16 April, 2010

लालबाग परळ – लागली वाट मुंबईची

परवा लालबाग परळ झाली मुंबई सोन्याची हा चित्रपट पाहीला. मन सुन्न झालं. महेश मांजरेकरचा हा शिवाजीराजे नंतरचा आणखी एक चांगला चित्रपट. हा चित्रपट पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १९८३ चा जानेवारी महिना असावा. कणकवली जवळच्या तरळा या गावी डॉ. दत्ता सामंतांची एक सभा होती. दीर्घकाळ चाललेल्या गिरणी संपामुळे चाकरमान्याने कधीचीच मुंबई सोडली होती. संपकर्‍यांसाठी त्या सभेचं आयोजन केलेलं होतं. सरकार आपल्या एकी समोर नमत घेईल, केंद्रीय वस्त्रोंद्योग मंत्री विश्वनाथ प्रताप सिंगना लक्ष घालावं लागेल अशा प्रकारे डॉक्टर कामगारांची समजूत घालत होते. पण गिरण्या मंबईला आणि संपामुळे विस्थापीत झालेला कामगार कोकणात, त्यांच्या समोरची ती सभा म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी अवस्था होती. आमच्या गावातल्या एका कुटुंबातले पाचच्या पाच भाऊ गिरणीत कामाला होते. ते गणपतीला गावाला येत तेव्हा त्यांचा रुबाब बघण्यासारखा होता. पण त्या संपाने त्यांची रया गेली. ते कुटुंब देशोधडीला लागलं तशी लाखो कुटुंबांची हालत झाली. त्यांच्या टाळूवरचं लोणी राजकारणी आणि गिरणी मालकांनी खाल्लं. अजूनही खाताहेत. दादर येथील गोल्ड मोहर मिलला २० मार्च २०१० रोजी भीषण आग लागली होती, ती रॉकेल ओतून लावली होती. (वाचा: गोल्ड मोहर मिलला रॉकेल टाकून आग लावल्याचा अहवाल) तशा सगळ्याच आगी लावलेल्या असाव्यात. त्या आगीत गिरणी कामगारांच्या चार तरी पिढ्या खाक झाल्या. चित्रपटात ते वास्तव पहायला मिळतं.                  


8 comments:

  1. फारच लाउड आहे हा सिनेमा असा रिपोर्ट वाचला म्हणुन पहाणे टाळले.

    ReplyDelete
  2. हा चित्रपट पहायचा आहे. यात ज्या घटना दाखवल्या आहेत, त्या प्रत्यक्षात जेव्हा घडत होत्या तेव्हा मी लहान होते पण आजसुद्धा जेव्हा त्या घटनांवर लोकांना कळकळीने बोलताना, हळहळ व्यक्त करताना पहाते, तेव्हा काय घडलं होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून रहाते.

    ReplyDelete
  3. बर झाल या विषयावर तुम्ही पोष्ट लिहीलीत. या विषयी मला काही वाटतयं ते थोडक्यात...

    मी क्राँम्टन ग्रीवज म्ध्ये होतो तेव्हा १९८० ते १९९४ जवळपास पंधरा वर्षे क्राँम्टन ग्रीवज म्ध्ये डाँ. दत्ता सांमतांच्या कामगार आघाडीची युनियन होती. १९८० मध्ये गिरणगावाची पुर्ती वाताहत झाली होती. जागातील सर्वात दिर्घकालीन संपाच्या अपयशाचं खापर डाँ. दत्ता सांमतांच्या माथ्यावर असतानाही अनेक कंपण्यांमध्ये डाँ. दत्ता सांमतांच स्वागतच होत होत. ते का ? जवळ्पास ४० वर्षे क्राँम्टन ग्रीवज म्ध्ये कम्युनिष्टांच्य लालबावटयाची युनियन होती. सदैव मालकांची टिमकी वाजवणा-या लालबावटयाने, कामगारांची जेमतेम गुजरण होईल इतकाच पगार कामगारांना मिळेल याची काळ्जी घेतली. कामगारांना भरपूर पगार मिळाला तर तो चलवळीत उतरणार नाही. आणि म्हणुन कामगारांना अर्धपोटी ठेउन 'कामगार चळवळ' जीवंत ठेवण्याच धोरण लालबावटयाची युनियन आखतं होती.
    डाँ. दत्ता सांमतांच्या कामगार आघाडीने क्राँम्टन ग्रीवजच्या कामगारांच्या पगारात दुप्पट वाढ केली ती वर्षभरातच. दिपावलीला मिळणा-या बोनसमध्ये तर चार पटीने वाढ झाली. हे फक्त क्राँम्टन ग्रीवजम्ध्येच घडलं अस नव्हे तर ठाणे बेलापूर पट्यातील अनेक मोठ्या कंपण्यातही असच घडल होत. १९८० ते १९९० हे द्शक, सदैव आर्थिक तनावाखाली दबून गेलेल्या खाजगी कंपण्यातील सर्वसामांन्याच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवणार ठरल हे त्या वेळचे कामगार विसरणार नाहीत हे मात्र नक्की.
    मी कामगार आघाडीचा सक्रिय कर्यकर्ता नव्हतो तर इतर अनेक कामगारांप्रमाणे सभासद होतो. त्या वेळी मी कंपणीच्या आनेक कार्यक्रमांच छायाचित्रणाच कामही करायचो. पुढे कामगार आघाडीच्या अनेक मोर्च्याचं तसेच मिटींग व वार्षिक दसरा मेळाव्याचं छायाचित्रण करण्याच्या निमीत्ताने काही कालावधी डाँ. सामताच्या आसपास राहण्याची मला संधी मिळाली होती. अनेक मोर्चात डाँ. दत्ता सांमत आघाडीवर असायचे. पोलिसांचा पहिला दांडूका त्यांच्यावर पडायचा मग कामगारांवर. खाजगी कंपण्यातील कामगारांच्या बाबत कमालीचे यशस्वी ठरलेले डाँ. दत्ता सांमत, गिरणी कामगारांसाठी मात्र 'खलनायक' का ठरले ? जागातील सर्वात दिर्घकालीन संपाच्या अपयशाचं खापर डाँ. दत्ता सांमतांच्या माथ्यावर का फुटलं ?
    डाँ. दत्ता सांमत संप पुकारण्या आधी द्वारसभेत जमलेल्या सर्व कामगारानां विश्वासात घ्यायचे. संपाचे फायदे तसेच तोटे यांच आभ्यासू विश्लेषण ते कामगारां समोर मांडायचे. मग संप करण्याबाबत विचारणा करायचे. कामगारांच्या दणदनित होकाराने कंपणीचा परीसर हादरून गेल्या शिवाय संप जाहिर होतच नसे. अस असताना डाँ. दत्ता सांमतांनी गिरणीकामगारांवर संपासाठी जबरदस्ती केली अस म्हणणे वास्तवाला धरून होणार नाही.
    जगभर गाजलेला गिरणी कामगारांचा संप जर यशस्वी झाला असता तर डाँ. दत्ता सांमत नावाची डोकेदु:खी काँग्रेसला जड जाणार होती. आणि केवळ काँग्रेस पक्षाच्या फायदयावर डोळा ठेऊन त्यावेळच कणखर व्यक्तिमत्व श्रीमती इंदिराजी गांधीनी डाँ. दत्ता सांमताच्या खांद्यावर बंदुक ठेऊन सगळ्या गिरणी कामगारांच्या संसाराची राखरांगोळी केली. गिरण्या बंद पड्ल्या तरी चालतील पण डाँ. दत्ता सांमतांची एकही मागणी मान्य करायची नाही असा केंद्रीय दबाव कोणाच्या इशा-याने आला ? इंदिराजी गांधी नंतर डाँ. दत्ता सांमताचे मित्र म्हणवणारे श्री. विश्वनाथ प्रताप सिंह यांनीही डाँ. दत्ता सांमतांना गाजर दाखवले. एकंदरीत काय तर राजकर्त्यांच्या हट्टापाई सर्वसामान्यं कामगारांच्या जीवनाची राखरांगोळी झाली.

    ReplyDelete
  4. पाहायचा आहे हा सिनेमा..याच विषयावरील अधांतर हे नाटक तर अप्रतीम आहे अगदि हलवुन टाकते ते आपल्याला...

    ReplyDelete
  5. महेंद्रजी, कांचन हा चित्रपट पहाच. आपणाला नक्की आवडेल.

    ReplyDelete
  6. विजयजी नमस्कार,

    आपण डाँ. दत्ता सांमतांना जवळून पाहिलत. गिरणी कामगारांच्या संपात डाँ. दत्ता सांमतांना उतरायचं नव्हतच, पण कामगारच हट्ट धरून बसले आणि डाँ. दत्ता सांमतांना त्यांचं नेतृत्व करावं लागलं. आपण उल्लेख केल्याप्रमाणे इतर कंपन्यात होणारी पगारवाढ गिरणी कामगार पहात होते आणि म्हणूनच गिरणी कामगारांनी डाँ. दत्ता सांमतांना नेतृत्वाची गळ घातली. हे माहित होतं म्हणूनच मी राजकारणी आणि गिरणी मालकांनी गिरणी कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं असं म्हटलं आहे.
    सव्विस्तर प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद...!

    ReplyDelete
  7. देवेन्द्र नमस्कार, मी अधांतर हे नाटक पाहिलेलं नाही. आता संधी मिळाल्यास जरूर पाहिन. आपण हा चित्रपट पहाच आपल्याला नक्की आवडेल.

    ReplyDelete
  8. मूळ नाटक हे सिनेमापेक्षा कैकपटीने उत्तम आहे.
    माझे वडील बी एम सी मध्ये कामाला होते ,ह्या सिनेमांच्या निमित्ताने आठवण सांगतांना ते म्हणतात.
    चुनाभट्टी येथे एक तलाव आहे व दर आठवड्याला एक कामगार तेथे आत्महत्या करायचा.
    ते ह्या लोकांना कळवळून सांगायचे,
    घरातील सर्व कर्त्या मंडळीनी गिरणी असो किंवा एकाच ठिकाणी काम करू नये.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates