Showing posts with label प्रसार माध्यमे. Show all posts
Showing posts with label प्रसार माध्यमे. Show all posts

12 May, 2025

तिथे नांदे शंभू कैलासाचा पती!

 

(दिनांक ११ मे २०२५ रेजी महराष्ट्र टाईम्समध्ये आलेला माझा लेख)


 

शिव-पार्वतीचं निवासस्थान, गणेशाचं जन्मस्थान आणि म्हणूनच की काय, हिंदूंचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. आयुष्यात एकदा तरी पाहावीत अशी जगातील कितीतरी ठिकाणं असतील, पण कैलास-मानसरोवरचं स्थान भारतीयांच्या मनात पक्कं घर करून असतं आणि या पवित्र स्थळाचं दर्शन घेण्यासाठी सगळेच आतूर असतात. ‘कैलास’ या शब्दाभोवतीच आध्यात्माचं गूढ वलय आहे. इहलोकाची यात्रा संपवून परलोकात जाणार्‍याला कैलासवासी म्हणून संबोधलं जातं. ऋषी, मुनींचं वास्तव्य ज्या हिमालयात झालं आणि आजही जगभरातून हजारो लोक साधनेसाठी ज्या ठिकाणी धाव घेतात, त्या हिमालयात एका अढळ स्थानावर कैलास पर्वत उभा ठाकला आहे. पायथ्याला सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा उगम आणि मानसरोवराचं पवित्र जल असलेला विशाल जलसागर आहे. पाहताक्षणी निसर्गाच्या विराट दर्शनानं नतमस्तक व्हावं असं हे ठिकाण आहे. हे विराटरूप म्हणजेच साक्षात शिवशंकर.


असं हे पवित्र स्थान आपल्या शेजारच्या तिबेटमध्ये आहे. तिबेटचा ताबा चीनने घेतल्यानंतर १९५० पासून भारतीयांना कैलासचं दर्शन दुर्लभ झालं होतं. १९८० साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि पुन्हा एकदा कैलासची यात्रा भारतीयांना करता येवू लागली. भारताच्या उत्तरांचल राज्यातून खडतर पायवाटेने चालत जाऊन तिबेटमध्ये प्रवेश करता येतो आणि पुढे कैलास-मानसरोवरला जाता येतं. भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत जी कैलास-मानसरोवर यात्रा आयोजित केली जाते ती या मार्गानेच नेली जाते. या यात्रेचा कालावधी २७ दिवसांचा असतो. या शिवाय नेपाळ-काठमांडू मार्गेही ही यात्रा करता येते. अनेक प्रवासी कंपन्या याच मार्गे यात्रेकरूंना नेतात आणि काठमांडूला थेट पोहोचता आल्याने तिथूनही ही यात्रा १३ दिवसात पूर्ण करता येते. साधारणत: मे ते सप्टेंबर महिन्यात म्हणजेच तिबेटच्या उन्हाळ्याच्या दिवसात ही यात्रा करता येते.


कैलास-मानसरोवर यात्रेसंदर्भात अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. ही यात्रा अत्यंत खडतर आहे. ठरावीक आजार असलेल्यांना ही यात्रा करताच येणार नाही, आणि आयुष्याच्या उत्तरार्धात ही यात्रा करावी असे अनेक समज आहेत, जे अपुर्या माहितीवर आधारित आहेत. ही यात्रा काठमांडू मार्गे केल्यास, काठमांडू ते मानसरोवर या संपूर्ण प्रवासाला रस्तामार्गे जीप किंवा बसमधून जाता येते. या मार्गात कुठेही चालावे लागत नाही. असं असलं तरी, या यात्रेला जाण्यापूर्वी किमान दोन महिने रोज सकाळी किमान एक तास जलद चालण्याचा व्यायाम करावा लागतो. प्राणायाम करणे, टेकडी चढणे किंवा ट्रेकिंगला जाणे यामुळे आपल्या फुप्फुसाची क्षमता वाढते आणि शरीरातील स्नायू बळकट होण्यास मदत होते. त्यामुळे, यात्रेदरम्यान याचा चांगलाच फायदा होतो.

मानसरोवरची उंची समुद्रसपाटीपासून १५,६०० फुटांच्या जवळपास असल्याने, त्याठिकाणी हाय अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास होऊ शकतो. साधारणपणे, माणूस दहा हजार फुट उंचीवर गेल्यावर हाय अल्टीट्यूड सिकनेस (HAS) किंवा ऍक्यूट माऊंटन सिकनेस (AMS) चा त्रास होऊ शकतो. एवढ्या उंचीवर असलेली विरळ हवा आणि त्यामुळे असलेला कमी दाब असलेला ऑक्सिजन यामुळे हा त्रास होतो.


अशा विरळ हवेत शरीरातील पाणी वेगाने कमी होत आहे आणि फुप्पूसातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने त्रास होऊ शकतो. अचानक जास्त उंचाईवरून प्रवास झाल्याने हा त्रास उद्भवू शकतो. असं असलं तरी हा त्रास तात्कालिक स्वरूपाचा असतो. जर हळू हळू वर चढत गेल्यास असा त्रास कमी होतो. डोकं दुखणं, थकवा जाणवणं, पोटदुखी, नीट झोप न येणं अशी त्रासाची लक्षणं असतात आणि त्यामुळे चिडचिड होणं, मळमळल्यासारखं होणं, उलटी येणं, चक्कर येणं असे त्रास होऊ शकतात. यावर हळू हळू उंचीवर जाणे हा सर्वात चांगला उपाय आहे. असं केल्याने विरळ हवेची शरीराला सवय होते. अशा उंच ठिकाणी जोरदार हालचाल न करणं (उदाहरणार्थ जलद चालणं, धावणं हे टाळावं), आल्कोहोलिक पदार्थ टाळणं, धूम्रपान न करणं अशा प्रकारची काळजी घेतल्यास त्रास कमी होतो. उंचावरच्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी हळू हळू उंचीवर गेल्यावर तिथे काही काळ विश्रांती घ्यावी. थोडं अधिक उंचीवर जाऊन पुन्हा कमी उंचीवर यावं. यामुळे शरीराला त्या वातावरणाची सवय होते (Altitude acclimatization). भरपूर प्रमाणात पाणी पिणे, जास्त उंचावर न थांबता लवकर खाली येणे अशा गोष्टी जाणीवपूर्वक केल्यास यात्रा सुखद होऊ शकते. यात्रेच्या कालखंडात, तिबेटमध्ये उन्हाळा चालू असला तरीही तिथली हवा महाराष्ट्राच्या विचारात खूपच थंड असते आणि जोरदार बोचरे वारे वाहत असल्याने पूर्ण यात्रेदरम्यान उबदार कपडे अंगावर असणे आवश्यक आहे.


नेपाळमध्ये दाखल झाल्यावर तिथल्या पशुपतीनाथासह अनेक उत्तम आणि प्राचिन मंदीरांचा परिसर फिरून पाहताना यात्रेला जाण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती होते आणि पावलं आपसूकच मानसरोवरला प्रस्थान करण्यासाठी उतावीळ होतात. काठमांडू शहर सोडल्यावर लगेचच हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटत आपला प्रवास सुरू होतो. मनोहारी धबधबे आणि नदीचा खळखळता प्रवाह याचा रम्य देखावा पाहात हा प्रवास काही ठिकाणी रस्ता खराब असला तरी सुखद होतो. काठमांडू शहरापासून जस-जसे आपण दूर येऊ लागतो तसतशी थंडी आपली जाणीव करून देते. काठमांडूपासून रस्ते मार्गाने कोदारी या नेपाळ-तिबेटच्या सीमेलगतच्या गावात गेल्यावर पारपत्र आणि प्रवेश विषयक बाबींची पूर्तता केल्यावर आपण तिबेटमध्ये येऊन दाखल होतो. तिबेटमधले रस्ते हिमालयातले असूनही उत्तम असल्याने पुढचा प्रवास चांगला होतो आणि गाडीबाहेरच्या देखाव्यांचा आनंद मनोसोक्त लुटता येतो. घनदाट पर्वतराजींमधून नागमोडी वळणं घेत जाणारे रस्ते, खळाळते प्रवाह, आल्हाददायक हवा, बौद्ध धर्मीयांनी ठिकठिकाणी बांधलेल्या प्रार्थनेच्या पताका या सर्वांचं धावतं दर्श घेत गाडी तिबेटच्या निर्जन प्रदेशातून जात असते आणि क्षितिजापर्यंत पसरलेला पठारी प्रदेश सुरू होतो. आता झाडा-झुडुपांची दाटी कमी होते आणि थोडासा वैराण प्रदेश सुरू होतो. हवेतला गारवा वाढतच जातो आणि त्याच बरोबर समुद्र सपाटीपासून वाढत जाणारी उंची एका वेगळ्याच प्रदेशात आल्याची जाणीव आपल्याला करून देते. सूर्य कलतीला जात असतानाच आपलं मुक्कामाचं गाव येते, मंडळी गाड्यांमधून पाय उतार होतात, वाफाळता चहा आणि शेरपा लोकांचं आतिथ्य याची मजा घेताना प्रसन्न मोकळ्या हवेत दिवसभराच्या प्रवासाचा शीण नगण्यच वाटतो.

मानसरोवरला १५,६०० फुटांच्या उंचीवर जाण्याच्या आधी, वाटेतल्या एखाद्या गावात एखादी टेकडी चढण्याचा सराव केल्यास, आपल्याला आपली क्षमता समजते. शिवाय, अशा उंचीवर वावरण्याची सवयही लागते. मानसरोवरच्या पुढे कैलासच्या परिक्रमेच्या तयारीसाठी या सरावाचा नक्कीच फायदा होतो, आणि या भागात कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, याची उजळणी होते.

तिबेटमधील डोंगराळ आणि मागास भागातून आपला प्रवास सुरू असला, तरी निसर्ग आणि बदलत जाणारा प्रदेश पाहात असताना मानसरोवरला पोहोचण्याची ओढ आणखीच वाढत जाते. निसर्गाच्या अफाट आणि बदलत्या रुपामुळे आपली जिज्ञासा वाढते. आपलं धावणारं वाहन, वाटेत लागणारं एखादं छोटं गाव, आणि मेंढ्या हाकणारे मेंढपाळ, एवढा काय तो चर सृष्टीचा संपर्क; बाकी सगळं कॅनव्हासवरचे चित्र वाटावं असंच दिसतं. मुक्कामाचं ठिकाणही नेहमीपेक्षा वेगळं आहे, चार भिंती आणि झोपण्या-जेवण्याची सोय. आधुनिक युगापासून चार पावलं दूर असण्यातली मजा इथेच अनुभवावी लागते. सर्व सुविधांपासून वंचित असलेल्या या ठिकाणांनी आपलं लक्ष कैलासकडे केंद्रित करणं अत्यावश्यक असतं. सभोवताली विशाल पसरलेला निसर्ग अनुभवताना आपसूकच मन विरक्त होत जातं.

मैलोनमैल पसरलेल्या प्रदेशावर नजर फिरवत असतानाच अचानक मानसरोवराची पहिली झलक नजरेस पडते. आणि आजवर केलेल्या तपश्चर्येचं फलित मिळाल्याचा आगळा आनंद नसानसातून प्रवाहीत होऊ लागतो. मग तो क्षण जवळ येतो, आपण मानसरोवराच्या काठावर उभे आहोत, समोर दूरवर पसरलेलं निळ्याशार जलाने भरून वाहणारं मानसरोवर आहे. सूर्यप्रकाशात चमचमणारे पाणी, त्याचे बदलते रंग, अंगावर रोमांच उभा करणारा गार-गार स्पर्श, पवित्र तीर्थाची याची देही याची डोळ्यासमोर आलेली पहिली भेट. आकाशातील अनंत रंग, पिंजारलेल्या ढगांच्या क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या आकृती आणि त्या सर्वांच्या समोर उभं असणारं साक्षात कैलास शिखर. हे बाहेर तसंच, मनात उचंबळून आलेला भावभावनांचा कल्लोळ. अतिप्रियतेने सहलसाथींची घेतलेली गळाभेट. एका दर्शनाने सारं कसं क्षणात बदलून जातं. सारा शीण, सारा भार सत्वर नाहीसा होतो, मन भारावून जातं. आपण भानावर येतो तेव्हा आता एकच ध्यास लागलेला असतो तो कैलासाच्या परिक्रमेचा. मानसरोवरच्या दर्शनाने पावन झालेलं मन-शरीर आता त्या एकाच विचाराने प्रेरीत झालेलं असतं. परिक्रमा.....! परिक्रमा.....!

कोदारी, न्यालम, सागा, होरचू, चूई गुंफा आणि दारचेन असा काठमांडू पासून सुरू झालेला मोटार प्रवास आता संपून पायी किंवा घोड्यावरून परिक्रमा करण्याचा दिवस येऊन ठेपतो. मनात एक आगळीच हुरहुर साठून राहाते. तासाने तासाला, काही वेळा मिनिटागणिक बदलत जाणारं वातावरण. बोचरे अतीशीत वारे, काळंकुट्ट आभाळ आणि त्या वातावरणाला साजेशी बर्फ वृष्टी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, परिक्रमेत आपला तग लागणार का? हा प्रश्न आणि परिक्रमा करायची लागलेली अनिवार ओढ इथे कस लागतो आपल्या मानसिक तयारीचा आणि आपल्या बरोबर असलेल्या सहलसाथीच्या नेतृत्व गुणांचा. मनाची पूर्ण तयारी करत आपण परिक्रमेसाठी सिद्ध होतो. स्वत:च्या पायांनी आणि मर्जीने यमद्वारापाशी येऊन उभं राहिल्यावर मनात जे भाव जागृत होतात ते वर्णनातीत असतात. जणू इहलोकीची यात्रा इथे संपते आणि यमद्वाराकडून पावलं पुढे पडतात ती कैलासाच्या प्रदक्षिणेसाठीच.

यमद्वार मागे टाकून आपण जणू परलोकातच प्रवेश करीत असतो. दमछाक करणारा चढा रस्ता, कोरडं आणि शुष्क वातावरण, उन्हाचा चटका, थंडीचा शहारा, पायांना ओढ, पण हे सगळं मागे टाकून मन मात्र पुढेच धावत असतं. त्या विराट रुपाच्या दर्शनासाठी. खरं तर, एव्हाना आपणही त्याचाच एक भाग बनलेले असतो. तो निळकंठ, कैलासपती आपल्याला आत सामावून घेत असतो. जय भोले! या नादात निनादत असताना पुन्हा एकदा बळ एकवटून आपण चालत राहातो. वाटेत उमेद वाढवणारं कैलास शिखराचं दर्शन होत राहातं. मजल दर मजल करत करत पहिल्या दिवसाच्या चालीनंतर रात्रीच्या मुक्कामाचा पडाव येतो.... दिरापूक. कैलास शिखराचं दर्शन इथे अगदी जवळून होतं. आता त्याच्या आणि आपणामध्ये कुणीच नसतं. त्या अनादी अनंताच्या दर्शनाने मन तृप्त होतं. दिवसभराचा १२ किलोमीटरच्या प्रवासाचा शीण पळून जातो आणि दुसऱ्या दिवशीच्या २२ किलोमीटरच्या प्रवासासाठी मन सज्ज होतं.

दोन रात्री आणि तीन दिवसांत पूर्ण होणारी परिक्रमा या प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे दुसऱ्या दिवशी असलेला प्रवास. या प्रवासात १८,६०० फुट उंचीवरचा डोलमा पास पार करणे फार महत्वाचे आहे आणि याच्यावर बऱ्याच चर्चा होत असते. पाठीवरचे ओझे (तिथे वजन खूप नसले तरी थोडं वजन आवश्यक असते), पाण्याची उपयुक्तता, ताकद वाढवणारा सुकामेवा या सर्वांचा महत्व पहिल्याच दिवशी स्पष्ट होतो, तसंच हातातली आधाराची काठी जीवनसाथीच्या रूपात वाटते.

दिरापूकचा मुक्काम हलवल्यावर लगेचच डोलमा पासची उंची खुणावू लागते. जय भोलेनाथचा गजर करीत प्रत्येकजण आपल्या ताकदीप्रमाणे अंतर कापत जातो. चहू बाजूंला पसरलेला बर्फ आणि आकाशाला गवसणी घालायला निघालेले यात्रेकरू. एका वळणावर ही रांग दिशेनाशीत होते, प्रत्येकाला जी जागा खुणावत असते तिथे डोलमा पास सामोरा येतो. विजयी वीराप्रमाणे एकेका करत यात्रेकरू तिथे पोहोचतो. आपल्या श्रद्धेप्रमाणे पूजा करीत आहेत. हाच तो यात्रेतला परमोच्च बिंदू. थोडा वेळ थांबून यात्री उताराला लागतात, तोच समोर खाली गौरी कुंडाचे दर्शन घडते. इथेच गणेशाचं जन्मस्थान असल्याचं मानलं जातं. पुराणात वाचलेली ठिकाणं प्रत्यक्ष पाहताना मन उल्हसित होतं. आता त्या खिंडीतून उताराला लागलेले यात्रेकरू महत्त्वाचा टप्पा पार केल्याच्या आनंदात आणि बाजी मारल्याच्या ऐटीत मार्गक्रमण करीत जातात. पुन्हा कैलासाचं दर्शन होतं. हात आपसूकच जोडले जातात. संध्याकाळपर्यंत लांबलेला प्रवास झुथूलपूक या गावात संपतो. आजचा पडाव इथेच आहे. यात्रेतला महत्त्वाचा भाग पार झाल्याने सर्वांचीच कृतकृत्य झाल्याची भावना असते.


तिसऱ्या दिवशीचा आठ किलोमीटरचा प्रवास हा परिक्रमा पूर्ण होणार या आनंदातच सोपा वाटू लागतो. प्रवासादरम्यानची बर्फवृष्टी आणि पाऊस यांची तमा न बाळगता, आधीच केलेल्या पूर्ण तयारीमुळे हा प्रवासही सुखरूप पार पडतो. पुन्हा लांबून मानसरोवराचं दर्शन होतं. परिक्रमेच्या आधी तिथे केलेलं होम हवन आठवतं. मंडळी परतीच्या प्रवासाला लागतात. काही लोकांना वाटतं की माणसं असा खडतर प्रवास का करतात? याचं उत्तर म्हणून एक प्रश्नच विचारावा लागेल; की गिर्यारोहक एव्हरेस्ट का चढतात? किंवा विक्रमवीर नायगारा का ओलांडतात? मित्रहो, यालाच जगणं म्हणावं नाही का? अशा ठिकाणी गेल्यावर जगण्यातली मजा आणखी वाढते आणि उर्वरित आयुष्याला ही काही अर्थ प्राप्त होतो. आज आपल्या घरात ज्या सोयी-सुविधा हात जोडून उभ्या असतात, त्याचं एरवी आपल्याला काहीच कौतुक वाटत नसतं.

पण अशा ठिकाणी प्रवास करून आल्यावर आपणाला आपलं किती आरामदायी जीवन जगत आहोत याचा साक्षात्कार होतो. या अशा प्रवासांमधून आपण जगण्याची कला शिकत असतो. त्या विराट दर्शनाने आपलं मनही विशाल होतं. जगण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.

 

नरेंद्र प्रभू

09 November, 2019

तेजाची आरती





गीत रामायण हा मराठी गीत, गायन आणि सादरीकरणाचा मुकूटमणी. गीत रामायण हे एप्रिल १९५५ ते एप्रिल १९५६ या कालावधीत ग. दि. माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेलं, सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं आणि गायीलेलं महाकाव्य आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालं होतं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या 'गीतरामायणा'स भरीव लोकप्रतिसाद मिळाला होता.

अनघा मोडक
या वर्षी आकाशवाणीने ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्या दोघांच्याही कारकिर्दीवर आधारित मालिका २५ जुलै २०१९ पासून प्रत्येक गुरूवारी सकाळी प्रसारीत केली होती. १३ भागातली ही मालिका श्रोत्यांना आनंदाचा खजिनाच रिता करून गेली आहे. अतिशय तरल, भावमय आणि ओजस्वी वाणी असलेल्या अनघा मोडक यांनी त्या मालिकेचं लेखन आणि निवेदन केलं आहे. आकाशवाणीच्या सुजाता परांजपे (क्रेंद संचालक) आणि नेहा खरे (कार्यक्रम अधिकारी) यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या मालिकेला चेतना झांजे यानी निर्मिती सहाय्य केलं आहे.       

गदिमा आणि बाबूजी या दोन महान व्यक्तीमत्वांच्या एकुणच जीवनाचा आणि कारकिर्दीचा अतीशय रंजक असा अभ्यासपूर्ण आढावा या तेरा भागात घेतला गेला आहे. अनेक रंजक किस्से, डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग आणि उद्बोधक माहिती या प्रसारणातून मिळाली. हे तेरा भाग प्रसारित झाल्यानंतर गेल्या गुरूवारी या चमूने श्रोत्यांशी संवाद साधण्याचाही कार्यक्रम प्रसारीत केला तेव्हा त्याला जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला, श्रोत्यांनी आपले सद्गदीत करणारे अभिप्राय दिले. गदिमा आणि बाबूजींच्या जीवन कार्याचा अभ्यास करून तो अल्प वेळात सादर करण्याचं शिवधनुष्य या कार्यक्रमाच्या लेखिका आणि निवेदिका अनघा मोडक यांनी लिलया पेललं आहे. 

नेहा खरे

लहानपणापासून दर्जेदार कार्यक्रम देणार्‍या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत आलोय. माहिती आणि मनोरंजना बरोबर विश्वासार्हता हे आकाशवाणीचं वैशिष्ट्य. बदलत्या युगात नवनव्या प्रसिध्दी माध्यमात मध्यंतरी आकाशवाणी काहिशी झाकोळून गेली होती. पण एफएम वाहिन्या आणि मुख्य म्हणजे मोबाईल अ‍ॅप (NewsOnAir)  या नव्या तंत्रज्ञानाचा वापर आकाशवाणीने सुरू केला आणि जगभरात पसरलेल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना पुन्हा एकदा जुने दिवस, जुनी गोडी आपल्या मुठीत आल्याचा आनंद झाला. मोबाईल अ‍ॅपमुळे तर कुठेही असलं तरी कार्यक्रम ऐकता येतात किंवा महत्वाच्या बातम्या कधीही ऐकता, पहाता, वाचता येतात.                   

हे भाग ऐकताना ते पुन्हा पुन्हा ऐकावे असं वाटत होतं, नेहा खरे आणि त्यांच्या चमूने ही बाब लक्षात घेऊन पहिले दोन भाग YouTube वर कधीही ऐकण्यासाठी उपलब्ध  करून दिले आहेत (पुढचे भागही लवकरच उपलब्ध होतील अशी आशा आहे)रसिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. एवढा सुश्राव्य कार्यक्रम सादर केल्याबद्दल आकाशवाणीचे धन्यवाद.   




28 October, 2019

लडाख डायरी



ईशान्य वार्ता मासिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख.  

सप्टेंबर २०१९
पहाटे चार वाजता गो एअरच्या विमानाने मुंबई सोडली आणि अडीज तासांनी लडाखची धरती सोनेरी सुर्यकिरणात माखून निघालेली दिसायला लागली. लडाखचं विहंगम दृष्य पाहून नवख्याला तो रुक्ष प्रदेश वाटेल, पण मला त्याचे अंतरंग चांगलेच परिचयाचे होते. या सप्टेंबरमध्ये १९व्या वेळी जातानाही मला त्याचं तेव्हढंच आकर्षण होतं जेवढं आत्माराम परब यांच्या सोबत दिलेल्या पहिल्या लडाख भेटीच्या वेळी होतं. मात्र कलम ३७० हटवल्यानंतर ची ही माझी पहिली भेट. या वेळी नेहमीप्रमाणे श्रीनगरला न जाता मुंबईहून थेट लेह गाठलं. हवेत चांगलाच गारठा होता. लडाखच्या हिवाळ्याला नुकतीच सुरूवात झाली होती. विमानतळाबाहेर नुरबू हा तरुण लडाखी मित्र स्वागताला हजर होता. विमानतळावर नेहमीचा उत्साह आणि आपुलकीचा भाव जाणवत होता. नुरबू बरोबर लेह गाठलं. हॉटेल मुन्शी कॉन्टीनेंटलचे व्यवस्थापक राजन शर्मा हसत मुखाने सामोरे आले. कुठेही कलम ३७० हटवल्याचा तणाव किंवा कुठलाच वेगळेपणा जाणवत नव्हता. लेह आपल्याच नादात मस्त होतं.

थोडी विश्रांती झाल्यावर स्वागत कक्षात राजनजींशी गप्पा रंगल्या असतानाच तिथे बसलेल्या एका इसमाकडे लक्ष गेलं. थोड्याच वेळात “कैसे हो?” विचारत त्याच्याशी गप्पांना सुरवात झाली. हा माणूस भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना न्यायला आलेल्या टॅक्सीचा चालक होता. तो कधीही निघून जाईल म्हणून मी लगेच विषयाला हात घातला, अर्थातच मला लडाखला केंद्रशाशित प्रदेश बनवलं गेलं त्याबद्दल त्याचं मत विचारायचं होतं.
मी:   युटी (Union Territory) अच्छा है?
तो:    हा! अच्छाही है हमारे लिए।
मी:   क्यु ?
तो:    अब हमे श्रीनगर नही जाना पडेगा. इधरही अच्छा स्कुल खुलेगा।
मी:   कितने बच्चे है आपके?                     
तो:    छे।
मी:   किधर रहते हो?
तो:    इधर ही, लेह।
मी:   गाव किधर है आपका?
तो:    तुरतुक।
मी:   नाम क्या है?
तो:    हसन
मी:   सब इधर पढते है?
हसन: नही, दो गावमे है
मी:   उधर स्कुल है?
हसन: हा... है, सेना चलाती है।
मी:   कितना खर्चा आता है,
हसन: जादा कुछ नही, सब सेना उठाती है।
मी:   सरहद के उसपार आना जाना होता है?
हसन: नही, वहा हमारे रिश्तेदार है, कभी मिलना है तो बाघा बॉर्डर से आते है।
मी:   हम उसे अटारी बॉर्डर कहते है।
हसन: वही, उधरसे आते है, बडी तकलिफ़ मे है, बहोत महंगाई है उधर, कुछ नही मिलता.
मी:   आपका एमपी कौन है?
हसन: जेटीएन (जामयांग त्सेरींग नामग्याल)
मी:   उधरभी वही?
हसन: हा पुरे लडाख मे एकही खासदार है।      
मी:   वह कुछ करेगा आपके लिये?
हसन: हा करेगा ना!

हसन नाव सांगितलं नसतं तर तो थेट लडाखी बौद्ध दिसत होता. पहिल्याच दिवशी जमिनी हकिकत समजत होती.
                  
१७ सप्टेंबर २०१९
सकाळी लवकर उठून कारगिलला जायला निघालो. वाटेत पथ्थरसाहेब गुरूव्दाराला थांबलो. भारतिय जवानांकडून चालवल्या गेलेल्या या शिखांच्या पवित्र गुरुव्दारात प्रसाद तर मिळालाच पण तिथल्या जवानांकडून नास्ता घेण्यासाठीही आग्रह होत होता. परंतू तिथे न थांबता पुढे निघालो. आता थेट द्रासचं कारगिल युद्ध स्मारक गाठायचं होतं. मॅग्नेटीक हिल, सिंधू-झंस्कार संगम, मुनलॅंड, लामायुरू, फोटू-ला, नमकि-ला, मुलबेक करत कारगिलला पोहोचलो. कारगिल बाजारपेठेत थोडा ट्राफीक जाम होता. सगळी बाजारपेठ गजबजलेली होती. ती मागे सारत द्रासा गावातलं कारगिल युद्ध स्मारक गाठलं. स्मारकापुढे नतमस्तक होऊन पुन्हा कारगिलला हॉटेलमध्ये आलो. सगळी आवराआवर झाल्यावर हॉटेल मालक सादीकभाईंची (यांनी कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय नागरीकांना, पत्रकारांना, सरकारी अधिकार्‍यांना आपल्या हॉटेल्मध्ये आसरा दिला होता.) भेट घेतली. सलाम-दुवा झाल्यानंतर रात्री निवांतपणे बोलायला सुरूवात केली.      

मी:         युटी (Union Territory) अच्छा है?
सादीकभाई:   अभी तो सब असमंजस मे है।
मी:         क्यो?
सादीकभाई:   आगे क्या होता है देखते है!   
मी:         क्यो? कुछ होने वाला है?
सादीकभाई:   नही... वैसी बात नही है। अभी सब शांती तो है, लेकिन श्रीनगर मे सब पाबंदी हटने के बाद मालूम पडेगा। कुछ लोग जो अपने नेता की बात मानते है वह हालात बिघाडनेकी कोशीश करेंगे। ३७० हटनेके बाद हॉटेल खाली पडा है। धंदा चौपट हुवा है। अब देखते है आगे क्या होगा। १९९० मे श्रीनगर मे मिलिटंसी शुरू हो गयी। लगातार पंद्रह साल हालात बिघडते चले गये। यहा कोई नही आता था। फीर २००४ से कुछ सुधार होने लगा। १५ साल मिलिटंसीने खाये, उसके आगे यह एक साल कुछ नही है। लेकीन वादे पुरे होने चाहीये। लोग बेचैन है।
मी:         बाकी हॉटेलवाले क्या कह रहे है?
सादीकभाई:   सब देखना चाहते है, आगे क्या होगा?
मी:         आपको भरोसा क्यो नही है की सब अच्छा होगा? 
सादीकभाई:   क्युकी ७० साल मे कुछ नही हुवा, अब मोदिजी कह रहे है... होगा। सब देखना चाहते है। होगा तभी मान जायंगे। बोलने से क्या होता है? जमिनी हालात सुधरने चाहिये। अब श्रीनगरसे यहा कोई नही आता है। मतलब सैलानी नही आते है।
मी:         हम लोग भी श्रीनगरसे आनेवाले थे, लेकीन डायरेक्ट लेह आये और अब यहा कारगिल पधारे है।     
सादीकभाई:   इंशाअल्ला सब ठिक होगा।
मी:         होना चाहिये। हॉटेल ओनर्स असोसियशन क्या कर रहा है? कुछ रिप्रेझेंटेशन दिया की नही?      
सादीकभाई:   देंगे तो भी किसको देंगे?
मी:         अभी ले. गव्हर्नर आजायेंगे उनको देना।
सादीकभाई:   अब सब अगले सिझन के इंतजार मे है।  
   
१८ सप्टेंबर २०१९
कारगिलहून निघालो, वाटेत खालसरला थोडं थांबलो, अक्रोड घेतले आणि पुन्हा लेह गाठलं. सगळीकडे सामान्य व्यवहार सुरू होते. कसलाही तणाव नव्हता.

१९ सप्टेंबर २०१९
आज सिंधू व्हालीत फिरायचं होतं. थिकसे मॉनेस्ट्रीला गेलो, तिथे बौद्ध धर्मगुरू दलायी लामा यायचे होतो म्हणून लगबग चालली होती. मनाली-लेह मार्गावर नेहमी प्रमाणे वाहतूल सुरू होती. लेह बाजार, हॉल-ऑफ-फेमला पर्यटक नेहमी सारखेच गर्दी करून होते.

२० सप्टेंबर २०१९
नुब्रा व्हालीत प्रवेश करायच्याआधी खारडुंग-ला हा जगातला सर्वोच्य मोटरेबल रोडवरचा पास  सामोरा येतो. तिथे पर्यटकांची गर्दी होती. नुब्रा व्हालीत स्थिती सामान्य होती.

२१ सप्टेंबर २०१९
ब्रॉड बॅन्डची लाईन टाकण्याचं काम 
काही पर्यटक मित्र नुब्रा मधून तुरतूकला जायला निघाले. आम्ही शेयॉक मार्गे पॅगॉन्ग लेक कडे निघालो. वाटेत ब्रॉड बॅन्डची लाईन टाकण्याचं काम जोरात सुरू होतं. विकासाची पावलं दिसत होती. भारत-तिबेट सिमेवर खडा पहारा देणारे आयटीबीपीचे जवान सिमेकडे निघाले होते. वाटेत लागणरी टांगसे, शक्ती, कारू ही गावं आणि तिथले लडाखी नेहमीप्रमाणे आपापल्या कामात मग्न होते.
                      
२२ सप्टेंबर २०१९
आज लेह जवळच्या साबू गावात फेरफटका मारला. इथे निवृत्त शिक्षक श्री. त्सेरींग नुरबू यांची भेट घेतली. गेली कित्येक वर्ष आपलं निवृत्त जीवन शांतपणे जगणार्‍या या जाणत्या लडाखी माणसाला बोलतं करण्यासाठी तोच प्रश्न विचारला:   
               
मी:         युटी (Union Territory) अच्छा है?
त्सेरींग नुरबू:  हा बहोत अच्छा है?
मी:         क्यो ?
शिक्षक श्री. त्सेरींग नुरबू
त्सेरींग नुरबू:  यह हमारी पहलेसेही डिमांड रही है। हमारी भाषा, संकृती, परंपरा, त्योहार, शादी, चाल-चलन आदी सब के सब श्रीनगर व्हाली से अलग है। भारत देश को  आजादी मिलनेके पहले से हम अलग ही थे। हमे किसीने पुछा तक नही की हमे किधर जाना है? हमे व्हाली से जबरन जोड दिया गया। सत्तर साल बित गये हमे न्याय की तलाश थी। अब हमे न्याय मिलेगा। हम खुद हमारा सरकार चलायेंगे। किसीके सामने हाथ फैलानेकी जरूरत नही है। अबा हमारे साथ जाजती नही होगी। भेदभाव नही होगा।               
मी:         क्या जाजती होती थी? कैसा भेदभाव?
त्सेरींग नुरबू: एकही PRC की बात देखो।   
मी:         PRC ख्या है?
त्सेरींग नुरबू: परमनंट रेसिडेंट सर्टीफिकेट मतलब PRC, यह नही होगा तो सरकारी नौकरी नही मिल सकती। हमे पिआरसी पाने के लिये बहुतही लडना पडता था। चार पिढीयोंका नाम सरकारी जमिन-खाता मे होगा तोही किसीभी लडाखी को पिआरसी मिलता था वर्ना नही। मा का नाम होने से भी नही मिलता था। कोई घर जमायी किया और वह हिमाचल प्रदेश या तिबेट से होगा तो उसे पिआरसी नही मिलता था। इससे बहोतही दिक्कत होती थी। वही दुसरी ओर पिओके से कोई भी आया और उसने व्हालीवाली लडकीसे शादी की तो उसे तुरंत  पिआरसी मिलता था। यह सरासर अन्याय ही है। अब वह दूर हो गया है।                 
मी:         अब विकास होगा? आप यह मनते है?
त्सेरींग नुरबू: होगा... जरूर होगा। उन्होने... मोदीजीने जो कहा वह किया है। हमे उनपर भरोसा है। उन्होने युटी की बात की थी, वह दे दिया। इतना आसान नही था वह। फिर भी हुवा, युटी होनेसे सब लोग बहोत खुश है। अब विकास होगा। वह भी दिन थे जब मै किसी कारण या काम से श्रीनगर जाता था। वहा पक्की सडक देखता था, ब्रिज देखता था तो मन ही मन मे बहोत दुख होता था। हमारे गाव मे यह क्यो नही है?  यहा, लडाख मे ना पक्की सडक थी, ना ब्रिज। हम लोग पॉपलर के पेड, खंबे डालकर ही काम चलाते थे। कच्ची सडक थी। सब पैसा व्हालीवाले खा जाते थे।
           
            श्रीनगरमे जाते थे तो वहा हमारे साथ दुय्यम व्यवहार होता था। बस मे से उतरने के बाद हमारे पिछे-पिछे दो-तीन कश्मीरी चलने लगते थे। हमे “बोट कनस्पा, बोट कनस्पा” करके पुकारते थे, यह एक गाली है। आखो मी आसू आते थे। कुछ बोला तो मारपीट पर उतर आते थे। सब सहना पडता था। अब हम सही मायने मे आझाद हो गये है। हमे युटी मिल गया है।             

असेंब्लीमे हमे सिर्फ २% प्रतिनिधीत्व था। हमे कौन पुछता था? कोई नही। बहोतही बुरी हालत थी हमारी।

            हमे, हमारे बच्चोंको स्कुल मे जबरन उर्दू सिखना पडता था। हमारा क्या ताल्लूख था उर्दू से? हम पर वह थोपी गयी थी। फिर यहा प्रायवेट स्कुल खोले गये, जिसमे उर्दू से छुटकारा मिल गया। हमारे बच्चे वहा सिखने लगे।
मी:         यह सब ठिक है, पर विकास कैसे होगा?  
त्सेरींग नुरबू: क्यु नही होगा? अब दिल्ली से यहा डायरेक्ट पैसा आयेगा। विकास होगा। अब लुटपाट नही होगी। हमारी सरकार होगी, ले.गव्हर्नर होगा। दादरा नगर-हवेली, पॉन्डेचरी मे विकास हुवा है। यहा भी होगा। सरकार अब ध्यान दे रही है। दिल्ली मे नयी सरकार बनतेही रक्षा मंत्री राजनाथ सिंह यहा पधारे थे। प्रधान मंत्री मोदी खुद चार बार यहा आये है। उन्होने जो कहा वह किया। अब हमारा हक कोई नही छिन सकता।             

त्सेरींग नुरबू भारावलेले होते. किती सहन केलं त्यांनी. १९६३ साली पॅगॉन्ग लेक जवळच्या शाळेत त्याची बदली झाली होती. लेहहून चालत निघाले की तीन दिवसांनी ते पॅगॉन्गला पोचायचे. मधे भिषण अशा चांगला पासचा त्याना सामना करावा लागत होता. आज त्यांची सुन तिकडच्या शाळेत आहे. कालच आम्ही पॅगॉन्गला जाऊन आलो होतो. रस्ता रुंदी करणाचं काम जोरात सुरू होतं. विकास लडाखच्या दारात, दर्‍या खोर्‍यात पोचला आहे.

२३ सप्टेंबर २०१९
दुपारचा साडे अकरा बाराचा सुमार होता. शांती स्तूपाच्या पायथ्याशी असलेल्या द पॅलेसमध्ये थोड काम होतं. त्या हॉटेलच्या दारात भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावलेली मोटार उभी दिसली. हळू हळू आणखी वहानं आली. त्या मोटारीच्या चालकाला बोलतं केलं.            
     
मी:   आपका नाम क्या है?            
तो:    डोरजे.      
मी:   डोरजे यहा कैसी रॅली है?
डोरजे: हम पंचायत चुनाव जित गये है।
मी:   तो क्या हुवा, इतना जल्लोश क्यु है?           
डोरजे: युटी मिला गया है? 
मी:   युटी (Union Territory) अच्छा है? 
डोरजे: हा अच्छा है। 
मी:  उससे क्या होगा?
डोरजे: दिल्ली से यहा डायरेक्ट पैसा आयेगा।
मी:   उस पैसेसे क्या होगा?  
डोरजे: स्कुल बनेगा, कॉलेज बनेगा, अस्पताल बनेगा। 
मी:   कौन बनायेगा?
डोरजे: मोदीजी, अमित शहाजी  
मी:   यहा कोई नही है?
डोरजे: है ना, हमारा जेटीएन  (जामयांग त्सेरींग नामग्याल) है।    

थोड्याच वेळात लेहच्या मॉल रोडवर लडाखचे खाजदार जामयांग नामग्याल मिरवणूकीने येताना दिसले. एक छोटीशी सभा झाली. भारत माता की जय चा जय जयकार झाला. वातावरणात कमालीचा उत्साह होता. 

२४ सप्टेंबर २०१९
लेह विमनतळावरून विमानाने श्रीनगरकडे झेप घेतली. श्रीनगरच्या विमानतळावर उतरताना खिडकीच्या झडपा बंद करण्याच्या सुचना दिल्या गेल्या. विमानात अंधार पसरला. बाहेर उजेड असताना आत मात्र अंधार होता. हा केलेला अंधार होता. श्रीनगरमध्ये कित्येक वर्षं कोंबडा झाकलेला आहे त्याची जणू ही प्रतिकात्मक बाजू होती. लडाखने प्रकाशाकडे झेप घेतली असताना श्रीनगर मात्र चाचपडत आहे. घरी आलो तेव्हा टिव्हीवर बातमी होती श्रीनगर खोर्‍यातल्या सफरचंदाच्या बागेतून सरकारने थेट खरेदी चालवली असून तीन दिवसात बॅंक खात्यात पैसे जमा होत आहेत. आता तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडूदे. उजाडूदे. लक्ख प्रकाश पडूदे.   

नरेंद्र प्रभू
     

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates