निसर्गात कलाकृती घडताना पाहाणे हे अत्यंत आनंददायी असतं . सृजनाची ती पहाट होताना जर आपण त्याचे साक्षीदार असलो तर.... ZZ वनस्पतीचा एक बोटा एवढा टणक तुकडा कुंडीतून वेगळा करावा लागला तेव्हा वाटलं याच्यात प्राण आहे, काही दिवस पाण्यात ठेवून पाहूया काय होतं ते. तसा हा तुकडा पाण्यात ठेवला. पहिले तीन महिने तो होता तसाच राहिला, ना कुजला, ना मऊ पडला. मग त्याला तीळा एवढं मुळ फुटतयं असं वाटू लागलं. ते मुळ किंचित वाढायला लागलं आणि त्याला आणखी एक मुळ फुटलं. हे मुळं वाढायला लागली आणि आता याला अंकुर कसा आणि कुठून फुटतो याचं कुतुहल वाटायला लागलं. पुढचे पंधरा-वीस दिवस फक्त ही मुळं वाढत होती आणि एके दिवशी आणखी एक मोठे जाड आकाराचं मुळ येत की काय असं चिन्ह दिसू लागलं. या जगात येताना संरक्षक कवच घेऊन यावं तसं ते जाड कवच वाढत गेलं आणि एका सकाळी अगदी छोटं सानुलं पान त्याच्यामधून डोकावू लागलं. त्या बोटा एवढा टणक तुकड्याला एकाच जागेवरून मुळं आणि पानं येतील असं वाटलंच नव्हतं.
चार-साडेचार महिने आत मध्ये अनेक क्रिया घडत असतील, सुप्तावस्तेत असताना बाहेरच्या जगाला
कोणतेही संकेत न देता नवोन्मेशाचं नाट्य आतल्या आत आकार घेत असावं. समोरच्या मेजावर
हे सगळं घडत होतं, निसर्ग सृजन आकार घेत होतं.

No comments:
Post a Comment