29 September, 2013

सॉंग ऑफ द डेजीवनाचं, जगण्याचं जर गाणं झालं पाहिजे तर संगीतासारखा सोबती नाही. कळायला लागायच्या आधीच हे संगीत आपल्या अवती-भवती निनादत असतं. पक्षाची शीळ, खळाळता झरा, पानांमधून होणारी वार्‍याची कुजबुज, समुद्राची गाज, छुम-छुम वाजणारे पैंजण या सर्वांमधून एक नादमधूर असा स्वरांचा गोफ आपल्या कानी येतच असतो. हे संगीत ऎकताना त्यातल्या मधुर्याकडे आपलं लक्ष जातच असं नाही, पण जेव्हा एखादा संगीतकार त्याचाच वापर आपल्या गाण्यात करतो तेव्हा मात्र आपण अचंबीत होतो. सहजच शब्द निघतात अरे...वा..!

एखादं गाणं हे काही फक्त त्या संगीतकाराचं नसतं तर ते गीतकार, संगीतकार, वादक आणि आताच्या जमान्यात रेकॉर्डीस्ट या सगळ्यांचा त्यात तेवढाच वाटा असतो. एखादं गाण मनाला भावतं त्याचं कारण काहीही असू शकतं. त्या गाण्याची चाल, त्या गाण्याचे शब्द, सुंदर वाद्य मेळ किंवा गाणं चित्रपटातील असलं तर चित्रीकरण या गोष्टी असतातच, पण या व्यतीरीक्त आपल्या आयुष्यातील एखाद्या प्रसंगाशी एखादं  गाणं कायमचं बांधलं जातं आणि ते गाणं ऎकताच तो सगळा गतपट आपल्या स्मृतीतून जागा होवून नजरे समोर तरळू लागतो. हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे नविन काळे यांचं सॉंग ऑफ द डे हे पुस्तक. कालच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अगदी अनौपचारीक वातावरणात विले पारले इथं पार पडला. हे पुस्तक वाचताना आठवणीतली गाणी आणि गाण्यांच्या आठवणी यांची एक मालिकाच आपल्या मनात रुंजी घालायला लागते. पुस्तक वाचताना गाण्यांची सौंदर्यस्थळ आपण नव्याने किंवा काहीवेळा प्रथमच पाहायला, ऎकायला लागतो आणि या आयुष्यात नसंपणारा एक खजिनाच आपल्या हाती लागतो. सव्वीस-सत्तावीस गाण्यांचा उहापोह या पुस्तकात केला आहे,  पण हे पुस्तक वाचता वाचता गाणं ऎकण्याचे संस्कार आपल्यावर नकळत होत जातात आणि आपल्या मनातली कितीतरी गाणी आपण पुन्हा ऎकायला प्रवृत्त होतो आणि त्याची एक मालिकाच सुरू होते. लेखक नविन काळे आणि या पुस्तकाची हीच तर खासियत आहे. जीवन गाणं नव्याने गाण्यासाठी राफ्टर प्रकाशनाचं हे पुस्तक जरूर वाचा.

पुस्तक प्रकाशन सोहळा


      

                   

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates