30 September, 2009

खरी कमाई

आज पोतदारांचा खुप दिवसानी फोन आला. काल दसर्‍याच्या शुभेच्छांचा SMS पाठवला होता. त्याचं उत्तर म्हणून त्यांनी हा फोन केला. पोतदार तसे नेहमी भेटणारे. भेटलो की छान गप्पा व्हायच्या. ते निवृत्त झाल्यापासून भेट नाही झाली. फोनवर बोलण्यासारखं काही काम नव्हतं त्या मुळे फोन केला नाही. माणसांचं हे असच असतं. एकाच वर्गात असणारे मित्र, एकाच ऑफिसात काम करणारे, एकाच वाटेने जाणारे, एकाच ट्रेनने एकाच डब्यातून जाणारे असे कितीतरी मित्र आपण रोजच्या रोज भेटत असतो, बोलत असतो, सहलीला जातो खुप छान सहवास असतो तो, तेव्हा त्याचं काही वाटत नाही, रोज भेटणार हे गृहीत धरलेलं असतं. पण शाळा कॉलेजचे दिवस संपतात तेव्हा, एखाद्याची बदली होते तेव्हा, एखादा निवृत्त होतो तेव्हा वाटा वेगळ्या होतात. मनात असुनही भेटता येत नाही, बोलता येत नाही. प्रत्येक जण आपापल्या व्यापात असतो. दिवस, महिने, वर्ष संपत जातात आणि कधीतरी असा फोन येतो तेव्हा आपण भुतकाळात रमून जातो. आठवणी काढत बसतो. पुन्हा भेटूया म्हणून ठरवतो. पण आता प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या झालेल्या असतात. भेटलो तरी मैफील जमेलच असं सांगता येत नाही. तेव्हा जवळ असताना हातचं राखलं नाही तर दूर झाल्यावरही ओढ वाटते, भेटावस वाटतं. हीच खरी कमाई असते. पोतदारानी अशी कमाई भरपूर केली आहे. बघू, त्याना लवकरच भेटेन.

29 September, 2009

गावचा दसरा
दसरा म्हणजे उत्साह, आनंद, जल्लोष. मुंबईतला दसरा म्हटला म्हणजे गरबा, दांडीया आणि रामलीला पण मला दसरा आठवतो तो गावचा. नवरात्रात रोज एक माळ या प्रमाणे नऊ माळा देवघरात, देवळात बांधल्या जायच्या. ललीतापंचमीचा उत्सव तर आमच्या घरातच होतो, माझ्या लहानपणी ललीतापंच्या दिवशी रात्र जागवली जायची. भजनं, किर्तन, लळीत व्हायचं. अष्टमी पासून तर धमाल असायची. अष्टमीला शाळेत सरस्वती पुजन, खंडेनवमीला शस्त्रांची पुजा म्हणून खोरं,कुदळ,पाटी या सर्वांचीच पुजा व्हायची. विजयादशमीला गावच्या देवळात सगळा गाव जमायचा. तरंग आणले जायचे. ते गावातील वेगवेगळ्या देवळात फिरवून मग रवळनाथाच्या देवळात ठेवले जायचे.

हे तरंग मला खुप आवडतात. नवनवीन साड्या नेसवून त्यांची मिरवणूक निघायची तेव्हा ती पाहाण्यासारखी असायची. एक एक खांब खांद्यावर घेवून जाणारे त्या दिवशी हिरो असायचे. ढोल वाजवत ही मिरवणूक जायची तेव्हा गावातल्या प्रत्येक देवळाजवळ थांबायची. थांबली असताना त्यातल्या एकावर देवाचं वारं यायचं. हू.. हू.. करून तो घुमू लागला की सगळेजण गोल उभे राहून ते पहात असत. काहीजण त्याला आपल्या अडीअडचणी विचारत आणि अंगात आलेला माणूस त्याची उत्तरं द्यायचा. लोक त्याला देव समजूनच प्रश्न विचारायचे. अजूनही विचारतात. ह्ल्ली बरीच वर्षं दसर्‍याला गावी जाणं झालं नाही. तरी पण दसरा म्हटला की नजरे समोर तेच दृष्य येतं.

28 September, 2009

कासचं पठार
सातारा जिल्ह्यात पाचगणी-महाबळेश्वरला आपण जातोच पण ऑगष्ट ते ऑक्टोबर मध्ये गेलात तर सातार्‍यापासून जवळच असलेल्या कासच्या पठारावर अवश्य जा. "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' पाहण्यासाठी आपण दूर हिमालयात जातो. तोच आनंद मिळवायचा असेल तर कासला भेट द्यायला पाहीजे. रान फुलांचा गालीचा, दर चार-आठ दिवसागणीक बदलणारा. कधी पिवळीजर्द चादर, तर कधी गुलाबी तिरड्यांची आरास. १५-२० दिवसांचं आयुष्य असणार्‍या असंख्य वनस्पती तिथे फुलत असतात, कोमेजत असतात तेव्हाच त्यांची जागा घ्यायला दुसरी फुलं तयार असतात. नजर जाईल तिथे इवली-इवली सानूली फुलं वार्‍याच्या झोक़्यावर झुलत असतात. दर दोन-तीन दिवसानी रुपं बदलणारी ही फॅशन परेड पाहून थक्क व्हायला होतं. मन हरकून जातं. भान हरपून जातं. गेल्यावर्षी मात्र मला बघायला मिळाली ती निळाई. सात वर्षानी फुलून येणारी कारवी ऎन बहरात होती तेव्हाच आम्ही तिथे पोहोचलो. आता ती फुलं पहायला अजून सहा वर्ष थांबावं लागणार, तरी काही बिघडत नाही. आपल्या स्वागताला इतर फुलं हसत हसत डुलत आहेतच. कासच्या पठाराबरोबरच कास तलाव, तापोळे, बामणोली, वासोटा, ठोसेघर ही रमणीय ठीकाणं आणि सज्जनगड, प्रतापगड यांसारखे ऐतिहासिक किल्ले या परिसरात आहेत त्याना अवश्य भेट द्यावी.

नरेन्द्र प्रभू

27 September, 2009

जीवनाचा कंटाळा आलाय


‘जीवनाचा कंटाळा आलाय’, ‘मला जगावसच वाटत नाही’ हे बोल कुणा दुर्धर आजार झालेल्या, मनोभंग झालेल्या किंवा परिक्षेत नापास झालेल्या व्यक्तीचे नसून माझ्याच मुलीच्या एका मैत्रिणीचे आहेत. क्षमा असं सांगत होती, म्हणून मला जेव्हा माझ्या मुलीने सांगितलं तेव्हा मी सुन्न झालो. सहावीत शिकणारी ही कोवळी पोर, हे तिचं खेळण्या-बागडण्याचं वय. नुकतीच उमलू लागलेली ही कळी हिच्या मनात असे आत्मघातकी विचार का यावेत ? चांगल्या सुशिक्षीत, सधन कुटूंबात, सुरक्षित वातावरणात वाढत असताना ‘मला हे आयुष्य नको आहे, मला नाही जगायच’ असं का म्हणतेय ?

या प्रश्नाचं उत्तर दडलय़ ते अभ्यासात. अतिशय हुशार असलेली क्षमा चौथीला स्कॉलरशीप मिळवलेली. हिन्दी सुबोध, होमी भाभा बाल वैज्ञानीक परीक्षा, पुढच्या वर्षीचा सातवीच्या स्कॉलरशीपचा अभ्यास, एवढी ओझी संभाळत चांगला अभ्यास करतेय. पण तिच्या आईने कमाल केली ती तिला सहावीची सगळी पुस्तकं तोंडपाठ करायच फर्मान काढून. हो ‘तोंडपाठ’, अगदी भुगोलाचे रुक्ष धडेही तोडपाठ हवेत म्हणून बिचारी क्षमा शाळेत मोकळ्या वेळातही ते पाठ करत बसलेली असते. हे असे पालक असतील तर कुणाला जगावसं वाटेल ? काय करावं त्या मुलांनी ? स्पर्धेला तोंड द्यायचं म्हणून त्या मुलांची मनं मारून, त्यांची अभ्यासातली गोडीच नष्ट करून हे पालक काय साध्य करणार आहेत ? अस करून ही मुलं पुढे जीवनात यशस्वी होतील का ? ते जाऊदे, पालकांचं नियंत्रण संपल्यावर कोणत्या थराला जातील ? आणि समजा तिने खरच जिवाचं काही बरं-वाईट केलं तर ?

अभ्यासात गोडी निर्माण झाली पाहीजे. जगण्याची उर्मी, आनंद वढवण्यासाठी अभ्यास असतो हे कघी कळणार आपल्याला ? परीक्षा म्हणजे सर्वस्व नव्हे.

नरेन्द्र प्रभू


तेच ते अन् तेच ते


तेच मुखवटे, तीच तोंडे

स्वतःला समजतात अकलेचे कांदे

पोर, पुतण्या, लेक, नातवंडे

सामान्य कार्यकर्त्याचे झालेत वांदे


तीच आश्वासने, तीच भाषणे

वर्तमानपत्रातूनही जुनीच पुराणे

चोर, खुनी, बदमाशांचे घराणे

उमेदवार बनून गाती गाणे


तोच मतदार, तसाच लाचार

एकपण नाही चांगला उमेदवार

मत दिलं तरी काय होणार ?

तेच बाजारबुणगे राज्य करणार

नरेन्द्र प्रभू

26 September, 2009

हा तर 'कामा'पुरता संग


हा तर 'कामा'पुरता संग आहे

आतला आणि बाहेरचा वेगळा रंग आहे

तत्वांना खुंटीवर टांगून सत्तेचा डाव आहे

खुर्चीवर बसतानाच पैशाची हाव आहे

आजचं माझं भक्षकालचा माझाच पक्ष
आजचं माझं भक्ष आहे
कुणीच तिकीट दिलं नाहीतर
मी अपक्ष आहे

नरेन्द्र प्रभू

त्यांना फक्त प्रसादाशी मतलबनिवडणूकीचा खेळ सुरू झाला आहे. निवडणूका जाहीर झाल्यापासून शह-काटशह देण्याचं राजकारण सगळेच राजकारणी खेळत आहेत. गेली पाच वर्ष केवळ आपलीच पोट भरण्यात मग्न आसलेले हे पुढारी आता जनतेची काळजी करण्याचं नाटक तरी करतील असं वाटत होतं. पण ‘कसलं काय आणि दहा पक्षात पाय’ अशी यांची अवस्था आहे. एकदा निवडून आलो म्हणजे तो मतदार संघ आपली जहागीर समजणारे काहीजण तर पक्षनिष्ठा, तत्व वैगेरे बाजूला ठेवून तिकीट देईल त्या कळपात सामील होत आहेत. कसलीच बांधिलकी न मानणारे असे लोक मतदारांशी प्रामाणीक राहूच शकत नाहीत. पुजेच्या मंडपाबाहेर प्रसादाच्या आशेने उभ्या असलेल्या भिकार्‍यांसारखी यांची गत आहे. देव आणि पुजा करणारे या दोघांशी त्यांना काहीच देणंघेणं नसतं, फक्त प्रसादाशी मतलब. नाहीतर, एका रात्रीत निष्ठा बदलणारे कालपर्यंत ज्याला विष्ठा म्हणत होते त्याच पंगतीत कसे बसतात ?


पण जनता म्हणजे काय यांच्या गोठ्यातली गाय आहे ? यांनी कशाचीही सरमिसळ करावी आणि जनतेने ते मान्य करावं. दलबदलू मग तो कोणत्याही पक्षाचा असूदे त्याला घरचा रस्ता दाखवणं हे आता जनतेचं काम आहे


नरेन्द्र प्रभू

25 September, 2009

नागडे पाय

देवाचा हप्ता या ब्लॉग पोष्ट मध्ये ‘लोक साईबाबा पुढे चप्पल काढल्यासारखं करतात पण प्रत्यक्षात बुट, चप्पल पायातच असतात’ हे माझं म्हणणं एवढ्या लवकर बुंबरँग होवून माझ्यावरच उलटेल असं मला वाटलं नव्हतं. अगदी सात दिवसात देवाने मला माझं ते विधान सपशेल मागे घ्यायला लावलं. त्याचं काय झालं महाराजा, गेले चार-पाच दिवस सकाळच्या वेळी मला एक साक्षात्कार होतोय. सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडलो की अनेक अनवाणी, नागडे पाय रस्त्यावरून चालताना दिसतात. (हो मी फक्त पायच पाहतो.) दोन दिवस दुर्लक्ष केलं पण ते तसे समोर येतच राहीले. सकाळीच नव्हे तर संध्याकाळी सुद्धा. हा काय प्रकार म्हणून बायको जवळ चौकशी केली तेव्हा उलगडा झाला. नवरात्रात हल्ली हे असं करतात. हे म्हणे व्रत आहे. नवरात्रात नऊ दिवस अनवाणी, अन्नपाण्या शिवाय रहायचं. (दिवसाच हा. रात्री खावून ‘पिवून’ नाचायचं).

वा..! मी या भक्तांचे चरण बघून धन्य झालो. कित्तेक जण तशी सवय नसल्याने असे काही चालतात की ती अजब चाल बघत रहावी. पण अशा टाचा घासून देव कसा पावणार ? (मला आणखी एका साक्षात्काराची वाट बघावी लागणार.) नऊ दिवस मोच्याचा धंदा बसणार, झालच तर त्या उघड्या पायांवर एखाद्याचा चपलेचा पाय पडणार.

(वर दिलेला फोटो हरेक्रिष्णजीच्या सौजन्याने)

नरेन्द्र प्रभू


24 September, 2009

असा ‘मान्य’ राजकारणी

Sudhir Sawant काल रात्री नऊच्या सुमारास चर्चगेटच्या दिशेने जणार्या लोकलमधून माझा प्रवास चालू होता. सैनिकी शर्ट घातलेल्या एका व्यक्तीकडे माझं सहज लक्ष गेलं, पाहतो तर ते शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत होते. बरोबर एक सहाय्यक, लोअर परेल स्थानकावर ते उतरले, मलाही त्याच स्थानकावर उतरायचं होतं. या पुर्वी एका समारंभात ब्रिगेडियर सुधीर सावंतांशी माझी तोंडओळख झालेली असल्याने मी त्याना नमस्कार म्हटलं. त्यानीही हात मिळवला. झी वाहिनीवर एका थेट प्रक्षेपण होणार्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते निघाले होते. “मंत्र्यांचा विमानाच्या खालच्या वर्गाचा प्रवास सध्या गाजत असताना आपण सामान्य माणसांबरोबर प्रवास करता हे पाहून बरं वाटलं अशी माझी प्रतिक्रीया मी त्यान देवून टाकली.

आमदार, खासदार ही पदं भुषवलेले असुनही कसलाच बडेजाव नसलेले आणि मोठेपणासाठी गोतावळा बरोबर फिरवणारे म्हणून मला त्यांचा अभिमान वाटला. त्याचबरोबर दिलेली वेळ पाळता यावी म्हणून प्रसंगी लोकल ट्रेनने प्रवास केला ही गोष्ट सुद्धा दखल घेण्याजोगी.

शशी थरूर, एस्. एम्. कृष्णा यांसारखे केंद्रीय मंत्री सरकारी बंगल्यांचा रंग पसंद नाही म्हणून तीन तीन महीने पंचतारांकीत हॉटेलात राहून सरकारचे, पर्यायाने जनतेचे पैसे (पंचतारांकीत हॉटेल साठी दिवसाला एक लाख रुपये भाडं) उधळीत असताना, विमानाच्या खालच्या वर्गाचा प्रवास जनावरांच्या लायकीचा, असले तारे तोडत असताना हा अनुभव मानाला दिलासा देणारा ठरला. राजकारणात असलेल्या काही चांगल्या लोकांपैकी ब्रिगेडियर सुधीर सावं आहेत एवढं नक्की.


नरेन्द्र प्रभू


22 September, 2009

पत्रे...! धोंडे...! कर्म...!


स्थळ: दादर येथील धुरू सभागृह , कृष्णाबाई नारायण सुर्वे लिखित मास्तरांची सावलीव डॉ. नंदा केशव मेश्राम लिखीत मी नंदाया दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळा, ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुर्वे, कृष्णाबाई सुर्वे, डॉ. नंदा मेश्राम, ‘लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर, कवयित्री नीरजा, शब्दांकनकार नेहा सावंत व सुमेध वडावाला-रिसबूड आदी मान्यवरांची उपस्थिती.

सभागृह साहित्य रसिकांनी तुडूंब भरल्यामुळे मी एका बाजूला उभा होतो. माझ्या जवळच एका मी मी म्हणणार्‍या दुरचित्रवाणी वाहिनीचा व्हीडीओग्राफर उभा होता, थोड्याच वेळात त्या वाहिनीचा वार्ताहरही आला. कार्यक्रम रंगात असतानाच त्या वार्ताहाराने मला कानात विचारलं यातल्या नंदा मेश्राम कोण ? सहाजिकच होतं नंदा मेश्रामना याआधी मी सुद्धा पाहिलं नव्हतं. त्याना त्याने ओळखलं नाही तर समजण्यासारखं होतं. पण दरम्यान वक्त्यांच्या भाषणात कवी नामदेव ढसाळांच उल्लेख झाला. त्या वार्ताहाराने मला लगेच प्रश्न केला नामदेव ढसाळ उपस्थित आहेत का ? ते प्रमुख वक्ते म्हणून जाहिर झाले होते पण उपस्थित नव्हते. मी नकारार्थी मान डोलावली. जरा वेळाने सुशिलकुमार शिंदेंचा उल्लेख झाला. त्या वार्ताहाराने पुन्हा मला प्रश्न केला सुशिलकुमार शिंदें उपस्थित आहेत का ? आता मला बाजुच्या भिंतीवर डोकं आपटावसं वाटायला लागलं. सुशिलकुमार शिंदें सध्या केंद्रीय मंत्री आहेत आणि पुर्वी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मी त्रासिक चेहरा करून उत्तरलो. बरं तो वार्ताहार मराठीतच बोलत होता. एवढं अगाध ज्ञान असलेला ग़ृहस्थ हातात माईक टेकवून अशा कार्यक्रमाला पाठवला म्हणून मी त्या वाहिनीला मनोमन सांष्टांग दंडवत घातले.

एफ. एम. वर सुद्धा बरेच रेडिओजॉकी आशीच अचरट बडबड करत असतात.

आमच्या एक सारंग काकू आहेत. अस्सल मालवणी. त्या तिथे उपस्थित असत्या तर म्हाणाल्या असत्या कर्मSS झाला...! पत्रे...! धोंडे...!


नरेन्द्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates