24 December, 2016

सुख पौर्णिमेचं आलं
सुख पौर्णिमेचं आलं
चांदण्यात झाड न्हालं
तुझ्या वर्षावात माझं
अंग अंग चिंब झालं

धुवूनीया आज निघे
तम काळोख्या रात्रींचा
तुझे शितल चांदणे
ताप हरे अंतरीचा

कले कलेने वाढतो
उजळतो हा प्रकाश
गुज अंतरीचे तुझ्या
अंथरले आसपास


नरेंद्र प्रभू       

12 December, 2016

त्या वाटेवरत्या वाटेवर फुले सुगंधी वेचीत असता
रुतला काटा
त्या वाटेवर बकुळ फुलांचा सडा सदोदीत
निसर्‍या वाटा
त्या वाटेवर निर्झर असती जीवन दायी
मध्येच खाई
त्या वाटेवर आम्रतरूंची सुंदर रायी
उंच चढायी
त्या वाटेवर तुझेच गे घर, अन हिंदोळे
जहरी डोळे
त्या वाटेवर पिठूर चांदणे कुणी शिपंडले
ढगही आले
त्या वाटेवर सावलीत मी बसलो असता
अवचीत हाका
त्या वाटेवर तुझी पाऊले नाजूक पडली
अडली घटका    

नरेंद्र प्रभू

12/12/201626 November, 2016

रोख मुक्त गाव - कृती महत्वाचीही कृती अत्यंत महत्वाची आहे. नोटबंदीने सगळा भारत ढवळून निघत असताना समाज माध्यमातही त्यावरच्या प्रतिकियांना बहर आला आहे. संसदेत विरोधकांनी कामकाज रोखून धरलं आहे. त्याना शेतकर्‍यांची पर्वा कधीच नव्हती आणि आजही नाही. ती असती तर त्यानीच मा. रणजित सावरकर यांनी केलेली कृती केली असती. DIGITAL INDIA या महत्वाच्या कार्यक्रमात ही हे पाऊल उल्लेखनीय आहे.  

मा. रणजित सावरकर
श्री. रणजित सावरकर यांच्या पुढाकाराने घसई होणार नोटबंदी नंतरचे भारतातील पहिले रोखमुक्त गाव. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या आदिवासी विभागातील धसई गावातील व्यवहार रोखमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.  

नोटाबंदीनंतर निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती दूर करण्याच्या दृष्टीने रोखमुक्त व्यवहाराच्या दिशेने केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अशाप्रकारे नोटबंदी नंतर रोखमुक्त होणारे घसई हे भारतातील पहिलेच गाव ठरणार आहे.

हे गाव १ डिसेंबर २०१६ पासून संपूर्णतः रोख मुक्त होत आहे. गावाची लोकसंख्या १०००० असून इथे जवळ पास १०० व्यावसायिक आहेत. आसपासची साधारण २५ खेडी व्यवहारांसाठी धसई वर अवलंबून आहेत. रोख मुक्तीचा लाभ धसाई आणि आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पन्नास हजार लोकांना होणार असूनबँकेतून रोकड काढण्याच्या त्रासातून मुक्तता होईल. १०० पैकी सुमारे ३४ व्यापाऱ्यांचे कार्ड स्वाईप मशीन ३० नोव्हेंबर पर्यंत कार्व्यान्वित होत आहेत. अन्य व्यापारी ह्या मशीन्स घेण्याकरिता आवश्यक ती कारवाई पूर्ण करीत आहेत.

येथील प्रत्येक कुटुंबाकडे जन-धन खाते असून डेबिट कार्ड हि आहे. त्यामुळे १ डिसेंबर पासून ह्या भागातील लोक आपल्या सर्व गरजा करिता हे कार्ड वापरू शकतील अगदी वडापाव पाव पासून भाजी पाला , धान्यऔषधेखते आणि इतर सर्व गरजांसाठी डेबिटकार्ड वापरता येईल. हे कार्ड केशकर्तनालयेदवाखानेमोटार गॅरेजेस पासून अगदी शेती कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठी डेबिट कार्ड वापरता येईल. थोडक्यातसांगायचे तर डेबिट कार्ड असलेया कोणालाही धसई गावात रोख रक्कम वापरण्याची गरज नाही. 

श्री रणजित सावरकर यांना या कामात धसई येथील धडाडीचे कार्यकर्ते श्री. कैलास घोलपश्री. अशोक घोलप आणि श्री. स्वप्नील पाटकर तसेच मुंबई येथील श्री पृथ्वीज माटे यांनी बहुमोल मदत केली. बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक श्री नवतेज सिंग यांनी अत्यंत तत्त्परतेनेअल्प वेळात व्यापाऱ्यांची खाती उघडून त्यांना कार्ड स्वाईप मशीन देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले. उप-महाप्रबंधक श्री श्रीधर राव यांच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रबंधक श्री. विजय सिंगश्री. कौस्तुभ शुक्ल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक यासाठी अखंडपणे कार्यरत होती.


याबाबत अधिक माहिती देताना रणजित सावरकर म्हणाले, "रोखी शिवाय व्यवहार असणारी अर्थव्यवस्था हे माझे स्वप्न होते. परंतु राज्यसभेत एका सन्माननीय सदस्याने केलेली एक टिप्पणी हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी लागणारी जिद्द निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. “शेतकरी काय धोतरात डेबिट कार्ड घेऊन फिरतो काय?” हाच तो शेतकऱ्यांचा अपमान करणारा शेरा! आणि यास कोणीही प्रत्युत्तर दिले नाही. शेतकरी गरीब असतीलपण ते मूर्ख नाहीत. ते डेबिट कार्ड बाळगतात आणि वापरतात सुद्धा. पण फक्त ATM मध्ये. जर व्यापारी डेबिट कार्ड घेऊ लागले तरमग सर्व प्रश्नच संपेल. “रोख मुक्त धसई” केवळ एक सुरुवात आहे. धसई मोडेल ने हेच सिद्ध केले की “रोख मुक्त गाव” हे ध्येय साध्य करण्यासाठी लोक तयार आहेतबँका तयार आहेतव्यापारी तयार आहेतगरज आहे यांना एकत्रित आणण्याच्या दुव्याची ! तेव्हा सर्व जन प्रतिनिधींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या दृष्टीने पुढाकार घ्यावा.

22 November, 2016

सर्जिकल ऑपरेशन आणि पुरोगामी दहशतवाद


ईशान्य वार्ता दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख 


जून २०१५ मध्ये भारतीय सेनेने म्यानमारच्या सीमेत घुसून १५८ दहशतवाद्याना ठार मारलं होतं. त्या आधी दहशतवाद्यानी घडवून आणलेल्या घातपाती कारवायात भारतीय लष्कराचे अठरा जवान कामी आले होते. सीमेवरच्या राज्यात अशा प्रकारचे हल्ले करून शेजारच्या देशात आश्रय घ्यायचा ही दहशतवाद्याची नेहमीचीच चलाखी. असे हल्ले वर्षोंवर्ष होत असूनही राजकिय इच्छाशक्तीच्या अभावी त्याचा चोख बंदोवस्त होत नव्हता. राजकिय निर्णयाचा अभाव असल्याने सेनादलाचे हात बांधलेले असायचे. केंद्रीय सरकारमध्ये सत्तापालट झाल्यावर मोदी सरकारने ‘ऍक्ट इस्ट’, ‘मेक इन इंडीया’ सारखी धोरणं आखून या प्रकारच्या कारावायांवर सर्वंकश नियंत्रण मिळवण्याचा तसंच समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न चालवला आहे.

दहशतवाद ही आता संपुर्ण जगाची समस्या असून त्याला कोणताही देश अपवाद नाही. या विरोधात उपाययोजना करायची असेल तर जागतीक नेत्यांचं एकमत होणं जरुरीचं आहे. गेल्या दोन वर्षात दिवसरात्र एक करून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जगभरातील अनेक देशाचे दौरे केले आणि भारताचे हितसंबंध जपण्यांचं आणि त्यात वाढ करण्याचं महत्वाचं काम केलं. दहशतवादाचा मुकाबला करणं हासुद्धा त्या रणनितीचा एक भाग होता. आसामसारख्या राज्यात त्यानंतरच सत्ता परिवर्तन झालं. केंद्र सरकारच्या कृतीला जनतेचा पाठिंबा मिळाला.

देशाच्या पूर्व सीमेवर अशा प्रकारची कारवायी होत होती तोपर्यंत त्यावर देशभरातून फार मोठी प्रतिक्रिया येत नव्हती पण पाकिस्तानच्या सीमेत घूसून ‘सर्जिकल ऑपरेशन’ करून  दहशतवादी आणि त्याच बरोबर पाक सैनिकांना कंठस्नान घतल्यावर मात्र पाकिस्तानचे इथले हस्तक किंवा पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेले लोक संभ्रम निर्माण व्हावा अशी वक्तव्य करायला लागले आहेत. आजपर्यंत भारतीय सेनेवर देशातून असा संशय व्यक्त केला गेला नव्हता. लष्कराने केलेल्या कारवाईचे पुरावे मागितले गेले नव्हते मग आत्ताच ते का मागण्यात येत आहेत? पाकिस्तानचे भारतातले हे ‘डीप असेट्स’ खाल्ल्या अन्नाला जागत आहे काय? की जनता मोदींना डोक्यावर घेऊन नाचेल म्हणून भयभित झाले आहेत? मोदींना विरोध करायचा म्हणून ही पुरोगामी मंडळी आता थेट पाकिस्तानच्या सुरात सूर मिळवू लागली आहेत. या पैकी अनेकजण या पुर्वीच्या सरकाराचा भाग होते, कित्येकजण पत्रकार बनून अपप्रचार करीत आहेत, परकिय पैशावर पाळल्यागेलेल्या एनजीओचाही त्यात सक्रिय सहभाग दिसतो आहे.

ही मंडळी काय करतात तर ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाअल्ला... इन्शाअल्ला...’ असे नारे देणार्‍याला डोक्यावर घेऊन नाचतात, त्याची भलामण करतात. आम्हीपण सर्जिकल स्ट्राईक केले होते पण त्याचा गवगवा केला नाही असा तद्दन खोटा दावा करतात, औरंगजेबाला सुफी संताचा दर्जा द्यावा आणि त्याच्या विरोधातली सगळी विधानं पाठ्यपुस्तकामधून काढून टाकावित म्हणून उपोषणाला बसतात. (मग शंभूराज्याना कुणी मरलं? असा प्रश्न त्याना विचारायचा नसतो.) पाकिस्तानच्या टिव्ही वाहिन्यावरच्या चर्चेमध्ये भाग घेऊन मोदी सत्तेत असे पर्यंत भारत-पाक चर्चा होऊ शकणार नाही, त्यासाठी त्याना सत्ताभ्रष्ट करावं लागेल आणि पकिस्तानने या कामी आपल्याला मदत करावी म्हणून आर्जवं करतात. पाकिस्तानी कलाकारांचा कैवार घेऊन  दहशतवाद आणि कला या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणून बुद्धीभेद करतात. पाकिस्तानी सामान्य जनता आणि कलाकार किती महान आहेत याचे दाखले द्यायची अहमहमिका लागते. या कलाकारांच्या नांगीत किती विष भरलेलं असतं त्याची वानगीदाखल ही एकच गोष्ट लक्षात ठेवली तरी दृष्टी साफ होईल. जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेली हकिकत त्या पाकिस्तानी कलाकारांविषयी सगळं सांगून जाते. ती गोष्ट अशी:

जगजितसिंग या गझल गायकाच्या पुण्यतिथी निमीत्त गुलाम अली या पाकिस्तानी गायकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खुद्द जगजितसिंग यांनीच आपल्या हयातीत पाकिस्तानी कलावतांना इथे आणू नये, असा आग्रह धरला होता. त्याचे कारण पाक कलावंत पक्के भारतद्वेषी असतात, असाच त्यांचा आरोप होता. किंबहूना त्याच कारणास्तव गुलाम अली याच्यावर भारतात यायला प्रतिबंध लागू झाला होता. ही माहिती आपल्यापर्यंत माध्यमांनी कशाला पोहोचवू नये? गुलाम अली याच्याविषयी किती सत्य आपल्यासमोर आणले गेले? एकदा भारतातून मायदेशी परत जाणारा हा गुलाम अली शेजारी बसलेल्या भारतीय दूतावासातील अधिकार्‍याशी गप्पा मारू लागला. तो अधिकारीही त्या गायकाचा चहाताच होता. मात्र हा प्रवासी भारतीय आहे याची गुलाम अलीला किंचितही कल्पना नव्हती, म्हणून तो मनमोकळा बोलत होता. अगदी खास पंजाबी भाषेत त्याने भारतीयांची काफ़ीर कुत्ते अशी अवहेलना चालवली होती. आपण सच्चे मोमीन म्हणजे मुस्लिम असल्याने काफ़ीरांचे पैसे, बायकांची मजा लुटतो, असे गुलाम अलीने मन मोकळे केले. मात्र इस्लामाबाद विमानतळावर उतरल्यावर त्या अधिकार्‍याने आपली खरी ओळख या गायकाला करून दिली. तेव्हा गुलाम अली गयावया करून माफ़ी मागू लागला. कारण शेजारचा प्रवासी पाकिस्तानी आहे अशा विश्वासाने त्याने मनमोकळे केले होते. पण त्यातून संभवणारा तोटा लक्षात आल्यावर गुलाम अली गांगरला होता. अर्थात अधिकार्‍याने त्याला दमदाटी वगैरे काही केली नाही. पण भारत सरकारला त्याविषयी माहिती दिल्यावर गुलाम अलीच्या भारतात येण्यावर वा कार्यक्रम करण्यवर प्रतिबंध लावण्यात आला. त्याचा फ़ारसा कुठे गाजावाजा झाला नाही. पण अनेक वर्षे हा प्रतिबंध कायम होता.

हा पाकिस्तानचा खरा चेहरा आहे. भारताशी प्रत्यक्ष युद्ध करून यश मिळवता येणार नाही याची पक्की खात्री असणार्‍या पाकिस्तानने वर्षानुवर्ष डावपेच आखून आपली माणसं भारतात पेरली आहेत. ते पाकिस्तानी हस्तक अतिशय मोक्याच्या जागा धरून बसलेत किंवा मोक्याच्या जागी बसलेल्यांनाच शत्रू त्याचे हस्तक म्हणून निवडत व नेमत आला आहे. त्यात बुद्धीजिवी, प्राध्यापक, कलावंत, पत्रकार, अधिकारी,राजकारणी अशा विविध पेशातील मंडळींची निवड होत असते. त्यांनी आपली बुद्धी समाजाच्या बुद्धीभेदासाठी पणाला लावावी, अशी कामगिरी त्यांच्यावर सोपवलेली असते. हेच ते घरभेदी तत्कालिन लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना दिर्घकाळ माध्यमातून लक्ष्य करीत होते. सिंग यांच्या कालावधीमध्ये काश्मिरात लष्कराने मोठे यश मिळवलेले होते आणि अनेक जिहादी दहशतवादी उचापती सोडून मुख्यप्रवाहात येण्य़ाची प्रक्रिया सुरू झालेली होती. तिलाच शह देण्यासाठी लष्कर दिल्लीवर चाल करून येणार होतं अशा अफ़वा पिकवण्यात आल्या होत्या. दहशतवादाला वेसण घालणारी सिंग यांची मोहिम हाणून पाडण्यासाठीचे हे काहूर पद्धतशीरपणे माजवण्यात आलं होतं. देशामध्ये लष्करी उठाव होणार असल्याची अफ़वा पाकिस्तानने फ़ैलावलेली नव्हती तर इथल्या माध्यमवीरांनी आणि पत्रकारांनी ती तिखटमिठ लाऊन जनतेसमोर आणली होती. आता तीच मंडळी भारताचे लष्करी कारवाईप्रमुख लेफ़्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी घोषणा करतानाच पुरावे असल्याचे सांगितले असूनही त्यावर संशय व्यक्त करीत आहेत. 
 
या घरभेद्यांच्या कारवायामुळेच पाकिस्तानची सीमेवर कुरापती काढण्याची हिम्मत होते. मग सीमेवरच काय मुंबईवरही हल्ले होतात. मुंबई हल्ल्याच्यावेळीही सर्जिकल ऑपरेशन करता आलं असतं पण तत्कालिन गृहमंत्री कपडे बदलण्यात व्यस्त आणि तेव्हाचे मुख्यमंत्री आपल्या मुलाला सिनेमात प्रमोट करण्यासाठी अतिरेक्यांच्या भक्षस्थानी पडलेल्या हॉटेल ताजची सफर सिनेदिग्ददर्शकाबरोबर करीत फिरत होते. या घटनांचं गांभिर्यच हरवलं होतं. परिणामी हेच पुरोगामी हस्तक घटनेच live फुटेज पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या बॉसना पुरवीत होते तरी त्यांच्यावर कोणतीही कारवायी झाली नाही. ही पकिस्तानी अतिरेक्यांना केलेली थेट मदत होती. अशा प्रकारे भारताला युद्ध परवडणारं नाही असं एका बाजूला सांगत दुसर्‍या बाजूने दहशतवाद्याना थेट मदत करण्याचं काम याच पुरोगामी म्हणवणार्‍या मंडळीनी चालवलं आहे. या अशा गोष्टींमुळेच लष्कर आणि पोलिसांचं मनोबल खच्चीकरण होत असतं. त्याना थारा कोण देत हा खरा प्रश्न आहे. शेवटी अख्खा देश म्हणजे फक्त सैन्य नव्हे, की तेच फक्त लढतील. राजकारणी, नोकरशहा, पत्रकार, कलाकार आणि सामन्य जनता असे सगळे मिळूनच तो देश बनतो. हाच न्याय पाकिस्तानलाही आहे, त्यांचे कलाकार हे त्या देशाचा भाग आहे आणि पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र असेल तर ते कलाकारही त्या शत्रूचाच भाग आहेत. ते दहशतवाद्यांचे हस्तक असू शकतात. त्याना दिवाणखान्यात आश्रय का द्यायचा? ते कलाकार तरी वेगळे करता येतात पण त्यांचे भारतातले साथीदार ओळखणं गरजेचं आहे.

खरा धोका किंवा जास्त धोका कुणापासून? पाकिस्तानकडून की चीनकडून असाही एक प्रश्न निर्माण करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सतत होत असतो. तो धोका दोन्ही बाजूने आहे आणि आता तर हे दोन्ही शत्रू एक झाले आहेत. बलुचीस्तान या आपल्याच पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या प्रांतात तिथल्या जनतेला चिरडून हे चालू आहे. तो भाग पाकिस्तानने चीनला आंदण दिला आहे. सीमेवर सैनिक लढतच आहेत, त्याना आपण घरात बसून मदत करू शकतो, कशी तर चीनी मालावर बहिष्कार घालून, ‘मेक इन इंडीया’ला साथ देऊन आणि पाकिस्तानच्या इथल्या पुरोगामी दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखऊन, निवडणूकात चारीमुंड्या चीत करून आपण आपल्यातला देशाभिमान जागृत असल्याचा पुरावा देवू शकतो. सर्जिकल ऑपरेशनच्या पुराव्यापेक्षा या पुराव्याची जास्त जरुरी आहे आणि हाच पुरावा या मंडळींचा बुरखा फाडून टाकेल.             
नरेंद्र प्रभू
सांताकृझ, मुंबई

17 November, 2016

स्वरांचा जादूगार – सत्यजित प्रभूमहाराष्ट्रा मंडळ न्युयॉर्क, अमेरीका यांच्या स्नेहदीपदिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख     
’मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं म्हणतात. ही म्हण खरी ठरवणार्‍या एका मुलाचे पाय मात्र मी पाळण्यात पाहिलेत, त्या पुढे आयुष्यभर जेव्हा कधी त्याचं वादन, गप्पा ऎकण्याचं भाग्य लाभलं तेव्हा मौजच मौज अनुभवत आलो. पेटी (हार्मोनियम), त्याच्या न कळत्या वयात ती त्याच्या हातात आली आणि तो त्याच्याही नकळत सप्तस्वरांच्या या जादूयी नगरीत प्रवेश करता झाला. 

सत्यजित प्रभू, दिड वर्षाचा असताना त्याचे हात हार्मोनियमच्या भात्याकडेही पोहोचत नव्हते पण सुरांवर मात्र बोटं लिलया फिरत असत, ऎकणारे अवाक होत, बोटात जादू होती. या व्यासंगी वादकाने सुरांशी पक्की दोस्ती केली किंबहुना ते त्याच्या आतच होते म्हणाना. दिवसोंदिवस सुरांमध्ये डुंबत असताना तो व्यासपीठाचा अधीपती कधी झाला हे त्यालाच समजलं नसावं. याची सुरूवात त्याच्या बालवयातच झाली. एकदा असाच पाचवीत असताना सत्यजित आपल्या आई बरोबर तिच्या फोर्टमधल्या कार्यालयात चालला होता. फोर्टच्या फुटपाथवर कि-बोर्डची अनेक खोकी मांडलेली दिसत होती. सत्यजितच्या नजरेतून ते कि-बोर्ड सुटत नव्हते. त्या कि-बोर्डवर हात आजमाऊन बघण्याची त्याला अनिवार इच्छा झाली. शेवटी त्याने आईला ही गोष्ट सांगितली. त्यांचा मोर्चा त्या फुटपाथवरच्या दुकानात वळला. अनेक कि-बोर्ड तपासून सत्यजितने त्या पैकी एक पसंत केला. तिथल्याच एका मोडॅक्या स्टुलवर बसून त्याचं बजावणं सुरू झालं. ‘मेरा जुता है जपानी’ पासून सुरूवात झाली आणि त्या बालकाचं कौशल्य पहायला आणि गाण्याच्या सुरेल धुन ऎकलायला तिथे शंभरावर माणसांची गर्दी जमा झाली. सत्यजित ते वाद्य घेऊन आईच्या कार्यालयात गेला. त्याने ते पुन्हा तपासून पाहिलं, वाजऊन पाहिलं आणि त्या कि-बोर्डच्या मर्यादा त्याला जाणवू लागल्या. या किबोर्ड पेक्षा सरस कि-बोर्ड सत्यजितने तिथे त्या दुकानात पाहिला होता. त्याने ती गोष्ट आईला सांगितली. महागडा कि-बोर्ड घेतला तरी मी त्याची किंमत नक्कीच वसूल करीन असा आत्मविश्वास सत्यजितला होताच. दुसर्‍या दिवशी पुन्हा मंडळी त्या दुकानात पोहोचली आधी एक हजारला घेतलेला कि-बोर्ड परत करून ६००० रुपयांचा कि-बोर्ड घेऊन सत्यजित घरी आला. त्या कि-बोर्डकडून त्याने शक्य ते सर्व वसूल केलं. त्याची सर्व फिचर्स वापरून त्याने ऎकणार्‍याचे कान तृप्त केलेच. आज त्याच सत्यजितला जगातल्या सर्व कंपन्यांचे उत्तम कि-बोर्ड वश झाले आहेत.                                       

हिर्‍याचं तेज लपून रहात नाही तसं सत्यजितचं वाजवणं वाखाणलं जावू लागलं आणि अगदी चौदा वर्षांचा असतानाच तो अशोक हांडेंच्या ‘आवाज की दुनिया’,  ‘मराठी बाणा’ अशा गाजत असलेल्या कार्यक्रमांमधून सिंथेसायझरची करामत दाखवू लागला. काही वादनाचे तुकडे तर एवढे क्लिष्ट असत की ते वाजवल्यावर लोक मानायला तयार नसत की हे आत्ता प्रत्यक्ष वाजवलं गेलय, श्रोत्यांना ती रेकॉर्डच वाटायची. मग ते पुन्हा वाजवलं की ‘क्या बात है’ हे ठरलेलं. असंच एकदा यामाहाचा सिंथेसायझर घ्यायचा म्हणून सत्यजितला घेवून अशोक हांडे मुंबईतल्या वाद्यांच्या दुकानात गेले. तिथे महागडा सिंथेसायझर विकत घेण्याआधी त्यानी तो सत्यजितला वाजवून बघ आणि पसंत असेल तर घेऊया असं म्हणाले. दुकानाचा मालक एवढी किमती वस्तू पोरसवदा मुलाच्या हातात द्यायला कबूल होईना, शेवटी हांडे आपल्या लालबाग-परळच्या खास ठसक्यात त्याला म्हणाले “अरे, यही बजाने वाला है, वही परखेगा, वह हा बोलेगा तो मै लुंगा” ही भाषा त्याला समजली. सत्यजितने वाजवायला सुरूवात केली आणि त्या मालकाची खात्री पटली की ‘काम भारी आहे.’ तिथेही गर्दी जमा झाली. लोक उभे राहून ऎकत होते, त्या वेळ पासूनच कित्येक कार्यक्रमात प्रेक्षागारात बसलेल्या प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं कौतूक केलं आहे.

अष्टपैलू वादक आणि कुशल वाद्यवृंद संचालक असलेले सत्याजित प्रभू हार्मोनियम, सिंथेसायझर ऍकॉर्डियन आणि पियानीका ही वाद्य स्टेजवर तर वाजवतातच शिवाय मराठी-हिंदी चित्रपट संगीत तसंच जाहिरातील मोजक्या लक्षवेधी जागा त्यानी आपल्या सुरावटींनी सजवल्या आहेत. आघाडीच्या बहुतेक सर्व गायक-गायीकांना सत्यजित प्रभूंनी साथ-संगत केली असून जगभरातील अनेक मैफिली गाजवल्या आहेत. अमेरिकेत बीएमएम आणि दुबईच्या प्रेक्षकांसाठी त्यांचा ‘जादूची पेटी’ हा कार्यक्रम झाला आणि तिथल्या मंडळीनी तो डोक्यावर घेतला. भारतातही कानसेन असलेले सुजाण श्रोते त्यांना कौतूकाची थाप देण्यात जराही मागे नाहीत. अशाच एका कार्यक्रमात शिवसेना प्रमूख मा. बाळासाहेब ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्यजितचं वाजवणं ऎकून मंत्रमुग्ध झाले. मध्यंतरात त्यानी सत्यजितला बोलाऊन तूझी जादूयी बोटं आम्हाला दाखव म्हणून हात हातात घेऊन त्याला शाब्बासकीची दिली. अशा घटना मग त्याच्यासाठी नित्याच्याच झाल्या. ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’ किंवा ‘अप्सरा आली’, गाणं कुठलही असूद्या सत्यजितच्या हातून ते स्वर हुबेहूब निघतात आणि टाळ्यांसाठी हात आपसूकच एकत्र येतात.

स्टेजवर गाण्यांचे किंवा वादनाचे प्रयोग चालू असताना काही वेळा अक्षरश: क्रिकेट सारखी फिल्डीग लावावी लागते असं सत्यजितचं म्हणणं आहे. अनेकदा काही वादकांकडून एखादा पिस वाजवलाच जात नाही त्या वेळी क्षणाचाही विलंब न लावता तो ताल पकडून कि-बोर्डवर तो पीस तत्काळ वाजवावा लागतो. हे सांगणं सोपं असलं तरी एवढी हुकमत गाजवण्यासाठी अभ्यास आणि साधनाही तशीच दांडगी लागते. स्वरांनी तूमच्याशी मैत्री करावी लागते. कान तयारीचे लागतात आणि प्रसंगावधान राखावं लागतं. म्हणूनच सत्यजित ‘फिल्डीग लावावी लागते’ असं त्याचं सार्थ वर्णन करतात. कान किती तयारीचे लागतात त्याचा एक किस्सा त्यानीच सांगितलेला. एकदा गोव्याच्या एका मंदिरात एका  ख्यातनाम गायकाचा कार्यक्रम चालू होता, सत्यजित साथीला होते, लोक गायनाचा आनंद लुटत होते. गायक जरा अस्वस्थच होते. काही तरी गडबड आहे असं त्यांना वाटत होतं. साऊंड, साथ सगळं ठिक होतं. तरी त्याना करमेना शेवटी त्यानी सत्याजितना विचारलं काय गडबड आहे का? सत्याजितनी सगळं व्यवस्थित चाललय असं सांगितलं, पण खरंच काहीतरी चुकल्याचं गायकाला सारखं वाटत होतं. त्यानी पुन्हा सत्यजितकडे विचारणा केली तेव्हा शेवटी “तुमच्या हातातली पेटी....!” असं सांगताच त्यानीही सुटकेचा श्वास सोडला. काही कारणाने स्वत:च्या पेटी ऎवजी तिथल्या यजमानांची पेटी (हार्मोनियम) त्या दिवशी ते गायक वाजवत होते आणि तिथेच खरी गोम होती. स्टेजवर असताना अष्टावधानी असणं किती आवश्यक आहे आणि ते कसं असावं हे सत्यजितकडून शिकावं.

सत्यजित प्रभूंना कि-बोर्ड किमयागार किंवा वाद्याव्दारे गाणारा गायक असं अनेकदा संबोधलं जातं. एक माणूस शांत संयत राहून गाण्यामध्ये किती रंग भरू शकतो ते त्यांचं वाजवणं ऎकतानाच समजतं. ‘गगन सदन तेजोमय’ या गाण्यातील व्हायोलिंस, पियानोचे स्वर ऎकताना वाद्याना गातं करणार्‍या या वादकाला सलाम करावासा वाटतो. ट्रंपेट, व्हायोलिन, पियानो, सतार, सेक्साफोन, मेंडोलिन अशी कितीतरी वाद्यांचे स्वर हुबेहूब वठवणं ही जादू नव्हे तर काय? शंकर जयकिशनचं ‘अजी रुठकर अब कहा जायीयेगा’ मधली सतार, पियानो, व्हायोलिंस यांची एकत्रीत सुरावट असो की ‘निलेनिले अंबर’ मधली गिटार असो, की ‘ओ सजना बरखा बहार आयी’ मधली सतार कुठल्याही गाण्यातला प्राण श्रोत्यांपर्यत पोहोचवण्याचं काम सत्यजित प्रभूंचा कि-बोर्ड करतोच करतो.

खुप महाग कि-बोर्ड असला की त्या बरोबर रेडीमेड खुप साऊंडस मिळतात असा प्रकार नसतो. तर ते साऊंडस वादकाला तयार करावे लागतात. मुळ वाद्याच्या जवळ जाणारे स्वर तयार केले तरच ते वादन प्रत्ययकारी असू शकतं. सत्यजित हे साऊंड तयार तर करतातच पण इतर वादकांना जर ते हवे असतील तर ते कॉपी करून द्यायला ते सदैव तयार असतात.

एकाच वेळी दोन वेगवेगळ्या सुरावटी किंवा वेगवेगळी वाद्य वाजवण्याचं कसब असलेला हा कलाकार अनेक दिग्गजांकडून वाखाणला गेला आहे. पंचमदांच्या वाद्यमेळ्यात केरसी लॉर्ड (Kerasi Lord) ऍकॉर्डीयन आणि मनोहारी सिंह सेक्सोफोन वाजवात असत हे सर्वश्रूत आहे. ‘रुप तेरा मस्ताना’, ‘ये शाम मसतानी’ या सारखी गाणी त्यांच्या सुरावटींनी अजरामर झाली आहेत. संगितकार आणि संगित संयोजक कमलेश भडकमकरांच्या स्टुडिओमध्ये ‘गुलाबी आखे’ या गाण्याचं रेकॉर्डींग करायचं होतं. ‘गुलाबी आखे’ मधला ऍकॉर्डीयन चा पिस सत्यजितनी आदल्या दिवशी स्टुडिओत वाजऊन झाला होता. दुसर्‍या दिवशी मनोहारी सिंह सेक्सोफोन वाजण्याकरीता स्टुडीओत आले, त्यानी आदल्या दिवशी झालेलं रेकॉर्डींग ऎकलं आणि ‘ऍकॉर्डीयन किसने केरसी लॉर्डने बजाया है क्या?’ असा प्रश्न केला. मनोहारी सिंहसारख्या महान कलाकाराकडून अशी दाद मिळवणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. असाच एक किस्सा सारेगमप या झी वाहिनीवरच्या कार्यक्रमामधला आहे. त्या दिवशी लक्ष्मिकांत-प्यारेलाल या संगितकारांच्या जोडीमधले प्यारेभाई परिक्षक म्हणून आले होते. गायिका ‘आ... जानेजा’ गाण गात होती त्या गाण्यातली क्लिष्ट सुरावट सत्यजितनी हुबेहुब वाजवली तेव्हा प्यारेभाईना राहावलं नाही जागेवरच उभं राहून त्यानी सत्यजितना ‘सुरेख’ अशी खुण करून दाद दिली. वानगी दाखल हे दोन प्रसंग सागितले, असे अनेक उत्कट प्रसंग या वादकाच्या वाट्याला आले आहेत. सरेगमप या झी मराठी वाहिनीवरच्या कार्यक्रमात त्यांच्या वादनाचा आनंद जगभरातील प्रेक्षकांनी घेताना असे अनेक सुखद क्षण अनुभवले आहेतच. 

असाहा गुणी कलाकार ‘जादूची पेटी’, जिवलग प्रस्तूत  म्युZeeशियंस, आवाज की दुनिया, गाने सुहाने, अमृत लता, अजय-अतूल संगित रजनी अशा अनेक कार्यक्रमांमधून ऎकता येईलच, पण सुरेशजी वाडकर, अजत-अतूल, वैशाली सामंत या बरोबरच अनेक मराठी–हिंदी संगिताच्या कार्यक्रमात त्यांच्या वादनाचा आनंद लुटता येईल.

नरेंद्र प्रभू

                                                                                                             

14 November, 2016

मधुमेहाचा (Diabetes) रोगी बरा होतो?


आज जागतिक मधुमेह दिन. हा काय साजरा करण्यासारखा दिवस नाही, तर या रोगा विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी याचे आयोजन असावे. गेली दहा वर्ष मला मधुमेहाने ग्रासलेलं असून त्यावर उपाय म्हणून घेतलेली ऍलोपथीची औषधं मुंबईतले निक्ष्णात समजले जाणारे डॉक्टर नेहमीच वाढवून देत आले आहेत. रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही औषधं घेत रहायचं. मात्र त्या रोगावर उपाय केला जात नाही. म्हणजे असं की ही राखर का वाढते ते पाहिलं जात नाही, तर वाढलेली साखर तात्पूर्ती नियंत्रणात राहाण्यासाठी औषधं देणं एवढचं काम हे डॉक्टर करतात आणि ती दिवसोंदिवस वाढतच जातात. (एवढी की यावर उपाय करणार्‍या एका डॉक्टरची स्वत:ची औषधं कंपनी आहे.)

मधुमेह निसर्गोपचारांनी बरा होतो किंवा त्यावर आयुर्वेदिक औषधं घेतल्याने नियंत्रण मिळवता येते असं समजल्याने मी  सिंधुदुर्ग योग निसर्गोपचार केंद्राच्या  आरोग्य धाममध्ये हेच उपचार करून घेण्यासाठी नुकताच गेलो होतो. तीन दिवस  आरोग्यधाममध्ये उपचार करून घेतले. मधुमेह आणि त्यामुळे गॅग्रीन झालेला पाय कापून टाकण्याचा सल्ला ऍलोपथीच्या डॉक्टॅरांनी दिला असताना एक रुग्ण (जे माझे दूरचे नातेवाईक आहेत) या निसर्गोपचार केंद्रात गेल्यावर्षी दाखल झाले होते, त्यानी उपचार करून घेतले आणि ते साधारण अडीज महिन्यात गॅग्रीन झालेला पायाची जखम  पुर्ण बरी झाल्यावर आपल्या पायावर घरी चालत गेले. अशा उदाहरणांमुळे मला माझ्या  तब्यती विषयी सकारात्मक भाव निर्माण झाले. डॉ. रसिका करंबेळकर यांनी केलेले उपचार खासच होते. तेथील योग शिक्षक श्री. विद्याधर करंबेळकर शिकवलेला योग आणि प्राणायाम हे सर्व या आधीसुद्धा शिकलो होतो पण योग्य तंत्र इथे शिकवलं गेलं. दि. ३०/१०/२०१६ पासून कसलीच मधुमेहाची औषधं न घेता शरीरातील साखर नियंत्रणात आहे. त्याचा आकडेवारी पुढील प्रमाणे
दिनांक.             Fasting        P. P
18/10/2016        137.5      192.7
30/10/2016        111        229
01/11/2016        143        139
06/11/2016         97        137
11/11/2016         86.4       93.6

दि. ३०/१०/२०१६ पासून मात्र २१ दिवसांच पथ्य डॉक्टरनी सांगितलं आहे. ३० तारीखला विरेचन खरं तर शुद्धीक्रिया केल्यावर खुप फरक पडत गेला.

लोकांना वीरेचन ऐकून माहिती आहे  म्हणून विरेचन असं लिहिलं.  पण सिंधुदुर्ग योग निसर्गोपचार केंद्रात होते ती शुद्धीक्रीया. आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर गाडीवर तुसतं पाणी मारणे व संपूर्ण सर्व्हिसींग करणे यातील फरक आरोग्यधाम मध्ये संपूर्ण सर्व्हिसींग करून विरेचनासकट अन्य फायदे घेता येतात. यात दोन्ही आतड्यांची धुलाई होता होता प्लीहा, यकृत, स्वादुपींड, liver spleen pancreas यांची शुद्धीक्रीया होते. तसेच स्वादुपींड अधिक सक्षम बनून इन्सुलिन निर्माण करण्यासाठी सक्षम बनते HDL वाढून LDL कमी होतेtriglycerides normal होते. कफ एलर्जी जुनाट सर्दी दूषीत वात पित्त कफ समान होऊन ह्रुदय कमीतकमी सहामहिन्यासाठी सुरक्षित रहाते. बद्धकोष्ठ अपचन मुळव्याध पित्ताचे खडे यात लाक्षणिक पण दूरगामी चांगला लाभ होतो.एवढे सगळे लाभ शुद्धीक्रीया केल्या होतात. आपण याला BODY SERVICING किंवा शरीर शुद्धीक्रीया म्हटल्यास ही व्याख्या अधिक व्यापक होईल


  डॉ. रसिका करंबेळकर यांनी सुचवलेले उपाय करून मधुमेहापासून सुटका करून घेण्याचा मानस आहे. मधुमेहाचा (Diabetes) रोगी बरा होतो का? असा प्रश्न विचारल्यास ‘नाही’ असं उत्तर ऍलोपथीचे डॉक्टर देतात. मात्र डॉ. रसिका करंबेळकर यांनी तुमच्या ऍलोपथीच्या गोळ्या बंद होतीलच असा विश्वास दिलाय. पुढच्या जागतिक मधुमेह दिनापर्यंत मी याचा मागोवा घेत राहीन आणि तो या ब्लॉगवर  प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करीन. पाहूया .....!   
  

   

13 November, 2016

॥आरोग्य धाम॥ सिंधुदुर्ग योग निसर्गोपचार केंद्र


खरं तर प्रत्येकाचं शरीर हे आरोग्य धाम असायला पाहिजे, पण तसं नसतं. चुकीच्या जीवन पद्धतीमुळे किंवा अनेक रोगांमुळे शरीर यातनामय होतं किंवा वेगवेगळे त्रास सुरू होतात. या सर्वांवर आयुर्वेदीक निसर्गोपचारासारखा दुसरा मार्ग नाही. सिंधुदुर्ग योग निसर्गोपचार केंद्राच्या  आरोग्य धाममध्ये हेच उपचार खुप काळजी पुर्वक केले जातात.

या निसर्गोपचार केंद्रात नुकताच जावून आलो. रुग्णाचे पॅथलॅबमध्ये काढलेले रिपोर्ट आणि  नाडी परिक्षा करून उपाय सुचवले जातात. संपुर्ण मानवी शरिरावर आयुर्वेद पध्दतीत सखोल अभ्यास केला गेला असून या केंद्राच्या डॉक्टर रसिका करंबेळकर (डिएचएमएस [सीसीएच] डीवायए, डीवायएन, एमडी (पंचगव्य)  या नेमकेपणाने उपचार करतात. जवळ जवळ सर्वच रोगांवर इथे उपचार केले जातात.

अनेक प्रकारच्या रोगांवर उपचार करून त्याचा लाभ उठवणार्‍या पेशंटचे अभिप्राय या ठिकाणी ठेवलेल्या नोंदवहीत वाचायला मिळाले. ते वाचून स्तिमित व्हायला होतं.  CANCER,   Diabetes, Kidney stone, Obesity, Skin Disease, Thyroid वैगरे अनेक रोगांवर उपचार करून बरे झालेले पेशंट आरोग्यधामला धन्यवाद देताना दिसतात.       

कुडाळ या कोकण रेल्वेच्या स्थानकापासून साधारण दिड किलोमिटरवर आणि कुडाळ एस्टी. स्टॉन्ड पासून जवळच हे आरोग्य धाम आहे. एस्टी. स्टॉन्ड जवळच्या पतांजली शॉपमध्ये आरोग्य धामला कसं जायचं ते समजून घेता येईल. आरोग्य धाममध्ये उपचार करून घेताना तिथे निवासाचीही सोय आहे. बाहेर गावहून येणार्‍या पेशंटला याचा विशेष लाभ होतो. सिंधुदुर्ग जिल्हा देशात सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून नुकताच जाहिर झाला आहे. कोकणातला हा निसर्गरम्य जिल्हा आता पर्यटनाच्या नकाशावर येत आहे. पर्यटनाबरोबरच  निसर्गोपचार करून घेतले तर एकाच दगडात दोन पक्षीही मारता येतील. कोकणच्या निसर्गाचा आनंद घेतानाच जीवनात हरवून बसलेला आनंद आरोग्य धाममध्ये निसर्गोपचार करवून घेवून पुन्हा प्राप्त करता येवू शकेल.
   

                    

09 November, 2016

सर्जिकल स्ट्राईक बाहेरचा आणि आतलासप्टेंबर महिन्यात पाक अधिकृत काश्मीरमध्ये  ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचा पुरावा मागणार्‍यांना आता न मागताच पुरावा मिळाला असेल. ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा रद्द करून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. हा सर्जिकल स्ट्राईक कुणाकुणाच्या घरी झाला त्याची यादी पुढील प्रमाणे देता येईल.
1.     पाकिस्तान (बनावट भारतिय चलन निर्माण करून देशाची अर्थव्यवस्था पोखरणारे)
2.     दहशतवादी करवाया करणारे
3.     नक्षलवादी कारवाया करणारे
4.     राजकिय धेंड
5.     बिल्डर
6.     सर्व अवैध कामं करणारे
7.     लाचखोर सरकारी अधिकारी
8.     स्मग्लर
9.     काळे व्यापारी

ही यादी आणखीनही वाढवता येईल. काळा पैसा फक्त देशाबाहेरच गेलेला नाही तर तो देशातही आहे. याच कळ्या पैश्यावरून मोदी सरकारला घेरणारेच आता सापळ्यात अडकले आहेत. देश आता दोन गटात विभागला गेला असेल, काल रात्री शांत झोप झाली नसणारे आणि शांतपणे झोपी गेलेले. ज्याची झोप खराब झाली आहे अशांची कोल्हेकुई आता हळूहळू ऎकू येईलच.
बेनामी व्यवहार... साठेबाजी, काळाबाजार यात सर्वसामान्य लोक सहभागी नसतात उलट त्यांना लुबाडून मिळवलेला पैसा आता मातीमोल झाला आहे.  

यह है अच्छे दिन !
                
मात्र या दिवसात गरीब लोक, घरकाम करणार्‍या बाया, ड्रायव्हर अशासारख्या लोकांना आपण मदत केली पाहिजे, त्याना हा सर्व व्यवहार समजावून सांगून त्यांच्याकडे असलेल्या  ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा बॅंकेमधून कश्या बदलून घ्यायच्या त्याचं मार्गदर्शन आपणच केलं पाहिजे. या कामात सरकारला जेवढी म्हणून मदत करता येईल तेवढी मदत करणं आपलं कर्तव्य आहे.                      

28 September, 2016

‘लडाख प्रवास अजून सुरू आहे’ तिसरी आवृत्ती


‘लडाख प्रवास अजून सुरू आहे’ या आमच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली त्या निमित्ताने ग्रंथाली प्रकाशनाच्या ‘शब्द रुची’ मासिकामध्ये आलेलं हे पुस्तक परीक्षण:30 August, 2016

CODE मंत्रदहा दिवसांपूर्वी लेह मध्ये सीमेवर तैनात झालेल्या सैनिकांबरोबर लेह मध्ये होतो. तिथे त्यांच्या बरोबर रक्षाबंधनाचा कार्यक्रम ‘ईशा टूर्स’ ने आयोजित केला होता. दूर सीमेवर सैनिकांना भेटण्यात वेगळाचं थरार असतो, तो तिथे अनुभवला आणि आज परल्याच्या दिनानाथ मंदीरात ‘CODE मंत्र’ हे नाटक पाहिलं. संपूर्ण नाटक सीमारेषेच्या पार्श्वभूमीवर घडतं. या नाटकात चाळीसच्यावर कलाकार आहेत आणि त्या मधले बहुतेक सैनिकी वेषात आहेत. तिकडे खर्‍या सीमाभागात वावरणारे सैनिक, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमामधलं त्यांचं संचलन आणि इथे या नाटकात सैनिकाची भूमिका वठवणारे कलाकार यांच्या देहबोलीत फरक जाणवला नाही. स्टेजवर भूमिका हुबेहुब वठवणं हे सोपं काम नव्हतं.

आता नाटका विषयी. मराठी रंगभूमीवर अशा प्रकारचं, या विषयावरचं हे कदाचीत एकमेव नाटक असेल. अतिशय संपन्न नाट्यानुभूती! पहिल्या क्षणापासून हे नाटक प्रेक्षकाच्या हृदयाचा ठाव घेतं. नाटक संपेपर्यंत दूसरा विचारही मनाला शिवत नाही. एका थराराचे आपण प्रत्यक्ष साक्षिदार आहोत असं वाटत रहातं. सगळ्यांच्याच भूमिका लाजबाब.

‘लोकसत्ता संपादक शिफारस पात्र’ असं; मुक्ता बर्वे, अजय पुरकर, संजय महाडीक यांच्या अप्रतिम भूमिका असलेलं हे नाटक मराठी नाट्य रसिकांनी आवर्जून पहावं असंच आहे. इतरत्र चालू असलेल्या मनोरंजनाच्या गदारोळात एक अस्सल कलाकृती पाहिल्याच्या आनंद दीर्घकाळ टिकून राहील असं हे पैसा वसूल आणि अखेर पर्यंत खिळवून ठेवणारं नाटक पहाच.
         

                          

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates