Showing posts with label अंधश्रद्धा. Show all posts
Showing posts with label अंधश्रद्धा. Show all posts

08 January, 2012

फेटेवाला मुंज्या!


जालरंग प्रकाशनाच्या 'शब्दगारवा' या अंकात प्रसिद्ध झालेली माझी कथा. 


वार्षिक परीक्षा संपली होती. अजून रिझल्ट लागायला वेळ होता. शाळेत जा की नको जाऊ, कुणीच विचारत नव्हतं, ना रागावत होतं. अशा दिवसात मी जवळपासच्या डोंगरावर जास्त रमायचो. परीक्षेच्या दिवसात अभ्यासामुळे कित्येक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असत.  नारायण धारप, बाबूराव अर्नाळकरांपासून बाबा कदम, वि.स.खांडेकरांपर्यंत जे मिळेल ते वाचावं आणि काजू, आंबे, फणस, करवंदं, जांभळं  खात डोंगररानात मनसोक्त भटकावं, या दिनक्रमामुळे परीक्षा आटोपल्या तरी उसंत म्हणून नसायची. वेळेचं भान नसायचं की ऊन्हातानाची पर्वा नसायची. घराजवळच्या डोंगरात तर मी एकटाच जायचो. आमच्या काजूच्या झाडांच्या काजू वेचून आणायचो. तिथल्या झुडुपांना लागलेली तोरणं मला खूपच आवडायची. काटेरी झुडुपांना लागणारी ही पांढुरकी दोन-तीन गुंजाएवढी फळं गोड चवदार असतात.

असाच एका दुपारी मी डोंगरावर गेलो.  सगळं कसं शांतं शांतं. पक्षी, प्राणी सुद्धा रानमेव्याचा आस्वाद घेऊन विसावले असावेत. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं. एका झुडुपाजवळ मी तोरणं काढण्यात मग्न होतो. तिथून दुसर्‍या झाडाजवळ जाताना सहज वर नजर गेली तर काय, एका उंच झाडावर डोक्याला पंचा गुंडाळून बसलेला माणूस माझ्याकडे एकटक पाहत होता. मी त्याच्याकडे लक्ष न देता तोरणं काढू लागलो. पण पुन्हा-पुन्हा नजर त्याच्याकडेच जात होती. हा मला निरखून का बघतोय......? आता माझं तोरणं काढण्याकडे लक्ष लागेना. मी त्यांच्या हद्दीत आल्यामुळे तर हा मला बघत असेल का? घरी वडिलांना येऊन सांगितलं तर? पण तोरणं काय कुणीही कुठलीही काढतात. त्यासाठी कोण कशाला रागावणार? माझ्याजवळ काजूसुद्धा होत्या पण त्या आमच्या झाडाच्या. वेगळ्या आकाराच्या असल्याने मी तसं दाखवून देऊ शकतो असे विचार मनात येत होते. पण नको लोकांच्या जागेत. आपण आपलं घरी परतावं म्हणून मी काढता पाय घेतला. घरी आलो तरी तो माणूस काही डोक्यातून जाईना.

संध्याकाळ झाली, मला परत डोंगरावर जावंसं वाटायला लागलं. बघूया तरी म्हणून पुन्हा त्या जागेवर गेलो. वर बघितलं तो दिसला नाही. आणखी पुढे गेलो आणि अचानक तो पुन्हा दिसला, तसाच डोळे रोखून बघणारा. माझी भितीने गाळण उडाली. पुन्हा वर बघितलं, तो अजून माझ्याकडेच बघत होता. कोण रे...! मी जीवाच्या आकांताने ओरडलो. पण त्याचं रोखून बघणं सुरूच, हाकेला,  आवाजाला मात्र कसलाच प्रतिसाद नव्हता. अंगावर नखशिखान्त काटा उभा राहिला. जवळपास कुणीच नव्हतं. मी आणि तो माझ्यावर डोळे वटारून बघणारा. मी तिथून धूम ठोकली. थेट घराच्या अंगणात पोहोचलो. अजून तिन्हीसांजा व्हायच्या होत्या. देवळाजवळ गेलो, तिकडे मुलं खेळत होती. माझा मित्र शशी भेटला. त्याला ही हकिगत सांगितली, त्यावर तो म्हणाला तिकडे एकटा कशाला गेलास, तिकडे भुतं, मुंजे असतात. तो मुंज्या असणार. मला ते खरं वाटू लागलं. असेल, मुंज्या असेल. मी तर त्याला दोनदा प्रत्यक्ष डोळ्यांनी  पाहून आलोय. एप्रिल-मे मध्ये आम्ही अंगणात झोपत असू. त्या दिवशी मी घरातच झोपलो. रात्री धड झोप लागली नाही, सारखा तो डोळ्यासमोर येत राहिला.

दुसर्‍या दिवशी उठल्या उठल्या तोंड धुतल्याबरोबर पुन्हा त्या जागेवर जावंसं वाटू लागलं. एकीकडे वाटत होतं नको. तो आज खाली जमिनीवर आला तर?  पण स्वस्थ बसवेना. धीर करून, हातात काठी घेऊन, तोंडाने जोरजोरात गाणं म्हणत गेलो. पुन्हा तेच, तो बघतच होता. माझ्या हातात काठी होतीच. पुढे झालो, नजर त्याच्यावरच, तो मलाच पाहत होता. आणखी पुढे गेलो. तरी तो बघतो आहेच. चार पावलं पुढे गेलो तर तो दिसेनासा झाला. आता काय करावं? शूरवीर मराठे तानाजी, शिवाजी, तेहतीस कोटी देव, सगळ्यांचं स्मरण केलं. बळ एकवटलं आणि पुन्हा वर पाहिलं, तो गायबच. पुन्हा चार पावलं मागे, तो परत दिसला. मग झुडूप बाजूला करून सरळ झाडाखाली गेलो आणि सगळा उलगडा झाला. त्या झाडाची माणसाच्या डोक्या एवढी होईल अशी फांदी कुणीतरी अशी तोडली होती की लांबून ते डोकं वाटावं. नाक, डोळे, मुंडासं थेट माणसा सारखं. झाडाच्या चिकामुळे ते सगळं हुबेहूब दिसत होतं. खाली लाकडं पडलेली होती. मी पुन्हा मागे जाऊन पाहिलं तर तो तिथेच, मला रोखून बघत होता. आता मात्र मजा वाटत होती. म्हणजे मुंज्या माझ्या मनात होता आणि वर झाडावर तोडलेली फांदी.

लेखक: नरेंद्र प्रभू


आशा आल्या प्रतिक्रीया:

ब्लॉगर विशाल नी म्हटले...

वाह काका !


२२ डिसेंबर २०११ ११-१० म.नं.



ब्लॉगर SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर नी म्हटले...




मस्त किस्सा.


अशाच गैरसमजातून भुते वगैरे जन्माला येतात. आपण अंधश्रद्धांना खतपाणी न घालता परिस्थिती व्यवस्थित समजून घेतलीत याबद्दल धन्यवाद.
२५ डिसेंबर २०११ ६-०९ म.पू.


ब्लॉगर अमित दत्तात्रय गुहागरकर नी म्हटले...




मस्त किस्सा. बरेचदा असं होतं.


आमच्याही गावी स्मशानाजवळील झाडावरच्या एका फांदीवर कुणीतरी पांढर्‍या रंगाचा शर्ट टाकला होता. हवेने तो हलत होता. आम्ही एकदा रात्री त्या रस्त्याने येत असताना तो शर्ट पाहीला आणि आम्ही तिथून प्रकाशाच्यापण दुप्पट वेगात पळ काढला.
२८ डिसेंबर २०११ ८-३१ म.नं.

25 May, 2010

ए पब्लिक है, सब जानती है


‘या पुढे रत्नागिरी टिळकांची नव्हे तर नरेंद्र महाराजांची भूमी म्हणून ओळखली जाईल’ – इती भास्कर जाधव ही बातमी वाचून हसावं का रडावं तेच समजेना. कोण हे नरेंद्र महाराज? ज्याला लोकमान्य टिळकांच्या जागी बसवायला जाधव निघालेत. काही वर्षांपुर्वी एक सामान्य ग्रामसेवक असलेला, सामान्य वकुबाचा माणूस स्वतःला स्वतःच शेंदूर फासून देव होवू पहातोय. अगोदर दगडाला शेंदूर फासला जात होता तिथपर्यंत ठिक होतं, तो दगड स्वतः उठून कुणाला नादी लावत नव्हता. अशा प्रकाराना रोखायचं सोडून आजचे राजकारणी त्यांची पाद्यपुजा करतना दिसताहेत. हेच ते महाराज ज्यानी आपल्या हातातली काठी खांद्यावर घेऊन उत्तरप्रदेशात विमानात प्रवेश करण्याचा हट्ट धरला होता आणि सुरक्षा यंत्रणेने मज्जाव करताच मुंबईत त्याच्या बगलबच्च्यांनी विमानतळावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी आपल्या काठीचा प्रसाद दिल्यावर त्याची पांगापांग झाली हा भाग वेगळा.

गर्दी दिसली की लगेच हात धूऊन घ्यायची आजच्या फुढार्‍यांना एवढी घाई झालेली असते की विचारता सोय नाही. त्या नरेंद्र महाराज्याने जमवलेल्या गर्दीला भुलून जाधव, तोगडीया अशी भुतावळ तिकडे गेली आणि मग तोंडाला येईल ते बोलली. त्यांचं सुद्धा बरोबरच आहे. ज्या सरकारात जाधव आहेत त्याचे म्होरकेच जर ‘वर्षा’वर जाहीरपणे सत्य साईबाबाची पाद्य पुजा करतात, मग एखाद्या राज्य मंत्र्याने नरेंद्र महाराजाचे पाय  धरले तर सामान्यांनी बघायचं तरी कुणाच्या तोंडाकडे?

पण मुळ मुद्दा वेगळाच आहे. या राजकारण्यांची वक्र दृष्टी आता महाराष्ट्रातल्या लक्षावधी देवळांकडे, नव्हे नव्हे त्यांच्या सपत्तीकडे वळलेली आहे. त्याचच हे मार्केटींग असावं. पण त्यासाठी आमच्या श्रध्दा स्थानांना हात लावायचा कुणालाच अधिकार नाही. काय सांगाव? उद्या छत्रपती शिवाजी महराजांचा महाराष्ट्र तुम्ही अशाच एखाद्या बाबाला आंदण द्याल हो..... हे कसं चालऊन घ्यायचं? अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक बासनात गुंडाळून ठेवणारं हे सरकार अंधश्रद्धेला खतपाणी घालायला निघालय. घाला, सध्या मुजोरांची चलती आहे, पण एक लक्षात घ्या, जनता वेडी नाही, ‘ए पब्लिक है भाई, सब जानती है।‘     

28 October, 2009

निवडणूका संपल्या, आता भोंदूबाबाचे पाय धरायला राजकारणी मोकळे.


निवडणूका संपल्या. गेली दहा वर्षं नाकर्तेपणा दाखावूनही राज्य मिळालं, गादी मिळाली. अशोक चव्हाणांच्या रुपाने महाराष्ट्राला एक तरूण तडफदार मुख्यमंत्री मिळाला म्हणून नांदेड मधल्या त्यांच्या समर्थकानी (की चमच्यांनी?) आकडा टाकून वीज चोरून त्यांची पोस्टर उजळवून टाकली. हे सर्व बघायला अशोकरावांना मात्र वेळ नाही. नको, गैरसमज नको, मंत्रिमंडळ रचनेचा तीढा सोडवण्यात ते व्यस्त नाहीत तर सत्यनारायण राजू या पुठ्ठापुर्तीच्या एका भोंदूबाबाच्या पायी लीन होण्यात ते मग्न आहेत. स्वतःला साईबाबांचा अवतार समजणारा सत्यसाईबाबा हा देशाच्या माजी गृहमंत्र्याला सुद्धा असाच नाचवत होता. शंकरराव चव्हाण हे त्यांचं नाव. आपल्या वडीलांचीच परंपरा अशोकराव चालवणार असं दिसतय. शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यांचे अश्रू पुसण्यासाठी या मुख्यमंत्र्याना तिकडे जावस वाटलं नाही पण सत्यसाईबाबा महाराष्ट्रात आल्या बरोबर त्याच्या समोर लोटांगण घालायला हे तिकडे धावले. आपल्या सरकारी निवासस्थानातही मुख्यमंत्र्यानी त्या बाबाला आमंत्रित केलं आहे. या बाबाने जादू करून वर्षा बंगल्याला सोन्याची कौल बसवावीत म्हणजे मी सुद्धा त्याच्या पाया पडेन. दुसरे जयंत पाटील, खुद्द सांगली-मिरजेत दंगल झाल्यावर ते तिकडे धावले नाहीत पण आज हे चरण धरायला ते तत्परतेने गेले. शिवराज पाटील चाकूरकरही इस्त्री मोडली तरी चालेल म्हणत गेले.

हातचलाखी करून अंगठी, सोन्याची चेन काढून त्या बाबाने त्यांना प्रसाद म्हणूनही दिले असेल. असे भक्त मिळाल्यावर सोन्याचा भाव कितीही वाढला तरी त्या बाबाला त्याची पर्वा नसणारच. प्रश्न तो नाही. अरे तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात. तुम्हीच जर असे भोंदूबाबांच्या नादी लागणार असाल तर तुम्ही कसली अंधश्रद्धा निर्मुलन करणार आणि ते विधेयक जे विधिमंडळात रखडलं आहे ते काय पारीत करणार?


25 September, 2009

नागडे पाय

देवाचा हप्ता या ब्लॉग पोष्ट मध्ये ‘लोक साईबाबा पुढे चप्पल काढल्यासारखं करतात पण प्रत्यक्षात बुट, चप्पल पायातच असतात’ हे माझं म्हणणं एवढ्या लवकर बुंबरँग होवून माझ्यावरच उलटेल असं मला वाटलं नव्हतं. अगदी सात दिवसात देवाने मला माझं ते विधान सपशेल मागे घ्यायला लावलं. त्याचं काय झालं महाराजा, गेले चार-पाच दिवस सकाळच्या वेळी मला एक साक्षात्कार होतोय. सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडलो की अनेक अनवाणी, नागडे पाय रस्त्यावरून चालताना दिसतात. (हो मी फक्त पायच पाहतो.) दोन दिवस दुर्लक्ष केलं पण ते तसे समोर येतच राहीले. सकाळीच नव्हे तर संध्याकाळी सुद्धा. हा काय प्रकार म्हणून बायको जवळ चौकशी केली तेव्हा उलगडा झाला. नवरात्रात हल्ली हे असं करतात. हे म्हणे व्रत आहे. नवरात्रात नऊ दिवस अनवाणी, अन्नपाण्या शिवाय रहायचं. (दिवसाच हा. रात्री खावून ‘पिवून’ नाचायचं).

वा..! मी या भक्तांचे चरण बघून धन्य झालो. कित्तेक जण तशी सवय नसल्याने असे काही चालतात की ती अजब चाल बघत रहावी. पण अशा टाचा घासून देव कसा पावणार ? (मला आणखी एका साक्षात्काराची वाट बघावी लागणार.) नऊ दिवस मोच्याचा धंदा बसणार, झालच तर त्या उघड्या पायांवर एखाद्याचा चपलेचा पाय पडणार.

(वर दिलेला फोटो हरेक्रिष्णजीच्या सौजन्याने)

नरेन्द्र प्रभू


09 September, 2009

आध्यात्मिक धमकी ?

काल मला एक धमकीचा SMS आला. “ सत् नाम, वाहेगुरू ! हा SMS गोल्डनटेंपल मधून पाठवला आहे. याचा आदर कराल तर तुम्हाला उद्याच एक चंगली बातमी समजेल. मात्र अनादर केला तर पुढची नऊ वर्षे संकटाचा सामना कराल. हा SMS बारा लोकांना पाठवा.” अशा अर्थाचा हा SMS होता.

या पूर्वीही साईबाबा, तिरूपती इत्यादीच्या नावाने असे SMS आलेले आहेत. गम्मत अशी की पूर्वी पत्र पाठवा किंवा पत्रकं वाटा म्हणून असेच संदेश दिले जायचे. आता या तथाकथीत आध्यात्मिक लोकांचीही तांत्रिक प्रगती झालेली दिसते. त्यांचं असूदे पण MBA, इंजिनीअर अशी मंडळी सुद्धा असल्या गोष्टीला बळी पडतात आणि असले SMS फॉरवर्ड करतात तेव्हा मात्र त्यांची कीव कराविशी वाटते. अरे या कावळ्यांचा श्रापांनी मरायला आम्ही काय कच्च्या गुरूचे चेले आहोत ? ( कावळ्यांचा बिचार्‍यांचा काय़ दोष ? असो.) असली थोतांडं करायला काय माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार झालाय ? मनःशांती साठी हव तर हवा तो जप करा. पण असल्या जाळ्यात फसू नका. त्याने झालाच तर तोटाच होईल तुमचा आणि मोबाईल सेवा पुरवणार्‍या कंपन्यांचा फायदा. किंबहूना ही त्या मोबाईल सेवा पुरवणार्‍या कंपन्यांचीच क्लुप्ती असावी. तेव्हा मित्रहो, सावधान.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates