Showing posts with label समाजकारण. Show all posts
Showing posts with label समाजकारण. Show all posts

28 April, 2019

मतदान कराच




आम्ही जे बटन दाबलं त्याच चिन्हाला आमचं मत गेलं. इकडेतिकडे नाही! काहीच गडबडघोटाळा नाही. मतदान कराच. 

लोकशाहीने दिलेल्या हक्कांपैकी मतदानाचा हक्क हा सर्वात मोठा हक्क आहे. आपल्या मतदानाच्या या हक्कामुळे परिवर्तन होऊन देशाचे भवितव्य ठरू शकते. त्यामुळे निराशावादी भूमिका न घेता सर्वांनी जागरुकतेने व प्रत्येक निवडणुकीध्ये आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यामध्ये आपला खारीचा वाटा उचललाच पाहिजे. लोकशाहीचे बळकटीकरण करायचे असेल तर जागरुक युवा मतदारांचा एक मोठा वर्ग अस्तित्वात येणे गरजेचे आहे ज्यामुळे आपला देश विकसनशीलतेकडून विकसित देश होण्यास निश्चितच मदत होईल. मतदानातून लोकशाही सक्षम होत असते. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी लोकशाही मजबूत असणे आवश्यक आहे. त्यामुळे देश घडवायचा असेल तर चांगले लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत. ती जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यासाठी मतदान करणे हाच एकमेव लोकशाही मार्ग ठरतो.

मतदान न करण्याचं  कोणतंही कारण असू शकत नाही. पाच वर्षांनी सर्व मतदारांना चालून आलेली ही सुसंधी असते. १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) किंवा पुलवामा सारखा हल्ला अशा प्रसंगी आपलं राष्ट्रप्रेम उफाळून वर येतं, पण त्या वेळी आपण काहीच कृती करू शकत नाही, मतदान करून मात्र आपण आपल्यासाठीच सक्षम सरकार निवडून आणू शकतो, तेव्हा मतदान कराच अशी कळकळीची विनंती आहे. 

29 May, 2017

मेजर लितुल गोगईंना पद्म पुरस्कार देऊन गौरवांकीत करण्यात यावे




पद्म पुरस्काराची उंची वाढवायची असेल तर मेजर लितुल गोगईंसारख्या खमक्या अधिकार्‍याला पद्म पुरस्कार देऊन गौरवांकीत केलं पाहिजे. काश्मिरमध्ये चाललेल्या देशद्रोही कारवाया आणि देशातील त्यांच्या पाठिराख्या नादान, नालायक घृणेसपात्र असलेल्या व्यक्तिंना त्यांची जागा दाखवायची असेल आणि योग्य संदेश द्यावयाचा असेल तर हे करणे अतिशय आवश्यक आहे. मुळात सैनिक हा हकनाक जीव देण्यासाठी नसतोच आणि या मेजरने तर कर्तव्य बजावणार्‍या निवडणूक अधिकार्‍यांना मृत्यूच्या दाढेतून मोठ्या हिमतीने परत आणलं. स्वत: मृत्यूला सामोरं जात, आपल्या सहकार्‍यांचा जीव वाचवला आणि एक प्रकारे मृत्यूवर विजय मिळवला. मुळात युद्धभूमीवरच्या असामान्य परिस्थितीला तोंड देण्याचंच ज्याना प्रशिक्षण मिळतं त्याना निवडणूकीच्या कामात जुंपलं जातं आणि तिथे युद्धजन्य परिस्थिती ओढवल्यावर त्यांनी तलवार म्यान करावी अशी अपेक्षा बाळगली जाते हे जगात आपल्याच देशात घडू शकतं. काश्मिरमध्ये सातत्याने सुरक्षा करणार्‍या जवानांवर हल्ले होतात आणि आपण फक्त हळहळत बसतो हे किती दिवस चालायचं?              

लष्करप्रमूख जनरल बिपीन रावत यांनी ‘जवानांना वार्‍यावर सोडू शकत नाही’ असं म्हटलं आहे ते या पार्श्वभूमीवर खुप महत्वाचं आहे. सैनिक, अर्धसैनिक आणि पोलिसांवर हात उगारणार्‍य़ांचे हात तत्काळ कलम केले गेले पाहिजेत. पण हे केव्हा घडेल तर त्यांच्या छुप्या पाठीराख्यांचा आणि घरभेद्यांचा बंदोवस्त होईल तेव्हाच ना? नक्षलप्रभावित राज्यांच्या प्रमुखांची केंद्रीय गृहमंत्रांबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीत आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी हीच बाब निदर्शनास आणून दिली. शेवटी खलप्रवृत्तीला शासनाचा धाक हा असावाच लागतो. आपण शिवाजी महाराज्यांचा वारसा सांगतो, त्यानी स्वराज्यात हा भोंगळपणा सहन केला असता काय? अरुंधती राय, बरखा दत्त या सारख्यांची जिभ सडणार नाही तर ती हासडावी लागेल. भारतात बसून पाकिस्तानला गोंजारत विषवल्लीची वाढ करणार्‍या या नराधमांच्या फळीचा आधी बंदोवस्त केला गेला पाहिजे. सेक्युल्यारीझम, आझादी, स्वातंत्र्य असल्या शब्दांचा आधार घेत, त्या मागे लपत सुकमासारख्या अंतर्गत भागात आणि तिकडे सिमेवर शत्रूला थेट मदत करण्यापर्यंत मजल मारणार्‍या बोरूबहाद्दर आणि अतिरेक़ी यांच्यात आता फरक करण्याची आवशयकता नाही.  
           
भारतीय सैन्य दलाने मंगळवारी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या आणि असंख्य बंकर उद्ध्वस्त केले आणि पाक सैन्याने केलेल्या गोळीबाराला तोफ गोळ्यांनी उत्तर देऊ, असे दाखवून दिले. आता देशांतर्गत शत्रूंचा निप्पात करायची वळ येऊन ठेपली आहे.  सारा देश भारतीय सैन्याच्या कामगिरीबद्दल अभिमान प्रकट करीत असताना काश्मीरमधील काही संघटना आणि काही राजकीय पक्ष व त्यांचे अवसान घातकी नेते मेजर लितुल गोगईच्या सन्मानावरून राजकारण करण्यात मग्न झाले आहेत.

मेजर लितुल गोगईंनी केलेली कृती ही देशात आणि देशाच्या सिमेवर डोळ्यात तेल घालून देशरक्षणासाठी झटणार्‍या जवानांना स्पूर्ती दायक अशीच आहे. शिवाय आपल्यासरख्या देशवासीयांना दिलासा देणारी अशी आहे. बुर्‍हाण वाणी या दहशत वाद्याचा खातमा केल्यापासून सुरक्षादलाला रोजच्यारोज लक्ष केलं जात आहे.

नऊ एप्रिल रोजी श्रीनगर लोकसभा मतदार संघात मतदान सुरू होतं त्या दिवशी काश्मीरमध्ये कमालीच्या तणावात हे मतदान चाललं असताना बडगाममधील एका मतदान केंद्रावर काश्मिरी तरूणांनी दगडफेक करून निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्याचे प्रयत्न केले. दगडफेक व हिंसाचार चालू असताना मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाच्या सतरा कर्मचार्यांचे जीव धोक्यात आले होते. या सतरा जणांचे प्राण वाचले ते मेजर गोगई यांच्या कामगिरीनेच. त्यांनी दगडफेक करणार्‍य़ा तरूणांना चिथावणी देणार्‍य़ा फारूख दारला पकडले व त्याला बांधून जीपच्या बोनेटवर बसवले. ती जीप त्याच्या सह सुरक्षीत ठिकाणी आणण्यात आली . हिंसक जमावाला पांगवण्यासाठी मेजर गोगईंनी केलेली ही कृती यशस्वी ठरली. गोळीबाराच्या फैरी न झाडता किंवा रक्तपात न होता मेजर गोगई यांनी अपेक्षीत परीणाम साधला. मग मानवी हक्कांच्या मूल्यांचे उल्लंघन केले म्हणून ‘आजादी’ टोळीने टाहो फोडायला सुरूवात केली, पण तसे करून सतरा कर्मचार्यांचे प्राण वाचवले, त्याविषयी कोणीच बोलत नाही.

मेजर गोगई यांना लष्कर प्रमुखांनी दिलेला पुरस्कार हा काश्मिरी तरूणाला जीपवर बांधून फिरवल्याबद्दल नव्हे तर सतरा कर्मचार्‍यांचे प्राण वाचवले यासाठी आहे. मेजर लितुल गोगईंच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना   पद्म पुरस्कार देऊन गौरवांकीत करण्यात यावे. संपूर्ण देशाची ही मागणी असली पाहिजे, जनतेने आधिच त्यांना  धन्यवाद देऊन पुरस्कार प्रदान केला आहे.   


  

13 March, 2017

रंग झाले केसरी



रंग सारे एक, झाले केसरी रे केसरी
पेटून उठली एक ज्वाला केसरी रे केसरी
न्हाऊन गेला लोक झाला केसरी रे केसरी
उधळून दे आयुष्य त्याचा पाठीराखा तो हरी

रंग हिरवा त्या मिळाला उजळून गेला केसरी
नीलरंगी धाऊन आले मिसळून झाले केसरी
केसरी रंगात जुळले लाल अन स्वेतांबरी
जनधनाची लाज राखी आज हो हा श्रीहरी   

देवभूमी रंगात न्हाली ललाट झाले केसरी
उत्तरेचा रंग झाला केसरी रे केसरी
पुर्वरंगी उदयास आली लाट आता केसरी
आरक्त दर्या आज झाला केसरी रे केसरी

नरेंद्र प्रभू


१३/०३/२०१७

26 November, 2016

रोख मुक्त गाव - कृती महत्वाची



ही कृती अत्यंत महत्वाची आहे. नोटबंदीने सगळा भारत ढवळून निघत असताना समाज माध्यमातही त्यावरच्या प्रतिकियांना बहर आला आहे. संसदेत विरोधकांनी कामकाज रोखून धरलं आहे. त्याना शेतकर्‍यांची पर्वा कधीच नव्हती आणि आजही नाही. ती असती तर त्यानीच मा. रणजित सावरकर यांनी केलेली कृती केली असती. DIGITAL INDIA या महत्वाच्या कार्यक्रमात ही हे पाऊल उल्लेखनीय आहे.  

मा. रणजित सावरकर
श्री. रणजित सावरकर यांच्या पुढाकाराने घसई होणार नोटबंदी नंतरचे भारतातील पहिले रोखमुक्त गाव. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या आदिवासी विभागातील धसई गावातील व्यवहार रोखमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.  

नोटाबंदीनंतर निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती दूर करण्याच्या दृष्टीने रोखमुक्त व्यवहाराच्या दिशेने केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अशाप्रकारे नोटबंदी नंतर रोखमुक्त होणारे घसई हे भारतातील पहिलेच गाव ठरणार आहे.

हे गाव १ डिसेंबर २०१६ पासून संपूर्णतः रोख मुक्त होत आहे. गावाची लोकसंख्या १०००० असून इथे जवळ पास १०० व्यावसायिक आहेत. आसपासची साधारण २५ खेडी व्यवहारांसाठी धसई वर अवलंबून आहेत. रोख मुक्तीचा लाभ धसाई आणि आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पन्नास हजार लोकांना होणार असून, बँकेतून रोकड काढण्याच्या त्रासातून मुक्तता होईल. १०० पैकी सुमारे ३४ व्यापाऱ्यांचे कार्ड स्वाईप मशीन ३० नोव्हेंबर पर्यंत कार्व्यान्वित होत आहेत. अन्य व्यापारी ह्या मशीन्स घेण्याकरिता आवश्यक ती कारवाई पूर्ण करीत आहेत.

येथील प्रत्येक कुटुंबाकडे जन-धन खाते असून डेबिट कार्ड हि आहे. त्यामुळे १ डिसेंबर पासून ह्या भागातील लोक आपल्या सर्व गरजा करिता हे कार्ड वापरू शकतील अगदी वडापाव पाव पासून भाजी पाला , धान्य, औषधे, खते आणि इतर सर्व गरजांसाठी डेबिटकार्ड वापरता येईल. हे कार्ड केशकर्तनालये, दवाखाने, मोटार गॅरेजेस पासून अगदी शेती कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठी डेबिट कार्ड वापरता येईल. थोडक्यात, सांगायचे तर डेबिट कार्ड असलेया कोणालाही धसई गावात रोख रक्कम वापरण्याची गरज नाही. 

श्री रणजित सावरकर यांना या कामात धसई येथील धडाडीचे कार्यकर्ते श्री. कैलास घोलप, श्री. अशोक घोलप आणि श्री. स्वप्नील पाटकर तसेच मुंबई येथील श्री पृथ्वीज माटे यांनी बहुमोल मदत केली. बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक श्री नवतेज सिंग यांनी अत्यंत तत्त्परतेने, अल्प वेळात व्यापाऱ्यांची खाती उघडून त्यांना कार्ड स्वाईप मशीन देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले. उप-महाप्रबंधक श्री श्रीधर राव यांच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रबंधक श्री. विजय सिंग, श्री. कौस्तुभ शुक्ल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक यासाठी अखंडपणे कार्यरत होती.


याबाबत अधिक माहिती देताना रणजित सावरकर म्हणाले, "रोखी शिवाय व्यवहार असणारी अर्थव्यवस्था हे माझे स्वप्न होते. परंतु राज्यसभेत एका सन्माननीय सदस्याने केलेली एक टिप्पणी हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी लागणारी जिद्द निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. “शेतकरी काय धोतरात डेबिट कार्ड घेऊन फिरतो काय?” हाच तो शेतकऱ्यांचा अपमान करणारा शेरा! आणि यास कोणीही प्रत्युत्तर दिले नाही. शेतकरी गरीब असतील, पण ते मूर्ख नाहीत. ते डेबिट कार्ड बाळगतात आणि वापरतात सुद्धा. पण फक्त ATM मध्ये. जर व्यापारी डेबिट कार्ड घेऊ लागले तर? मग सर्व प्रश्नच संपेल. “रोख मुक्त धसई” केवळ एक सुरुवात आहे. धसई मोडेल ने हेच सिद्ध केले की “रोख मुक्त गाव” हे ध्येय साध्य करण्यासाठी लोक तयार आहेत, बँका तयार आहेत, व्यापारी तयार आहेत, गरज आहे यांना एकत्रित आणण्याच्या दुव्याची ! तेव्हा सर्व जन प्रतिनिधींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या दृष्टीने पुढाकार घ्यावा.”

19 April, 2016

बाजार मांडला




कुण्या दगडाच्यासाठी तुम्ही बाजार मांडला
पडे गाभार्‍यात पाय, तुम्ही सज्जन जाहला?

मनी नसे भाव-देव, राजकारणाचा कावा
मान द्यावया तुम्हाला नसे कुणी आता गावा

देव गाभार्‍यात नाही, देव नसे देवळात
तुम्ही बाजारी जाऊन, घेता देव हा विकत

देव पुजार्‍याचा नाही, देव नाही व्यापार्‍याचा
अंतरात असे देव, काहो टाहो हा फुकाचा?


नरेंद्र प्रभू
१९/०४/२०१६       

09 April, 2016

जेएनयु कांड - माओवाद्यांचे वैचारिक भ्रमास्त्र



एप्रिल २०१६ च्या इशान्य वार्तामध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख: 

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये ९ फेब्रुवारी २०१६ ला ‘डेमोक्रॅटिक स्टुडंट्स युनियन’ (डीएसयू)च्या माजी सदस्यांनी सभा बोलावली होती. अफझल गुरू आणि मकबूल भटचा न्यायव्यवस्थेने खून केल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्या विरोधात आणि ‘काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाच्या लोकशाही हक्कासाठी चाललेल्या लढय़ाला’ पाठिंबा देण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. तिला कॅम्पसमधले आणि बाहेरचे बरेच काश्मिरी विद्यार्थी उपस्थित होते. अफझल गुरूच्या स्मरणार्थ ‘अ कंट्री विदाऊट अ पोस्ट ऑफिस’ हा कार्यक्रम तिथे  आयोजित करण्यात आला होता. डीएसयू हा कट्टर डाव्या विचाराच्या, माओवादावर विश्वास असलेल्या विद्यार्थ्यांचा एक गट आहे. छत्तीसगढमधल्या माओवाद्यांना त्यांचं समर्थन आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सध्या देशद्रोहाच्या आरोपाने खळबळ माजली आहे.  डाव्या पक्ष संघटनांनी आता दिशाभूल करण्याची निती अवलंबली आहे. जो मुद्दा आहे त्याला बगल देवून भलत्याच विषयावर गदारोळ माजवायचा ही त्याची नेहमीची चाल आहे. इथेही तेच घडले आहे ज्या डाव्या संघटनांच्या पुढाकाराने तिथे अफ़जल गुरूचे उदात्तीकरण झाले, त्यावर पोलिसांनी कारवाई केल्याबरोबर त्यानी तात्काळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा गळा काढला. डीएसयू चा नेता कन्हय्या कुमार याला अटक झाल्याबरोबर आदल्या दिवशीपर्यंत वाहिन्यांवर झळकणारा उमर खालीद हा विद्यार्थी नेता फरार झाला. हा उमर खालीद DSU (डोमोक्राटीक स्टूडंट युनियन)चा नेता DSU ही कमुनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाची विद्यार्थी संघटना. याच उमर खालीदचा या कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्य हात होता.  उमर खालीदचे वडील सैय्यद कासिम इलियास हे सिमी या संघटनेचे प्रमुख नेते होते. विद्यापीठात पोलिस आलेच कसे? हा नवा युक्तीवाद डाव्यांकडून पुढे करण्यात आला आहे. पोलिस या देशातील कायदा व्यवस्थेचे राखणदार असून, त्यांना कुठल्याही जागी व केव्हाही जाण्याचा अधिकार देशातील कायद्याने दिलेला आहे. हे विद्यापीठ भारताचा भाग नाही, असे डाव्यांना म्हणायचे आहे काय? बाहेरचे विद्यार्थी इथे येऊ शकतात मात्र पोलिसांना मज्जाव का करण्यात येतो?  देशप्रेमी नागरीकांना छळणारे अनेक प्रश्न या प्रकरणातून पुढे आले आहेत. या घटनेआधी उमर खालीदने काश्मीर आणि खाडी देशात अनेक फोन केले होते अशी माहिती उजेडात येत आहे. देशविरोधी कारवाया आणि माओवाद्यांच्या काश्मीर कनेक्शनचाच हा भाग आहे. आणि स्वतंत्र्य म्हणजे वैराचार नव्हेच. २०१० मध्ये दंतेवाडा इथं लक्षलवादी हल्ल्यात ७५ जवान शहीद झाले होते तेव्हा याच जेएनयु विद्यापीठात विजय दिन साजराकरण्यात आला होता ही गोष्ट नजरेआड करता येत नाही. देशात दुर्गापूजा केली जाते तेव्हा इथे महिषासूर पुजाला जातो अशी ही औलाद आहे. 

         
या वेळी “भारत तेरे टुकड़े होंगे, इन्शा अल्लाह इन्शा अल्लाह, अफज़ल हम शर्मिंदा हैं , तेरे क़ातिल ज़िंदा हैं, अफज़ल तेरे खून से इन्किलाब आएगा, भारत की बर्बादीतक जंग रहेगी जंग रहेगी” अशा देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. यावर कॉग्रेस सहीत सर्वच विरोधीपक्षांचं म्हणणं आहे की नुसत्या घोषणा देणं म्हणजे देशद्रोह नव्हे. हे म्हणे अभिव्यक्ति स्वातंत्र्य!  हे बुद्धी दिवाळखोरीत निघाल्याचं लक्षण आहे.. माणसाचे तुकडे तुकडे करू म्हणून घमकी दिली तर मात्र ती जिवे मारण्याची धमकी म्हणून गुन्हा होईल पण देशाचे तुकडे तुकडे करू म्हणणार्‍याची जिभ हासडून टाकली पाहिजे असं यांना वाटत नाही. जगात आयसिसचा धोका टोकाला गोलाय, जगाचं कशाला आपल्याच काश्मीरच्या पंपोरमध्ये अतिरेक्याशी  जिवाची बाजी लाऊन लढणार्‍या (या चकमकीत सेनादलाचे पाच वीर शहीद झाले) सैनिकांवर काश्मीरमधले नागरिक एकत्र येऊन दगडफेक करतात आणि बाजूच्या मशीदीमधून अतिरेक्यांचं गुणगान गाऊन त्यांना पांठिंबा दिला जातोय, ही हिम्मत येते कुठून? तर आपल्याच संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरूच्याबाजूने बोलून आपलेच कॉगेसी खासदार पाकिस्तान आणि दोशद्रोही अतिरेकी यांना पाठबळ देत आहेत या सारख्या ग़्हटनांमुळे या वोषवल्लीला खत पाणी घातलं जातं. बरं या अफजल गुरूला आपलंच सरकार असताना फासावर चढवलं गेलं हे पण ते निर्लजपणे नजरेआड करतात. ही देशविरोधी विषवल्ली वेळीच मुळासकट उखडून टाकली पाहिजे, त्याशिवाय या देशाला चांगले दिवस दिसणार नाहीत. अतिरेक्यांशी सामना करताना मानवीहक्क, सहिष्णूता असले मुद्दे दुय्यम ठरतात. लोकशाही समाजव्यवस्था असलेला जगातला सर्वात मोठा देश असलेल्या भारतातच ही थेरं खपऊन घेतली जात आहेत. ज्या लोकशाहीचा जगात उदौदो केला जातो त्या अमेरीकेतल्या विद्यापिठात ‘ओसामा हम शर्मिंदा हैं , तेरे क़ातिल ज़िंदा हैं’ म्हणण्याची कुणाची हिम्मत होईल काय? आंधळा मोदी विरोध करणारी ही मंडळी आता देशाच्या मुळावर उठलीत आणि मोदी पंतप्रधान व्हायच्याआधी हेच  लोक त्याना अमेरीकेचा विजा दिला जावू नये म्हणून अमेरीकेची आर्जवं करीत होते.

अफजल गुरू, कसाबसारख्या अतिरेक्यांना फाशीच्या दोरापर्यंत नेण्यासाठी आपल्या देशात अनेक वर्षं न्यायालयात संघर्ष करावा लागतो. त्या नंतर असे काहीच अतिरेकी फासावर लटकवता येतात. आता या अतिरेक्यांचा कळवळा आलेले लोक त्या न्यायालयांचाही अपमान करीत आहेत. ‘चार-दोन व्यायमुर्तींनी ठरवलं म्हणून अफजल गुरू दोषी ठरत नाही’ असं उमर खालीद उघडपणे वाहीन्यांवर येऊन सांगतो? भारतीय व्यायव्यवस्थेला हे लोक किती किम्मत देतात ते यावरून लक्षात घ्यायला पाहीजे. काश्मीरमध्ये Thank you JNU चे फलक दाखवणारे आणि इथे दिल्लीत विद्यापिठात वर्षानुवर्ष भारतमातेच्या अन्नावर पालनपोषण झालेले मावोवादी एकच आहेत. सापाला किती दिवस असं दुध पाजत बसायचं? काश्मीरमधल्या अतिरेकी कारवाया सुरू होण्याआधी काश्मीर विद्यापिठात बॉम्बस्पोट झाले होते ही गोष्ट विसरून चालणार नाही.

प. बंगालच्या मालदा मध्ये घडलेली घटना, मुंबईत रझा अकादमीच्या मोर्चात महिला पोलिसांचा विनयभंग आणि पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न अशा घटनांना दंगली या सदरात मोडता कमा नये तर त्या अतिरेकी कारवाया म्हणूनच त्यावर कारवाई केली पाहिजे न पेक्षा भारताचा सिरीया व्हायला वेळ लागणार नाही.                                                                        
पुण्याच्या फ़िल्म संस्थेतील  विद्यार्थी आणि जेएनयु मध्ये देशविरोध घोषणा देणारे विद्यार्थी हे तिथे कित्येक वर्ष ठाणमांडून सर्व सोईसुविधांचा अखंड लाभ घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना किती वर्षे  विद्यापीठामधील वसतीगृहांचा वापर करु द्यावा याचा विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.
भारत विकासाच्या वाटॆवर आहे हिच खरी तर विरोधकांची दुखरी बाजू आहे. देश आणि जगभरात हे स्पष्ट होऊ लागताच प्रत्येकवेळी या सकारात्मक बाबींवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोदीविरोधाला उत आला. त्याची वानगी दाखल उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत.    
ओबामांची भारत भेट  - चर्चमधल्या चोर्‍यांचा चर्चवरचा हल्ला म्हणून गहजब.
भार-आफ्रिका फोरम समिट – बिफवरुन राजकारण
बिहार निवडणूक – पुरस्कार वापसी
पुर्वांचलाचा विकास – रोहित वेमूला आत्महत्येचं राजकारण
मेक इन इंडीया विक – जेएनन्यु कांड
  
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याला हेतूता हवा देण्यात आली. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आर्थिक आघाडीवर अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. मुख्यता अनुदान आणि मनरेगासारख्या योजनामधून खर्च होणारा केंद्रसरकारचा निधी यांना लागलेली गळती थांबवण्यावर सरकारला यश प्राप्त होत आहे. नेमकी हीच गोष्ट हितसंबंधी लोकांना खुपते आहे. योजनांमधला निधी परस्पर हडप करण्याच्या या कारस्थानाला ‘आधार’ आणि जनधन खात्यांच्या मार्फत सरकारने आळा घातला असताना त्यामुळेच अस्वस्थ झालेली मंडळी ‘असहिष्णूता’, ‘अभिव्यक्ति स्वातंत्र्य’ असल्या मुद्द्यांची ढाल पुढे करून सरकार अस्थिर सरण्याचा प्रयत्न करीत आहेत.                

क्षुद्र राजकिय स्वार्थासाठी देशविरोधी कारवाया करायच्या आणि विपर्यास करून राज्य घटनेचा आधार घ्यायचा ही कमुनिस्टांची जुनी रितच आहे. पण आश्चर्य वाटतं ते देशावर साठवर्षाहून अधिककाळ राज्य केलेल्या कॉग्रेस पक्षाचं. त्यानाही ही विपरीत बुद्धी का होते? प. बंगाल मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस आणि डावे यांची युती होणार त्याची परिणीती म्हणून हे नेपथ्य तयार करण्यत आलेले आहे काय? कॉग्रसचे नेते दिग्विजय सिंग तर निवडणूक जिंकण्यासाठी नक्षलवाद्याची मदत मागतात तर त्याच पक्षाचे दुसरे नेते मोदींना पराभूत करण्यासाठी पाकमध्ये जावून पाकची मदत मागतात. कॉग्रेसच्या रिटा बहुगुणाचं म्हणणं   विश्वविद्यालयात तिरंगा फडकावयाचा आदेश देणं लाजिरवाणं आहे. इसरत जहाला थेट शहीद दर्जा देणारे ते हेच लोक, (शहीद हणूमंतप्पा असतो इसरत जहा नव्हे) युपीए  सरकारच्या काळात डेव्हीड हेडलीने इसरत जहा आत्मघातकी पथकाची सदस्य होती असं तपास अधिकार्‍यांना सांगितलं होतं पण केवळ नरेंद्र मोदींना संपवण्यासाठी तपास अधिकार्‍याला त्याच्या मुळ राज्यात परत पाठवून त्या सरकारने ती गोष्ट लपऊन ठेवली. या प्रकरणात अनेक प्रामाणिक अधिकार्‍याना अनेक वर्ष तुरुंगात खितपत पडावं लागलं. आता न्यायालयात हेडलेने साक्ष देताना ती गोष्ट पुन्हा सांगितली तेव्हा जनतेला सत्य समजलं.                    

ऎशीच्या दशकात सुरूवातीला पंजाबविद्यापीठात चार-पाच टाळकी खलिस्थानबद्दल बोलताना आढळायची, कालांतरांने ती दहा-वीस, नंतर पन्नास-साठ अशी संख्या वाढत गेली. सुरवातीलाच तिकडे लक्ष न दिल्याने पुढे देशाला त्याची काय किंमत द्यावी लागली त्याचा इतिहास ताजाच आहे. हा असा भ्रम निर्माण करून देशाच्या शहरी भागातही नक्षलवाद पोसण्याचं हे कारस्तान आहे. माओवादी आणि काश्मीरी अतिरेकी यांची हातमिळवणी झाल्याची ही फळं आहेत. जिथे जी चालतील ती अस्त्र वापरायची दिल्लीत वैचारीक भ्रम तयार करायचा आणि केरळ, प. बंगालमध्ये मुडदे पाडायचे.         

एकूण काय ‘खटासी असावे खट, उद्धटासी उद्धट’ शिवरायांनासुद्धा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वधच करावा लागला होता. प्रसंग बाका होता आणि............. आताही आहे.     


नरेंद्र प्रभू

सांताकृझ, मुंबई        

08 April, 2016

दूध का पानी


डॉ. तात्याराव लहाने = जे. जे. रुग्णालय, डॉ. संजय ओक = के.ई.एम. रुग्णालय अशी समिकरणं तयार होतात ती त्या समाजहितेशी डॉक्टरांमुळे. व्यवस्थेशी झगडत, तिच्याशी दोन हात करीत समाजाचं हित नजरेसमोर ठेऊन अहोरात्र झटणार्‍या डॉक्टरला देवत्व प्राप्त होतं ते त्याच्या रुग्ण सेवेमुळे. समाजाच्या सर्व थरातील रुग्णांना आपल्या डोळ्यावर डॉ. लहानेनी शस्त्रक्रिया करावी असं वाटत असेल तर ती डॉ. लहानेंसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. जे.जे. मध्ये महाराष्ट्रातल्या गरीब रुग्णांची पहाटे ४ वाजल्यापासून रांग लागलेली असते. अशा देशाला अभिमान वाटावा अशा गोष्टी केल्या की आपलं सरकार त्या व्यक्तीला पद्म पुरस्कार देतं. डॉ. तात्यांना तोही मिळालाय. म्हणजे सरकार, समाज आणि समाजसेवी डॉक्टर त्यात डॉ.आमटे बंधूही आले अशा सर्वांच्या लेखी सन्माननिय असलेला हा डॉक्टर अचानक विद्यार्थ्यांना नकोसा का झाला? जे शिकाऊ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने शस्त्रक्रिया शिकवत नाहीत म्हणतात तेच शिकाऊ डॉक्टर  बारा-बारा तास काम करायला लावतात म्हणतात तेव्हा वाटतं ‘डाल मे कुच काला है।‘

डॉ. तात्याराव लहाने यांनी जे.जे. मध्ये काम केलं म्हणजे नक्की काय ते पाहू:
·        
  •    सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक परवानग्या गेल्या दोन वर्षांत मिळवल्या. सरकारी रुग्णालयाच्या इतिहासात हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
  •        १९५६ नंतर प्रथमच जे.जे.तील खाटा लक्षणीय संख्येने वाढणार आहेत. सध्या १३५२ खाटा आहेत. त्यात ११०० खाटांची भर पडेल.
  •          जे.जे.ची ओपीडी वर्षाला पाच लाख रुग्णांची होती. ती गेल्या सहा वर्षांत नऊ लाखांवर गेली.
  •          जे.जे. महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ हॉस्पिटल बनले.
  •          वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंगमध्ये जे.जे.चे स्थान २०१० पर्यंत १३ वे होते. गेल्या सहा वर्षांत पाचवे स्थान पटकावले.
  •         एकूण १९ हजार शस्त्रक्रिया व्हायच्या, सध्या ४० हजार होतात. नेत्र विभागात वर्षभरात ६०० शस्त्रक्रिया व्हायच्या त्या सध्या १६ हजार होतात.
  •          इनडोअर पेशंटस्ची संख्या ४२ हजारांवरून ६५ हजारांवर पोहोचली.
  •          एमएमआरडीएकडून ४३ कोटी रुपये निधी आणून रुग्णालयाचा कायापालट घडवून आणला. थ्री टेस्ला एमआरआय मशीनसारखी अत्याधुनिक यंत्रणा सुरू केली.
  •          रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी ५०० लोकांकरिता धर्मशाळा उभारली.
  •          प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण केले.
  •          वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा ९७ वरून १३३ करण्यात यश आले.


हे सगळं सरकारी अडथळ्यांची शर्यत पार करीतच त्यानी केलं असणार. आता मार्डला हाताशी धरून सरकरच त्याना दूर करू पहात आहे काय?      
परवा विधान परिषदेत उच्च शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे या विषयासंदर्भात म्हणाले की ‘यांची चौकशी होऊन जाऊ दे, म्हणजे दूध का दूध, पानी का पानी हो जायेगा’ हा निर्णय नीर क्षीर विवेक असलेला वाटत नाही तर ‘दूध का पानी’ करणारा वाटतो. डॉ. तात्याराव लहानेनी केलेली रुग्ण सेवा कुणाच्या डोळ्याना खुपत आहे?  का?   

वृत्तपत्र काय म्हणतात:  





        

15 June, 2015

इज्जत


आपली समाजात किती इज्जत आहे, किंबहुना असावी यासाठी सगळेचजण सजग असतात. आपल्या इज्जतीला धक्का लागू नये म्हणून प्रयत्न करतात. जर एखद्याने सर्वांसमोर आपली अक्कल काढली किंवा घालूनपाडून बोलला तर आपल्याला आपल्या इज्जतीचा फालूदा होतोय असं वाटून समोरच्याचा खिमा करण्याची तिव्र इच्छा होते. घराण्याची इज्जत, मुलीची इज्जत, स्त्रीची इज्जत, हल्ली लग्नाच्या बाजारात मुलाची इज्जत असे इज्जतीचे अनेक प्रकार आहेत. जो तो आपापल्या परीने ती सांभाळण्याचा प्रयत्न करतो. एकूण काय प्रत्येकजण आपल्या समजानुसार आपल्या इज्जतीला जपण्याचा प्रयत्न करतोच करतो.

अगदी लहानपणापासून घरी आई आणि शाळेत शिक्षक आपल्याला कसं वागावं याचे धडे देत असतात आणि मुलं सर्वाथाने शहाणी होवून आपला आणि आपल्या घराण्याचा पर्यायाने समाजाचा उत्कर्ष कसा  होईल यासाठी प्रयत्न करीत असतात. मित्रहो... नमनाला घडाभर पाणी ओतल्यावर मी आता इज्जतीवर येतो. त्याचं काय झालं आज पार्ल्यात लोकमान्य सेवा संघाच्या पु.वि. भागवत गुंतवणूक प्रबोधन केंद्रातर्फे श्रीमती हर्षला चांदोरकर (Sr. Vice President, CIBIL) यांचं वैयक्तिक पत मानांकन (Credit Rating) या विषयावर व्याख्यान होतं. फार आधीपासूनच तुमचं क्रेडीट किती आहे यावर तुमची इज्जत अवलंबून असते. 

वाहन, घर कर्ज, क्रेडीट कार्ड इ. कारणासाठी प्रत्येक व्यक्तीचं ‘पत मानांकन’  बॅंका किंवा संबंधीत संस्था तपासत असतात. तुम्हाला कर्ज किती मिळू शकतं हे तपासताना बॅंक तुमचं क्रेडीट रेटींग किती आहे याचा दाखला मिळवते आणि नंतरच कर्ज मंजूर करायच का? किती रक्कम द्यायची ? की कर्ज द्यायचंच नाही हे त्या दाखल्यावरून ठरतं. कोण देतो हा दाखला?

Credit Information Bureau (India) Limited किंवा CIBIL ही संस्था हे काम गेल्या पंधरा वर्षांपासून करीत आहे. कुणी बॅंकेकडून कर्ज घेतलं, क्रेडीट कार्ड घेतलं, फोन कनेक्शन घेतलं की कर्जाचा हप्ता, फोनचं बिल किंवा क्रेडीट कार्डची देय रक्कम वेळेत भरली जाते किंवा कसं याची माहिती त्या त्या संस्था वेळोवेळी सिबिलला कळवत असतात. या नोंदींची योग्य वर्गवारी करून सिबिल प्रत्येक व्यक्तीचं पत मानांकन करून त्याला मार्क देत असते. कधीतरी चुकवलेला कर्जाचा हप्ता, क्रेडीट कार्डचं न केलेलं पेमेंट किंवा फोनचं न भरलेलं बिल आपली बाजारातली पत घालवू शकतं. आणि तुम्ही जर वेळेवर रक्कम अदा करीत असाल तर आपल्याला चांगलं पत मानांकन प्राप्त होवू शकतं.

सिबिलकडे पाचशे रुपये भरून तुम्ही तुमचं मानांकन तपासू शकता. नोकरीला लागताना किंवा लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी असा दाखला समोरच्याने मागितला तर आता नवल वाटायला नको. तेव्हा मित्रहो...,  यह इज्जत का मामला है। सिबिल सगळं बघतंय, तेव्हा इज्जतीला धक्का लागू देवू नका.          

11 October, 2014

सत्याचा अर्थ नोबेल


भारताचे कैलाश सर्त्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफजाई  यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल त्या महान व्यक्तींचं अभिनंदन. दोघांचही वैशिष्ट्य म्हणजे तरूण वयातच त्यांनी लहान मुलांसाठी स्वत:ला वाहून घेतलं आणि आपलं काम निष्ठेने करीत राहिले. कैलाश सर्त्यार्थी आज साठ वर्षाचे आहेत पण वयाच्या तीसाव्या वर्षीच अभियंता असलेल्या कैलाशनी भरभक्कम पगाराची नोकरी सोडून बाल मजूरी विरुद्ध आवाज उठवला.
मलाला युसूफजाईचं तर आणखीनच कौतूक करायला हवं कारण आज ती सतरा वर्षांची आहे आणि वयाच्या अकराव्या वर्षीच तीने मुलींच्या शिक्षणासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावली.  पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या धमक्यांपायी मुलींना शिकू दिले जात नाही व समाजात एकूणच त्यांची अवस्था दयनीय असते. याविरोधात तिने आवाज बुलंद केला होता. त्यामुळे चिडून जाऊन तालिबानी अतिरेक्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्लाही चढवला होता. तिच्या डोक्याला गोळी लागून ती गंभीर जखमी झाली होती, परंतु मोठय़ा जिद्दीने मृत्यूशी दोन हात करीत तिने ही लढाई जिंकली होती. त्यानंतरही तिने आपले काम सुरूच ठेवले आहे.  पाकिस्तानात आणि अफगाणीस्तानच्या सिमेवरच्या स्वात खोर्‍यात अतिरेक्यांचा वावर ही रोजचीच गोष्ट आहे त्याच अतिरेक्यांनी तिच्यावर गोळ्या चालवल्या आणि ती मृत्यूच्या दारातून परत आली.

कैलाश सर्त्यार्थी आणि मलाला युसूफजाई यांना नोबेल पुरस्कार मिळाला म्हणजे मनवतेलाच तो मिळाला आहे. या आनंदात आपणही सहभागी होवूया.




        

17 September, 2014

सर्वात पुढे आहे हात मारूक माहाराष्ट्रावर माझ्या


राज्य परिवहन  - यथा राजा तथा

पार्श्वभूमी : लाल मातीच्या कोकणात काळ्या डांबरी रस्त्यांची पार दुर्शशा उडालेली आहे. चतुर्थीचे दिवस असल्याने MH 01 ते  MH 47  अशा नंबरप्लेट असलेल्या अनेक गाड्या गावोगावी रस्तोरस्ती उभ्या दिसत असल्या तरी एस. टी. ची वाट पहाणारी मंडळी “आजून कशी एस्टी इली नाय” असा त्रासिक चेहरा करून कान आणि डोळे तिकडे लावून बसलीय. पवसाची रिपरिप अधूनमधून चालूच. रडणार्‍या पोराला रपाटा घालू का नको अशा संभ्रमात आये आहे.

एवढ्यात एस्टी येते. एवढा वेळ चारा-पाचच वाटणारी पण आता पाच-पंचवीस झालेली मंडळी तुटून पडतात.

“चड चड बाबा, आता चडलस नाय तर मोदी मंत्रीमंडळात घेवचो नाय” – एक म्हातारा

भराभर सगळे प्रवासी गिळून एस्टी निघते. आत जागा असूनही बरेच जण उभेच. सिट भिजलेल्या. असो…, या सिट पावसात नायतर कधी भिजणार?  थांबलेला पाऊस पुन्हा बरसू लागतो तसा छतातून अभिषेक सुरू होतो. या सिट त्यामुळेच भिजलेल्या होत्या तर. “गळकी एस्टी कळवा, एक हजार रुपये मिळवा’ या घोषणेचं काय झालं असा विचार मनात आला. की आता त्याचं  “धडकी एस्टी कळवा, एक हजार रुपये मिळवा’”  असं झालय? वरचे थेंब चुकवत उभं राहाण्याची कसरत करीत असतानाच अनंत गचके खात प्रवास सुरू असतो.  पाच-सहा किलोमिटरचा प्रवास होतो आणि पत्रा फाटल्या सारखा जोरदार आवाज येतो.

आता आणि गाडीर काय पडला? असा प्रश्न पडला असतानाच गाडीवर नाही तर खाली प्रॉब्लेम झाला आहे हे लक्षात येतं. गाडी थांबवून डायव्हर खाली उतरतो. मागच्या चार टायर पैकी एक पंक्चर झालेला असतो.

आता.............................. असा सवाल सगळ्याच्याच चेहर्‍यावर वाचता येतो. पुढे तीन तासानी येणार्‍या एस्टीवरच आता मदार हे अर्धे अधिक ओळखून असतात.

“वर स्टेपनी आसा पण जॅक नाय”  इती कंडक्टर 

“चला घेवन तशीच” एक प्रवासी.

प्राप्त परिस्थितीत हळूहळू गाडी पुढच्या प्रवासाला निघते. मग अनंत सुचना सुरू होतात. वानगी दाखल काही पुढे देत आहे.

”पाठसून येणारी पांग्रड तरी मिळात, चला तुमी अशीच कडावलीक जावदे.”

“असे गेलो तर पुढची गाडी कशी मिळणार? कंडक्टर नुसते काय बसलात? डेपो मध्ये फोन करा, 
दुसरी गाडी मागवा, हे चालणार नाही. कुणी तरी बोललच पाहिजे” इती संतप्त मुंबईकर.

कंडक्टर हू की चू करत नाही. (केलं तरी त्या खडखडाटात काय ऎकू येणार?)

”आता दुसरं काहीतरी बघितलं पाहिजे, ओ कंडक्टर आमचे पैसे परत द्या” दुसरा संत्रस्त मुंबईकर.

गाडी कुपवडा-पांग्रड-कडावल दर्शनाला निघाल्यासारखी डोलत चाललीय. नेहमीचे मुरलेले मालवणी 
प्रवासी गप्प बसून “गाडी न्हेता मा, गप बासाया” असं न बोलताच म्हणत असतात.

कडावल बाजाराच्या अलिकडे गाडी बाजूला थांबते. सगळे प्रवासी उतरून मागून येणार्‍या पांग्रड एस्टीची वाट बघत असतात.

“आता ती भरान इली म्हणजे झाला” इती याक चेडू.

“हे बघा बाबा, दादा आमका हसतत, कशे तुमका गंडवलव म्हणान. मायxxxनी फसवल्यानी रे, हे पैशे खातत आणि आमची ही परस्थिती. हसतत बग तरी कशे, नुसते जायराती ‘सर्वात पुढे आहे हात मारूक माहाराष्ट्रावर माझ्या” एक अस्सल मालवणी.

“आता नाय येवचे निवडान” दुसरा

“येवन खातले काय, फुटक़ी गाडी” पहिला.

मागाहून येणारी पाग्रड गाडी येवून उभी रहाते.

पुन्हा तशीच झुंबड, मंडळी तुटून पडतात.

असे अंक गावोगावी चालूच आहेत.      

        

                       

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates