माझं स्वैर लेखन
12 November, 2018
हे मृत्युंजय- एक प्रेरणादायी नाट्य
16 January, 2017
सावरकर स्मारकात लाईट ऍन्ड साऊंड शो
24 May, 2014
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारत रत्न ?
28 May, 2013
त्या काळ कोठडीतली ११ मिनीटं
18 February, 2010
काळ्यापाण्याची शताब्दी
ब्रिटिश सरकार ज्यांना खर्या अर्थाने घाबरत होतं, इंग्रजांवर ज्यांचा वचक होता अशा भारतमातेच्या सुपूत्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव अग्रणी होतं. लोकमान्यानी जो वन्ही पेटवला होता त्यात अनेक ब्रिटिश नराधम अधिकारी मारले जात होते, त्याच बरोवर चाफेकर बंधूंसारख्या वीरात्म्यांचीही आहूती दिली जात होती. या देशाने मोगलांचा जुलूम सहन केला होता, पण त्या मोगलांना सळो की पळो करून सोडणार्या छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा हा महाराष्ट्र परकीयांचं जोखड मानेवर घ्यायला कदापी तयार नव्हता. ‘शिवाजी’ या तीन अक्षरात अशी काही जादू होती की तो शब्द उच्चारताच तमाम महाराष्ट्राला नवसंजीवनी प्राप्त होत होती. मराठ्याच्या नसानसा मधूनच नव्हे तर कृष्णा, गोदावरी सारख्या नद्यांमधूनही विद्युल्लता प्रवाहीत होत असे. केसरी मधून लिहीलेल्या अग्रलेखांमधून, लोकमान्य टिळकांच्या भाषणांमधून संदेश घेवून उभा महाराष्ट्र जसा पेटून उठत होता, तसा फासावर जाणार्या हुतात्म्यांची जागा घ्यायला नवीन योद्धा पुढे येत होता. चाफेकर बंधूंना फासावर लटकवले हे ऎकून केवळ सोळा वर्षे वयाचा विनायक दामोदर सावरकर हा तरूण देवघरात कुलदेवता दुर्गेसमोर जावून उभा ठाकला. आणि ती कठोर प्रतिज्ञा केली “मी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारीता मारीता मरेतो झुंजेन, ब्रिटिशांना माझ्या मातृभूमीमधून हुसकावून लावीन आणि देशाला श्रेष्ठत्व प्राप्त करून देईन.” काय योगायोग आहे पहा, बाल शिवाजीने रोहीडेश्वरी घेतलेली स्वराज्याची शपथ आणि सावरकरांनी भुगूर या आपल्या गावी घेतलेली शपथ यात विलक्षण साम्य होतं. स्वातंत्र्याची उर्मी तीच, देशाबद्द्लची प्रिती तीच, परकीयांबद्द्लचा त्वेश तोच आणि मनगटातला जोशही तोच.
सावरकरांचे वडील आणि चुलते प्लेगला बळी पडले. सावरकर बंधू पोरके झाले. पण या घरच्या दुःखात बुडून न रहाता सावरकर सतत देशाचाच विचार करत होते. क्रांतिची स्वप्ने पहात होते. सन १९०४ मध्ये त्यानी ‘अभिनव भारत संघटना’ ही संस्था स्थापन केली. टिळकांचा स्वदेशीचा आग्रह सावरकरांना मनोमन पटला होता. लोकमान्यानी स्वदेशीचा आग्रह धरला होता त्याच वेळी सावरकरानी विदेशी मालावर बहीष्कार घालण्याचं आवाहन केलं. पुण्यात विदेशी कपड्यांची होळी करण्याचा त्यांनी घाट घातला. लोकमांन्यानी त्याला सहमती दर्शवली. एक गाडीभरून विलायती कपडे जमा केले गेले आणि मिरवणूकीने ते आणून त्यांची होळी करण्यात आली. ही नुसती संपत्तीची नासाडी नसून या होळीने क्रांतिचा वणवा पेटेल असा विचार त्यामागे होता. विदेशी कपड्यांच्या होळीच्या साक्षीने जाळजळीत विचार मांडणारी भाषणं केली गेली. या क्रांतिकारक घटनेचं नेतृत्व सावरकरानी केलं. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असतानाच सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती. महाविद्यालयाकडून सावरकरांना दहा रुपये दंड आणि वसतीगृहातून काढून टाकणे या शिक्षा करण्यात आल्या पण असल्या शिक्षेला सावरकर थोडेच भिक घालणार होते. त्यांचे शिक्षण आणि क्रांतिकार्य जोमाने सुरू होते. फर्ग्युसन महाविद्यालयाचा निषेध म्हणून टिळकांनी ‘हे आमचे गुरूच नव्हत’ या मथळ्याचा लेख लिहीला. १९०५ साली सावरकरानी बी.ए. परिक्षा उत्तीर्ण केली, कायद्याचा अभ्यासही सुरू होता. पण हे करत असताना सावरकर पुण्या-मुंबईच्या विद्यार्थ्यात स्वातंत्र्यासाठीचे क्रांतिकारक विचार पेरत होते.
आता सावरकरांना देशविदेशीचे क्रांतिकारक, त्याचे कार्यपद्धती, हिंदूस्थानच्या स्वातंत्र्यासाठी त्याचा वापर या गोष्टींची आवश्यकता भासू लागली. लंडनच्या इंडीया हाऊसचे पं. शामजी कृष्णवर्मा यांच्याकडे ‘शिवाजी’ शिष्यवृत्तीसाठी त्यानी प्रयत्न सुरू केले. लो. टिळक आणि शिवरामपंत परांजपे यांनी दिलेली शिफारस पत्रे अर्जासोबत जोडलेली होती. सावरकरंना शिष्यवृत्ती मिळाली. पं. शामजी कृष्णवर्मा यांनी सावरकराना एक करार करायला सांगितले. “ब्रिटिशांची नोकरी करणार नाही” सावरकरांची उद्दिष्ट्ये वेगळीच होती. देशासाठीच्या कामगिरीसाठी सावरकर विदेशी रवाना होण्याच्या तयारीला लागले. ९ जुन १९०६ रोजी हा क्रांतिकारकांचा मुकुटमणी पुर्णिमा या बेटीवर चढला तेव्हा एकच स्वप्न, एकच ध्यास होता ‘स्वातंत्र्य’. प्रवासात मनातल्या मनात आखणी चाललेली, ब्रिटनमध्ये जावून क्रांतिकारकांची संघटना बांधावी. बुद्धिमान भारतीय विद्यार्थी जे इंग्लंडला आय्.सी.एस्., बॅरिस्टर व्हायला गेलेत त्यांच्या मनात क्रांतिचे विचार भरवावेत. स्वातंत्र्याचा लढा खुद्द इंग्रजांच्या भूमीतच उभारावा. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लंडनला पोहचल्या नंतर सावरकरानी लगेचच आपल्या क्रांतिकार्याला सुरूवात केली. लंडन मध्ये ‘स्वतंत्र भारत समाज’ या संस्थेची स्थापना केली.
इंग्लंड मध्ये त्या वेळी असलेले भारतीय विद्यार्थी हे वर्णाने आणि रक्ताने भारतीय असले तरी त्यांच्या आवडीनिवडी, मते, नितीच्या कल्पना या पुर्णपणे विलायती होत्या. सावरकराना त्या मधूनच भारतीय आशा आकांक्षांचे समर्थन करणारा गट तयार करायचा होता. सावरकरांच्या क्रांतिकार्याची व्याप्ती जसजशी वाढत गेली तसतशी इंग्रजी लोक आणि वृत्तपत्रे याना ती खुपू लागली. सावरकरांच्या प्रभावाखाली सेनापती बापटांसारखे युवक एकत्र जमू लागले. सशस्त्र क्रांतिचे सावरकरांचे विचार सर्वानाच भारून टाकत होते. सेनापती बापटांनी ‘होमरूल’ची मागणी करणारी पुस्तिका प्रसिद्ध केली. त्याची शिक्षा म्हणून मुंबई विद्यापिठाने त्यांची शिष्यवृत्ती बंद केली. पण क्रांतियज्ञात उडी घेतलेल्या सेनापती बापटांना त्याची पर्वा नव्हती. पॅरिस मध्ये जावून बॉम्ब बनवण्याचे तंत्र त्यानी शिकून घेतले.
इटलीचा क्रांतिकारक योद्धा मॅझिनीने सावरकराना मोहिनी घातली होती. त्याच्या कार्याची माहिती आपल्या देशबाधवांना मिळाली तर हिंदूस्थानचा तरूण पेटून उठेल या प्रेरणेतून सावरकरांनी मॅझिनीचं चरित्रा लिहीलं आणि गुप्त पणे भारतात पाठवून दिलं. सावरकरांचे जेष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांनी ते पुण्यातून प्रसिद्ध केलं. ब्रिटिशाना आता सावरकरांच्या प्रत्येक कृतीची भीतीच वाटत होती. सरकारने तो ग्रंथ जप्त केला आणि त्यावर बंदी घातली. तिकडे १८५७ च्या बंडाला ५० वर्षे झाली म्हणून ब्रिटनमध्ये ब्रिटिशांनी ‘विजयाचा अर्धशताब्दी समारंभ’ साजरा केला. सावरकर आणि त्यांच्या मित्रानी ब्रिटनमध्येच भारतीय शुरवीरांच्या स्मृतीनिमित्ताने रौप्यमहोत्सवी समारंभ साजरा केला. आणि १८५७ साली झालेलं ते बंड नसून स्वातंत्र्यसंग्राम होता आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे हे वीराग्रणी होते. तो लढा आपणाला पुर्ण करायचा आहे. भारताला स्वातंत्र्या मिळेपर्यंत झुजायचे आहे असा संदेश दिला. १८५७ च्या क्रांतिचा इतिहास तमाम भारतीयांना कळावा म्हणून ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहीला. शांततामय प्रतिकारामागे जर लष्करी सामर्थ्य नसेल तर अखेर त्याचा पराजयच होतो, असा सावरकरांचा विचार होता. ब्रिटीशाना जर भारतातून हाकलून लावायचे असेल तर सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही हा विचार रुजवण्यासाठी अभिनव भारत संघटनेचे परदेशात प्रचार कार्य जोमाने सुरू होते. जर्मनीत स्टटगार्ड येथे आंतरराष्ट्रीय सोशालिस्ट कॉग्रेसमध्ये मॅडम कामांनी हिंदूस्थान चा राष्ट्रध्वज फडकावला. इकडे भारतात स्वदेशीचा पुरस्कार, परदेशीचा बहिष्कार आणि परकीय सत्तेचा तिरस्कार ही त्रिसुत्री बनली होती.
क्रांतिकारकांचा आणि राष्ट्रवादाचा ब्रिटिश सरकारने धसका घेतला होता. अभिनव भारत संघटनेच्या क्रांतिकारकांनी रशिया, आयर्लंड, इजिप्त आणि चीन या देशांमधल्या क्रांतिकारकांशी संबंध प्रस्थापित केले होते. त्याच वेळी सावरकरांचे प्रभावी लिखाण भारतातील क्रांतिकारकांच्या मनातील अग्नी भडकवत होतं. ब्रिटिश सरकारचं सावरकरांवर बारीक लक्ष होतच. ब्रिटिशांच दमन सत्र सुरू झालं होतं. २३ जुलै १९०८ रोजी लोकमान्य टिळकाना काळ्यापाण्याची शिक्षा झाली आणि त्यांची मंडालेला रवानगी करण्यात आली. सावरकरांच्या विचारांनी प्रेरीत झालेले मदनलाल धिंग्रासारखे तरूण हौतात्म्याला सिद्ध झाले होते. खुद्द इंग्लंडमध्ये मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीवर गोळ्या झाडल्या आणि त्याला निजधमाला धाडले. मदनलाल धिंग्रांचा निषेध करण्यासाठी इंग्लंड मधल्या नेमस्तांची एक सभा भरली होती. ‘ही सभा मदनलाल धिंग्राचा एकमताने निषेध करते’ असा ठराव येताच “नाही एकमताने नाही” असा आवाज सभेनधूनच घुमला. सगळे जण इकडे तिकडे पाहू लागले. हा मी इथे उभा आहे, असं सांगत त्या तरूणाने माझं नाव सावरकर असं म्हणताच उपस्थितांचा थरकाप उडाला. सगळे गर्भगळीत झाले. एका संतप्त युरेशीयन इसमाने सावरकरांच्या कपाळावर फटका मारला. सावरकरांचा चेहरा रक्ताने लाल झाला. तरी ते म्हणाले “इतके झाले तरी मी त्या प्रस्तावाच्या विरूद्धच आहे.” सावरकरांच्या शेजारी उभ्या असलेल्या सावरकरांच्या मित्राने तिरूमलाचार्याने सावरकरांवर हल्ला करणार्या त्या पामर नावाच्या इसमाच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्याला क्षणार्धात खाली लोळवला. अय्यर नावाचा दुसरा मित्र त्याच्यावर गोळी झाडण्याच्या तयारीत होता, त्याला सावरकरांनी ‘नको’ म्हणून नजरेनेच खुणावलं. सभेची पांगापांग झाली. मदनलाल धिंग्रांवर खटला चालवला गेला आणि अपेक्षे प्रमाणे त्यांना देहांताची शिक्षा झाली. मदनलाल धिंग्रा हसत हसत फासावर गेले.
या सगळ्या घटनांचा उगम सावरकर हेच आहेत अशी वृत्तपत्रानी झोड उठवली. भारतातील त्यांच्या आप्तेष्टांचा छळ सुरू झाला. कर्झन वायली प्रकरणानंतर भारत निवासाला (India House) टाळे ठोकण्यात आले. सावरकरांच्या डोक्यावरचं लंडनमधलं छप्परही हिरावलं गेलं. सततच्या धावपळीने आणि त्रासाने सावरकरांची प्रकृती बिघडली. रहायला घर नाही, खायला अन्न नाही, बोलायला मित्र नाही अशी अवस्था झालेले सावरकर आपल्या एका मित्रा सोबत ब्रायटन या गावात रहायला गेले. मातृभूमीच्या विरहाने भावनाविवश होवून तिथल्या सागर किनारी सावरकरांच्या तोंडून ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे अप्रतिम विरहगीत बाहेर पडलं.
अभिनव भारत संघटनेच्या ग्वाल्हेर सातारा इत्यादी ठिकाणी शाखा सुरू झाल्या होत्या. बॉम्ब तयार करण्याचे कारखाने आणि साहित्य यांचे साठे महाराष्ट्रात हुडकून काढण्यात आले. तशातच सावरकरांचे जेष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांनी कवी गोविंदांच्या क्रांतिकारी कविता छापल्या म्हणून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती ती आता कायम करण्यात आली. क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनचा गोळ्या झाडून वध केला. त्या पाठोपाठ सावरकरांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकरांना अटक झाली. आपल्या भावाच्या अटकेची बातमी सावरकराना समजली. आता ब्रिटिशांचा रोख सावरकरांकडेच होता हे ओळखून सावरकरांच्या मित्रांनी त्याना लंडन सोडण्याचा सल्ला दिला. काही काळासाठी सावरकर पॅरीसला निघून गेले. मॅडम कामांच्या घरी ते राहू लागले.
जॅक्सन खुन प्रकरणात अभिनव भारत संघटनेचा हात स्पष्ट झाला होता. सावरकरांनी पाठवलेल्या ब्राउनिंग पिस्तूलांपैकीच एकाने जॅक्सनला निजधामाला पाठवले होते. सावरकरांवर अभियोगाची तयारी झाली. पॅरीसला असलेले सावरकर इंग्लंडला जायला निघाले. आपण इंग्लंडला गेलात तर आपणाला अटक झाल्याशिवाय रहाणार नाही, आपण नेतृत्व करण्यासाठी आम्हाला हवे अहात असे सांगूनही सावरकर थांबले नाहीत. “माझ्य सहकार्यांचा आणि अनुयायांचा छ्ळ मला पाहवणार नाही, ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी नेता म्हणून मला सामोरे गेलेच पाहीजे” म्हणून सावरकर लंडनला परतले. १३ मार्च १९१० रोजी त्याना लंडनच्या व्हिक्टोरिया स्थानकात अटक झाली. सावरकरांवर अभियोग चालवण्यासाठी त्यांना भारतात नेण्यात यावे असा निकाल लंडन येथील न्यायालयाने दिला.
सावरकरांचे अनुयायी आणि स्वतः सावरकरांना आता ब्रिटिश सरकारच्या हेतू विषयी शंका वाटू लागली. देहांताची शिक्षा देवून सावरकरांचा काटा काढायचा असा इग्रजांचा उद्देश्य असेल तर हाती घेतलेलं क्रांतिकार्य अर्धवट राहील. सावरकर क्रंतिकारकांचे मुकूटमणी होते, नेते होते. एवढ्या सहज ब्रिटीशांची मनिषा पुर्ण होवू द्यायची नाही. औरंगजेबाच्या तावडीतून शिवाजी महाराज जसे आग्र्याहून सुटकाकरून सहीसलामत सुटले होते तसेच आता आपल्याला निसटून गेले पाहीजे हे सवरकरांच्या मनाने पक्के केले. ’मोरिया’ नावाच्या आगबोटीवर सावरकरांना चढवण्यात आलं आणि हे आगबोट ७ जुलै १९१० रोजी फ्रांस मधल्या मार्सेलिस या बंदरात आली. आठ जुलै १९१० च्या पहाटे सावरकरांनी शौचास जायचे आहे म्हणून पहारेकर्यास सांगितले. दोन पहारेकरी सोबत असताना सावरकर शौचकुपात शिरले. आतून कडी लावली. बरोबर मुद्दाम आणलेला नाईट गाऊन पारदर्शक दारावर अडकवला. संडासावरच्या वाटोळ्या खिडकीचा त्यानी आधीच अंदाज घेतला होता. क्षणाचाही विलंब न लावता चपळाईने ते त्या पोर्टहोल जवळ पोहोचले. आपली कृश देहयष्टी खिडकिच्या बाहेर काढली आणि ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ म्हणत समुद्रात उडी घेतली. त्या खिडकीतून सावरकर अर्धवट बाहेर पडले असतानाच पहारेकर्यांची धावपळ उडाली. पळाला, पळालाचा एकच कोलाहल झाला. दार फोडण्याचा प्रयत्न झाला. पण सावरकर निसटले होते. पोहत किनारा गाठण्याचा प्रयत्न करत असताना वरून गोळ्यांचा वर्षाव होत होता. पण सावरकरांनी किनारा गाठला. किनार्यावर येताच ते पळत सुटले पण तोपर्यंत शिपाई किनार्यावर येऊन पोहोचले होते. सावरकरानी फ्रेंच पोलिसाला आपल्याला जवळच्या पोलिस ठाण्यावर घेऊन चल असा आग्रह धरला, पण तोपर्यंत तिथे आलेल्या ब्रिटिश पहारेकर्याने त्याच्या मुठीत नोट कोंबताच त्याने सावरकराना त्याच्या हवाली केले. सावरकराना धक्के देत ओढत पुन्हा बोटीवर आणण्यात आले.
ब्रिटिशानी आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केला होता. फ्रांसच्या भुमीत ते सावरकराना अटक करू शकत नव्हते. सावरकरांचे मित्र त्या ठिकाणी उशिरा येवून पोहोचले त्यामुळे हा क्रांतिसिंह गजाआड गेला. पण सावरकरांची ती उडी त्रिखंडात गाजली. युरोपातील वृत्तपत्रांनी त्या घटनेला ठळक प्रसिद्धी दिली. सावरकरांवर दोन अभियोग चालवले गेले आणि त्यांना न भुतो न भविष्यती अशा दोन काळ्यापाण्याच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. पन्नास वषे काळे पाणी, जगाच्या इतिहासातली कठोरतम शिक्षा. या घटनेला आता शंभर वर्ष पुर्ण होणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक असाधारण व्यक्तीमत्व अंदमान येथील सेल्यलर कारागृहात बंदीवासात होतं. तो बंदिवास आणि ती उडी संपूर्ण जागातील क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी ठरली, अजरामर झाली.
03 October, 2009
संन्यस्त खड्ग
वीर सावरकरांचं हे अप्रतिम नाटक गांधी जयंती दिवशीच साहित्य संघ मंदिरात पाहीलं. क्रांतिकारक, नेता, उत्तम वक्ता, समाजसुधारक, लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार, गीतकार असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे उत्कृष्ट नाटककारही होते हे प्रत्येक संवादातून आणि नाट्यगीतातून वारंवार जाणवत होतं. पण या सगळ्याहून माझ्या मनाला भावला तो त्या नाटकातून दिलेला संदेश. कपीलवस्तू या शकांच्या राज्यात गौतम बुद्धाच्या काळातला जवळ जवळ चाळीस वर्षांचा कालखंड या नाटकात दाखवलेला आहे. अपार करूणा आणि प्रेम या दोनच गोष्टी या पृथ्वीतलावर अनंत काळ वास करत राहतील हा गौतम बुद्धांचा संदेश त्यांच्या पिताजींच्याच राज्यात कसा फोल ठरतो ते या नाटकात नेमकेपणाने दाखवून दिले आहे. बुद्धंम्... शरणम्... गच्छामी म्हणत राज्यातील तमाम योद्धे, वीर, कर्तेपुरूष सन्यास घेऊन विहारात गेले आणि जेव्हा राज्यावर आक्रमण झालं तेव्हा लढायला कुणीच नव्हतं.
बुद्ध आणि महावीराच्या काळात वीररसाचा जो र्हास झाला तोच पुढे भारतभुमीच्या नाशाला कारणीभुत ठरला आणि भविष्यात परकीय आक्रमणं होतच राहिली. त्या काळात खड्ग म्हणजे तलवारीनेही कसा सन्यास घेतला होता ते पाहून मन हेलावतं. आत्यंतिक अहिंसा ही अहिंसा नसून हिंसाच आहे कारण समोरचा शत्रू हा नराधम असला की त्याच्या लेखी अहिंसाही नपुंसक असते आणि तो आपल्या स्वार्थासाठी लाखो निरपराधांचे बळी घेतो हा इतिहास आहे.
सध्या रंगभुमीवर असलेलं हे उत्तम संगीत नाटक प्रमोद पवार यांनी दिग्दर्शीत केलं असून त्यात गौतम बुद्धाची मध्यवर्ती भुमिकाही केली आहे. उपेन्द्र दाते, वंदना घांगुर्डे यांचं नाट्यगीत गायनही चांगलं. एकूणच नाटक त्या काळात घेऊन जाणारं. मजा आया....
01 October, 2009
आणि सावरकरानी सशस्त्रक्रांतीचा पुरस्कार केला
प्लेगच्या साथीला प्रतिबंध करण्याच्या निमित्ताने ब्रिटीश सरकारने जनतेचा जो असह्य छळ चालवला होता, स्त्रियांवर अत्याचार केले ते पाहून चाफेकर बंधू खवळले. चाफेकर बंधूंनी रँडला गोळ्या घालून ठार केलं. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १८ एप्रिल १८९८ रोजी दामोदरपंत चाफेकर हातात गीता घेऊन फासावर चढले. वासुदेव आणि बाळकृष्ण हे चाफेकर बंधू मे १८९९ मध्ये फाशी गेले. भगूर मध्ये ही बातमी बाल सावरकरांच्या कानी पडताच ते अस्वस्थ झाले. रक्त गरम झालं, हे तरूण देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर हसत ह्सत फासावर जाणार असतील तर आपण गप्प बसून चालणार नाही. ते तडक देवघरात गेले आणि कुलदेवता दुर्गेच्या चरणापाशी बसून प्रार्थना केली की “ या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारीता मारीता मरेतो झुंजेन, पण आई तुझ्या मस्तकावर स्वातंत्र्याचा सुवर्ण किरीट चढवल्याशिवाय रहाणार नाही.” सावरकर त्यावेळी वयाचं पंधरावं वर्ष पुर्ण करत होते. बाल शिवाजीने रोहीडेश्वरी घेतलेली शपथ आणि सावरकरानी घेतलेली ही शपथ यात विलक्षण साम्य होतं. वीर सावरकरानी आयुष्याच्या अंतापर्यंत या प्रतिज्ञेचा पठपुरावा केला. सशस्त्रक्रांतीचा पुरस्कार केला पण सावरकर हिंसावादाचे पुरस्कर्ते होते असं नाही. पण इंग्रजांच्या दमनकारी राजवटीला धडाशिकवायचा असेल तर त्याना घटनात्मक मार्गाने विरोध करता येणार नाही कारण हिंदुस्थानच्या भल्याची तेव्हा घटनाच नव्हती, जे काही कायदे होते ते ब्रिटीश सत्तेचा पाया मजबूत करणारेच होते. ही राजवट उलथून टाकायची असेल तर क्रांती शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे सावरकराना त्या बाल वयातही चांगलच कळलं होतं आणि त्या दिशेने त्यांची पावलं पडत होती.
14 September, 2009
पहिला हप्ता म्हणून हा देह...!
१९१० चा डिसेंबर ! स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चालवलेल्या अभियोगाचा निकाल लागून उद्या शिक्षा सुनावण्यात येणार. ही शिक्षा काय असू शकते याची कल्पना बॅरिस्टर असलेल्या सावरकरांना पुर्णपणे होती. कठोरात कठोर शिक्षा होवून आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा ब्रिटीश घोट घेणार हे सुद्धा त्यांना माहीत होतं. फक्त शिक्षा देहांताची की जन्मठेपेची हाच काय तो प्रश्न होता. अशा कठीण प्रसंगी जे सुटण्याची शक्यता होती त्या सहआरोपीं सोबत आपल्या मतृभूमीला आणि सहकार्यांना उद्देशून स्वातंत्र्यवीर म्हणतात.
“ हे मातृभूमी तुझ्या अंगा खांद्यावर मी खेळलो, तुच आमचं पालनपोषण केलस, ते ऋण फेडण्यासाठी पहिला हप्ता म्हणून हा देह तुला अर्पित आहे. या हवनात जळून त्वरीत दुसरा जन्म घेईन आणि पुन्हा देह अर्पून तिसरा... असे कैक जन्म तुझ्या पायी अर्पण करण्यास मी सिद्ध आहे. तो पर्यंत जिचा सारथी कृष्ण आहे आणि सेनानी राम आहे अशी तीस कोटी सेना लढून शत्रूस पराभूत करेल आणि जरीपटका उंच हिमालयावर रोवला जाईल. माझ्याविना हे कार्य थांबणार नाहीच. तो पर्यंत माझी ही स्वल्प सेवा मान्य करून घे.”
08 September, 2009
माझ्या त्या अस्थी पुनः चैतन्याने पेटून प्रदीप्त होतील !
स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदुस्थानात चौकशीसाठी पाठवण्याचे ठरले तेव्हा ते लंडनला ब्रिक्स्टनच्या बंदिशाळेत होते. हिंदुस्थानात नेल्यावर काळेपाणी अथवा मृत्यूदंड हा ठरलेला, अशा परिस्थितीत त्या देशभक्ताच्या समोर एकच विचार होता तो म्हणजे स्वातंत्र्याचा, देशसेवेचा. हिंदुस्थानात केव्हाही पाठवले जाईल अशा अवस्थेत असताना त्यानी आपल्या क्रांतिकारक मित्राना निरोप धाडला की, “ आपण सर्व विधात्याने नेमून दिलेली कामे करण्यासाठी दूर होत आहोत. क्षणात दिसू तर क्षणात नाहीसे होऊ. कधी शिखरावर तर कधी तळाशी. पण जेथे जाऊ तेथे सर्वोत्कृष्ट ठरू.
माझ्या दीनाच्या अस्थी कोठेही पडोत, अंदमानच्या एखाद्या उदास ओढ्यात त्या विखुरल्या जाओत अथवा श्रीगंगेच्या स्पटिकासारख्या पावन प्रवाहात. जेव्हा भारतमाता स्वतंत्र होईल तेव्हा ज्या युद्धात मी कामाला आलो ते युद्ध जिंकले म्हणून माझ्या त्या अस्थी पुनः चैतन्याने पेटून प्रदीप्त होतील. पण तो पर्यंत अगदी डोळा लागू न देता मातृभूमीच्या वैभवाकरिता एकसारखे काम करीत राहा. येतो ! जयजय ! “
28 July, 2009
कीं घेतले व्रत न हें अम्हीं अंधतेने
थोरला आणि धाकटा दोन्ही बंधूनी काळ्यापाण्याच्या शिक्षेची वाटधरली असताना वीर सावरकरांच्या वहिनीला एकच कायतो आधार होता, तो म्हणजे बॅरिस्टर सावरकरांचा पण १९१० च्या मार्च मध्ये वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी सावरकराना ब्रिटीश सरकारने पकडले, गुन्हा होता ‘ हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्रचळवळ ’. देहांताची शिक्षा होऊशकेल असा हा गुन्हा. अअता या जन्मात पुन्हा भेट घडणे असंभवनीय. आपल्या प्रिय वहिनीला हे वृत्त कळवताना, त्या मागील दिव्य आणि उदात्त हेतू स्पष्ट करताना इंग्लंडच्या ब्रिस्टन जेलमधून बहूदा आयुष्यातले शेवटचे होऊपाहणारे पत्र लिहीले. जणू मृत्यूपत्रच होते ते. अशा कठीण प्रसंगीही स्वातंत्रवीर सावरकरांची प्रतिभा, तेजस्वी विचार, जाज्वल्य देशप्रेम कसं उफाळून आली होतं पहा. वीर सावरकर म्हणतात.
हे मातृभूमि, तुजला मन वाहिलेलें ॥
वक्तृत्व-वाग्विभवही तुज अर्पियेलें ॥
तूंतेचि अर्पिलि नवी कविता रसाला ॥
लेखांप्रती विषय तूंचि अनन्य झाला ॥१६॥
त्वत्स्थंडिली ढललिले प्रिय मित्रसंघा ॥
केलें स्वयें दहन यौवन-देह भोगा ॥
त्वत्कार्य नैतिक, सुसंमत सर्व देवा ॥
त्वत्सवेनींच गमलीं रघुवीर सेवा ॥१७॥
त्वत्स्थंडिली ढललिली गृह-वित्-मत्ता ॥
दावानलांत वहिनी, नवपुत्र, कांता ॥
त्वत्स्थंडिली अतुल-धैर्यवरिष्ठ बंधू ॥
केला हवी परम कारूण पुण्यसिंधू ॥१८॥
त्वत्स्थंडिलाचरी बळी प्रिय बाळ माझा ॥
त्वत्स्थंडिली बघ अतां मामा देह ठेला ॥
हें काय ! बंधु असतो जरि सात आम्ही ॥
त्वत्स्थंडिलींच असते दिधले बळी मी ॥१९॥
कीं घेतले व्रत न हें अम्हीं अंधतेने ॥
लब्धप्रकाश-इतिहास-निसर्ग-मानें ॥
जें दिव्य दाहक म्हणूनी असावयाचें ॥
बुध्द्याचि वाण धरिले करिं हें सतीचें ॥२५॥
16 July, 2009
अमर होय ती वंशलता । निर्वंश जीचा देवांकरिता ॥
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू गणेशपंत यांना काळ्यापाण्याची शिक्षा झालेली. धाकटा भाऊ बाळ याला वयाच्या १९ व्या वर्षी लॉर्ड मिंटो वर फेकलेल्या बॉंबप्रकरणी अटक झालेली. या दोन्ही वार्ता इंग्लंडमध्ये असलेल्या विनायकरावांना त्यांची वहिनी आणि गणेशपंतांची पत्नी कै. यशोदाबाई यांनी कळवली. दोन्ही भावांना अटक झालेली असताना घरी एकाकी असलेल्या वहिनीला कुणाचाच आधार नव्हता. होता तो फक्त विनायकरावांचा. ते विलायतेत दूर, त्यांचीही क्रांतिकार्याची धामधुम चललेली. त्याही परिस्थितीत विनायकरावांनी वहिनीस सांत्वनपर पत्र लिहीलं, त्याचा सारांश असा.
" खरोखरच आपला वंश धन्य म्हटला पाहिजे. इश्वरी अंश असल्या शिवाय असल्या गोष्टी घडत नाहीत. फुले अनेक फुलतात आणि सुकून जातात त्यांची कोण दखल घेतो ? पण जे फुल गजेंद्राने श्रीहरीला वाहीले ते अमर झाले. त्या गजेंद्राप्रमाणेच आपल्या भारतमातेची केविलवाणी स्थिती झाली आहे. तेव्हा आपल्या वंशातील सर्व फुले खुडून त्याच्या माळा केल्या आणि नवरात्रीत नऊ माळा अर्पण केल्यावर कालीमाता प्रकट होते त्या प्रमाणे ती झाली तर देशाकरीता निर्वंश झाला तरी आपण अमरच होऊ.
आता हे महत्कार्य हाती घेतले आहे तेव्हा मोठ्याप्रमाणेच वागलं पाहीजे. तू तर धैर्याची मुर्ती आहेस, तेव्हा संताना पसंत पडेल असे वर्तन कर. "
(क्रमशः)
10 July, 2009
क्रांतीसुर्य सावरकर
दमनकारी ब्रिटीश सत्ताधीशांची दडपशाही आणि अत्याचार आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या उद्देशाने, ब्रिस्टनच्या तुरुंगातून मुंबईला नेत असताना सुटका करुन घ्यायची योजना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आखली होती. त्या योजनेबरहुकूम ८ जुलै १९१० रोजी मार्सेल्सच्या समुद्रात सावरकरांनी जी ऎतिहासिक साहसीउडी मारली त्याला आता ९९ वर्षे पुर्ण झाली. पुढे ३० जानेवारी १९११ रोजी सावरकरांना दोन जन्मठेपेच्या काळ्यापाण्याची शिक्षा झाली. पुढचं वर्ष हे स्वातंत्र्यवीरांना झालेल्या शिक्षेचं शताब्दी वर्ष आहे. वीर सावरकरांचं संपुर्ण आयुष्यच ओजस्वी घटनांनी ओतप्रोत भरलेलं आहे. अनेक प्रसंग, जे आठवले की अंगावर रोमांच उभं रहातं. काय होईल याची पुर्ण जाणीव असतानाही जिवाची बाजी लावून मातृभुमीसाठी आयुष्याचा यज्ञ या क्रांतीसुर्याने पेटवला. त्या यज्ञातील काही समीधारुपी प्रसंग आपण जाणून घेऊया या शताब्दी वर्षाच्या निमीत्ताने क्रांतीसुर्य सावरकर या मालेत.
(क्रमशः)
वाचकसंख्या
About Me
Join this site
अनुक्रमणिका
Popular Posts
-
मन मानत नाही तरी चार दिवसांपूर्वी माझा प्रिय मित्र चेतन जानी गेला ही गोष्ट खरी आहे. तो निघून गेला पण मागे उरलेल्यांना त्यांचं काम केलच पाह...
-
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रो लिमिटेडमधील शत्रू पक्षाच्या ताब्यात असलेल्या समभागांची एलआयसी आणि अन्य दोन सरकारी विमा कंपन...
-
आम्ही जेव्हा सांताकृझला राहायला आलो तेव्हा पहाटे जाग यायची ती चिमण्यांच्या चिवचिवाटाने आणि पक्षांच्या किलबिलाटाने. गेल्या दहा-अकरा वर्षात त...
-
गोठलेल्या लडाखसफरीवर आत्माराम परब निसर्गाच्या करामती त्याचे विभ्रम आणि एकुणच निसर्ग आपल्या सर्वानाच आवडतो पण तो कितपर्यंत तर तो आपल्याला...
-
संगीताने आपलं जीवन किती सुरस बनवलय. गाता गळा आणि फुललेला मळा ही तर निसर्गाचीच देणगी. एखादी सुंदर तान ऎकताक्षणी वाह...! क्या बात है....! अस...
-
श्रेष्ठ संगीतकार , गीतकार , कवी, गायक आणि विशेष म्हणजे खरोखरीचा ‘ देव ’ माणूस असलेलं एक उमदं व्यक्तीमत्व म्हणजे यशवंत देव. काल माटुंग्या...
-
आपल्या डोळ्यासमोर अनेक चुकीच्या गोष्टी घडत असताना आपण तिकडे दुर्लक्ष करतो किंवा चालायचच म्हणून पुढे जातो. हे असं वारंवार घडत जातं आणि आपण...
-
हर्षदाने लगीनघाईत काढलेला महिना आणि ऋचाच्या अभ्यासाची घाई सुरू होण्याआधी श्रम परिहार करावा, जवळपास कुठेतरी दोन दिवसांसाठी जावून यावं म्हणू...
-
थोरला आणि धाकटा दोन्ही बंधूनी काळ्यापाण्याच्या शिक्षेची वाटधरली असताना वीर सावरकरांच्या वहिनीला एकच कायतो आधार होता, तो म्हणजे बॅरिस्टर सावर...
-
दरवळतो मोगरा अन याद तुझी येते सडा असे पडलेला प्राजक्तही भेटे तू शिंपलेले झाड कसे डवरत बघ होते हात असा धरुनी...
Blog Archive
Labels
Search This Blog
My Blog List
-
अभिप्राय - १ - “आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार, आत्म...1 year ago
-
Finance Fair – 2019 - *Lokmanya Seva Sangh, Parle* *P.V.Bhagwat Investment Guidance Cell* *Presents* Finance Fair – 2019 *12 & 13th January, 2019 13TH* *Enrollment* Registra...7 years ago









