Showing posts with label संगीत. Show all posts
Showing posts with label संगीत. Show all posts

01 July, 2020

करेल उपाय



विठू ठाकलासे उभा विटेवर

सदा माझा भार त्याच्यावर

जरी बंद झाले आज माझे द्वार

मनामध्ये सार माउलीचे

 

सरेल अंतर करेल उपाय

पडेल हा पाय वाटेवरी

पुन्हा दिंडी घेऊन चारी दिशांना

जाईन होईन वाटेकरी

 

जरासा विसावा जरी लाभला हा

नसे थार आता माझ्या जिवा

भ्रमंती जगाची खोळंबली ही

उद्या जाऊया पाहू वाटा नव्या 


28 April, 2016

विरहिणी











वसंतात येते फुलांना झळाळी
तुझी याद ही दाटली रे उरी
जरी मोगर्‍याचा उल्हास आहे
कशी सांज मी ही करू साजरी?

ग्रीष्मात शोधू कुठे मी विसावा
कसा ताप सोसू तू नसता असा?
असा रंध्ररंध्रातूनी घाम बरसे
रीता घट पाण्याहूनी ना पसा

विसरून गेलास पाऊस सारा
दिसेना किनारा मला पारखा
तुझ्या रुपगंधात न्हावू कशी रे
कुठे हात शोधू तुझ्यासारखा?

वैरीण झाली अशी रात्र का रे
शिंपून जातो शरद चांदणे
आकाश सारे तुला वाहिले मी
नसे चंद्र माझा असे वागणे

तशी साथ हेमंत आता न देई
सुके वैखरी गीत गाता तुझे
धुके दाटले रे असे हे सभोवती
खरे होऊदे भास हे रे तुझे

पानात पाऊल माझेच वाजे
शिशिरासवे गान गाऊ कसे?
वार्‍यात थंडी असे दाटलेली
उबदार मिठी तुझी ती नसे  

२७/०४/२०१६          

नरेंद्र प्रभू     

16 March, 2015

विविध भारती FM वर


जुनी गाणी ऎकणं आणि पांचट बडबड यापासून वाचायचं असेल तर विविध भारतीला पर्याय नाही. पण आजपर्यंत मध्यम लहरीवरच ऎकू येणारं हे केंद्र आता FM च्या 102.8 लहरींवर ऎकता येणार आहे.

कोलकातामध्ये आधीपासूनच असलेली ही सोय आता मुंबईबरोबरच दिल्लीकरांनाही उपलब्ध झाली असून, जुन्या गाण्यांचा सर्वात मोठा खजिना असलेलं हे केंद्र रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.     

    FM वर सुस्पष्टपणे ऎकता येण्याबरोबरच मोबाईल फोन आणि कारडेकवर हे केंद्र आता ऎकायला मिळणार असल्याने जुना रेडिओ नसेल तर होणारी गैरसोय होणार नाही. 

12 January, 2014

काल


या उजाड माळावरती
मी उन्हात फिरतो आहे
ती फुले काल रात्रीची
मी अजून शोधतो आहे

तू सांजवेळी आलीस
अवचीत अशी हसलीस
ना कळले मजला काही
की मला तशी दिसलीस


तो गंध फुलांचा होता
की तुझाच होता सांग
पसरला सभोवती होता
नव प्रेमाचा मृदगंध

तारका नभी फुलताना
तू कळ्या मांडल्या होत्या
अन गालावर कुसूमाच्या
निश्वास टाकला होता

तो चंद्र साक्षीला होता
की तुझाच तो फितूर
सामोरा मी तुज आलो
तू गेलीस किती, किती दूर



नरेंद्र प्रभू 

05 August, 2012

रौप्यमहोत्सवी ‘चौरंग’




‘अशोक हांडे’ हे नाव उच्चारताच जबरदस्त मनोरंजन, सादरीकरणातली श्रीमंती, उत्तम नियोजन, कसलेले कलाकार, अभ्यासातून आलेली परिपूर्णता, उत्सव आणि उत्साह अशा अनेक गोष्टींची दंगल मनात उसळते. हा हा म्हणता चौरंगला पंचवीस वर्ष पूर्ण झाली. मंगलगाणी दंगलगाणी पासून सुरू झालेल्या या संगीतमय प्रवासाचा प्रत्येक टप्पा आणि कार्यक्रम मी जवळून पाहिलाय. उत्तरोत्तर होत जाणारी प्रगती आणि प्रयोगातील सातत्य हे तर आहेच पण एक मराठी ‘शो मॅन’ हे सगळं करतो आहे हे पाहून प्रत्येक नव्या कार्यक्रमाच्यावेळी उर भरून यायचा, अभिमान वाटायचा. मंगलगाणी दंगलगाणी, आवाज की दुनिया, आजादी ५०, माणिकमोती, गाने सुहाने, गंगा जमुना, अमृत लता, मधुरबाला, आपली आवड आणि अर्थातच मराठी बाणा, हे सगळे कार्यक्रम पाहाणे म्हणजे केवळ आत्मानंद होता. कार्यक्रमातून भारावून जाणारा रसिक अशोक हांडे हे नाव आपल्या हृदयावर कोरणारच अशी त्या प्रयोगांची छाप असायची, अजूनही तो सिलसिला चालू आहे. अशोक हांडेंच्या  चौरंग या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आशोक हांडे आणि चौरंगच्या संपूर्ण टिमला मझ्या मना पासून शुभेच्छा!


अशोक हांडेंनी हे मनोरंजन विश्व कसं उभं केलं याची एक झलक आजच्या लोकसत्ताच्या रविवार वृत्तांत मध्ये त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून वाचता आली  ती पूढे देत आहे.

‘चौरंगा’वर डाव मांडला!
रोहन टिल्लू, रविवार, ५ ऑगस्ट २०१२

‘मंगलगाणी दंगलगाणी’, ‘अमृतलता’, ‘मधुरबाला’, ‘मराठी बाणा’ यांसारखे अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर करणाऱ्या ‘चौरंग’ या संस्थेला ७ ऑगस्ट रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा प्रवास अभिमानास्पद तर होताच, पण त्याचबरोबर आव्हानात्मकही होता. या आव्हानांबद्दल आणि ‘चौरंग’च्या वाटचालीबद्दल ‘चौरंग’चे सर्वेसर्वा अशोक हांडे यांच्याशी केलेली ही बातचित..

गेल्या २५ वर्षांत तुम्ही अनेक दर्जेदार कार्यक्रम दिलेत. पण या सर्व कार्यक्रमांसाठीचं सांगीतिक बाळकडू नेमकं कुठे मिळालं?

हे बाळकडू आम्हाला पाजण्यात अनेक गोष्टींचा आणि गावांचा हात आहे. माझ्या बालपणाचा सुरुवातीचा काळ हा खेडेगावात वगैरे गेला. उंब्रज तालुक्यात आमचं गाव होतं. त्यामुळे ग्रामीण जीवन, बारा बलुते वगैरे आम्ही खूप जवळून पाहिलं होतं. या ग्रामीण जीवनात संगीताला, त्यातही लोकसंगीताला खूप वरचं स्थान आहे. लग्नापासून धार्मिक उत्सवांपर्यंत सगळीकडे लोकसंगीत अगदी ठासून भरलं आहे. त्यात तमाशाची पंढरी मानलं जाणारं नारायणगाव हे आम्हाला खूप जवळ. त्यामुळे तमाशाचा नादही (चांगल्या अर्थाने) लहानपणापासूनच लागला. शेतावर राखणीला मामाबरोबर जायचो. आम्हाला तमाशाचं वेड लागलं, त्याला कारण आमचा हा मामा! आम्ही राखणीला म्हणून जायचो आणि पाच किलोमीटर लांब धावत जाऊन तमाशा बघून यायचो. तर तात्पर्य हे की, लोकसंगीताचे संस्कार आमच्यावर लहानपणापासूनच झाले.


मग मुंबईचा प्रभाव तुमच्यावर नेमका किती आणि कसा पडला?

मुंबईचा म्हणण्यापेक्षाही रंगारी बदक चाळीचा प्रभाव माझ्यावर जास्त पडला. ही चाळ म्हणजे मुंबईतला महाराष्ट्र होता. महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागातून लोक त्या चाळीत राहायला आले होते. ते आले ते त्यांची संस्कृती, लोकसंगीत वगैरेंची परंपरा घेऊनच आले. त्यामुळे रंगारी बदक चाळीत प्रत्येक सण साजरा करण्याची वेगवेगळी तऱ्हा होती. त्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लाऊडस्पीकरवरून चालणारी गाणी. जुनी गाणी सतत वाजायची आणि आमच्या कानी पडायची. त्यामुळे त्या गाण्यांचे शब्दच नाही, तर दोन कडव्यांमधलं संगीतही अगदी मनात कोरलं गेलंय. याचा फायदा मला ‘आवाज की दुनिया’, ‘अमृतलता’, ‘मधुरबाला’ वगैरे कार्यक्रम करताना झाला.


हे संस्कार तुमच्या बरोबरच्या प्रत्येकावरच झाले असतील. पण मग अशोक हांडे, चौरंग आणि एकापेक्षा एक यश संपादन करणारे अनेक कार्यक्रम हा सिलसिला कसा सुरू झाला?

अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण या संस्कारांबरोबरच चिकित्सक शाळेत मी नाटकंही करायचो. रुपारेल कॉलेजमधून एकांकिका केल्या होत्या. कॉलेजच्या एनएसएस युनिटचा प्रमुख म्हणूनही मी जबाबदारी सांभाळली होती. त्या वेळी इंटरला असताना मंगल वाचनात दुर्गाबाई भागवतांचा ‘महाराष्ट्राची दगडी शीर’ नावाचा धडा होता. त्याचबरोबर शि. म. परांजपे यांचा ‘खरं सोनं’ हा धडाही होता. या दोन धडय़ांवरून मला ‘पसायदान ते कसाईदान’ची कल्पना सुचली. त्यावेळी पु. लं.चा ‘तीन पैशांचा तमाशा’ जोरात चालू होता आणि त्यात हे कसाईदान होतं. त्यातून मी ते उचललं आणि १९७७मध्ये रुपारेल कॉलेजच्या एनएसएस युनिटसाठी हा कार्यक्रम पहिल्यांदा सादर केला. तो सगळ्यांना खूपच आवडला. मग त्याच वर्षी कॉलेज डेलाही तो केला. मी १९८०मध्ये मुलुंडला राहायला आलो. तिथे आम्ही ‘संस्था मुलुंड’ या संस्थेतर्फे तो मुलुंडमध्ये केला. मग विरंगुळा म्हणून गणपतीत वगैरे तो होतच राहिला. पुढे ३० एप्रिल १९८७मध्ये ‘नाटय़दर्पण रजनी’ या कार्यक्रमात ‘पसायदान ते कसाईदान’ आम्ही सादर केला. त्या वेळी एका वर्तमानपत्रात असं छापून आलं होतं की, यंदाच्या नाटय़दर्पण रजनीचं एकमेव फलित म्हणजे अशोक हांडे आणि त्याचा ‘पसायदान ते कसाईदान’ हा कार्यक्रम. तर त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम व्यावसायिक मंचावर आणण्याचं ठरवलं. त्यासाठी ७ ऑगस्ट १९८७ रोजी ‘चौरंग’ नावाची संस्था स्थापन केली आणि ‘पसायदान ते कसाईदान’चा ‘मंगलगाणी दंगलगाणी’ झाला.


‘आझादी ५०’ करताना भारताच्या स्वातंत्र्याची पन्नास वर्षे, हीच कल्पना डोक्यात होती का?

तसंच काही नाही. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने एखादा कार्यक्रम केला जावा, अशी इच्छा कोलकातामधील एका संस्थेने व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम हाती घेतला. पण या कार्यक्रमाची बीजं खूप लहानपणीच मनात रोवली गेली होती. मी चौथीत असताना आम्हाला शिंदे नावाचे सर शिकवायला होते. ते नेहमी एक कविता म्हणून दाखवायचे. 
‘
गजनी, घोरी, गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद, लोदी
सुलतान वेशी राज्य मिळविले, दिल्लीची गादी’
ही कविता मनात घर करून बसली होती. ‘आझादी ५०’ करताना या कवितेची खूपच मदत झाली. 


हात घालेल त्या कार्यक्रमात ‘चौरंग’ने तुफान यश मिळवलं. पण त्यामागे अशोक हांडे नावाच्या कलाकारासह त्यात दडलेला व्यावसायिक आणि व्यवस्थापकही होता. हा व्यवस्थापक कसा घडला?

याला सर्वात मुख्य कारण म्हणजे आमचा परंपरागत आंब्यांचा धंदा. या आंब्यांनी मला व्यवसायाचा रस पाजला. लहानपणापासून वडिलांबरोबर आम्ही या धंद्यात भाग घेतला होता. त्यांनीच आम्हाला धंदा कसा करावा, याचं प्राथमिक शिक्षण दिलं. मग पुढे आम्हीही अनुभवातून शिकत गेलो. तर माझ्यातला व्यावसायिक हा कदाचित त्या ‘जीन्स्’मधून घडला असावा. पण व्यवस्थापक मात्र मी स्वत: घडवला. कॉलेजमध्ये असताना माझ्या प्रत्येक एकांकिकेचं प्रॉडक्शन कंट्रोल नेहमी मीच केलं आहे. मुलुंडमधील आमच्या संस्थेचं व्यवस्थापनही मीच केलं होतं. सुरुवातीला ‘मंगलगाणी दंगलगाणी’ फार चालला नाही. पण आम्ही लंडनचा दौरा करून आल्यावर इथेही तो कार्यक्रम धो धो चालायला लागला. आमचे पहिले तीनशे-चारशे प्रयोग रिकामेच गेले होते. पण माझ्यातल्या व्यवस्थापकाने आणि व्यावसायिकाने हार मानली नाही. तसंच या आंब्याच्या धंद्यामुळे मी खूप फिरलो. त्याचाही फायदा मला दौरे आखताना झाला.


तुमच्या प्रत्येक कार्यक्रमापाठी एक तरी कथा आहे. त्याबाबत काही सांगाल का?

उगाच करायचा म्हणून मी कधीच कार्यक्रम केला नाही. त्या कार्यक्रमाला काही तरी हेतू हवा. तो नसेल, तर मग त्याला काही अर्थच राहत नाही. लताजींचा अमृतमहोत्सव झाला, तेव्हा एका वाहिनीवर त्यांच्या गाण्यांचा रिमिक्स कार्यक्रम सादर झाला होता. मला तो प्रचंड खटकला आणि त्याबाबत संतापही आला. एका महान गायिकेचा अमृत महोत्सव अशा प्रकारे साजरा व्हावा, याची खंत बोचत होती. त्यातूनच ‘अमृतलता’ समोर आला. माणिक वर्मा या शास्त्रीय आणि भावगीत हे दोन्ही प्रकार गाणाऱ्या माझ्या मते एकमेव गायिका. त्यांच्या मृत्यूनंतर भारती आचरेकर यांनी माझ्याकडे माणिक वर्मावर एखादा कार्यक्रम करावा, अशी विनंती केली होती. त्यातून ‘माणिकमोती’ तयार झाला. तीच कहाणी ‘गंगा-यमुना’ या कार्यक्रमाची. आपल्याकडे ‘रुपेरी पडद्याला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्न’ याच नजरेने मधुबालाकडे बघितलं जातं. पण त्या सौंदर्यवतीला आयुष्यात खूप सोसावं लागलं. ते सर्व मी ‘मधुरबाला’च्या रूपात मांडलं. ‘यशवंत’ या कार्यक्रमात तर यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याची संधी मिळाली.


पण तुमचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘मराठी बाणा’. तर हा ‘बाणा’ नेमका कसा तयार झाला?

आम्ही नवीन शतकाच्या स्वागतासाठी सांगलीत ‘स्वागत-२०००’ हा कार्यक्रम केला होता. त्यात गेल्या शतकात सांगलीचं नाव मोठं करणाऱ्या सांगलीच्या सुपुत्रांचा आढावा घेतला होता. त्या वेळी सांस्कृतिक आणि सांगीतिक क्षेत्रात भलंमोठं योगदान देणारे अनेक कलाकार आणि त्यांची कला समोर आली. त्या निमित्ताने इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. हा कार्यक्रम नंतर २२ ऑक्टोबरला गगनगिरी महाराजांच्या आश्रमात झाला होता. त्या वेळी तर लोक अक्षरश: बेभान झाले आणि त्याच वेळी आम्ही हा कार्यक्रम एका नव्या नावाने व्यावसायिक स्वरूपात आणायचं ठरवलं. नाव ठरलं, ‘मराठी बाणा’. विचार करा, २२ ऑक्टोबरला आम्ही हा कार्यक्रम करायचं ठरवलं आणि त्याचा पहिला प्रयोग अक्षरश: दहा दिवसांत मी दीनानाथ नाटय़मंदिरात १ नोव्हेंबर रोजी केला.


या यशात कलाकारांचा आणि ‘चौरंग’शी संबंधित सर्वाचाच वाटा असेल ना? मग हे कलाकार नेमके कसे निवडलेत आणि सांभाळलेत?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ‘चौरंग’मध्ये पंक्तिभेद अजिबात नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे, सर्वाना सारखी वागणूक मिळते. दौऱ्याच्या वेळी मी जे खातो तेच माझे कलाकारही खातात. तसंच आमच्याकडे चार बसेस आणि चार टेम्पो आहेत. सगळे कलाकार व्यवस्थित झोपून जातात आणि कपडेपट, सेट वगैरेही अगदी व्यवस्थित पोहोचतात. ‘चौरंग’साठी काम करणं, म्हणजे जास्तीत जास्त कार्यक्रम आणि कमीत कमी त्रास, हे कलाकारांना माहीत झालं आहे. त्यामुळे कलाकार आमच्याकडे अगदी आवर्जून काम करत असतात.


पंचवीस वर्षांची यशस्वी वाटचाल आणि एकापेक्षा एक दणकेबाज कार्यक्रम यानंतर आता ‘चौरंग’ काय घेऊन येणार आहे?

सुनील गावस्कर नेहमी सेन्चुरी केली की नव्याने गार्ड घ्यायचा. त्याचप्रमाणे आम्हीही आता पुन्हा एकदा गार्ड घेणार आहोत. आमचे सध्याचे कार्यक्रमच एवढे तुफान चालू आहेत की, सध्या तरी नवीन असं काहीच करत नाही. पण लवकरच आम्ही प्रेक्षकांसाठी नवीन कल्पनेवर आधारित कार्यक्रम नक्कीच घेऊन येऊ.  



27 November, 2011

सदाबहार ‘गीतमाला’





“देवी और सज्जानो.........., बहनो और भाईयो.......” अशी हाक देऊन तमाम भारतीयांना चाळीस वर्षाहून जास्त काळ ‘बिनाका गीतमाला’ या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडून ठेवणारे अमीन सायानी काल प्रत्यक्ष ऎकायला मिळाले. निमित्त होतं ‘स्वरगंधार’चे मंदार कर्णीक यांनी आयोजित केलेल्या ‘गीतमाला के सुरीले संगीतकार- अमीन सयानी के साथ’ या कार्यक्रमाचं. रेडीओ सिलोन वरून दर बुधवारी रात्रौ आठ वाजता सादर होणार्‍या ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमाने त्या काळी संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावलं होतं. तब्बल चाळीस वर्षाहून जास्त काळ ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमाने सर्व भारतीय एका सुत्रात बांधले जात होते. ‘श्रीलंका ब्रॉडकास्टींग कॉर्पोरॅशन’ किंवा रेडीओ सिलोन हा तेव्हा सगळ्याना जोडणारा एक समान धागा होता. कानात प्राण आणून रसिक ती गाणी ऎकत होते. चारशेहून जास्त रेडीओ क्लब स्थापन झाले होते. त्या काळी घरोघरी रेडीओ नव्हते, मग छोट्या-मोठया हॉटेलच्या परिसरात किंवा शेजारच्या घरी जमून मंडळी या कार्यक्रमाची मजा अनुभवत असत. आपली आवडती गाणी ऎकण्याचं तेव्हाचं ते एकमेव साधन होतं. नुसती गाणी ऎकणं वेगळं आणि अमीन सयानीसारख्या निवेदकाकडून किस्से ऎकता ऎकता एक  एका गाण्याचा आनंद घेण वेगळं. संपुर्ण तासभर तमाम जनतेला एका जागी खिळऊन ठेवण्याची ताकत अमीन सयानी यांच्या निवेदनात होती आणि आजही आहे. गायक गायीकांचा सुरीलास्वर ऎकतानाच सयानीसाहेबांचं निवेदनही सुश्राव्य असच असायचं. एका अर्थाने हा सुरांचा जादुगारच आहे. अनेक संगीतकार ‘गीतमालेत’ आपण कुठे आहोत यावरून आपली पातळी ठरवत असत.

हिंदी चित्रपट संगीत सृष्टीने तमाम भारतीयांचं जीवन खर्‍या अर्थाने सुसह्य बनवलं. लोक आपलं सुख-दुख: या गाण्यात शोधू लागले. लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, महंमद रफी, मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, हेमंत कुमार पासून अगदी अलका याज्ञीक या गायक-गायीका पर्यंत आणि नौशाद, हेमंत कुमार, ओ.पी. नय्यर, एस.डी बर्मन, सी. रामचंद्र, आर. डी बर्मन, शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम, रवींद्र जैन अशा अनेक दिग्गज संगीतकारांचं संगीत जनसामान्यापर्यंत पोहोचलं, रुढ केलं ते गीतमालेनं. शकील बदायुनी, राजेंद्र कृष्ण, शैलेंद्र, मजरूह सुलतानपुरी, भरत व्यास, शाहीर लुधीयानवी, हसरत जयपुरी, आनंद बक्षी, अंजान, समीर अशा अनेक गीतकारांना ओळख प्राप्त करून दिली आणि त्यांचे शब्द रसिकांच्या हृदयावर कायमचे कोरले गेले. सामान्यांच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण आणले. ‘गीतमाले’ची लोक चातका प्रमाणे वाट बघत असत. लहाणपणी कोकणातल्या कोचर्‍यासारख्या खेडेगावात असताना मी याचा अनुभव घेतला आहे.

‘स्वरगंधार’ने काल यशवंत नाट्यगृहात सादर केलेल्या या कार्यक्रमाला अंबरीश मिश्र यांचं निवेदन लाभलं होतं, काही मिनिटं स्वत: अमीन सयानीसाहेब रंगमंचावर अवतरले होते. बाकीच्या वेळात ते दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधत होते. जुन्या काळातील आठवणींना उजाळा देत होते. सोनाली कर्णीक अर्चना गोरे, हृषीकेश रानडे, संदीप शहा आदी गायकांनी आणि अमर ओक, सुराज साठे, अविनाश चंद्रचूड, मनीष कुलकर्णी, दत्ता तावडे  या मुझिशीयनसनी तर बहार आणली. सुमारे तीन तास चाललेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि जुन्या स्मृतींना उजाळा देत गेला. प्रत्येक क्षण मंतरलेला होता. भारलेला होता. श्रोतृवृंद आसनाला खिळलेला होता. कार्यक्रम संपल्यावर तरंगत आपापल्या घरी जाताना तरूण झाल्याचा भास प्रत्येकाला झाला असावा.                     

22 November, 2011

देवा काय देऊ तुला?





श्रेष्ठ संगीतकार, गीतकार, कवी, गायक आणि विशेष म्हणजे खरोखरीचा ‘देव’माणूस असलेलं एक उमदं व्यक्तीमत्व म्हणजे यशवंत देव. काल माटुंग्याच्या यशवंत नाट्य गृहात त्यांचा “माझा सन्मान” देऊन सत्कार करण्यात आला. वयाची पंच्याऎशी वर्ष पुर्ण करणार्‍या यशवंत देवांना नुकताच माहाराष्ट्र शासनाचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार देण्यात आला. त्या पुरस्काराची पुर्ण रक्कम रुपये दोन लाख यशवंत देवांनी दिवंगत संगीतकार श्रीनीवास खळे यांच्या कुटुंबीयांना तत्काल देऊन टाकली. या त्यांच्या दातृत्वामुळे भारावून गेलेल्या अशोक मुळे या वल्ली ने हा सत्काराचा घाट घातला होता.

अशोक मुळेंनी आयोजीत केलेला हा देवा... काय देऊ तुला? नामक सोहळा असल्याने नाट्य मंदिर हाऊस फुल्ल होतं हे वेगळं सागायला नकोच. भाऊ मराठेंनी निवेदनासाठी ध्वनीक्षेपक हातात घ्यायच्याआधी मुळे काका स्टेजवर आले (तसे ते स्टेज, नाट्यगृह, आत-बाहेर सगळीकडेच वावरत होते. कारण कार्यक्रमाची धुरा ते एकहाती वाहत होते.) कार्यक्रम हाऊस फुल्ल असूनही समोरच्या काही खुर्च्यांमध्ये अजूनही माणसं नाहीत हे पाहाताच त्यांनी तिथून स्टेजवरूनच पास घेऊन जाणार्‍यांची कडक शब्दात हजेरी घेतली. “मिटींगावर मिटींगा आणि हजार कामं होती तर पास मागितलेच कशाला? फुकट आहेत म्हणून?“ अशोक मुळे कडाडले. चला कार्यक्रमाचा नारळ अशा रितीने फुटला म्हणजे आता मजा येणार असं मनातल्या मनात म्हणत मी सावरून बसलो (मुळे काकांचा कार्यक्रम म्हणजे जे काही म्हणायचं ते मनातल्या मनातच, उघड बोलायची कुणाची हिम्मत आहे? ते सत्कार मुर्तीचीही पत्रास ठेवत नाहीत, मग आपण कोण पामर? शिवाय त्यांचा तो सर्वत्र होणारा संचार पाहाता कधी समोर प्रगट होतील असं सारखं वाटत राहतं.) “सगळे कलाकार फुकट गायला-वाजवायला तयार झाले असले तरी आज त्यांना दोन दोन पाकळ्या देणार आहे” मुळेंनी दुसरा षटकार मारला. सभागृह हास्यात बुडून गेलं. मांगिरीश इस्टेट्स चे नितिन नेरूरकर यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला आहे असं नमूद करून त्यांनी त्याना आणि महाराष्ट्र टाईम्सचे संपादक अशोक पानवलकर यांना स्टेजवर यायची विनंती केली आणि ते येत असतानाच म्हणाले “मला कार्यक्रम करायचा असला की पैसे कमी पडत नाहीत. कोण ना कोण देतच, आजच्या या कार्यक्रमाला नेरूरकरांनी दिले. लागतील ते सगळे पैसे त्यानी दिलेत. हो, हा आता पुष्पगुच्छ दोतोय ना, तो सुद्धा त्यांच्या पैशातून घेतला आहे.” (प्रचंड हशा) वाटत होतं मुळे काकांनीच बोलतच रहावं. एखादी मैफल जमून जाते. या गोष्टी ठरवून होत नसतात. कालची मैफल उत्तरोत्तर रंगतच गेली. खरच बहार आली राजे हो...!         

भाऊ मराठेंनी निवेदनाला सुरूवात केली, खुमासदार किस्से आणि आठवणीचे पट उलगडताना ‘देव’ हा शब्द केंद्रस्थानी ठेऊन गाणी म्हटली जात होती. देव देव्हर्‍यात नाही, देवा दया तुझी ही, देवाचीये दारी, देह देवाचे मंदिर अशी अनेक गाणी सादर होत होती. अरविंद पिळगावकर, अजित परब, अमोल बावडेकर, बकुळ पंडीत, सोनाली कर्णीक, अर्चना गोरे, निलिमा, मधुरा कुंभार, श्रीरंग भावे असे दिग्गज कलाकार आणि साथीला कमलेश भडकमकर, जगदीश मयेकर आणि त्यांची टिम, मध्यंतर कधी आला कळलच नाही.
  

मध्यंतरानंतर पडदा दूर झाला तेव्हा मुळे काका व्यासपीठावर अवतरले ते दोन खुर्च्या घेऊनच. त्यांनी पुन्हा माईक हाती घेतला. सेकंड इनींगला बॅटीगला आल्यासारखे ते बोलायला लागले, सगळं बोलणं अनौपचारीक होतं. “यशवंत देवांचा सत्कार म्हणून त्यांचीच गाणी पाहिजेत असं कुठे आहे? ही गाणी मी निवडलीत. त्यांची एक दोन ठेवलीत. ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे गाणं माझ्यासाठी ठेवलं. अजून घडी तशीच आहे...... काही घडलं नाही..... गायकांना सुद्धा सागितलं मी सांगेन ते गाणं म्हणायचं. बस्स...! तुमची ती संथ गाणी नकोत, कुणी म्हणालं, पण हे बरं वाटतं....., वाटू दे ...., ते तू घरी म्हण. इकडे सगळं कसं दणक्यात झालं पाहिजे. देवांनी सत्काराची एवढी मोठी रक्कम खळेंच्या कुटूंबीयांना दिली म्हणून सत्कार करावासा वाटला. त्यांच्या हृदयात ‘करूणा’ आहे. ती त्यांना सोडून गेली नाही. यांचा सत्कार केलाच पाहिजे. नाही तर ते तसं नको. घराताच एकमेकांना पुरस्कार द्यायचे आणि वर म्हणायचं मी हल्ली पुरस्कार स्विकारत नाही. इथं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, सगळे प्रेमाने येतात. हा साउंडवाला टिट्टू फार बिझी असतो, झाकिर हुसेनलाही हाच लागतो, म्हटल हा बिझी आहे, दुसर्‍याल बोलाऊया. पण हाच म्हणाला, मी येणारच, दुसरा आला तरी बाजूला लावेन. हे असं प्रेम आहे. म्हणून हा उत्सव होतो. (प्रत्येक गायक कलाकार सांगत होते मुळे काकांचा आदेश असतो, विनंती नाही. आम्ही तो पाळतोच.) मी मानपत्र अजिबात देत नाही. ज्यांना मानपत्र द्यायचं त्यांनाच त्यांची माहिती विचारायची आणि पुन्हा तेच त्याला माहीत असलेलच लिहून द्यायचं, हे असलं मी करणार नाही.” बोलण्यात जरा वेळच झाला पण सगळं अनौपचारीक होतं, पुन्हा म्हणाले ”आता निवेदन फार नको, पानवलकर बोलतील, मग भाऊ, मग यशवंत देव”

देवांचा सत्कार झाला. पानवलकर, भाऊंची भाषणं झाली. देव उत्तराला उभे राहिले. म्हणाले “ या माणसात माणूसकी आहे म्हणून सगळे बोलावल्या बरोबर येतात. हे मुळे नेहमी पांढर्‍या कपड्यात असतात. हा माणूस जसा बाहेरून तसा आतूनही आहे. यांचे अंतरंग आणि बहीर्रंगही पांढरे........ हौस भारी.... म्हणून यांना मी ‘व्हाईट हौस’ म्हणतो. तुम्हाला यांनी खुप हसवलं. तुम्ही आता खुप हसलात, हसलच पाहिजे. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की जो हसतो.  तुमच्या चेहर्‍यावरची हास्य रेषा हीच खरी भाग्य रेषा आहे.” त्या नंतर ‘एक शाम, हसी के नाम’ ही कविता त्यांनी म्हटली, रसिकांनीही कवितेचा भरपूर आनंद घेतला. पुढे यशवंत देव म्हणाले “देव असतो की नाही हे माहित नाही पण प्रत्येक माणसात परमेश्वर असतो हे मी ठामपणे सांगू शकतो.” नंतर ते आपल्या बालपणीच्या मित्राच्या आठवणीत रमून गेले. 

सोळावं वरीस होतं, मी मुंबईच्या शाळेत
मुरलीधर जयसिंगाने धरला माझा हात.

जयसिंग या मित्रामुळे आपण संगीताच्या क्षेत्रात आलो, आकाशवाणीवर गेलो. अशा आठवणी सांगताना देव साहेब सद्गदीत झाले होते.  

रात्र बरीच चढली होती. उत्तरार्धाचा शेवटही जवळ येत होता. “भाऊ.... चार गाणी एका निवेदनात मोकळी करा” मुळे काकांचा हुकूम झाला. पुन्हा गाण्यांची मैफल सुरू झाली आणि ‘आधी बिज एकले’ या ‘संत तुकाराम’ चित्रपटाच्या गाण्याने सांगता झाली. आसनाला खिळून राहिलेले देव साहेबांचे चाहते रसिक उठले, पण सगळ्यांच्याच ह्रदयात भाव होते. 

देवा काय देऊ मी तुला?
गीत दिले तू मला...!

नरेंद्र प्रभू

                                                     




02 September, 2011

पद्मभूषण श्रीनिवास खळे अनंतात विलीन




आपल्या सर्वांगसुंदर रचनांनी तमाम मराठी मनाला गुंतवून करणारे संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे हे आज अनंतात विलीन झाले 
"जय महाराष्ट्र माझा", "गोरी गोरी पान", "शुक्रतारा मंदवारा", "बगळ्यांची माळ फुले", "श्रावणात घन निळा', "निज माझ्या नंदलाला', "या चिमण्यांनो परत फिरा रे', "सावळे सुंदर रुप मनोहर' अशा अनेक गाण्यांना खळेकाकांनी अप्रतीम स्वरसाज चढविला. भावगीत, अभंग, बालगीते, पोवाडा, लावणी अश्या सर्वच क्षेत्रात त्यांचा हातखंडा होता. अगदी लहानपणापासून मनाला रिझवणारी अनेक गाणी ज्या खळेकाकांमुळे ऎकायला मिळाली ते आता आपल्यात नाहीत याचं वाईट वाटतं.

संगीतासाठीच जगणारे खळेकाका गेले, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना.   

04 December, 2010

अवघा रंग एकचि झाला, सर्वांग सुंदर संगीत नाटक



कालच ‘अवघा रंग एकचि झाला’ हे नाटक बघीतलं. बर्‍याच वर्षांनंतर संगीत नाटक बघायला गेलो होतो, गेल्या काही वर्षात संगीत नाटकाची परंपरा खंडीत झाल्यासारखी झाली होती. जुने कलाकार पडद्याआड गेले आणि नव्या पिढीला संगीत नाटक आवडेल की नाही किंवा जुनी संगीत नाटकं आताच्या काळानुरूप नसल्याने ती चालतील का? या साठमारीत प्रेक्षक संगीत नाटकांना मुकले होते, पण ‘अवघा रंग एकचि झाला’ या नाटकाने ती उणीव भरून काढली असं नाटक पाहिल्यावर आपण नक्की  म्हणू शकतो. किंबहूना जुनी आणि नवी पिढी यातला वैचारीक संघर्ष, जनरेशन गॅप, आणि मुळात स्वार्थी नसल्याने जमवून घेण्याची वृत्ती हाच या नाटकाचा मुळ गाभा आहे. जुनं ते सोनंच पण ते नव्या युगात मंडताना त्याला झाळाळी कशी प्राप्त होईल हे पाहिलं पाहिजे हा नव्या पिढीचा आग्रह शेवटी मान्य होतो.

अमोल बावडेकर
ग्लोबल खेड्यात आता जात, धर्म या गोष्टींना थारा नाही. माणसं मनाने एकत्र आली पाहिजेत मग भाषा, प्रांत, जात, देश यांची बंधनं तुटून पडतात आणि अशी जवळ आलेली माणसं गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकतात हा संदेश या नाटकाने दिला आहे.

प्रसाद सावकार, अमोल बावडेकर, गौतम मुर्डेश्वर, जान्हवी पणशीकर, रश्मी मोघे या सर्वांचेच अभिनय आणि गायकी यांना प्रेक्षकांची दाद मिळत राहते आणि नाटक उत्तरोत्तर रंगतच जातं.  नाट्यसंपदाचं हे नाटकही यांच्या लौकीकाला शोभेलसच आहे. लवकरच या नाटकाचा तीनशेवा प्रयोग सादर होणार आहे. आपल्या जवळच्या नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग लागेल तेव्हा तो पहाच, आपल्याला एक सर्वांग सुंदर संगीत नाटक पाहिल्याचा आनंद नक्कीच मिळेल.  
           

10 November, 2010

इंग्रजी माध्यम, मराठी कविता



हल्ली वर्गात कविता एका सूरात म्हटल्या जाताहेत असं क्वचितच ऎकायला येतं. मराठी माध्यमाच्या शाळाही त्याला अपवाद नाहीत, इंग्रजीची तर बातच सोडा. कवितेला चाल लाऊन ती वर्गात एका तालात म्हटल्याने ती पुन्हा पाठ करावी तर लागत नाहीच पण ती लक्षातही चांगली राहते. अर्थ उमगत जातो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून ही गोष्ट होणं कठीण याच स्वानुभवातून सौ. कल्पना प्रभु यांनी इंग्रजी माध्यम, मराठी कविता ही ऑडीओ सिडी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केली आहे. सौ. कल्पना प्रभु या नुकत्याच गोरेगाव, मुंबई येथील कॉनव्हेंट स्कूल मधून सेवा निवृत्त झाल्या असून दहाविच्या अभ्यासक्रमातला मराठी कवितांचा बोजा कमी व्हावा, त्यामध्ये ग्येयता यावी म्हणून लगेचच त्यानी हा उपक्रम हाती घेऊन तडीस नेला आहे. हे करत असताना स्वतःच्या पदराला खार लावून त्यांनी निवृत्त झाल्यावरही आपला विद्यार्थ्याप्रती असलेला प्रेम, जिव्हाळा व्यक्त केला आहे.

१ गुरू हा संतकुळीचा राजा
२ भक्ताचिया लोभा
३ वैकुंठीचा हरि
४ काय करू आता
५ खेळणी
६ निरोप
७ तहान
८ संघर्ष
९ अंधार पखाली
१० कसं चालेल
११ शब्दशस्त्र
१२ श्वास

वरील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता दहावीच्या मराठी पुस्तकातील सर्व कविता सदर सिडीमध्ये आहेत. प्रत्येक कवितेच्याआधी असलेलं अर्थपुर्ण निवेदन आणि संगीताचा  बाज या मुळे या कविता श्रवणीय तर झाल्या आहेतच, पण सहज ऎकता ऎकता विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करणार्‍याही आहेत. संगीतकार संजय गायकवाड यांनी या कवितांना सुंदर चाली लावल्या आहेत तसच काही कविताना आपला आवाजही दिला आहे. कु. ऎश्वर्या चव्हाण, कु. वरूण बिड्ये यांच्या बरोबरच स्वतः सौ. कल्पना प्रभु यांनी गायनाची बाजूही सांभाळली आहे. याबद्दल अधिक माहीतीसाठी: सौ. कल्पना प्रभु (9969104365) किंवा श्री. संजय गायकवाड (9867444076) यांच्याशी संपर्क साधावा आणि दहावीचे विद्यार्थी तसेच शाळांनी याचा जरूर लाभ उठवावा.   

17 August, 2010

‘कॉमन वेल्थ’ मराठी अभिमानगीत







                                  स्वातंत्र्यादिनाच्या दिवशी गोरेगावच्या
अ.भि. गोरेगांवकर शाळेच्या १६०० विद्यार्थ्यांनी मराठी अभिमानगीत एका सुरात म्हटलं. दूरचित्रवाणी संचावर बातम्यांच्या गदारोळात ही बातमी बघून खुप बरं वाटलं. संगीतकार कौशल इनामदार यांनी मराठी अभिमानगीताच्या माध्यमातून मराठीची एक असाधारण सेवा केली आहे. मराठीसाठी एवढी भव्य दिव्य गोष्ट गेली जवळ जवळ दोन वर्ष सात्यत्याने काम केल्यानेच ते करू शकले. या दोन वर्षात त्यानी बाकीची सर्व कामं बाजूला ठेऊन केवळ या गीताचाच ध्यास घेतला होता. सुप्रसिद्ध कवी, गीतकार, गझलाकार सुरेश भटांचे शब्द आणि ११२ प्रस्थापित गायक आणि ३५६ समूह गायक अशा ४५० हून अधिक गायकांनी गायलेलं हे गीत म्हणजे मराठी माणसासाठी एक स्फुर्तीगीतच आहे. सामान्य माणसांकडून (त्यात काही असामान्यही आहेत) प्रत्येकी पाचशे रुपये जमा झाले आणि त्या रकमेतून हे गाणं साकार झालं. त्या अर्थाने ही ‘कॉमन वेल्थ’ आहे, मराठी माणसाची सांसकृतीक ठेव आहे. मराठीच्या हकासाठी आपण भांडत असतो पण मराठीसाठी असलेलं आपलं कर्तव्य तर आपण विसरलो नाहीना? असा प्रश्न मला पडला तो कौशल इनामदार यांचं फेसबूक वरचं आवाहन वाचलं तेव्हा. आपणही ते वाचा, विचार करूया आणि मुख्य म्हणजे कृती करूया. 

कौशल इनामदार यांचं फेसबूक वरचं आवाहन:
“मराठी अभिमानगीताचा दुवा आपल्याला देत आहे. आपण जरूर ऐकावं, आवडलं तर आपल्या मित्रांनाही तो आनंद द्यावा. मराठीचा अभिमान जागृत करायचा असेल तर एक अहिंसक व्यासपीठ असणंही गरजेचं आहे, आणि संगीतापेक्षा संयुक्तिक माध्यम आणखी काय असू शकतं. अमराठी लोकांना आपल्या भाषेचा आदर करायला सांगण्याआधी मराठी लोकांमध्ये अभिमान जागृत करण्याची अधिक गरज आहे. सुरेश भटांचे शब्द ११२ प्रस्थापित गायक आणि ३५६ समूह गायक अशा ४५०हून अधिक गायकांनी गायलेलं हे गीत बाकी काही नाही तर एक चैतन्य जरूर निर्माण करेल यावर माझा विश्वास आहे. महाराष्ट्रगीताबाबत आपण एक चूक केली. ५० वर्षांमध्ये आपण या गीताशी रोजचा संपर्कही ठेवला नाही. आज मराठीच्या दुरवस्थेला आपली अनास्था हे एक मोठं कारण आहे. ही चूक आपण (मराठी माणसं) मराठी अभिमानगीताबाबतीत करू नये असं मला वाटतं. आज अ.भि. गोरेगांवकर शाळेच्या १६०० विद्यार्थ्यांनी हे गाणं एका सुरात म्हटलं. मराठी भाषेला छोट्या मुलांसारखा दुसरा ब्रॅन्ड ऍम्बॅसेडर नाही! आपल्या माध्यमातून आपण हे मराठी अभिमानगीत पोचवलंत तर आमच्या कार्याला मदत होईल. धन्यवाद.”

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates