्लाईड शो’ दाखवणार होते. पारल्याच्या लोकमान्य सेवा संघात दहा मिनीटं ते चित्रांवर बोलले होते तेव्हापासून मला त्याना ऎकायचं होतं. आज तो योग जुळून येणार होता. वासुदेवजींनी दाखवलेली पहिली स्लाईड पाहिली आणि मन भरून आलं आणि त्या सगळ्या स्लाईड आणि त्याबरोबर चाललेलं वासुदेव कामतांचं निरुपण म्हणजे मणीकांचन योग होता. एखादा कलाकार बहुआयामी असतो म्हणजे काय ते तेव्हा कळलं. चित्रकलेत अगाठलेली उंची त्याना जगमान्यता द्यायला पुरेशी आहे, पण ते तेवढेच चांगले निरुपण करू शकतात हे तेव्हा समजलं. सारंच वातावरण भारून टाकल्यासारखं झालं होतं.  
 

भारतातील संतांवर वासुदेव कामतानी केलेल्या ‘मोगरा फुलला’ या चित्रमालिकेत संत ज्ञानदेव ते संत विनोबा भावे यांच्या जीवनातील उत्कट प्रसंगाना कॅनव्हासवर चित्रबध्द केलं आहे. शेवटच्या चित्रातली “देवाचा तुमच्यावर विश्वास आहे, काही हरकत?” हे लिहिलेली पाटी तर षटकार मारून गेली. अनेक संत रचनांचा नव्याने अर्थ लागत होता. चित्रांमागचा भाव कळत होता. त्यासाठी  चित्रकाराने केलेल्या अभ्यासाची व्याप्ती दिसून येत होती. एक कलाकार किती तन्मयतेने चित्रं काढतो आणि तेवढ्याच लिनतेने त्याचं सादरीकरण करतो. सगळेजण मंत्रमुग्ध होवून ऎकत होते, पहात होते. नंतर दाखवलेल्या चित्रफितीत वासुदेव कामतानी वाजवलेली बासरी त्यांच ‘वासुदेव’ हे नाव किती सार्थ आहे त्याच द्योतक होत. एकूण काय त्या जवळजवळ बारा तासात आत्मानंदी टाळी लागली होती खरी.                                                                 





01 September, 2015

निज रुप


(परमस्नेही सौ. रेखा भिवंडीकर आणि अरुण आंबेरकर यांचं ‘कलासिद्धि हे चित्र, शिल्प प्रदर्शन पाहिल्यावर सुचलेलं गीत)


किती रुप रंगी, तुला पाहतो मी
आणिक अभंगी गात असे
अनंत आकार एकच उकार
तुझे निज रुप त्यात दिसे

तुझ्या या कळांना नाही रे उपमा
काय अनुपम साज असे
चौसष्ट कलांचा तुच अधिपती
विद्येचा सांगाती आद्य असे

देखणे ते रुप, रंग आणि रेषा
तुच परमेशा ठायी ठायी
अखंड व्यापशी कलासक्त मन
त्याची परिणीती आज होई

०१-०९-२०१५
नरेंद्र प्रभू
 


12 May, 2015

निरंतर

इंदापूरच्या आकार पॉट आर्ट चे कल्पक कलाकार राजेश कुलकर्णी यांचं  ‘निरंतर’ हे प्रदर्शन मुंबईत मांडण्यात आलं आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, (ऑडीटोरीयम हॉल), एम. जी. रोड, काळा घोडा, मुंबई ४०० ०२३  येथे दिनांक १२ ते १८  मे  २०१५ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील.





राजेश कुलकर्णी यांनी साकार केलेल्या या कलाकृती पाहिल्यावर फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार या गाण्याच्या ओळी सहज ओठावर येतात, पण इथला वेडा कुंभार मात्र परंपरागत कुभार नाही. राजेश कुलकर्णी यांना समोर पाहिल्यावर ते कॉर्पोरेट ऑफिसमधले अधिकारी वाटतात, पण त्यांनी कुंभाराच्या चाकावर केलेली अदाकारी पाहिली की थक्क  व्हायला होतं. या कलावंताने मातीला हात लावला की बघता बघता  समोरची माती पणती, मडकी, चंबू, घडा, नरसाळे असे अनेक आकार घ्यायला लागते. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा गणनायक, तो गणपती त्या मधून प्रकट होतो. या सगळ्या कलाकृती पाहताना आणि राजेश कुलकर्णी यांच्या कडून या कले विषयी ऎकताना  मन हलकेच गावाकडे निघून जातं.

 
पेण, जवळचच माणगाव ही तर कलाकारंचीच भुमी. गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध असलेला इलाखा हळूहळू शहरीकरणाने व्यापून जात असतानाच आणि इथले मुळचे कुंभार आपला व्यवसाय सोडून ऊपजीविकेसाठी इतर व्यवसायात गुंतले असताना राजेश कुलकर्णीनी मातीत हात घातला आणि त्यातून सोनं निर्माण केलं. आपल्या सोबत गावातील दहा-बारा तरूणांना त्या कलेचं बाळकडू पाजून तयार केलं आणि गावातच स्थिरस्थावर केलं. गाव आणि गावच्या मातीमध्ये ते भक्कमपणे उभे आहेत.
हे प्रदर्शन पाहताना आपण आपसूकच त्या मातीच्या प्रेमात पडतो. मोठी माणसं गतकाळच्या गावच्या आठवणीत रममाण होतात, इंदापूरच्या आकार पॉट आर्ट मध्ये उपलब्ध असणार्‍या कलाकृती आता या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांनी प्रदर्शनात मांडलेल्या छोट्या कलाकृती तर केवळ अप्रतिमच.

                            

16 March, 2015

विविध भारती FM वर


जुनी गाणी ऎकणं आणि पांचट बडबड यापासून वाचायचं असेल तर विविध भारतीला पर्याय नाही. पण आजपर्यंत मध्यम लहरीवरच ऎकू येणारं हे केंद्र आता FM च्या 102.8 लहरींवर ऎकता येणार आहे.

कोलकातामध्ये आधीपासूनच असलेली ही सोय आता मुंबईबरोबरच दिल्लीकरांनाही उपलब्ध झाली असून, जुन्या गाण्यांचा सर्वात मोठा खजिना असलेलं हे केंद्र रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.     

    FM वर सुस्पष्टपणे ऎकता येण्याबरोबरच मोबाईल फोन आणि कारडेकवर हे केंद्र आता ऎकायला मिळणार असल्याने जुना रेडिओ नसेल तर होणारी गैरसोय होणार नाही. 

20 February, 2015

सोंगाड्यांच्या हाती सत्ता


यावर आणखी एक मजला बांधायला प्रोत्साहन
शहर किती आणि कसं बकाल करायचं याचे धडे घ्यायचे असतील तर गेली कित्तेक वर्षं मुंबई महापालिकेत सता भोगणार्‍य़ा पक्षाकडे पहावं लागेल. रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांचं व्यवस्थापन किमान चांगलं ठेवून, शहरातील रस्त्यालगतच्या फुटपाथ( याला पादचारी मार्ग असा पर्यायी शब्द आहे. ) वरून नागरिकांना व्यवस्थीत चालता आलं पाहिजे एवढीही सेवा ज्या सत्ताधारी पक्षाला देता आली नाही ते आता या शहराची  उरली सुरली झोप उडवायच्या मागे लागले आहेत. प्रत्येक गोष्टींमध्ये केवळ स्वत:चाच विचार करणार्‍या आडमुठ्या नेतृत्वाचे दशावतार गेले काही महिने आपण पाहतोच आहोत, त्यात आता या पुढच्या पिढीच्या वारसदारांनी मुंबईची दुर्दशा करायचा चंग मांडला आहे. 

ही सुधारणा
इथे येणारा पर्यटक आणखी एक दिवस (खरं तर रात्र) थांबला तर महसुलात भर पडेल म्हणणार्‍य़ांना आणि उठसुट शिवरायांचं नाव घेणार्‍यांना महाराष्ट्रातले गड-किल्ले का दिसत नाहीत? पाच वर्षात एक किल्ल्याला जरी त्याचं पुर्वीचं रुप देता आलं तरी जगभरातील पर्यटकांचा ओघ या मराठी भूमीत वळल्याशिवाय रहाणार नाही. ते करायचं सोडून नाईट लाईफच्या मागे लागायचं म्हणजे अतीच झालं. असलेल्या लोकांना किमान सुविधा न देता ‘झोपडपट्टी वासियांना मोफत घरं’ असल्या भंपक आणि कधिही पुर्‍या न होणार्‍या घोषणा करून मुंबईत गर्दीला निमंत्रण धाडून हे शहर अधिक विद्रूप केलं गेलं आहे, आता झोपडीच्या वरच्या मजल्यालाही संरक्षण देण्याचं आश्वासन पुढील निवडणूकांवर डो:ळा ठेवून दिलं जात आहे. खरं तर झोपड्या कधी हटत नाहीत. तिथली माणसं इमारतीत रहायला गेली तरी पुन्हा त्या जागेवरची झोपडी तशीच असते. कायद्याच्या मर्यादा कुणीच पाळत नाही. “स्वाईन फ्लू हा हृदयविकार आहे  आणि तो उष्णतेमुळे होतो आणि त्यावर उपाय म्हणून शहरात झाडं लावणार आहोत” अशी मुक्ताफळं उधळणारी व्यक्ती महापौर पदी आहे.
यांच्या लाईफचं काय? 
त्यांचे कर्ते-करविते ‘नाईटलाईफ’ चा गेम सुरू करण्याच्या मागे आहेत.  प्रत्यक्षात आश्वासनपुर्ती करता आली नाही की नवनवीन क्लुप्त्या काढून पुढील निवडणूक जिंकायची असा धंदा आहे आणि जनहिताचं सोग आणून हे सोंगाडे आपल्याला झुलवू पहात आहेत. सोंगाड्यांच्या हाती सत्ता किती दिवस ठेवायची? मोकळ्या जागा व्यापणं आणि जनतेने दिलेल्या करातून ज्योत पेटवणं हेच कायते यांचं कर्यव्य आणि करून दाखवणं.

26 November, 2014

शशीकांत धोत्रे: एक सिद्धहस्त कलाकार


शशीकांत धोत्रे या सिद्धहस्त कलाकाराच्या कलाकृतींचं प्रदर्शन ‘इंडीया आर्ट फेस्टीव्हल’च्या चौथ्या प्रदर्शनात मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये भरणार आहे. नेहरू सेंटर, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई ४०० ०१८ या ठिकाणी दि. २८ ते ३० नोहेंबर २०१४ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत सदर प्रदर्शन सर्व रसिकांसाठी विनामुल्य खुलं राहील. रंगीत पेन्सीलने चितारलेली ही चित्रं म्हणजे चित्रकलेचा अनोखा नजराणा आहेत.     

 

अवखळ मुलगी ते संसारात रममाण झालेली स्त्री या दरम्यान तीच्या प्रगल्भ होत जाणार्‍या भावना, हळवं प्रेम, हुरहुर, आत्ममग्न मन, दळण दळत असताना सखीशी केलेलं हितगुज, घडीभर विश्रांती घेणारी गृहिणी, मेंदीची नक्षी काढण्यात दंग असलेल्या मैत्रिणी, मातीची भांडी रंगवण्यात मग्न झालेली तरुणी अशी सुमारे वीस चित्रं या प्रदर्शनात मांडली जाणार आहेत. प्रथम दर्शनी छायाचित्रंच वाटणारी ही हुबेहूब चित्रं पाहून पाहणारा दंगच होवून जातो.                    

रंगीत पेन्सीलने चित्रीत केलेली ही चित्रं म्हणजे शशीकांत धोत्रे यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीची नजाकत आहे. या माध्यमाचा उपयोग करून एवढ्या मोठ्या प्रमाणात हुबेहूब काढलेली चित्रं पाहण्याच्या योग या प्रदर्शनानंतर भारतभरातील रसिकांना लाभणार आहे. पुढच्या संपुर्ण वर्षात भारतभर भ्रमण झाल्यावर मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत वर्षअखेर हे प्रदर्शन भरणार आहे.

        
या प्रदर्शनाला आर्ट सोसायटी ऑफ इंडीया(२००८), बॉम्बे आर्ट सोसायटी(२००९) चा प्रथम पुरस्कार, राज्यस्थरीय आशा दीप पारीतोषीक (२०१०), इंडीया आर्ट फेस्टीव्हल चा प्रथम पुरस्कार (२०११), महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (२०१३) अशा अनेक नामंकीत संस्थांकडून परितोषीकं मिळाली असून मुंबईतल्या नामांकीत कलादालनांमधून शशीकांत धोत्रे यांनी चित्रंप्रदर्शनं मांडली आहेत.       
            
पुढील एका वर्षात देशभरातील सत्तावीस शहरात एकाच कलाकाराने मांडलेलं हे एकल प्रदर्शन भ्रमंती करणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं हे एकमेव प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनाला मुंबईकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि कलेचा आस्वाद घ्यावा.          



06 November, 2014

मराठी संस्कृतीचा दळभद्री गुण


गोड गोड लिहीण्यापेक्षा सडेतोड लिखाणासाठी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर प्रसिद्धच आहेत. श्रीमंत होण्यासाठी आधी तसे संस्कार व्हावे लागतात, मग तसे विचारमनात येतात. नंतर त्या अनुशंगाने कृती होते आणि मग वाटा दिसायला लागतात. नंतर प्रयत्न आणि मग सिद्धी. हा असा मार्ग असताना मुळातच 'धट्टीकट्टी गरिबीच बरी, अंथरुण पाहून पाय पसरा, देवाला भिकारदास आणि गरिबाला दरिद्रीनारायण असली नाव आणि म्हणी प्रथम हद्दपार केल्या पाहिजेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला एकवीस वर्ष पुर्ण झाली त्या निमित्ताने लोकसत्ताचा हा अग्रलेख प्रत्येक मराठी माणसाने वाचलाच पाहिजे.        


अर्थव्यवस्था बदलत असताना भांडवली बाजारात घपले घडू लागले, ते टाळण्यासाठी एक छोटे- पण महत्त्वाचे पाऊल २० वर्षांपूर्वी उचलले गेले. आर एच पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या नव्या, संगणकाधारित भांडवली बाजाराने - 'एनएसई'ने २१ व्या वर्षांत सशक्तपणे पदार्पण केले आहे..

मराठी संस्कृतीचा सर्वात दळभद्री असा कोणता गुण असेल तर संपत्तिनिर्मितीस कमी लेखणे. पैसे कमावणे हे जणू काही पापच आहे आणि ते न कमावणारे हेच थोर थोर आहेत अशा स्वरूपाचे संस्कार मराठी मनांवर लहानपणापासूनच होतात. परिणामी जरा कोणी पैसे मिळवणारा वा मिळवताना दिसला की तो नक्की भानगडबाजच असणार अशा स्वरूपाची खात्री मराठी मनामनात आपोआपच होते. त्याचमुळे देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार, बाँबे स्टॉक एक्स्चेंज, या मराठी राज्याच्या राजधानीत असूनही मराठी पावले त्याकडे वळलीच नाहीत आणि मराठी माणूस त्या बाजारास सट्टाबाजार म्हणून खिजवत आपले भिकार नैतिक दारिद्रय़ मिरवत राहिला. समस्या ही की मराठी समाजातील हा दुर्गुण दूर करण्याचा प्रयत्न करावा असेदेखील कोणा राजकीय पक्ष वा संघटनेस वाटले नाही. मराठी अस्मितेच्या नावाने राजकारण करणाऱ्यांची बौद्धिक कुवत वडापावच्या गाडीच्या आसपासच घुटमळत राहिली आणि स्वत:ची धन करण्यापलीकडे मराठी माणसाच्या संपत्तिनिर्मितीत महत्त्व द्यावे असे या मंडळींना कधी वाटले नाही. मुंबई महाराष्ट्रात राहणार की जाणार अशा काल्पनिक मुद्दय़ांवर लढण्यात या मंडळींना शौर्य वाटत होते. मुंबई महाराष्ट्राच्या सीमांत राहिली खरी पण मुंबई तुमची भांडी घासा आमची, हेच ऐकण्याची वेळ मराठी माणसावर आली. या सगळ्याचा दूरगामी परिणाम असा की मराठी माणूस आर्थिक  संपन्नांच्या सान्निध्यात अजूनही कानकोंडा होतो आणि विपन्नांच्या संगतीतच त्यास हायसे वाटते. तेव्हा या अशा मुंबई नगरीत स्थापण्यात आलेली नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, एनएसई, ही यंत्रणा आज एकविसाव्या वर्षांत पदार्पण करीत असून तिच्या वाटचालीची दखल घेणे हे या मराठी मानसिकतेवर काही प्रमाणात तरी उतारा ठरू शकेल.

ही अशी दखल घेण्याची अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे या एनएसई नामक भांडवली बाजाराने भारतीय अर्थव्यवस्थेतील एका महत्त्वाच्या घटकात शिस्त आणली आणि त्यायोगे बाजारपेठेवरील विश्वास वाढवला. हे झाले तो काळ पाहिल्यास याचे महत्त्व पटेल. हर्षद मेहता नामक व्यापारी सांडाने बाजारात धुमाकूळ घातला होता. भांडवली बाजार आणि बँकिंग व्यवस्था यांतील कच्चे दुवे चतुरपणे हेरत हर्षद मेहता याने भारतातील पहिला मोठा भांडवली बाजार घोटाळा करून दाखवला आणि स्वत:चे आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचेही अध:पतन घडवून आणले. हा काळ पंतप्रधानपदी नरसिंह राव आणि अर्थमंत्रिपदी मनमोहन सिंग यांच्या असण्याचा. देशाच्या सीमा आर्थिक सुधारणांच्या वाऱ्यांनी मुक्त झालेल्या आणि परकीय भागभांडवल भारताकडे संभाव्य गुंतवणूक गंतव्यस्थान म्हणून पाहू लागले होते. परंतु भांडवली बाजारातील या घोटाळ्याने भारताविषयीच्या विश्वासास मोठाच तडा गेला होता. अर्थात हा तडा घालवण्याचे पुण्यकर्म करणारा हर्षद मेहता ही काही पहिली विभूती नव्हे. त्याआधी दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणाऱ्यांनी समभाग प्रमाणपत्रांची बनावट मालिका छापून बाजाराची झोप उडवली होती. त्या काळात समभाग हे कागदी स्वरूपात असत आणि अनुक्रमांकांनी त्यांची नोंद ठेवली जात असे. परंतु या थोर महाशयांनी या अनुक्रमांकांचीच चोरी केली. परिणामी एकाच अनुक्रमांकाचे अनेक समभाग बाजारात उपलब्ध झाले आणि एकच हलकल्लोळ झाला. तेव्हा इतक्या मागास आणि लबाडांना आवतण देणाऱ्या व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज वाटू लागली होती. त्यासाठी पर्याय होता बाँबे स्टॉक एक्स्चेंजमध्येच आमूलाग्र सुधारणा घडवणे वा स्पर्धा म्हणून एक स्वतंत्र एक्स्चेंज जन्माला घालणे. यातील दुसरा निवडला गेला. याचे कारण जुन्या पडक्या वाडय़ाची डागडुजी करण्यापेक्षा नवीन इमला बांधणे अधिक सोपे आणि आर्थिकदृष्टय़ा परवडणारे असते. खेरीज नवीन घर हे बदलत्या काळानुसार बांधता येते. त्याचमुळे असे नवीन घर बांधण्याचा निर्णय झाला.

हे नवीन घर म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज. ही घटना १९९२ सालची. म्हणजेच आर्थिक सुधारणांना वर्ष होत असतानाची. त्या वेळी या नव्या घराची चावी कोणाच्या हाती द्यावी यासाठीदेखील मोठा खल झाला होता. या जबाबदारीसाठी लायक व्यक्ती अनेक होत्या तरी लायकीइतकीच निष्ठा आणि बांधीलकी हे गुण असणे अधिक महत्त्वाचे होते. कारण मुंबई भांडवली बाजारात जे काही उद्योग सुरू होते ते पाहता ही नवीन बाजारपेठ पूर्णपणे घोटाळामुक्त असणे गरजेचे होते. या सर्व निकषांवर निवडली गेलेली व्यक्ती ही मराठी होती ही बाब लक्षात घेण्यासारखी आणि एनएसईची विशी साजरी करण्यासाठी आणखी एक कारण ठरणारीदेखील. त्या वेळी आयडीबीआय या बँकेच्या प्रमुखपदी होते एसएस नाडकर्णी. या नाडकर्णी यांनी अनेकांना घडवले आणि त्या घडलेल्यांतील एका व्यक्तीने पुढे नाडकर्णी यांच्या हाताखाली काम न करता स्वतंत्रपणे काही नवे करण्यासाठी आयडीबीआय सोडली. यांच्याचकडे एनएसईची सूत्रे देण्यात आली. रामचंद्र पाटील हे त्यांचे नाव. पुढील काळात आरएच पाटील या व्यक्तीच्या नावावर अनेक आर्थिक संस्थांची नोंद झाली. परंतु या अनेक संस्थांतील मानाचा तुरा म्हणजे एनएसई. या बाजाराने भारतीय भांडवली बाजाराचा चेहराच बदलून तो अधिकच साजिरा आणि आश्वासक केला. कोणत्याही नव्या व्यवस्थेस नाके मुरडणे, तिचे अहित चिंतून ती कशी अपयशी होईल याचे प्रयत्न करणे हे आपल्या समाजाचे लक्षण. त्या लक्षणांना सामोरे जाण्याची वेळ एनएसईवरदेखील आली. लीधो-वेचो करीत समभागांची खरेदी-विक्री करणाऱ्यांचे वर्तुळ एनएसईत कधीच नव्हते. सुरुवातीपासून चोख संगणकीय पद्धतीने व्यवहार करणाऱ्या एनएसईला कधीही बाजारपेठीय गोंगाटाचा स्पर्श झाला नाही. त्या अर्थाने या नवीन पद्धतीत विक्रेत्यांची कलकल, वर्दळ वा गलका कधीच नव्हता. त्यामुळे हा बाजार बाजार वाटायचाच नाही. तेव्हा जन्मल्या जन्मल्या त्याचे मृत्युलेख लिहिले जाणे अपरिहार्य होते.

परंतु ते सर्व फोल ठरले आणि भारतीय कल्पनाही करू शकत नव्हते अशा स्वरूपाचे एक्स्चेंज यातून उभे राहिले. या बाजारपेठेचे यश साजरे करण्याचे आणखी एक कारण म्हणजे या व्यवस्थेच्या निमित्ताने आणखी एका, पूर्ण भारतीय महाकंपनीचा जन्म झाला. एनएसईची स्थापना, तिचे पूर्ण संगणकीकरण, संगणकीय आज्ञाप्रणाली, यंत्रसामग्री आदी प्रचंड पसारा हाताळण्याचे काम अनेक बलाढय़ परदेशी कंपन्या स्पर्धेत असतानाही एका तुलनेने नगण्य अशा भारतीय कंपनीस दिले गेले. ती कंपनी म्हणजे टीसीएस. यातील वैशिष्टय़ाची बाब ही की टीसीएसने या बाजाराची उभारणी दिलेल्या मुदतीच्या आधीच पूर्ण केली आणि अखेर ४ नोव्हेंबर १९९४ या दिवशी एनएसईवर पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, बडय़ा विकसित देशांत होतात तशाच पद्धतीने व्यवहारांस सुरुवात झाली. या काळात वरळीतील एका बडय़ा इमारतीत अत्यंत छोटेखानी खोलीत पाटील यांचे कार्यालय होते. त्यांना भेटावयास गेलेल्या एका उद्योगपतीने ते पाहून अधिक मोठय़ा कार्यालयाची गरज व्यक्त केली. त्यावर पाटील म्हणाले, मोठेपणा विचारात हवा, कार्यालयासाठी एक टेबल आणि संगणक इतकेच पुरेसे असते. जेव्हा जन्माला आले त्या वेळी एनएसईत एका सेकंदात दोन व्यवहार इतकेच व्यवहार होत. सहा वर्षांत त्याची गती एका सेकंदात ६० व्यवहार इतकी झाली. आजमितीला या एक्स्चेंजमध्ये एका सेकंदात तब्बल एक लाख ६० हजार व्यवहार होतात आणि जगातल्या पहिल्या २० एक्स्चेंजमध्ये त्याची गणना होते. 

तेव्हा अशा तऱ्हेने पूर्ण भरात आलेल्या, अर्थक्षमतेने मुसमुसत्या या बाजारपेठेचा विसावा जन्मदिन साजरा करणे हे आपले कर्तव्य ठरते. त्याची आठवण करून देण्यासाठीच हा प्रपंच.

27 September, 2014

मुंबईचा पाऊस


महाराष्ट्र मंडळ न्युयॉर्कच्या स्नेहदिप अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख:

मुंबईत सदासर्वकाळ घामाचा पाऊस पडत असतो. ट्रेन, बस, फुटपाथ कुठेही जा घाम हा ठरलेला. त्याला कुणी इथलं दमट हवामान कारणीभूत आहे असं म्हणत असलं तरी मला ते तेवढं पटत नाही. कारण इथला माणूस सतत धावत असतो, श्रम करीत असतो. फुकट चकाट्या पिटत  बसलेला माणूस इथे दिसणार नाही. ट्रेनच्या गर्दीत या घामाच्या पावसाचा जोर वाढतो आणि अनेक वेळा दोन  माणसांच्या घामाचा संगमही होतो. खरा पाऊस बरसला की मात्र या घामकर्‍यांची धांदल उडते. पाऊस आला तरी दोन-चारदा भिजल्याशिवाय खरा मुंबईकर छत्री हातात घेत नाही. इमारतींचा आसरा घेत, टॅक्सी......, ऑटो........ असं ओरडत तो घर किंवा ऑफिस गाठण्याचा प्रयत्न करतो. तो नेहमीच यशस्वी होतो असं नाही. पाऊस आला रे आला की सगळॆ रिक्षा टॅक्सीवाले तुम्हाला हवं ते ठिकाण सोडून विरुद्ध दिशेलाच जायला उत्सुक असतात. वाहन पकडण्याच्या नादात मात्र आपण ते पकडायच्या आधीच चिंब होतो. कधी पावसाने तर कधी रस्त्यातल्या खड्ड्यातल्या पाण्याचा सपकारा एखादं वाहन असं उडवतं की आपण नखशिखांत भिजून जातो. छत्री असल्याने भिजणारे किंवा भिजलेला रेनकोट घालून ट्रेनच्या गर्दीत घुसणारे कावळॆ दुसर्‍या स्टेशनला उतरताना अंग पुसून साफरूफ होवून बाहेर पडतात.   

कालच्या भिजण्याच्या अनुभवाने शहाणा झालेला मुंबईकर आता छत्री घेऊन बाहेर पडतो आणि पहिल्याच पावसाने बावरून गेलेली लोकल त्याला ‘आजका दिन मेरा है” अशा थाटात जेरीस आणते. नुकत्याच सुरू झालेल्या पावसाने ही ‘लोकल’ मुंबईच्या ‘लो’ लाईन एरीयामे पानी भरने के कारण अभी ‘कल’ ही चलेगी असं वाटायला लागतं. ती लोकल मग जलराणीच होऊन जाते. वरून पडणारा पाऊस दारं-खिडक्यांची तमा नबाळगता आतल्या गर्दीला सर्दी होईल याची काळजी घेत असतो, काही भाग्यवान लोक जर त्यापासून बचावलेच तर मग छपरातून होणारा अभिषेक ती कमी भरून काढतो. वर हे जलधारांचं नाट्य तर खाली रुळांवर साचलेलं पाणी नौकानयनाचा आनंद देतं असतं. एका छोट्याश्या प्रवासात आणि अल्प दराच्या तिकीटात असे अनेक अद्भूत अनुभव देणारी वाहतूक जगाच्या पाठीवर दुसरी नसावी. आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली मेट्रोही यात मागे नाही. रस्त्यावरील गर्दीला  टाटा करीत उन्नत मार्गावरून ऎटीत जाणारी मेट्रो सध्या कौतूकाचा विषय बनली आहे.  वातानुकुलीत असल्याने या मेट्रोत घाम येत नाही. उंचावरून प्रवास चालू असल्याने आता ट्राकमध्ये पाणी भरलं म्हणून वाहतूक अडणार नाही. मेट्रोने प्रवास करणार्‍यांचे तरी आता ‘अच्छे दिन’ आले असं वाटायला लागलं. पण स्वयंचलीत दरवाजे बंद झाल्यावर पावसाचं पाणी आत येण्याची शक्यता नसल्याने बाहेर पडणार्‍या पावसाची मजा घेत प्रवास करणार्‍या मुंबईकरावर त्या दिवशी छपर फाडके पावसाची बरसात प्रत्यक्ष मेट्रोत झालीच. मुबईचा पाऊस लोकांशी जवळीक साधायला असा कुठूनही प्रगट होत असतो.

मुंबईत पावसाळ्याआधी करण्याची कामं मात्र मुबईकर पहिल्या पावसाच्या सरी पडल्यानंतरच करताना दिसतो. या गोष्टीला महापालिका आणि रेल्वे प्रशानही अपवाद नाही. पहिल्याच पावसाने दणका दिल्यावर सगळेच जागे होतात आणि मग कामाला लागतात. महापालिकेचं अर्ध काम पाऊसच करतो. गटारात साचलेला कचरा वाहून जातो आणि ते साफ केल्याचं श्रेय मात्र अधिकारी घेत असतात. मुंबईचा डबेवाला सोडून मुंबईत कुणी टोपी घालताना दिसत नाही पण हल्ली बर्‍याच इमारतीना पावसाळ्यात टोप्या घातलेल्या दिसतात. (नशीब इकडे तो केजरीवाल नाही, अन्यथा त्याने या टोप्यांवर ही ‘हुँ आम इमारत’ असं लिहून टाकलं असतं.)

या मुंबईत तिनशे पासष्ठ दिवस काहीना काही उत्सव सुरू असतात. धार्मिक नसले तर मग ‘मुंबई फेस्टीव्हल’, ‘फिल्म फेस्टीव्हल’ असे अनेक उत्सव इथे घडत असतात. पावसाळ्यात शाळा कॉलेज सुरू झाल्यावर वर्षा सहलींचा एक उत्सव सोहळाच सुरू होतो. दर आठवडा अखेर जवळच्या नदी, तलाव, धबधबे, समुद्र किनारा जिथे म्हणून पाणी आहे तिथे हौशी आणि दर्दींची झुंबड उडते. माणसं आणि पाणी दोन्ही उसळत असतात. समुद्राला उधाण येत आणि गर्दीलाही. पावसाळ्यात ट्रेकिंगला जाणारा मुंबईकर तेवढाच निसर्ग आपल्या कवेत घेवून सुखावतो. मामाचं गाव, गावाकडचं घर या संकल्पना आता पातळ होत चालल्यात पण दर आठवडा नाही जमलं तर निदान पंधरवड्याला तरी ट्रेकिंग करणारे अनेक मुंबईकर आपल्याला दिसून येतील.

मुबईकरांना असलेलं हे पावसाचं कौतूक पाहून कधी कधी पाऊसही हुरळून जातो आणि तो त्याची भेट घेण्यासाठी थेट त्याच्या घरात प्रवेश करतो. २६/७ ही तारीख मुंबाईकर विसरू शकत नाही २६/११ ला दहशत वाद्यांनी जशी दहशत माजवली तशीच दहशत त्या पावसाने २००५ साली माजवली होती. इमारतीच्या आवारात पाणी आलं म्हणून नातवाला घेवून कागदी होड्या पाण्यात सोडणार्‍य़ा आजोबांना काही वेळाने खर्‍या होड्यामधून सुरक्षीत स्थळी सोडावं लागलं. दहशतवाद्यांनी मारली तशीच माणसं पावसाने डोळ्यादेखत ओढून नेली. अवघी मुंबई जलमय झाली.

यंदा मात्र जुलै उजाडला तरी पाऊस बरसलाच नाही आणि मुंबाईकराच्या तोंडचं पाणी पळालं. शब्दश: पाणी पळालं. नळाला पाणी नाही तर काय करायचं? कुठं जायचं? मायानगरी म्हणून सगळे इकडे धाव घेतात आता या संकट समयी मुंबईकराने कुठं जायचं? कित्येक वर्ष चावून चोथा झालेले उपाय पुन्हा वर्तमान पत्रांचे रकाने भरून वाहू लागले. हे उपाय वेळीच केले असते तर पाणी राखता आलं असतं. आता काय करायचं? पावलोपावली अडथळ्याची शर्यत असल्याने सतत खाली बघून चालणारा मुंबईकर कधी नव्हे तो आभाळाकडे टक लावून पाहू लागला.  दोन दिवस पाऊस पडला आणि पाण्याची समस्या कमी झाली असं इथे होत नाही. चांगला महीनाभर पाऊस पडल्यानंतर इथल्या नळाला पाणी येतं. महापालिकेने पाणी कपात केली आणि बालदीत घ्यायचं पाणी मुबईकराला कपात घ्यायची पाळी आली. आता काय करायचं? बेडकाच लग्न लावायचं?  बेडकाच लग्न लावलं म्हणजे म्हणे पाऊस पडतो. कशाने का होईना पाऊस पडूदे म्हणून बेडकाची शोधाशेध सुरू झाली. आधीच पाऊस नाही, तो नाही म्हणून चिखल नाही, चिखल नाही म्हणून बेडूक नाही अशी साखळी समस्या उभी ठाकली. मुंबईत बेडूक नसतातच, अशा परिस्थितीत ते आणखी दुरापास्त. काय करावं? हल्ली मुंबईत कसलीही कमतरता भासली की चिनी ती भरून काढतात. मागे कांद्याची आवक घटली तेव्हा चिनी कांदे बाजारात आले होते. बघून कळतच नव्हतं ते खरे की खोटे. तर या वेळीही चिनी बेडूक वाजारात दिसले तेच बेडूक घेवून त्यांची लग्न लावली गेली. थेडा पाऊस पडला लगेच चिनी छत्र्या बाजारात आल्या. हल्ली सगळच चिनी असतं इकडे. फक्त बसक्या चिनी नाकाचाच कायतो तुटवडा आहे.


कुणाच्याका बेडकाने पडेना पण पडलेल्या पावसाचं मुंबईकराला भारी कौतूक. एकदा पाऊस पडला की तलावात किती पाणी भरलं याची आकडेवारी वर्तमानपत्रात यायला लागते. वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, मोडकसागर एकदा का भरली की मुबईकरांचा जीव भांड्यात पडतो, तो भांड्यात जमवलेलं पाणी ओतून टाकतो आणि नळाचं पाणी वहायला लागतं, पुन्हा थेंब... थेब... गळे पर्यंत. 


19 September, 2014

'मर्यादा पुरूषोत्तम' - प्रदर्शन: चित्रकार वासुदेव कामत



जगविख्यात चित्रकार वासुदेव कामत यांचं मर्यादा पुरूषोत्तम हे चित्रप्रदर्शन  १६१ बी, एम, जी रोड, जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई ४०० ०२३ येथे माडलं जाणार आहे. हे प्रदर्शन दि. २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१४ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.

‘रामायण’ हा सर्वच मानव जातीचा श्रद्धेचा विषय राहीला आहे. याच रामायणातील काही प्रसंग कॅनव्हासवर चित्रीत करताना त्यातील भाव आत्मसात करण्याचा प्रयत्न चित्रकाराने केला आहे. या विषयी बोलताना चित्रकार वासुदेव कामत म्हणतात “परिस स्पर्शाने लोखंडाचं सोन होतं असं म्हणतात पण मुळात परिस आहे का? हा जसा प्रश्न पडतो तसंच रामकथा हे वास्तव की कविकल्पना असा विचार करीत बसण्यापेक्षा या कथेचं सार लक्षात घेवून त्यातून होणारे संस्कार खुप महत्वाचे आहेत. रामलीला आणि ग.दि.मांचं ‘गीतरामायण’ यांनी बालपणापासून माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत आणि ती पुंजी आयुष्यभर पुरण्यासारखी आहे. त्यापासूनच प्रेरणा घेवून ‘मर्यादा पुरूषोत्तम’ ही चित्रमाला रंगविण्याचा संकल्प सिद्धिस नेला.”


आजवर अनेक माध्यमातून रामायण सर्वांसमोर आलं आहे. यात आणखी काय भर घालणार असं वाटत असतानाच रामसेतू उभारताना चिमुकल्या खारूताईचं जे योगदान होतं ते पाहून मला प्रेरणा मिळाली असं सांगताना कामत म्हणतात की   त्या खारीएवढंच योगदान देवून मी पूर्वसुरींच्या साहित्य आणि कलाकृतींना जोडला जावू इछितो.


या प्रदर्शनात चित्रकार वासुदेव कामत यांनी प्रेम, मैत्री, वचन, त्याग आणि दृढता अशा अनेक भावना व्यक्त होणारी ‘रामदास हनुमान’, ‘राम-चंद्र दर्शन’, ‘जनक सूता सीता’, ‘अहल्या उद्धार’, ‘भरत मिलाप’, ‘कपिसे उऋण हम नही’, ‘गुंफिते बदरी बिजांची तपमाला’, ‘भरत राज’ अशा अनेक चित्रांची गुंफण केली आहे.

आज रावणालाही लाजवेल अशा दुष्ट प्रवृत्ती माजल्या असून त्याचं निर्दालन करणारा राम आपल्या मनात जागृत झाला तर तेच या प्रदर्शनाचं फलित असेल.

पौराणिक कथा कॅनव्हासवर जिवंत होताना पाहण्याचा हा ऎतिहासिक क्षण रसिकांनी अनुभवण्यासारखा आहे.  



LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates