28 February, 2021

या दिसाची आहुती ही

 


प्रिय मित्र आत्माराम परब यांनी हा सुंदर फोटो काढला आणि त्या चष्म्यामधून सुर्यच आपल्याकडे पहात आहे असं वाटलंमग ही कविता सुचली. सूर्य म्हणतोय:

 

रोजचा दिस ढळत जाता सांज होई मी पहातो

तू तिथे काठावरी रे घुटमळोनी का परत जातो?

उतर या दर्यात आता तोडूनी ते पाश सारे 

कवळूनी घे स्वप्ने तुझी ती, बघ आता येतील तारे

 

दे झुगारून बंधने ती, जी तुझी तू घातलेली 

वेळ थोडा राहिला अन, ती निशा बघ थांबलेली

रे तुझ्या बाहूत आहे स्फुरण माझ्या लालिमेचे

कर आता साकार स्वप्ने आर्त जे आहे मनीचे 

 

चांदण्याचे राज्य येईल, अन कळ्याही उमलतील 

सज्य हे आकाश सारे, येत आहे तारकादल 

कर जरा घाई जराशी पाहुदे रे पूर्णताही 

जाऊदे रे दिनकराला या, या दिसाची आहुती ही 

 

नरेंद्र प्रभू

२८ फेब्रुवारी २०२१

13 February, 2021

तुझी सावली लाभली

 

स्वामी स्वरुपानंदाचा स्नेह लाभलेल्या लेखिका मृणालिनीताई जोशी यांचा आज ९४ वा वाढदिवस. नुकतीच या विदुषीची भेट घेता आली. त्यांच्या दर्शनानंतर सुचलेल्या या ओळी आजच्या वाढदीवशी त्याना अर्पण.       

माया आभाळभरून तुझी अनुभवाआली

किती दिसांनी गे माये तुझी सावली लाभली

एका कृपाकटाक्षाने अमृताचा गे वर्षाव

मन चिंब चिंब न्हालं क्षणोक्षणी ती आठव

 

किती प्रकाश दाटला निरांजन तेजाळलं

दाही दिशा तुझ्या झाल्या गात्र गात्र उजाळलं

वर प्रेमाचा वर्षाव जणू आभाळ भरलं

इवल्याशा कुटीमध्ये असे ब्रम्हाण्ड साठलं

 

स्वामी स्वरूप दाविती चित्त थाऱ्यावर एक

हर्ष आनंद जाहला आशीर्वचन प्रेरक

अन् लाभला मजला प्रसादाचा हा आलोक

तुझ्या कृपाकटाक्षाचा सोनसळी अभिषेक

 

नरेंद्र प्रभू

१३ फेब्रुवारी २०२१


07 February, 2021

पर्यटनाचा मानबिंदू सिंधुदुर्ग जिल्हा


 ईशा टुर्सच्या नुकत्याच पार पडलेल्या सिधुदुर्ग सहलीची एम.जी.फडके यांनी काढलेली ही छायाचित्रं आणि महिती. सहलीच्या आठवणी जपून ठेवण्याची आणि दुसर्‍यांनाही त्याचा आनंद देणाची ही वृती उल्लेखनीय आहे. धन्यवाद फडके साहेब. 

आंबोलीचा कावळेसाद - इथे कावळ्याने साद घातल्यावर त्यालाही प्रतिसाद मिळत असावा ! 


ही फुलं आहेत आजणी नांवाच्या झाडाची . इतक्या सुंदर फुलांवर मधमाश्या नाहीत नि याची फळं पक्षीही खात नाहीत . या फुलाना हात लावल्यावर माझ्या अंगाला खाज सुटली .  खरंतर  याचं नांव खाजणी असं केलं पाहिजे.

तर ही झाडं आहेत आंबोलीतल्या  हिरण्यकेशी (पार्वती ) च्या एका देवराईतल्या मंदिराच्या परिसरात . देवीच्या मूर्तीखालून हिरण्यकेशी नदीचा उगम आहे जी पुढे कर्नाटकात कोन्नूर येथे घटप्रभेला मिळते .




कोचर्‍याजवळच्या निवती किल्यावरून (टेहळणी बुरुज ) डावीकडे भोगवे बीच

कुडाळ तालुक्यातल्या वालावल गावातलं चौदाव्या शतकात बांधलेलं यादवकालीन  लक्ष्मीनारायण मंदिर .




मंदिरासमोर काळ्या पाषाणातले पांच दीपस्तंभ आहेत . एका देवळात इतके दिपस्तंभ प्रथमच पाहिले .


दीपस्तंभ तोलून धरणारे हत्ती  , मूर्तीसमोरचा मारुति आणि गरूड तसंच प्रत्यक्ष मूर्तीही अत्यंत सुबक आहे .

कर्ली नदी आणि समुद्र यांच्या संगमाजवळचं संगम बेट आणि त्यासमोरचा सॅन्डबार ( दांडी )


देवबागला कर्ली नदी समुद्राला मिळते तिथलं एक बेट , समुद्रकिना-यावर मेजवानी झोडण्यासाठी जमलेले सीगल पक्षी , विस्तीर्ण आणि स्वच्छ वाळू आणि अर्थातच सूर्यास्त !





देवगडमधलं कुणकेश्वर म्हणजे कोकणातली काशीच ! ११व्या शतकातलं यादवकाळातलं हे मंदिर , शिवाजी राजे येथे अनेक वेळा दर्शनाला आल्यामुळे खूप  प्रसिद्ध झालं असावं .






देवगडच्या वाटेवर मिठमुंबरी बीच


विजयदुर्गाचं मोटरबोटीतून दर्शन





आणि हा जिल्ह्याचा मानबिंदू - सिंधुदुर्ग !

गावच्या मानक-यांचे खांब ( छायाचित्र मोठं करून पाहिलं तर मानक-यांची नांवं दिसतील

१५३० साली म्हणजे शिवजन्मापूर्वी १०० वर्षे , सावंत-भोसले यांचं सावंतवाडी संस्थान  स्थापन होण्याच्या सुमाराला इथल्या ग्रामस्थानी निर्माण केलेला धामापूर तलाव ! याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या तलावाचं क्षेत्र कमी न होता उलट  वाढतंय  ! या तलावाला २०२० चा WHIS (world heritage irrigation site ) हा पुरस्कार मिळाला आहे!














        



06 February, 2021

जगलेच तुम्हांसाठी ते

डॉ. अंजली जोशी यांनी FB वर सकाळी हे फुल पोस्ट केलं आणि ही कविता सुचली.



हे कसे उमलले फुल
जणू गोंडस दिसते बाळ
पाकळ्या! किती ते हात
परमात्मा दडला आत

भ्रमराचा वाटे हेवा
तो लुटतो इथला ठेवा
मकरंद कुठून हा येतो
मधूगंध देऊनी जातो

हे असेच रे उमलावे
आनंदा वाटीत जावे
हे फुल सांगूनी जाते
जगलेच तुम्हांसाठी ते

नरेंद्र प्रभू

02 February, 2021

हे… माझे घर


सिंधुदुर्गच्या भूमीवर पाय ठेवल्याबरोबर लगेच सुचलेली ही कविता:   



इथे मातीला सुगंध सुटतो

क्षितिजाचीही झालर होते

खळखळ वाहे निर्झर इथला

जगण्याचे मग गाणे होते

वाटा दूरवर नेती इथल्या

शांत जलाशय विहंग उडती

आठवणींचा पट उलगडतो  

पाण्यावर जणू तरंग उठती

सागरतीरीची वाळू इथल्या

गूज प्रीतीचे पुन्हा सांगते

डुलवत नेती नावा इथल्या

मनास येते पुरते भरते

माडबनातून झुलते पोफळ

ताल धरुनी वाऱ्यावरती

पाटामधले पाणी अवखळ

धावत असते पायाभवती

मनात करते घर कोकण हे

किती विसावा या भूमीवर

कातर काळीज म्हणत राहाते

हे माझे घर हे माझे घर



















LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates