25 September, 2009

नागडे पाय

देवाचा हप्ता या ब्लॉग पोष्ट मध्ये ‘लोक साईबाबा पुढे चप्पल काढल्यासारखं करतात पण प्रत्यक्षात बुट, चप्पल पायातच असतात’ हे माझं म्हणणं एवढ्या लवकर बुंबरँग होवून माझ्यावरच उलटेल असं मला वाटलं नव्हतं. अगदी सात दिवसात देवाने मला माझं ते विधान सपशेल मागे घ्यायला लावलं. त्याचं काय झालं महाराजा, गेले चार-पाच दिवस सकाळच्या वेळी मला एक साक्षात्कार होतोय. सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडलो की अनेक अनवाणी, नागडे पाय रस्त्यावरून चालताना दिसतात. (हो मी फक्त पायच पाहतो.) दोन दिवस दुर्लक्ष केलं पण ते तसे समोर येतच राहीले. सकाळीच नव्हे तर संध्याकाळी सुद्धा. हा काय प्रकार म्हणून बायको जवळ चौकशी केली तेव्हा उलगडा झाला. नवरात्रात हल्ली हे असं करतात. हे म्हणे व्रत आहे. नवरात्रात नऊ दिवस अनवाणी, अन्नपाण्या शिवाय रहायचं. (दिवसाच हा. रात्री खावून ‘पिवून’ नाचायचं).

वा..! मी या भक्तांचे चरण बघून धन्य झालो. कित्तेक जण तशी सवय नसल्याने असे काही चालतात की ती अजब चाल बघत रहावी. पण अशा टाचा घासून देव कसा पावणार ? (मला आणखी एका साक्षात्काराची वाट बघावी लागणार.) नऊ दिवस मोच्याचा धंदा बसणार, झालच तर त्या उघड्या पायांवर एखाद्याचा चपलेचा पाय पडणार.

(वर दिलेला फोटो हरेक्रिष्णजीच्या सौजन्याने)

नरेन्द्र प्रभू


1 comment:

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates