23 February, 2012

केल्याने देशाटन


बरेच दिवस एकाच परिघात फिरत राहिलं तर जीवन निरस होत जातं. पण भ्रमंतीच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यावर, किंबहूना पडतानाच हुरूप येतो. फिरण्यासाठी आपण कुठे जातो या पेक्षा जातो की नाही याला खुप महत्व आहे. पण समजा खंडप्राय अशा आपल्या भारत देशात जर आपण एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे प्रयाण करणार असू आणि काही तासातच दूरवर पोहोचणार असू तर काय बहार येईल महाराजा ! पण हे मी का सांगतोय..... कारण...... आज मी मुंबईहून पुर्वांवांचलाच्या सफरीवर निघालोय.  पुर्वांचल म्हणजे असा प्रश्न पडला का? अहो, असम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपूरा, नागालॅंड, मणिपूर आणि मिझोराम या भारताच्या पुर्वेकडच्या सात राज्यांना पुर्वांचल म्हणतात. 

तर आज आत्ता आमचं विमान मुंबईहून निघून दिल्लीत काही वेळासाठी थांबलं आहे. थोड्या वेळाने ते गुवाहाटीसाठी रवाना होईल, घाई नाही पण मला शक्य तेवढ्या लवकर तिकडे गुवाहाटीला पोहोचायचं आहे. गडबड, गोंधळ या पासून दूर एक अनोखा प्रदेश माझी वाट पाहात आहे. मुख्य म्हणजे माझा प्रिय मित्र आत्मा (मित्र हो,..., हे महा भारी प्रकरण आहे.) मला भेटणार आहे. पण हे गुपीत मी माझ्या मनातच ठेवलय, बरोबरच्या मंडळींना त्याचा अजून थांगपत्ता नाही. असो त्याला अचानक पाहिल्यावर काय होतं बघूया.

आला..... आत्माचाच फोन आला......   .... .... ......

चला, हा कोलकात्याच्या विमानतळावर पोहोचतोय, आमचं विमान उडण्याची तयारी झालीय, आता लॅपटॉप बंद करावा लागणार तेव्हा पुढचा वृतांत नंतर देईनच. तुर्त थांबावं लागतय.

आपलाच रोजचा मित्र, पण तो वेगळ्या प्रदेशात भेटणार, यातही एक वेगळी मजा असते. तिथे गेल्यावर एका छप्पराखालची माणसं एकाच घरातील होवून जातात. बघूया काय होतं ते, आत्मा सोडून बाकी सार्‍यांची अजून तशी सारखी ओळख व्हायची आहे. हो.. दांडेकर साहेब आधीपासून परिचयाचे  आहेत. असो.  

इलेक्ट्रॉनीक उपकरणं बंद करा अशी सुचना झाली तेव्हा हे आता बंद करतो. पण आता मला तिकडे गुवाहाटीला आत्मा भेटणार की काझीरंगाला ?


13 February, 2012

प्रेम कुणावर करावं ?प्रेम कुणावर करावं?
प्रेम...
योगावर करावं
भोगावर करावं
आणि त्याहूनही अधिक
त्यागावर करावं.

कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळी प्रेम म्हटलं की सहज ओठावर येतात. व्हालेंटाईन डे च्या निमित्ताने किंबहूना त्या निमित्त मांडलेल्या बाजारामुळे या गोष्टीकडे अधिक लक्ष वेधून घेतलं गेलं. प्रेम कुणावरही करावं..... पण भोगावर करता करता योगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं हे आताशा विसरलं जावू लागलय. योग तर कधीचाच दूर गेला, त्याग फक्त दातृत्वाचा केला गेला आणि भोग हा एकमेव प्रेमाचा विषय झाला. भोग, त्यासाठी लागणारा पैसा या मागे माणूस लागला आणि स्वत:वरच प्रेम करायला विसरला. प्रेम दुसर्‍यावर करावं पण त्याहूनही अधिक स्वत:वर करावं. स्वत:च्या प्रकृतीवर करावं, स्वत:च्या सकारात्मक वागणूकीवर करावं, मित्रामित्रांमधल्या दृढ नात्यांवर करावं, जगण्यासाठी लागणार्‍या साधनांवर करावंच पण त्याही पेक्षा अधिक स्वत:च्या जगण्यावर करावं. मित्रांनो आपण हे जगणच हल्ली विसरून गेलोय. तेव्हा व्हालेंटाईन डे च्या निमित्ताने एक प्रेमळ आर्जव आहे:

प्रेम भोगावर करावं
त्यासाठी लागणार्‍या साधनांवर करावं
आणि त्याहूनही अधिक
आपल्या जगण्यावर करावं. 

03 February, 2012

लिटल ब्युटी


जीवनी संजिवनी तू बालकाचे हास्य का ? जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असणार्‍या भगवंताला कवीने विचारलेला हा प्रश्न. खरच देवाचं दर्शन याची देही याची डोळा घ्यायचं असेल तर फुलं आणि मुलं यांच्या शिवाय पर्याय नाही. रोज नवोन्मेषाने बागडणारी बालकं पाहिली की जीवन किती आनंदाने भरलेलं आहे याचा साक्षात्कार होतो. आजच्या धकाधकीच्या रहाटगाडग्यात या मुलांकडे पाहायला वेळ कुणाकडे आहे?
पण त्या सानुल्या बालकांचे अनेक भावविभ्रम केवळ एका पेंसिलच्या सहाय्याने साकार केले आहेत विनायक धारगळकर यांनी. चिमुकल्यांच्या चेहर्‍यावरचे निरागस भाव तेवढ्याच तरलतेने कागदावर उतरवलेले पाहून आपण थक्क होवून जातो.  गोजीर्‍या बालकांचं हास्य, लटका भाव, खेळात रममाण होणं, आपल्याच नादात असणं, विस्फारीत नेत्रांनी जगाकडे पाहाणं, फुरंगटून बसणं अश्या अनेक भावमुद्रा त्यांनी तेवढ्याच हळूवारपणे सादर केल्या आहेत. एका स्केच मध्ये तर ती चिमुरडी आपणला पाठमोरी दिसते पण तिच्या चेहर्‍यावरचे कुतुहूल आपणाला तो चेहरा न पाहताही जाणवत राहतं हेच धारगळकारांच्या हातामधलं कसब आहे.

अशाच अनेक चित्रकृती लिटल ब्युटी या आपल्या प्रदर्शनातून विनायक धारगळकर यांनी मांडल्या आहेत. स्थळ आहे, ऎरावत आर्ट गॅलरी, 29 बाळक़ृष्ण निवास, एल. एन. रोड, वेलिंगकर मॅनेजमेंट इंस्टिट्यूट जवळ, माटुंगा (मध्य रेल्वे) मुंबई 400 019. दि. 2 ते 11 फेब्रुवारी 2012, सकाळी 11 ते  सायंकाळी 7 या वेळात सदर प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले आहे. अधिक माहितीसाठी 24135851 वर संम्पर्क साधावा.                 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates