25 January, 2013

ऑन द रोड लेस ट्रॅव्हल्ड


सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि इशा टुर्स या पर्यटन संस्थेचे संचालक आत्माराम परब यांच्या छायाचित्रांचं ऑन द रोड लेस ट्रॅव्हल्ड हे प्रदर्शन मध्य मुंबईतील रविंद्र नाट्य मंदीराच्या आवारातील पु.ल. देशपांडे कला दालन, सयानी रोड, प्रभादेवी मुंबई ४०० ०२५ या ठिकाणी २४ ते २७ जानेवारी २०१३ या कालवधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत भरत आहे. जगप्रसिद्ध न्युरो-स्पायनल तज्ज्ञ डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून कायदेतज्ज्ञ श्री. अधिक शिरोडकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. सदर प्रदर्शन सर्व रसिकांना विनामुल्य खुलं राहिल.

फोटोग्राफीची आवड असलेल्यांसाठी आणि पर्यटन प्रेमींसाठी आत्माराम परब यांचं हे प्रदर्शन म्हणजे दरवर्षी चालून येणारी एक संधीच असते. देश तसेच विदेशातील दुर्लक्षीत पण अनोख्या स्थानांचं मनोवेधक छायाचित्रीकरण करून ते रसिकांसमोर मांडून आत्माराम परब यानी कलाक्षेत्रात एक उत्तम पायंडा पाडला आहे. त्यांच्या आजवरच्या नावलौकीकाला साजेसं असंच हे प्रदर्शन असून त्यात लडाखची एकमेवाव्दीतीय अशी चांद्रभुमी, १४५०० फुट उंचावरचा अनोखा खार्‍यापाण्याचा तलाव पॅंगॉंग लेक, जगातल्या सर्वोत्तम समुद्र किनार्‍यांपैकी एक अंदमान जवळचा राधानगर बीच, मेघालय मधील आश्चर्य असलेला लिव्हींग रुट ब्रीज, हंपी-बदामीचं जागतीक वारसा लाभलेलं विलोभनीय स्थळ, सिक्कीम मधील गुरूडोंगमारचा तलाव आणि पद्मसंभवाचा भव्य पुतळा, कांचनजंगाची सोनेरी शिखरं, हिमाचल प्रदेश मधील नयनरम्य खजीयार, अरुणाचल प्रदेश मधील तवांग मॉनेस्ट्री, आसाम मधील पक्षांचं माहेरघर आणि सर्वच बाबतीत अनोखं असं माजूली आयलंड तसंच एकशींगी गेड्याचं वास्तव्य असलेलं भारतातील एकमेव ठिकाण काझीरंगा, नागालॅन्डचा हॉर्नबील फेस्टीव्हल, गुजराथ मधील मोडेरा सुर्य मंदीर, भुतानची आकाशाशी स्पर्धा करणारी तक्संग मॉनेस्ट्री, व्हीएतनाम मधील हॅलॉंग बे हे जगातील सात नैसर्गीक आश्चर्यापैकी एक ठिकाण, कंबोडीया मधील अंकोरवाट हे अतिविशाल आणि प्राचिन हिंदू मंदीर, दक्षीण आफ्रीकेतील बो काप हे पुर्वीचं गुलामंचं आणि आताचं पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेलं खेडं, केनीया टांझानीया मधील प्राणी आणि पक्षांचं वैभव या आणि अशा अनेक ठिकाणची उत्तमोत्तम छायाचित्रं, माहितीपट तसंच या ठिकाणी कसं आणि कधी जावं याची इतंभुत माहीती या प्रदर्शना दरम्यान मुंबईकरांना उपलब्द्ध होणार आहे. प्रदर्शन काळात येणारी तीन दिवसांची सुट्टी देशो देशीचे देखावे पाहून कारणी लावण्याबरोबरच पुढच्या सुट्टीचे नियोजन करण्याकरीता हे प्रदर्शन नक्कीच मार्गदर्शक ठरेल. अधीक माहितीसाठी आत्माराम परब यांच्याशी ९८९२१८२६५५ atmparab2004@yahoo.com  वर संपर्क साधावा. 

22 January, 2013

शोध तथागत बुध्दांच्या पदचिन्हांचा.....प्रज्ञा क्रिएशनच्या शोध तथागत बुध्दांच्या पदचिन्हांचा......
या माहितीपटाचा प्रकाशन सोहळा संपन्न

 

 डॉ. प्रेमानंद रामाणी यांचं स्वागत करताना निर्माता-दिग्दर्शक विजय मुडशिंगीकर 
प्रज्ञा क्रिएशनच्या शोध तथागत बुध्दांच्या पदचिन्हांचा या माहितीपटाचा प्रकाशन सोहळा नुकताच सुप्रसिद्ध न्युरो-स्पायनल तज्ज्ञ डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या हस्ते झाला. यावेळी सिद्धार्थ कांबळे (अध्यक्ष मुंबई जिल्हा सहकारी बॅंक) आणि जेष्ठ साहित्यिक वामण होवाळ हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.   

देशभर फिरून आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून गंगा नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा मांडणारे सुप्रसिद्ध छायाचित्रकार विजय मुडशिंगीकर यानी भारत, नेपाळ आणि श्रीलंका असा बुद्धभुमीचा प्रवास करून हा माहितीपट दिग्दर्शित केला असून निर्मिती प्रज्ञा क्रिएशन ने केली आहे. स्वप्निल शेटे या तरुण कलाकाराने चित्रिकरण आणि सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. एकाच वेळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये सादर माहितीपटाचं प्रकाशन या प्रसंगी करण्यात आलं.

तुडूंब भरलेल्या थिएटरमध्ये अतिशय भावपुर्ण वातावरणात हा सोहळा साजरा झाला. उपस्थितांच स्वागत आणि हा माहितीपट पुर्णत्वाला नेणार्‍या चमूचं अभिनंदन केल्यानंतर डॉ. प्रेमानंद रामाणी यांचं मोलाचं मार्गदर्शन या प्रसंगी लाभलं. समाजातील समस्यांवर नेमकं बोट ठेवताना आज गौतम बुध्दाच्या शांती आणि प्रज्ञा या मार्गाचं किती महत्व आहे हे त्यानी विषद केलं. भारतिय संकृती आणि विचार हे जगाला मार्गदर्शक ठरत असताना आपण मात्र त्यापासून दूर जात आहोत आणि नेमक्या याच वेळी विजय मुडशिंगीकर यांनी बुद्धाचा जीवन प्रवास ज्या ज्या भागातून झाला तो मार्ग जनसामान्यासमोर आणला आहे हे फार महत्वाचं आहे असे गौरवोत्गार या प्रसंगी डॉक्टर रामाणी साहेबांनी काढले. या वेळी  बोलताना मुंबई जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे म्हणाले की हा महितीपट उत्तम तर आहेच पण स्वत:चं राहतं घर गहाण ठेऊन  विजय मुडशिंगीकरांनी हा उपक्रम तडीस नेला, त्यासाठी बॅंकेने त्याना कर्ज दीलं. पुढील वाटचालीसाठी आता बॅंक त्यांच्यावर घर गहाण ठेवायची पाळी येवू देणार नाही असं निसंदिग्ध आश्वासनही कांबळेसाहेबांनी दिलं. मुडशिंगीकरांची सर्व धडपड प्रथम पासून पाहाणारे जेष्ठ साहित्यिक वामण होवाळ यांनी हा चित्रपट तयार करतांना मुडशिंगीकर कुटूंबीयानी किती जिद्दीने साथ दिली त्याचे दाखले दिले. सर्वच वक्त्यांनी या उपक्रमाचं कौतूक केलं आणि परिश्रमपुर्वक मनापासून केलेल्या कामाचं आज चिज झाल्याची भावना व्यक्त केली. माझं कामच बोलतं मी काय बोलू आपण हा माहितीपट पहा आणि कायते ठरवा असं म्हणताना स्वत: मुडशिंगीकर सदगदीत झाले तेव्हा संपुर्ण सभागृहाने टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतूक केलं.  

तथागत गौतम बुध्दांचा जन्म ते महापरिनिर्वाणापर्यंतचा प्रवास ज्या ज्या ठिकाणी झाला त्या पैकी बहुतांश भागांचं चित्रिकरण या महितीपटात करण्यात आलं आहे. नेपाळ मधील लुम्बिनी या बुद्धाच्या जन्मठिकाणापासून सुरुवात झालेली ही यात्रा पुढे सारनाथ, राजगीर, नालंदा, श्रावस्ती, वैशाली, संकिया, लेह-लडाख, कुशीनगर, सांची, अजिंठा   ही भारतातील ठिकाणं करून नंतर अनुराधापूर या श्रीलंकेतल्या ठिकाणापर्यंत जाते. गेली सहा वर्ष अथक परिश्रम करून बौद्ध धम्माच्या विस्मयचकीत करणार्‍या प्रदीर्घ प्रवासातील धम्म स्थळांचा नयनरम्य देखावा आणि माहिती या माहितीपटाव्दारे प्रज्ञा किएशनने रसिकांसमोर आणली आहे. या सर्व ठिकाणांची अभ्यासपुर्ण माहिती सर्वांसमोर यावी हा या माहितीपताचा उद्देश आहे.           

पटकथेसाठी डॉ. आ. ह. साळूंके यांचं तर स्थिर चित्रीकरणासाठी प्रकाश शेट्टी यांच मोलाचं सहकार्य लाभलं असून मधुकर कांबळे, नरेन्द्र प्रभू आणि करुणा पंडीत यांचही योगदान या माहितीपटाला लाभलं आहे. प्रकाशनानंतर लगेचच या माहितीपटाचं सादरीकरण करण्यात आलं. माहितीपट पाहिल्यानंतर सभागृहाने मुडशिंगीकरांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आणि एक उत्तम कलाकृती सादर केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  

संपुर्ण मुडशिंगीकर कुटूंबीयानी आणि मित्रपरिवाराने हा कार्यक्रम पारपाडण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. दोन डिव्हीडी स्वरुपात हा संच उपलब्ध असून अधिक माहिती करिता रोहन मुडशिंगीकर २५७७५०७०/९४२२२१४३६८ यांच्याशी संपर्क साधावा.


17 January, 2013

आनंद तरंगतूझ्या पाखरांना कुणाचा दिलासा?
कुणी ना उसासा टाकतसे
कुणी खेद खंती नसे डुंबलेला
आनंद सोहळा होत असे

असे पर्ण संभार ज्यांच्या कपाळी
तयांना जीवन मिळते कसे?
सदासर्व काळी तयांचा तू माळी
नित्य नवे रुप घेत असे

नसे दीर्घ चिंता उद्याच्या दिसाची
आनंद तरंगी नाचतसे
जगावे जीवन कसे मानवाने
त्याचीच प्रचिती रोज दिसे

नरेन्द्र प्रभू

13 January, 2013

कायदा आणि सुव्यवस्था सरकारलाच नको आहे का?
कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी वसंत ढोबळींची पुन्हा बदली झाली आहे. ज्या सांताकृझ  आणि पारले परिसरात त्यांची नियुक्ती होती त्या परिसरात गेले काही महिने आम्ही कायद्याच राज्य अनुभवत होतो. इथले लोकप्रतिनिधी आणि त्यांचे बगलबच्चे यांच्या अनिधिकृत कामांवर ढोबळेसाहेबांनी अंकूश बसवला होता. इतरवेळा परप्रांतीय फेरीवाल्यांनी व्यापलेले रस्ते ढोबळेसरांच्या काळात अचानक चालण्या योग्य झाले. दोन महिन्यांपुर्वी पारले कट्ट्या वर त्यांचे आश्वासक शब्द कानावर पडले आणि उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाव्दारे  मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

अनधिकृत काम रोखणे हे पोलीसांचं कर्तव्यच आहे, पण हे करणार्‍यावर जर, जे आज तुरूंगात पाहिजे होते त्यांच्या सांगण्यावरून कारवाई होत असेल तर........., तर आम्ही सामान्य नागरिकांनी जावं कुठं? दिल्लीत बलात्कार झाला, सारा देश हादरला, इथे मुंबईत हा कायदा आणि सुव्यवस्थेवरचा बलात्कार नव्हे का?          

07 January, 2013

धीर धर मित्रा


भडकलेली आग कधीतरी शांत होतेच
धीर धर मित्रा, रात्रीनंतर पहाट होतेच

कधी रात्र मोठी, मध्यरात्रीनंतरही लांबलेली
उशीराने होणारी पहाट, काळजात दाटलेली
ढगाला सारून दूर, सुर्यबिंब वर येतेच 
धीर धर मित्रा, रात्रीनंतर पहाट होतेच

भरती नंतर ओहोटी ही सागराची रीत आहे
शेजारच्या ओहोळाला नुसता खळखळाट आहे
समुद्राच्या गाजेची त्यावर मात होतेच
धीर धर मित्रा, रात्रीनंतर पहाट होतेच

काजवे कधी सुर्यासमोर चमकतात का रे?
विजा कधी आभाळ भरूनही उरतात का रे?
धरित्री त्यांना खाली खेचून घेतेच
धीर धर मित्रा, रात्रीनंतर पहाट होतेच

२८ १२ २०१२
रात्री १२.३०


03 January, 2013

याला जीवन ऎसे नावयाला जीवन ऎसे नाव
कुणी देतसे घाव खोलवर
देतसे कुणी वाव
याला जीवन ऎसे नाव

सुर्य आजचा नवा उगवला
तिमीरा नंतर प्रकाश पडला
काल रातीचा वेगळा होता डाव
याला जीवन ऎसे नाव

जुळल्या तारा, जुळली हृदये
नजरे मधले भाव बदलले
अंतरीचा लागे ठाव
याला जीवन ऎसे नाव


नरेंद्र प्रभू
29/12/12
पहाटे 5.30

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates