09 July, 2026

निळाईची गाज

 


स्पिती व्हॅली मधलं लांझा हे जीवाश्म गाव (Fossil village). समुद्रसपाटीपासून १४५०० फुट उंचीवरच्या या गावात फिरताना पायाखालच्या जमिनीवर तुम्हाला जीवाश्म सापडले तर ते नवल नाही. लाखो वर्षांपूर्वी समुद्र तळाला झालेल्या फार मोठ्या हालचालीतून हिमालयाची निर्मिती झाली आणि त्यावेळी समुद्रात असलेले जलचर अचानक पणे एवढ्या उंचीवर उचलले गेले आणि कालौघात जीवाश्मांची घडण झाली. नील नभाने मंडित बर्फाच्छादित हिमालयाचे दर्शन घेत असतानाच कधीकाळी समुद्राचा भाग असलेले हे जीवाश्म न्याहाळत होतो आणि सोबत लाभली होती ती सागरांच्या लाटांवर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या कॅप्टन वैभव दळवी या अवलियाची. मुंबई ते चंदीगड हा विमान प्रवास करत असताना साधारण अशाच उंचीवर कॅप्टन वैभव दळवी यांनी त्यांचं समुद्रायन हे पुस्तक भेट म्हणून दिलं आणि कॅप्टन दळवींची प्रत्यक्ष ओळख व्हायच्या आधीच पुस्तक रूपाने त्यांच्याशी जवळीक साधली गेली होती. प्रवासाच्या धामधुमीत पुस्तक वाचायला मिळालं नाही पण या पुस्तकाचे लेखक वैभव दळवी बरोबर असल्याने त्यांच्या अनेक सागर सफारींच्या चित्तवेधक कहाण्या ऐकायला मिळाल्या. लांझा  गावात महासागराची भेट अशा दोन प्रकारे झाली आणि नंतरच्या प्रवासात ती वृद्धिंगत होत गेली.

आपला निसर्ग सुंदर भारत देश उत्तुंग हिमालय आणि अथांग दर्या यांनी संपन्न आहे पण या सागराची अनेक भली बुरी रूपं गेली तीस-पस्तीस वर्षं अनुभवलेल्या कॅप्टन वैभव दळवी यांनी लिहिलेलं समुद्रायन पुस्तक खूप गाजलं, माहितीजालत उपलब्ध असलेल्या त्यांच्या अनेक कविताही दळवींच्या प्रतिभेची चुणूक दाखवतात. अशा या दर्यावर्दी लेखक कवीला प्रत्यक्ष भेटण्याची आणि ऐकण्याची संधी आपल्याला चालून आली आहे.

'पु. ल. कट्टा'  उपक्रमांतर्गत “निळाईची गाज” हा खास कार्यक्रम उद्या म्हणजे शुक्रवारी, १० जुलैला रसिकांसाठी विनामूल्य सादर होणार आहे. संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत चालणार्‍या या कार्यक्रमाला आपण नक्की यायचं आहे कारण पाऊसही  निळाईची गाज ऐकायला उसंत घेणार असे म्हणाला आहे. कॅप्टन वैभव दळवी आपल्या कवितेत म्हणतात:

 

झेलला मी सागराचा वार ऐसा जीवघेणा,

काय होता भार त्याचा, हे तुम्हा कैसे कळावे?

धाडशी त्या नविकांचे शूर असे झुंजणे की;

पाहता ते वादळांनी थांबुनी मागे वळावे.

 

ती अनुभूती, ती गाज लेखकासोबत वाटून घ्यायची असेल तर नक्की याच!   





No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates