30 November, 2011

ईशान्य वार्ता


संपूर्णपणे वाचनीय असे ईशान्य वार्ता हे मासिक हाती पडलं आणि अखेरच्या पृष्ठापर्यंत वाचून काढलं. ईशान्य भारता विषयीची उपेक्षेची भावना नाहीशी होवून औत्सुक्य आणि जिज्ञासा जागृत व्हावी हा या मासिक काढण्याबद्दलचा उद्देश साध्य व्हावा असाच हा अंक आहे. या मासिकाचे संपादक पुरुषोत्तम रानडे आणि त्यांच्या चमूने परिश्रम घेवून हा अंक सिद्ध केला आहे. ईशान्य भारतातील जनता देशाच्या प्रमुख प्रवाहात यावी या मुख्य उद्देशाने सुरू असलेल्या उपक्रमाचाच हा एक भाग आहे. 


  • गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या देशप्रेमाच्या अनेक हृद्य आठवणी संवाद या सदरात आहेत.

  • मकरंद केतकर यांचा नागालॅंड: आदिमतेकडून आधुनिकतेकडे या लेखात तेथील लोक विशेषत: तरूण अतिरेकी फॅशनकडे आकृष्ठ होत आहेत आणि हम हम है, बाकी पानी कम है अशी मनोवृत्ती बाळगत आहेत हे वाचून मन विषण्ण होतं.

  • नातं मैत्री आणि विश्वासाचं या लेखात अभिनय बोरकर यांनी डोंबिवलीच्या नागालॅंड वसतीगृहातील अलेले अनोखे अनुभव खुमासदार शैलीत मांडले आहेत. विशेषत: नागालॅंड मधील जेवणाच्या सवयीत हळूहळू बदल होत महाराष्ट्रीय जेवण जेवण्याची आवड निर्माण झाली त्याचा आलेख छानपणे मांडला आहे.          

  • प्रा. चारुचंद्र उपासनी यांचा एका विकतच्या श्राद्धाची पन्नाशी हा लेख विशेष उल्लेखनीय असाच आहे. दोन-तीन हजार वर्षांपासून भारत चीन संबंध सौहार्दाचे होते पण ते बिघडून अचानक युद्ध करण्याचा पवित्रा चीन ने का घेतला आणि आपल्याच प्रेमात पडलेल्या नेहरू आणि पार्टीला ते कसे उमजले नाही याचा उत्तम परामर्श या लेखात घेण्यात आला आहे. दलाईलामांना गेली पन्नास वर्षे आंदण दिलेला धरमशाळा सारखा भाग, त्यांचा अनिर्बंध संचार याचा ही योग्य शब्दात समाचार घेण्यात आला आहे. प्रदिर्घ काळ दुसर्‍या देशात राहून सर्व सुखपभोग घेत तिबेट बद्दल केवळ बोलत राहायचं, पोकळ वल्गना करायच्या हे कसं चूक आहे ते समजून घेण्यासाठी हा लेख मुळातूनच वाचला पाहिजे.

  • चाळीस वर्षाहून जास्त काळ पूर्वाचलशी निगडीत राहून कार्य करणार्‍या अविनाश बिनीवाले यांचा पूर्वाचलातील खाद्यसंकृति हा लेख आपल्याला शाकाहारी आणि मांसाहारी या मधला भेदाभेद स्थानपरत्वे कसा बदलत जातो हे सांगतो.   

  • दुसर्‍या महायुद्धातील प्रसंग बॅटल ऑफ कोहिमा या लेखात सांगितले आहेत. जपानी सैनिकांचं देशप्रेम आणि परस्परांविषयी वाटणारा प्रेमभाव हृदयस्पर्शी असाच आहे.


  • पश्चिमेचा देवदूत: कै. भय्याजी काणे हा लेख आपणाला अंतरमुख करणार आहे. पेशाने शिक्षक पण वृत्तीने सैनिकीबाणा जपणारे खरे भारतरत्न म्हणजे भय्याजी काणे. चाळीस वर्षांपूर्वी ईशान्येची हाक ऎकून त्यानी केलेल्या कार्याला तोड नाही. सरकार कोट्यावधी रुपये ओतूनही जे करू शकत नाही ते भय्याजीनी आंतरीक ओढीने करून दाखवलं आणि त्यांचेच शिष्योत्तम जयवंत कोंडविलकर हे पुढे हा वारसा चालवत आहे.

  • स्वर्गिय भूपेन हजारिका यांचं नुकतच निधन झालं. त्यांच्या निधना पूर्वी लिहिलेला भूपेन हजारिका: ईशान्य भारताचे सांकृतिक सम्राट हा लेख भूपेनादां विषयी बरच काही सांगून जातो. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले तरी राजकारण्यांची लागण त्यांना झाली नव्हती. आपल्या उच्च शिक्षणाचा आणि संगीत तसेच सिनेमा विषयक ज्ञानाचा उपयोग त्यानी आसामी जनतेसाठी अखेर पर्यंत केला.

वरील अनेक लेखांमधून ईशान्या भारताचं आजचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. हा अंक वाचनिय तर आहेच, पण संपादक पुरुषोत्तम रानडे आणि जयवंत कोंडविलकर हे ज्या आत्मियतेने हे काम करीत आहेत त्याला तोड नाही. प्रसंगी पदरमोड करून समाजासेवेचा हा वसा ते पुढे नेत आहे.

(सदर कार्यासाठी फार मोठ्या प्रमाणात निधिची आकश्यकता आहे तरी इच्छूकांनी कृपया जयवंत कोंडविलकर यांच्याशी 9619720212 किंवा पुरुषोत्तम रानडे  9969038759 या नंबरवर संपर्क साधावा अशी विनंती आहे.)

ईशान्य वार्ता या मासिक अंकाची वार्षिक वर्गणी फक्त रुपये १५० असून त्यासाठीही वरील नंबरवर किंवा  friendsofne@gmail.com या मेल आयडीवर आपण जरूर संपर्क साधावा. 


                       

28 November, 2011

भारत जोडो

खंडप्राय भारत देश एकसंघ राहावा अशी प्रत्येक देशप्रेमीची इच्छा असतेच. सरकारी पातळीवर अनेक धोरणे आखली जातात, पण ती बहुतेक वेळा कागदावरच राहातात. काही समाज धुरीण मात्र हा वसा घेतात आणि जन्मभर त्या साठी झटत असतात. शंकर दिनकर उर्फ भय्याजी काणे हे त्या पैकी एक. आत्यंतीक देशप्रेमाने प्रेरीत होऊन भय्याजीनी आपली मुख्याध्यापकाची नोकरी सोडून थेट म्यानमारच्या (ब्रम्हदेश) सिमेलत असलेले मणिपूर हे राज्य गाठले आणि तेथील जनता मुख्यप्रवाहात यावी यासाठी आपले पुर्ण आयुष्य वेचले. त्यांचे शिष्योत्तम जयवंत कोंडवीलकर यानी हा वसा खांद्यावर घेऊन भय्याजींचं कार्य आजही पुढे चालू ठेवलं आहे.

वर लिहिलेल्या चार ओळीत या गुरू-शिष्याच्या कार्याचा आवाका लक्षात येणार नाही. मणिपूर सारख्या राज्यात आजही सामान्य भारतीय पाय ठेवायला कचरतात त्या ठिकाणी चाळीस वर्षांपूर्वी वास्तव्य करून या गुरू-शिष्याने तेथील लोकांना आपलेसे केले. मणिपूरच्या खारासोम, जिल्हा उखुल येथे शाळा स्थापन केली. (सहा वर्षा पुर्वी असम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये फिरताना त्या प्रदेशाची दुर्गमता माझ्या लक्षात आली होती.) तसच ईशान्येतील विद्यार्थ्यांची सोय व्हावी आणि त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणता यावं म्हणून महाराष्ट्रात चौदा वसतीगृहे सुरू केली.

 पुरुषोत्तम रानडे (संपादक ईशान्य वार्ता)
भय्याजी काणे आणि जयवंत कोंडवीलकर या गुरू-शिष्याच्या कार्याने भारावून गेलेल्या एका पुरुषोत्तमाची नुकतीच भेट घडली. या वल्लीने या कार्याला वाहून घेण्यासाठी आपली महानगर टेलीफोन निगम मधली नोकरी सोडली. पुरुषोत्तम रानडे ईशान्य वार्ता हे मासिक या कार्याची माहिती व्हावी आणि लोक जोडले जावेत म्हणून संपादीत करतात. (या विषयीचा लेख या ब्लॉगवरून लवकरच प्रसिद्ध केला जाईल.) माझे परम मित्र आत्माराम परब यांच्यामुळे रानडे साहेबांची भेट झाली. इशा टुर्सच्या माध्यमातून आत्माराम परब पुर्वांचल (ईशान्य भारत), लडाख, अंदमान सारख्या दूरवरच्या आणि पर्यटकांपासून वंचीत असलेल्या क्षेत्रात सहली आयोजित करतात. गोठलेलं लडाख या त्यांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने गेलो असता आत्मारामनी रानडे यांची भेट घडवून आणली.

देशप्रेमासाठी नोकरीला तिलांजली देणारा रानडें सारखा पुरुषोत्तम विरळाच. (अर्थात सौ. रानडे वहिनींना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.) त्या दिवशी झालेल्या तोंड ओळखीत जी माहिती झाली ती आपणा समोर मांडली. त्यांच्या कार्याची माहिती होत जाईल तशी माडण्याचा प्रयत्न करीन. तुर्तास एवढेच. 


श्री. पुरुषोत्तम रानडे यांच्याशी आपण friendsofne@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधू शकता.  
        
    


27 November, 2011

सदाबहार ‘गीतमाला’

देवी और सज्जानो.........., बहनो और भाईयो....... अशी हाक देऊन तमाम भारतीयांना चाळीस वर्षाहून जास्त काळ बिनाका गीतमाला या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडून ठेवणारे अमीन सायानी काल प्रत्यक्ष ऎकायला मिळाले. निमित्त होतं स्वरगंधारचे मंदार कर्णीक यांनी आयोजित केलेल्या गीतमाला के सुरीले संगीतकार- अमीन सयानी के साथ या कार्यक्रमाचं. रेडीओ सिलोन वरून दर बुधवारी रात्रौ आठ वाजता सादर होणार्‍या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने त्या काळी संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावलं होतं. तब्बल चाळीस वर्षाहून जास्त काळ बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने सर्व भारतीय एका सुत्रात बांधले जात होते. श्रीलंका ब्रॉडकास्टींग कॉर्पोरॅशन किंवा रेडीओ सिलोन हा तेव्हा सगळ्याना जोडणारा एक समान धागा होता. कानात प्राण आणून रसिक ती गाणी ऎकत होते. चारशेहून जास्त रेडीओ क्लब स्थापन झाले होते. त्या काळी घरोघरी रेडीओ नव्हते, मग छोट्या-मोठया हॉटेलच्या परिसरात किंवा शेजारच्या घरी जमून मंडळी या कार्यक्रमाची मजा अनुभवत असत. आपली आवडती गाणी ऎकण्याचं तेव्हाचं ते एकमेव साधन होतं. नुसती गाणी ऎकणं वेगळं आणि अमीन सयानीसारख्या निवेदकाकडून किस्से ऎकता ऎकता एक  एका गाण्याचा आनंद घेण वेगळं. संपुर्ण तासभर तमाम जनतेला एका जागी खिळऊन ठेवण्याची ताकत अमीन सयानी यांच्या निवेदनात होती आणि आजही आहे. गायक गायीकांचा सुरीलास्वर ऎकतानाच सयानीसाहेबांचं निवेदनही सुश्राव्य असच असायचं. एका अर्थाने हा सुरांचा जादुगारच आहे. अनेक संगीतकार गीतमालेत आपण कुठे आहोत यावरून आपली पातळी ठरवत असत.

हिंदी चित्रपट संगीत सृष्टीने तमाम भारतीयांचं जीवन खर्‍या अर्थाने सुसह्य बनवलं. लोक आपलं सुख-दुख: या गाण्यात शोधू लागले. लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, महंमद रफी, मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, हेमंत कुमार पासून अगदी अलका याज्ञीक या गायक-गायीका पर्यंत आणि नौशाद, हेमंत कुमार, ओ.पी. नय्यर, एस.डी बर्मन, सी. रामचंद्र, आर. डी बर्मन, शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम, रवींद्र जैन अशा अनेक दिग्गज संगीतकारांचं संगीत जनसामान्यापर्यंत पोहोचलं, रुढ केलं ते गीतमालेनं. शकील बदायुनी, राजेंद्र कृष्ण, शैलेंद्र, मजरूह सुलतानपुरी, भरत व्यास, शाहीर लुधीयानवी, हसरत जयपुरी, आनंद बक्षी, अंजान, समीर अशा अनेक गीतकारांना ओळख प्राप्त करून दिली आणि त्यांचे शब्द रसिकांच्या हृदयावर कायमचे कोरले गेले. सामान्यांच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण आणले. गीतमालेची लोक चातका प्रमाणे वाट बघत असत. लहाणपणी कोकणातल्या कोचर्‍यासारख्या खेडेगावात असताना मी याचा अनुभव घेतला आहे.

स्वरगंधारने काल यशवंत नाट्यगृहात सादर केलेल्या या कार्यक्रमाला अंबरीश मिश्र यांचं निवेदन लाभलं होतं, काही मिनिटं स्वत: अमीन सयानीसाहेब रंगमंचावर अवतरले होते. बाकीच्या वेळात ते दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधत होते. जुन्या काळातील आठवणींना उजाळा देत होते. सोनाली कर्णीक अर्चना गोरे, हृषीकेश रानडे, संदीप शहा आदी गायकांनी आणि अमर ओक, सुराज साठे, अविनाश चंद्रचूड, मनीष कुलकर्णी, दत्ता तावडे  या मुझिशीयनसनी तर बहार आणली. सुमारे तीन तास चाललेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि जुन्या स्मृतींना उजाळा देत गेला. प्रत्येक क्षण मंतरलेला होता. भारलेला होता. श्रोतृवृंद आसनाला खिळलेला होता. कार्यक्रम संपल्यावर तरंगत आपापल्या घरी जाताना तरूण झाल्याचा भास प्रत्येकाला झाला असावा.                     

22 November, 2011

देवा काय देऊ तुला?

श्रेष्ठ संगीतकार, गीतकार, कवी, गायक आणि विशेष म्हणजे खरोखरीचा देवमाणूस असलेलं एक उमदं व्यक्तीमत्व म्हणजे यशवंत देव. काल माटुंग्याच्या यशवंत नाट्य गृहात त्यांचा माझा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. वयाची पंच्याऎशी वर्ष पुर्ण करणार्‍या यशवंत देवांना नुकताच माहाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. त्या पुरस्काराची पुर्ण रक्कम रुपये दोन लाख यशवंत देवांनी दिवंगत संगीतकार श्रीनीवास खळे यांच्या कुटुंबीयांना तत्काल देऊन टाकली. या त्यांच्या दातृत्वामुळे भारावून गेलेल्या अशोक मुळे या वल्ली ने हा सत्काराचा घाट घातला होता.

अशोक मुळेंनी आयोजीत केलेला हा देवा... काय देऊ तुला? नामक सोहळा असल्याने नाट्य मंदिर हाऊस फुल्ल होतं हे वेगळं सागायला नकोच. भाऊ मराठेंनी निवेदनासाठी ध्वनीक्षेपक हातात घ्यायच्याआधी मुळे काका स्टेजवर आले (तसे ते स्टेज, नाट्यगृह, आत-बाहेर सगळीकडेच वावरत होते. कारण कार्यक्रमाची धुरा ते एकहाती वाहत होते.) कार्यक्रम हाऊस फुल्ल असूनही समोरच्या काही खुर्च्यांमध्ये अजूनही माणसं नाहीत हे पाहाताच त्यांनी तिथून स्टेजवरूनच पास घेऊन जाणार्‍यांची कडक शब्दात हजेरी घेतली. मिटींगावर मिटींगा आणि हजार कामं होती तर पास मागितलेच कशाला? फुकट आहेत म्हणून? अशोक मुळे कडाडले. चला कार्यक्रमाचा नारळ अशा रितीने फुटला म्हणजे आता मजा येणार असं मनातल्या मनात म्हणत मी सावरून बसलो (मुळे काकांचा कार्यक्रम म्हणजे जे काही म्हणायचं ते मनातल्या मनातच, उघड बोलायची कुणाची हिम्मत आहे? ते सत्कार मुर्तीचीही पत्रास ठेवत नाहीत, मग आपण कोण पामर? शिवाय त्यांचा तो सर्वत्र होणारा संचार पाहाता कधी समोर प्रगट होतील असं सारखं वाटत राहतं.) सगळे कलाकार फुकट गायला-वाजवायला तयार झाले असले तरी आज त्यांना दोन दोन पाकळ्या देणार आहे मुळेंनी दुसरा षटकार मारला. सभागृह हास्यात बुडून गेलं. मांगिरीश इस्टेट्स चे नितिन नेरूरकर यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला आहे असं नमूद करून त्यांनी त्याना आणि महाराष्ट्र टाईम्सचे संपादक अशोक पानवलकर यांना स्टेजवर यायची विनंती केली आणि ते येत असतानाच म्हणाले मला कार्यक्रम करायचा असला की पैसे कमी पडत नाहीत. कोण ना कोण देतच, आजच्या या कार्यक्रमाला नेरूरकरांनी दिले. लागतील ते सगळे पैसे त्यानी दिलेत. हो, हा आता पुष्पगुच्छ दोतोय ना, तो सुद्धा त्यांच्या पैशातून घेतला आहे. (प्रचंड हशा) वाटत होतं मुळे काकांनीच बोलतच रहावं. एखादी मैफल जमून जाते. या गोष्टी ठरवून होत नसतात. कालची मैफल उत्तरोत्तर रंगतच गेली. खरच बहार आली राजे हो...!         

भाऊ मराठेंनी निवेदनाला सुरूवात केली, खुमासदार किस्से आणि आठवणीचे पट उलगडताना देव हा शब्द केंद्रस्थानी ठेऊन गाणी म्हटली जात होती. देव देव्हर्‍यात नाही, देवा दया तुझी ही, देवाचीये दारी, देह देवाचे मंदिर अशी अनेक गाणी सादर होत होती. अरविंद पिळगावकर, अजित परब, अमोल बावडेकर, बकुळ पंडीत, सोनाली कर्णीक, अर्चना गोरे, निलिमा, मधुरा कुंभार, श्रीरंग भावे असे दिग्गज कलाकार आणि साथीला कमलेश भडकमकर, जगदीश मयेकर आणि त्यांची टिम, मध्यंतर कधी आला कळलच नाही.
  

मध्यंतरानंतर पडदा दूर झाला तेव्हा मुळे काका व्यासपीठावर अवतरले ते दोन खुर्च्या घेऊनच. त्यांनी पुन्हा माईक हाती घेतला. सेकंड इनींगला बॅटीगला आल्यासारखे ते बोलायला लागले, सगळं बोलणं अनौपचारीक होतं. यशवंत देवांचा सत्कार म्हणून त्यांचीच गाणी पाहिजेत असं कुठे आहे? ही गाणी मी निवडलीत. त्यांची एक दोन ठेवलीत. जीवनात ही घडी अशीच राहू दे हे गाणं माझ्यासाठी ठेवलं. अजून घडी तशीच आहे...... काही घडलं नाही..... गायकांना सुद्धा सागितलं मी सांगेन ते गाणं म्हणायचं. बस्स...! तुमची ती संथ गाणी नकोत, कुणी म्हणालं, पण हे बरं वाटतं....., वाटू दे ...., ते तू घरी म्हण. इकडे सगळं कसं दणक्यात झालं पाहिजे. देवांनी सत्काराची एवढी मोठी रक्कम खळेंच्या कुटूंबीयांना दिली म्हणून सत्कार करावासा वाटला. त्यांच्या हृदयात करूणा आहे. ती त्यांना सोडून गेली नाही. यांचा सत्कार केलाच पाहिजे. नाही तर ते तसं नको. घराताच एकमेकांना पुरस्कार द्यायचे आणि वर म्हणायचं मी हल्ली पुरस्कार स्विकारत नाही. इथं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, सगळे प्रेमाने येतात. हा साउंडवाला टिट्टू फार बिझी असतो, झाकिर हुसेनलाही हाच लागतो, म्हटल हा बिझी आहे, दुसर्‍याल बोलाऊया. पण हाच म्हणाला, मी येणारच, दुसरा आला तरी बाजूला लावेन. हे असं प्रेम आहे. म्हणून हा उत्सव होतो. (प्रत्येक गायक कलाकार सांगत होते मुळे काकांचा आदेश असतो, विनंती नाही. आम्ही तो पाळतोच.) मी मानपत्र अजिबात देत नाही. ज्यांना मानपत्र द्यायचं त्यांनाच त्यांची माहिती विचारायची आणि पुन्हा तेच त्याला माहीत असलेलच लिहून द्यायचं, हे असलं मी करणार नाही. बोलण्यात जरा वेळच झाला पण सगळं अनौपचारीक होतं, पुन्हा म्हणाले आता निवेदन फार नको, पानवलकर बोलतील, मग भाऊ, मग यशवंत देव

देवांचा सत्कार झाला. पानवलकर, भाऊंची भाषणं झाली. देव उत्तराला उभे राहिले. म्हणाले या माणसात माणूसकी आहे म्हणून सगळे बोलावल्या बरोबर येतात. हे मुळे नेहमी पांढर्‍या कपड्यात असतात. हा माणूस जसा बाहेरून तसा आतूनही आहे. यांचे अंतरंग आणि बहीर्रंगही पांढरे........ हौस भारी.... म्हणून यांना मी व्हाईट हौस म्हणतो. तुम्हाला यांनी खुप हसवलं. तुम्ही आता खुप हसलात, हसलच पाहिजे. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की जो हसतो.  तुमच्या चेहर्‍यावरची हास्य रेषा हीच खरी भाग्य रेषा आहे. त्या नंतर एक शाम, हसी के नाम ही कविता त्यांनी म्हटली, रसिकांनीही कवितेचा भरपूर आनंद घेतला. पुढे यशवंत देव म्हणाले देव असतो की नाही हे माहित नाही पण प्रत्येक माणसात परमेश्वर असतो हे मी ठामपणे सांगू शकतो. नंतर ते आपल्या बालपणीच्या मित्राच्या आठवणीत रमून गेले. 

सोळावं वरीस होतं, मी मुंबईच्या शाळेत
मुरलीधर जयसिंगाने धरला माझा हात.

जयसिंग या मित्रामुळे आपण संगीताच्या क्षेत्रात आलो, आकाशवाणीवर गेलो. अशा आठवणी सांगताना देव साहेब सद्गदीत झाले होते.  

रात्र बरीच चढली होती. उत्तरार्धाचा शेवटही जवळ येत होता. भाऊ.... चार गाणी एका निवेदनात मोकळी करा मुळे काकांचा हुकूम झाला. पुन्हा गाण्यांची मैफल सुरू झाली आणि आधी बिज एकले या संत तुकाराम चित्रपटाच्या गाण्याने सांगता झाली. आसनाला खिळून राहिलेले देव साहेबांचे चाहते रसिक उठले, पण सगळ्यांच्याच ह्रदयात भाव होते. 

देवा काय देऊ मी तुला?
गीत दिले तू मला...!

नरेंद्र प्रभू

                                                     
16 November, 2011

बोंडला अभयारण्य - गोवा

नयनरम्य अशा समुद्र किनार्‍यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात गेल्यावर बोंडला अभयारण्याला अवश्य भेट दया. फक्त आठ चौरस किलोमीटर एवढाच व्याप असला तरी प्रदुषण मुक्त असलेला हा भाग अवर्जून पहावा असाच आहे. दाट जंगलाने वेढलेलं  पच्छिम घाटातलं हे अभयारण्य रानगवे आणि सांबरांसाठी प्रसिद्ध आहे.

वळणावळणाच्या वाटेवरून जाताना मध्येच नदीचा प्रवाह दिसतो आणि शेवटी आपण या अभयारण्यातील प्राणी संग्रहालया जवळ पोहोचतो. या प्राणी संग्रहालयात पट्टेरी बाघ, बिबळ्या, गवे, सांबर, अस्वल, मोर आदी प्राणी-पक्षी कुंपणाआडच्या मोकळ्या जागेत हिंडताना पहायला मजा येते. उत्तमप्रकारे तयार केलेला बगीच्या हे या अभयारण्याचं आणखी एक वैशिष्टय, पण गजांतलक्ष्मी, वेतोबा वगैरे पुरातन मुर्ती आपलं लक्ष वेधून घेतात.
 प्रदुषण मुक्त भाग असल्याची साक्ष देणारी एक प्रकारची बुरशी

गोव्यातील फोंडा तलूक्यात हे अभयारण्य असून, मडगाव रेल्वे स्टेशनपासून ३६ किलोमीटर अंरतावर आहे. पणजी-बेळगाव राष्टीय महामार्गावरून (4A) उसगाव जवळच्या फाट्यावरून इथे पोहोचता येते. इतर दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी  उघडे असणारे हे अभयारण्य दर गुरूवारी बंद असते. स्वत:चे वाहन घेऊन या ठिकाणी सहज जाता येते.        

गजांतलक्ष्मीची मुर्ती
 

14 November, 2011

सुंदर प्राणी

बालदिना निमित्त ही कविता छोट्या दोस्तांसाठी.

हत्ती हत्ती मोठ्ठा किती !
हत्तीला पाहून वाटते भिती

एवढीशी मुंगी, तीच नाव चिंगी
हळूच येऊन मारते नांगी

खादाड मनीमाऊ, करते म्याव म्याव
स्वयंपाकघरात घुसून, दुध पिते राव !

सश्याचे कान, जिराफाची मान
वाघाचे पंजे, उंटाची कमान

कित्ती सुंदर हे सगळे प्राणी
आम्ही गातो त्यांची गाणी

नरेंद्र प्रभूदोस्तीचा धागा


एकच धागा
परस्परांना जोडूनी जेव्हा जातो
ह्रदयाचे मिलन
करूनी तयांचा मिलाप तेव्हा होतो

ह्रदबंध तक्षणी
अतूट नाते, सहोदरांचे होते
किती तरल भावना
या ह्रदयीची त्या ह्रदयी ती जाते

मग, फुटती निर्झर
द्रवती हृदये
लोण्याहून मऊ होती
जी, वैशाखातील ढेकळापरी होती


नरेंद्र प्रभू 

11 November, 2011

आशा

मनमनी छेडीली तार
अशी हळूवार कोवळ्या रात्री
झंकार जाहला मात्र
रंग तरंग गात्रोंगात्री

अंधूक दिशातून
उजळे एक प्रकाश
निमिषात जळाले
जळमटलेले पाश

किती काजळकाळी
होती ती गत रात्र
ठेचाळत होतो
पदपथ थारोळ्यात

ती दिसली, म्हणता म्हणता
धूसर झाली
परी, तरंग उठऊन
जागऊनी मज गेली


नरेंद्र प्रभू


09 November, 2011

झाले मोकळे आकाश
आज मोकळे आकाश
रवी सुखाऊन गेला
पडे पिठूर चांदणे
शशी हसाया लागला

आज मोकळे आकाश
तारकांची लयलूट
चहू दिशांना आरास
मनी चंदेरी प्रकाश

आज मोकळे आकाश
शितल वार्‍याचा गारवा
मनमोर नाच करी
अंतरात वाजे पावा

आज मोकळे आकाश
भाळा वरली निळाई
जणू पदर आईचा
तीच गातसे अंगाई

नरेंद्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates