Showing posts with label मुंबई वरचे ह्ल्ले. Show all posts
Showing posts with label मुंबई वरचे ह्ल्ले. Show all posts

26 March, 2020

राजा परिक्षीत आणि आपण



परिक्षीत राजाला राज्य कारभार सोपवून पांडव हिमालयात निघून गेले, भगवान श्रीकृष्णांनी वैकुंठाला प्रस्थान केलं आणि नेमकी त्याच वेळी कलीयुगाला सुरूवात झाली. कलीयुगाचा आरंभ झाला आणि सत्ययुग, त्रेतायुग आणि व्दापारयुगातले नियम बाजूला पडून कलीयुगातल्या सुंदोपसुंदीला सुरूवात झाली. प्रजाहित दक्ष आणि कर्तव्यनिष्ठ राजा परिक्षीत एकदा शिकारीला गेला असताना त्याचा कलीशी वाद झाला, राजाने कलीला पृथ्वीवरून निघून जायला सांगितलं पण आता व्दापारयुगाची समाप्ती झाली असून माझं इथेच रहाणं आवश्यक आहे असं कलीने सांगितलं आणि रहायला जागा मागितली, मग परिक्षीत राजाने त्याला द्यूत, मद्यपान, परस्त्रीगमन आणि हिंसा या चार ठिकाणी रहायची परवानगी दिली. पण एवढी चारच ठिकाणं पुरेशी नसून आणखी एखादं ठिकाण तरी द्यावं अशी कलिने मागणी केली. परिक्षीत राजाने मग त्याला सोन्यात रहाण्याची परवानगी दिली. मान हालवून कली निघून गेला आणि काही वेळातच गुप्तरुपात येवून  राज्याच्या मुकुटात राहू लागला.

दिवसभर जंगलात फिरून राजा दमून गेला, फिरता फिरता तो शमिक ऋषिंच्या आश्रमाजवळ आला. ऋषि ध्यानात मग्न होते, राजाने प्यायला पाणी मागितलं पण ऋषिंची समाधी लागली होती. राजाने तीन-चारदा विनंती करूनही ऋषि बोलेनात तेव्हा मुकुटातल्या कलीने संधी साधली आणि राज्याच्या विवेकाला हुलकावणी देवून, विवेकाला बाजूला सारून त्याला क्रोधयुक्त केलं, राजाने मरून पडलेला साप ऋषिंच्या गळ्यात अडकवला. तेव्हढ्यात शमिक ऋषिंचा पुत्र शृंगी नदीवरून परत आला. त्याने ते दृष्य पाहून राजाला शाप दिला की सात दिवसात महाविषारी तक्षकाच्या दंशामुळे तू मरण पावशील.

महालात परत येवून राजाने जेव्हा मुकूट काढून ठेवला तेव्हा त्याला आपली चूक कळून चुकली. त्या तक्षकापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने एका बंद पिंजर्‍यात स्वत:ला कोंडून घेतलं पण भुकेने व्याकूळ झाल्याने त्याला फलाहाराची इच्छा झाली. राजाने गोड बोरं मागवली, त्या बोरात लपलेल्या तक्षकाच्या अळीचा पिंजर्‍यात प्रवेश झाला. तीच्या दंशाने राजाचा अंत झाला.

कोरोनाच्या विषाणूने आपल्याला असंच कैद केलं आहे किंवा त्याच्यामूळे आज आपण घरात बंद झाले आहोत. राज्याच्या फळाच्या आशेने जशी तक्षकाला संधी मिळाली तशी संधी आपण कोरोनाला देता कमा नये. आज राजा आणि रंक सगळेच एका पातळीवर आले आहेत किंवा आपण सगळेच राजा झालो आहोत. परिक्षीतासारखी चूक करूया नको.           


04 November, 2019

किती तुझी जीभ लांब?




किती तुझी जीभ लांब?
अरे कुठेतरी थांब!

ज्याच्यावर कालपर्यंत केले वार
त्याचाच आज घेतोस कैवार?
नाचतो आहेस होऊन सांब
पण आहेस एकच खांब
असा कसा आलाय रे उत
तू कुणाचा आहेस दुत

धुतराष्ट्रालाही माहित आहे हा खोटं बोलतोय
संशय आलाय, हा नावाचाच आहे तो जाणतोय
य कसा होणार तो ममोमन खचतोय
माचा रेडा बघा त्याला सोडूनच पळतोय
आंधळा खानदान(पक्ष) नष्ट होताना बघतोय
निती तिथेच असतो विजय

तुला लोळवणार बारामतीचा पैलवान
जो आहे इटालियनचा बागवान
बगलमे छुरी आणि तोंडात राम
आंध्रबाबूला बघ फुटलाय घाम
बाजारबुणगे तुला घेऊन नाचतात
तुझ्याजवळ आकडानाय ते जाणतात   

म्हणे आम्ही नितीवान
असे किती लोळवलेत खान
बेडकाचा होतो का कधी सांड?
चव्हाट्यावर किती ही भांडाभांड?
आपणच म्हटलं रांड...
तर जग म्हणतंचना सांड?

रस्त्यावरच्या खड्यात पेंग्वीन कसा जगेल
इतकं खाऊन पालिका कशी तरेल
बेस्टची गाडी पहिली रुळावर आण     
नाही रे ती सोन्याची खाण
पोरगं आहे ते, त्याला नाय जाण
जनता आहे ती काढेल पायताण  

विश्वासाला तडा गेलाच, तो आता ढळतोय
दोन मातोश्री झाल्या, आता कसला फळतोय?
महाराष्ट्र जळतोय, पाऊस असा छळतोय  
हुरळून नको जावू मिडिया तुख्याशी खेळतोय  
कापून घेवू नको नाक
वल्गना नको होशील खाक

टाळ्या पिटताहेत बघून तुझ्या कसरती
तुला केव्हा होणार आहे उपरती?
गुरगुरणारा शिकार करीत नसतो
गरजणारा तरी कुठे बरसतो?
आत्मघाताची तुला आलीय खाज
म्हणून चोळतोयस सोडून लाज      

इतिहासात नको राहू, त्याच्यापासून शिक
जे स्वत:च नागडे ते घालतील का भिक?      
बहकू नकोस, म्हणतील स्वत:लाच विक
रामराम करतील ते नाहीत भाविक
म्हणून म्हणतो कुठेतरी थांब!
हातातला जाम ठेव जरा लांब




27 February, 2019

माझ्या खात्यात पंधरा लाख जमा झाले





पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर १२ दीवसात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर (पाक व्याप्त काश्मीर नव्हे)  बालाकोट या ठिकाणी हवाई हल्ला करून जैश-ए-महंमदचं महत्वपूर्ण ठिकाण नष्ट केलं. या हवाई हल्ल्याबद्दल सर्व प्रथम भारतीय हवाई दलाचं आणि हा हल्ला करण्यास आदेश देण्यार्‍या निर्भीड नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन. जराही नुकसान न होता ही कारवायी तडीस नेण्यात आली म्हणून जवानांचं कौतूकच, पण त्याना आदेश देणारं सरकार देशात आहे हे प्रत्येक भारतीयाचं नशीब. २६/११ चा हल्ला झाला  तेव्हाही आपल्या सुरक्षा दलांना अशीच आरपारची कारवायी करायची होती, पण नेहमी भारत काहीतरी कृती करेल असं वाटलं की नमतं घेणार्‍या पाकला साथ देणारं सरकार तेव्हा अधिकारावर होतं. पाकचे हस्तकच सरकारमध्ये बसल्याने आणि सुरक्षा सौद्यामधल्या दलालीतच स्वारस्य असलेल्या घराण्यामुळे तेव्हा कारवायी होऊ शकली नाही.  त्या वेळीही आपल्याजवळ मिराज २००० ही फायटर विमानं होती आणि धैर्यशील वायूसेनाही होती, पण शिस्त पाळणार्‍या आपल्या लष्कराला तेव्हा पांगळं कसं करता येईल याचंच जणू काम ते सरकार करीत राहीलं. आज राफेल-राफेल म्हणून बोंब ठोकणार्‍या बुद्धूला तेव्हा दहा वर्षात कुणी अडवलं असेल तर या कमिशनने. देशाच्या सुरक्षेची अक्षम्य हेळसांड करणारे हेच खरे गुन्हेगार आहेत.     

जय हिंद’, वंदे मातरम्’, भारतमाता की जय म्हणायला लाजा वाटणार्‍या आणि त्याला विरोध करणार्‍या नादान शक्ती आणि जातीयवादाचं विष शिगोशीग भरलेल्या, तसंच तेच एक भांडवल करून आजन्म उर बडवणार्‍यांना आपल्या शुल्लक स्वार्थापुढे देशप्रेम कुठलं? मग हेच हलकट तुकडे-तुकडे गॅंगला समर्थन द्यायला त्यांच्या दारात रांगा लावयला, त्याना डोक्यावर घेऊन नाचायलाही कमी करत नाहीत ना?

आता हेच लोक  मिराज २००० विमानं चाळीस वर्षांपूर्वी घेतली म्हणूनच हा हल्ला करता आला असं म्हणून मोदी सरकारचं श्रेय काढून घ्यायला पहात आहेत. मोदी स्वत: लढायला गेले होते काय? असा प्रश्न विचारत आहेत. प्रत्येकाने आपलं काम केलं की देश मोठा होतो, संबंधीत सर्व आपापलं काम रात्रंदीवस जागून करीत असताना असलं गरळ ओकणार्‍यांना म्हणूनच आपण उघडं पाडलं पाहिजे, त्याना त्याची जागा दाखऊन दिली पाहिजे.

मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि एक खमका पंतप्रधान देशाला मिळाला असा भास झाला होता, आता साडेचार वर्षानी त्याची खात्री पटली आहे. संभवामी युगे-युगे म्हणणारा श्रीकृष्ण त्यांच्यामागे आहेच, आपणही त्यांना साथ दिली पाहिजे. येत्या निवडणूकीत त्याना मत दिलंच पाहिजे. बाकी बॅंक खात्यात पंधरा लाख कधी जमा होणार म्हणून विचारणार्‍यांना मी सांगू इच्छितो की, काल पाकमध्ये घुसून हवाईदलाने हल्ला केला त्या वेळी मी झोपेत होते तरी त्याच क्षणी माझ्या खात्यात पंधरा लाख जमा झाले.

08 April, 2016

दूध का पानी


डॉ. तात्याराव लहाने = जे. जे. रुग्णालय, डॉ. संजय ओक = के.ई.एम. रुग्णालय अशी समिकरणं तयार होतात ती त्या समाजहितेशी डॉक्टरांमुळे. व्यवस्थेशी झगडत, तिच्याशी दोन हात करीत समाजाचं हित नजरेसमोर ठेऊन अहोरात्र झटणार्‍या डॉक्टरला देवत्व प्राप्त होतं ते त्याच्या रुग्ण सेवेमुळे. समाजाच्या सर्व थरातील रुग्णांना आपल्या डोळ्यावर डॉ. लहानेनी शस्त्रक्रिया करावी असं वाटत असेल तर ती डॉ. लहानेंसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. जे.जे. मध्ये महाराष्ट्रातल्या गरीब रुग्णांची पहाटे ४ वाजल्यापासून रांग लागलेली असते. अशा देशाला अभिमान वाटावा अशा गोष्टी केल्या की आपलं सरकार त्या व्यक्तीला पद्म पुरस्कार देतं. डॉ. तात्यांना तोही मिळालाय. म्हणजे सरकार, समाज आणि समाजसेवी डॉक्टर त्यात डॉ.आमटे बंधूही आले अशा सर्वांच्या लेखी सन्माननिय असलेला हा डॉक्टर अचानक विद्यार्थ्यांना नकोसा का झाला? जे शिकाऊ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने शस्त्रक्रिया शिकवत नाहीत म्हणतात तेच शिकाऊ डॉक्टर  बारा-बारा तास काम करायला लावतात म्हणतात तेव्हा वाटतं ‘डाल मे कुच काला है।‘

डॉ. तात्याराव लहाने यांनी जे.जे. मध्ये काम केलं म्हणजे नक्की काय ते पाहू:
·        
  •    सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक परवानग्या गेल्या दोन वर्षांत मिळवल्या. सरकारी रुग्णालयाच्या इतिहासात हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
  •        १९५६ नंतर प्रथमच जे.जे.तील खाटा लक्षणीय संख्येने वाढणार आहेत. सध्या १३५२ खाटा आहेत. त्यात ११०० खाटांची भर पडेल.
  •          जे.जे.ची ओपीडी वर्षाला पाच लाख रुग्णांची होती. ती गेल्या सहा वर्षांत नऊ लाखांवर गेली.
  •          जे.जे. महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ हॉस्पिटल बनले.
  •          वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंगमध्ये जे.जे.चे स्थान २०१० पर्यंत १३ वे होते. गेल्या सहा वर्षांत पाचवे स्थान पटकावले.
  •         एकूण १९ हजार शस्त्रक्रिया व्हायच्या, सध्या ४० हजार होतात. नेत्र विभागात वर्षभरात ६०० शस्त्रक्रिया व्हायच्या त्या सध्या १६ हजार होतात.
  •          इनडोअर पेशंटस्ची संख्या ४२ हजारांवरून ६५ हजारांवर पोहोचली.
  •          एमएमआरडीएकडून ४३ कोटी रुपये निधी आणून रुग्णालयाचा कायापालट घडवून आणला. थ्री टेस्ला एमआरआय मशीनसारखी अत्याधुनिक यंत्रणा सुरू केली.
  •          रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी ५०० लोकांकरिता धर्मशाळा उभारली.
  •          प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण केले.
  •          वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा ९७ वरून १३३ करण्यात यश आले.


हे सगळं सरकारी अडथळ्यांची शर्यत पार करीतच त्यानी केलं असणार. आता मार्डला हाताशी धरून सरकरच त्याना दूर करू पहात आहे काय?      
परवा विधान परिषदेत उच्च शिक्षण मंत्री मा. विनोद तावडे या विषयासंदर्भात म्हणाले की ‘यांची चौकशी होऊन जाऊ दे, म्हणजे दूध का दूध, पानी का पानी हो जायेगा’ हा निर्णय नीर क्षीर विवेक असलेला वाटत नाही तर ‘दूध का पानी’ करणारा वाटतो. डॉ. तात्याराव लहानेनी केलेली रुग्ण सेवा कुणाच्या डोळ्याना खुपत आहे?  का?   

वृत्तपत्र काय म्हणतात:  





        

21 June, 2015

पाऊस कधी चाsssअडतो


पाऊस कधी चाचपडतो
कधी पडतो असा उताणा   
करी पाणी-पाणी सगळ्यांचे
तो वाहून गेला बाणा
पाऊस कधी चाsssपडतो

दौर्‍यात न्याहाळी गटारे
सफाई फक्त हातांची
मग गटारगंगा आली
‘मिठी’ बसली का रे दातांची ?
पाऊस कधी चाsssपडतो

चापात अडकला वाघ
पन्नाशीची ती डरकाळी
चिरक्या आवाजाचीही
ती वेळही चुकून गेली   
पाऊस कधी चाsssपडतो

पाऊस कधी चाsssडतो
किती वर्षे झाली इथली
पाण्यात अडकली दुनिया
ही तुझीच ना रे खेळी ?
पाऊस कधी चाsssडतो

माजल्या उरावर तुझीया
पेटून उठो मतदार
तो असा पडो पाऊस
तू नको पुन्हा येवूस
पाऊस कधी चाsssपडतो




20 February, 2015

सोंगाड्यांच्या हाती सत्ता


यावर आणखी एक मजला बांधायला प्रोत्साहन
शहर किती आणि कसं बकाल करायचं याचे धडे घ्यायचे असतील तर गेली कित्तेक वर्षं मुंबई महापालिकेत सता भोगणार्‍य़ा पक्षाकडे पहावं लागेल. रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांचं व्यवस्थापन किमान चांगलं ठेवून, शहरातील रस्त्यालगतच्या फुटपाथ( याला पादचारी मार्ग असा पर्यायी शब्द आहे. ) वरून नागरिकांना व्यवस्थीत चालता आलं पाहिजे एवढीही सेवा ज्या सत्ताधारी पक्षाला देता आली नाही ते आता या शहराची  उरली सुरली झोप उडवायच्या मागे लागले आहेत. प्रत्येक गोष्टींमध्ये केवळ स्वत:चाच विचार करणार्‍या आडमुठ्या नेतृत्वाचे दशावतार गेले काही महिने आपण पाहतोच आहोत, त्यात आता या पुढच्या पिढीच्या वारसदारांनी मुंबईची दुर्दशा करायचा चंग मांडला आहे. 

ही सुधारणा
इथे येणारा पर्यटक आणखी एक दिवस (खरं तर रात्र) थांबला तर महसुलात भर पडेल म्हणणार्‍य़ांना आणि उठसुट शिवरायांचं नाव घेणार्‍यांना महाराष्ट्रातले गड-किल्ले का दिसत नाहीत? पाच वर्षात एक किल्ल्याला जरी त्याचं पुर्वीचं रुप देता आलं तरी जगभरातील पर्यटकांचा ओघ या मराठी भूमीत वळल्याशिवाय रहाणार नाही. ते करायचं सोडून नाईट लाईफच्या मागे लागायचं म्हणजे अतीच झालं. असलेल्या लोकांना किमान सुविधा न देता ‘झोपडपट्टी वासियांना मोफत घरं’ असल्या भंपक आणि कधिही पुर्‍या न होणार्‍या घोषणा करून मुंबईत गर्दीला निमंत्रण धाडून हे शहर अधिक विद्रूप केलं गेलं आहे, आता झोपडीच्या वरच्या मजल्यालाही संरक्षण देण्याचं आश्वासन पुढील निवडणूकांवर डो:ळा ठेवून दिलं जात आहे. खरं तर झोपड्या कधी हटत नाहीत. तिथली माणसं इमारतीत रहायला गेली तरी पुन्हा त्या जागेवरची झोपडी तशीच असते. कायद्याच्या मर्यादा कुणीच पाळत नाही. “स्वाईन फ्लू हा हृदयविकार आहे  आणि तो उष्णतेमुळे होतो आणि त्यावर उपाय म्हणून शहरात झाडं लावणार आहोत” अशी मुक्ताफळं उधळणारी व्यक्ती महापौर पदी आहे.
यांच्या लाईफचं काय? 
त्यांचे कर्ते-करविते ‘नाईटलाईफ’ चा गेम सुरू करण्याच्या मागे आहेत.  प्रत्यक्षात आश्वासनपुर्ती करता आली नाही की नवनवीन क्लुप्त्या काढून पुढील निवडणूक जिंकायची असा धंदा आहे आणि जनहिताचं सोग आणून हे सोंगाडे आपल्याला झुलवू पहात आहेत. सोंगाड्यांच्या हाती सत्ता किती दिवस ठेवायची? मोकळ्या जागा व्यापणं आणि जनतेने दिलेल्या करातून ज्योत पेटवणं हेच कायते यांचं कर्यव्य आणि करून दाखवणं.

16 October, 2014

माजोरडे


काल मतदान झालं आणि आता महाराष्ट्रात सत्तेवर कोण येणार यासाठी १९ तारखेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. भाजपला पुर्ण बहूमत की...?  असा प्रश्न असताना प्रचारादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्वाने जे वक्तव्य केलं ते ‘माजोरडे’ या एकाच शब्दात जोखता येईल.

उत्तर प्रदेश, बिहारच्या पोटनिवडणूकांचा निकाल जाहीर झाल्यापासूनच सामनामधून भाजपला कमी लेखण्याचे, टोमणे मारण्याचे, घालून पाडून बोलण्याचे उद्द्योग सुरू झाले आणि शेवटी मोदींचा ‘बाप’ काढण्यापर्यंत मजल गेली. या सगळ्या प्रचारात मातोश्री म्हणजे रायगड, उद्धव ठाकरे म्हणजे शिवाजी महाराज, निवडणूका म्हणजे अफजलखानाची भेट असं चित्र उभं करण्यात आलं. शिवसैनिक म्हणजे बाघनखं, कोथळा काढू, अफजलखानाची फौज, दिल्लीवरून स्वारी, हत्तीची सोंड कापून काढू (अमित शहांना उद्देशून), दिल्ली की बिल्ली, शिवसेनेशी फारकत म्हणजे हिंदुत्वाची काडीमोड, अशी खालच्या पातळीवरची आणि असंबद्ध टिका करण्यात आली. आदिलशहा, कुतूबशहाला लोळवला तसा अमितशहाला लोळवू आणि भांडी घासायला लावू अशी भाषा केली गेली. मोदींना ‘चायवाला’ म्हणून हिणवलं गेलं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायला निघालेत म्हणून खोटा प्रचार केला. मुख्य म्हणजे कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसला विरोध न करता भाजप एक नंबरचा शत्रू म्हणून आरोळी ठोकली. एका अर्थी त्यांचाच प्रचार केला.      

भाजपने विश्वासघात केला, खंजीर खुपसला अशी टिका शेवटपर्यंत करीत असताना आपण निवडून आल्यावर काय करणार हे सांगायला ते विसरले, मराठी गुजराती वाद निर्माण करून समाजात नसलेली तेढ निर्माण केली, मुंबईतले उद्योग गुजरातमध्ये नेले जात आहेत अशी ओरड करून आपण महापालिकेत सत्ता असतानाही साधे खड्डेमुक्त रस्ते देवू शकत नाही याचा त्यांना विसर पडला. भारतातल्या पाच राज्यांपेक्षा जास्त अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेची सत्ता वीस वर्षाहून जास्तकाळ उपभोगूनही नागरी सुविधांची बोंब असताना राज्य पुन्हा आमच्या ताब्यात द्या असं हे लोक कसं म्हणू शकतात? मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणत असताना आपलं उत्पन्न आणि उद्योग याची वाच्यता न करण्याची काळजी घेतली. महाराष्ट्रात विरोध आणि तिकडे दिल्लीत मंत्रीपद शाबूत ठेवण्याची कसरत करताना दुटप्पीपणा केला. कोणतही कर्तृत्व नसताना आपला बाळबुद्धीचा मुलगा नेता म्हणून लादताना घराणेशाहीचा दुसर्‍यावर केलेल्या आरोपाचा विसर पडला. पंतप्रधान दिल्ली सोडून प्रचाराला का येतात असं विचारत असातानाच दहा वर्षापुर्वीची बाळासाहेबांची चित्रफित दाखवून मतांचा जोगवा मागितला.    


एकूण काय शिवकाळानंतर बराच काळ निघून गेला आहे, चौथीच्या पुस्तकानंतर इतिहास आहे हेच यांना माहीत नाही. मतदार मुर्ख नाही हे निकालात कळेलच. वानर्‍याच्या सभेत गुडघ्यावर आलेच आहेत पुढे किती दांभिकपणा करतात ते दिसेलच.    
  

16 February, 2014

ते लहाने होते म्हणूनी


भर दिवसाही ज्यांच्या डोळ्यासमोर केवळ अंधाराचंच साम्राज्य असतं त्याला प्रकाशाचा एक किरण पाहाण्याची केवढी मोठी आस लागून राहाणार याची कल्पना डोळसांना येणं कठीणच आहे.  कधी काळी देवाची आपल्यावर कृपादृष्टी होईल आणि आपल्याला दृष्टी येईल याचीच याचानामय प्रार्थना हे लोक देवाजवळ नक्कीच करीत असतील, पण तो देवही एवढा दयाळू असेल का? मुळात तो दयाळू असता तर त्याने तो प्रकाशच आमच्या डोळ्यासमोर का येवू दिला नाही?  असं.... ते आर्त स्वरात आपलं दु;ख़ व्यक्त करणार्‍याच्या हाकेला खरंच एकदा देव ओ देतो. डॉ. लहानेंच्या स्वरूपात तो त्याना दर्शन देतो. आता दर्शन देतो म्हटल्यावर दृष्टी ही यायलाच हवी,  ती दृष्टी सुद्धा हा लहानेदेव देतो. हा देव शिबिरं भरवतो. केवळ आपला फायदा व्हावा म्हणून समुहाला वापरून घ्यायच्या या युगात दृष्टीहिनांच्या समुदायाला एकत्र करून त्याना दृष्टीदान करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारा हा महामानव आपली नित्य जबाबदारी पार पाडत असतानाच वरोर्‍याच्या आनंदवनातही अगदी नेमाने जातो. एरवी स्वत:ला उपेक्षीत समजणाराही ज्यांच्यापासून चार हात दूर उभा राहतो अशा  कुष्टरोग्यांवरही लहानेसाहेब आईच्या ममतेने आणि बापाच्या जबाबदारीने शस्त्रक्रिया करतात. चार दिवसापुर्वी रुग्णांविषयी वाटणार्‍या काळजीतूनच त्यानी निदर्शनं करणार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तर आज त्यांनाच अटकपुर्व जामिनासाठी धावपळ करावी लागत आहे.

याच समाजाचा एक भाग म्हणून डॉ. लहानेसाहेब मी तुमची माफी मागतो. केवळ आणि केवळ सामाजासाठीच जगणार्‍यावर ही अशी किटाळं कधी तरी येतात आणि त्याची जखम खुप खोलवर होते याचीही मला कल्पना आहे. या प्रसंगातून आपण नक्कीच सुखरूप बाहेर याल आणि पुन्हा तेजाने चमकाल अशी खात्री आहे. डोळस ‘माणसांना’ तुम्ही हवे अहात.....  खरंच... ते म्हणताहेत:

ते तात्या होते म्हणूनी
मी घोर तमातून तरलो
अंधार्‍या दुनियेमधुनी
मी प्रकाश भरूनी उरलो

ता.क. अंबानीच्या अंबारीत आसनस्त होणं सोडून तुम्ही जनसामान्यांसाठी जे.जे.लाच आपलं केलं याची जाणीव आहे समाजाला.      

आपला हितचिंतक
नरेंद्र प्रभू  

                        

14 July, 2013

हे राजकारण जनतेच्या मुळाशी येणार...!


चर्चेचा केंद्रबिंदू वेगळ्याच ठिकाणी वळवण्यात मिडीया आणि राजकारणी पटाईत आहेत. लखनभय्या गुंड होता आणि इशरत दहशतवादी होती हे कुणीही नाकारू शकत नाही. कित्येकवर्ष कायद्याचा किस पाडून न्याय होत नाही. झटपट निर्णय किंवा न्याय मिळत नाही तेव्हा न्याय नाकारला गेल्याचीच भावना निर्माण होते. बोफोर्स खटल्यातले सर्व आरोपी मरून गेले तरी खटला आहे तिथेच आहे. पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये हे खरं, पण आयपीएस अधिकार्‍यांच्या लॉबीतलं  हे राजकारण जनतेच्या मुळाशी आल्याशिवाय राहाणार नाही. 


लोकसत्तामध्ये आलेली बातमी हेच सुचवते आहे काय?


'बनावट' चकमकीला आयपीएस अधिकार्‍यांमधील संघर्षांची झालर



आम्हालाही फासावर लटकवा!



Published: Sunday, July 14, 2013

छोटा राजनचा हस्तक लखनभय्या याची चकमक 'बनावट' असल्याचे न्यायालयाने शिक्कामोर्तब करण्याआधीच आयपीएस अधिकाऱ्यांमधील संघर्षांतून ही चकमक बनावट ठरविण्याचे जोरदार प्रयत्न झाले होते. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी इच्छुक असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याचा यामध्ये सहभाग असल्याची चर्चा आहे. या आयपीएस अधिकाऱ्यानेच चकमकफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा हे पुन्हा पोलीस दलात येऊ नयेत, यासाठी जंग जंग पछाडले होते. परंतु या वादात नाहक १३ पोलिसांसह २१ जणांचा बळी गेल्याची चर्चा आहे. मुंबईत गेल्या काही वर्षांत चारशे ते पाचशे चकमकी झाल्या. त्या वेळीही आयपीएस अधिकाऱ्यांच्या दोन गटातील संघर्ष वारंवार समोर आला होता. 

प्रदीप शर्मा यांना अडकविण्यासाठी या चकमकीची ढाल पुढे करण्यात आली. त्यातच लखनभय्या याचा भाऊ रामप्रसाद गुप्ता काही केल्या मागे हटण्यास तयार नव्हता. त्याचा पुरेपूर फायदा उठवीत आयपीएस अधिकाऱ्यांच्या गटाने शर्मा यांना या प्रकरणात अटक करविली. परंतु शर्मा यांच्या अटकेनंतर आणखी २२ जणही गजाआड झाले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच या प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे हे प्रकरण हातातून निसटले, अशी चर्चाही आता ऐकायला मिळत आहे. शर्मा निर्दोष सुटल्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांचा संबधित गट अस्वस्थ झाला आहे. परंतु शर्मा यांना शिक्षा ठोठावण्याच्या नादात या अंतर्गत राजकारणाशी काही संबंध नसलेल्या पोलिसांनाही शिक्षा भोगावी लागल्याचे बोलले जात आहे

21 March, 2013

सलाम सुर्यवंशी



वर उन्हाचा तडाखा
खाली माजाचा भडका
कसा करावा सामना ?
असे प्रसंग हा बाका

गाडी तुफान हाकतो
शिवी पोलिसांना देतो?
आमदार असल्याचा
मग्रुरीत हा रहातो

हक्क भंगाची नोटीस
की पोरखेळ चाले ?
विधीमंडळात का रे
हे गुंड घुसलेले

होता कसाब परका
त्याचा सुरक्षेवर हल्ला
इथे सदस्य आपला
घाली कायद्यावर घाला

कुणाचे हे राज्य ?
न्याय देणार कुणाला?
पोलिसच असहाय्य
वाली नसे उरलेला

नरेंद्र प्रभू

13 January, 2013

कायदा आणि सुव्यवस्था सरकारलाच नको आहे का?




कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी वसंत ढोबळींची पुन्हा बदली झाली आहे. ज्या सांताकृझ  आणि पारले परिसरात त्यांची नियुक्ती होती त्या परिसरात गेले काही महिने आम्ही कायद्याच राज्य अनुभवत होतो. इथले लोकप्रतिनिधी आणि त्यांचे बगलबच्चे यांच्या अनिधिकृत कामांवर ढोबळेसाहेबांनी अंकूश बसवला होता. इतरवेळा परप्रांतीय फेरीवाल्यांनी व्यापलेले रस्ते ढोबळेसरांच्या काळात अचानक चालण्या योग्य झाले. दोन महिन्यांपुर्वी पारले कट्ट्या वर त्यांचे आश्वासक शब्द कानावर पडले आणि उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाव्दारे  मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

अनधिकृत काम रोखणे हे पोलीसांचं कर्तव्यच आहे, पण हे करणार्‍यावर जर, जे आज तुरूंगात पाहिजे होते त्यांच्या सांगण्यावरून कारवाई होत असेल तर........., तर आम्ही सामान्य नागरिकांनी जावं कुठं? दिल्लीत बलात्कार झाला, सारा देश हादरला, इथे मुंबईत हा कायदा आणि सुव्यवस्थेवरचा बलात्कार नव्हे का?          

26 August, 2012

कायद्यावर घाला! जनात आणि वनातही.



देशात आणि राज्यात अखंड अवनतीचंच राज्य सूरू आहे. इथल्या संविधानावर, कायद्यावर, निसर्गावर राजरोसपणे हल्ला होतो आहे. राजकीय नेतृत्व हतबल आणि संभ्रमावस्तेत चाचपडताना दिसत आहे. गुंडापुंडांच्या हातात सत्ता गेल्यासारखं वाटत राहतं. महाराष्ट्रातील सव्यसाची आणि झोकून देऊन काम करणार्‍या मानमीय व्यक्तिंपैकी राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचा लेख कायद्याचे राज्य आहे कुठे? (११ ऑगस्टाची दंगल)  आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची  पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया (पश्चिम घाट परिसर अभ्यास अहवाल) मुलाखत आजच्या लोकसत्ता मध्ये आली आहे. शहरात आणि गावात चाललेली अंधाधुंदी या वर प्रकाश टाकणारे आणि विचारकरायला लावणारे हे लेख जरूर वाचच.


गाडय़ांना आगी लावत, पत्रकारांवर पाशवी हल्ले चढवत, पोलिसांना जीवघेणं बदडून काढत आणि त्यांच्या बंदुका, काडतुसे हिसकावून घेऊन गुंड पळून जात असताना आणि सर्वात कळस म्हणजे महिला पोलिसांचा भरदिवसा हे पशुतुल्य हल्लेखोर विनयभंग करत असताना पोलिसांनी काय करायचे? महात्माजींच्या सत्याग्रहीप्रमाणे हात जोडून त्यांनी गुंडांना विनंती करायची, की कायद्यानं दिलेला अधिकार वापरून हा हिंसाचार, विनयभंग थांबवायचा? पोलिसांचा हा अधिकार का काढून घेतला गेला? हा संयम, ही पळवाट, की कायदे बिनदिक्कत तोडणाऱ्यांना पोलीस नेतृत्वाने आणि राज्यकर्त्यांनी दिलेले हे उत्तेजन? या राज्यात कायद्याचे राज्य आहे तरी काय, असा हतबल करणारा प्रश्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात उभा राहतो.  पुढे वाचा>>>    

            
पश्चिम घाट परिसर अभ्यासाच्या समितीने सारे वास्तव अहवालात मांडून  सूचना केल्या. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांचा त्यात सहभाग होता. पण ते बदलून जाताच मंत्रालयाने अचानक ठरविले, आमचा अहवाल दडपून ठेवायचा. नव्या मंत्री जयंती नटराजन यांना विनंती केली, की मी तुम्हाला भेटू इच्छितो, म्हणजे या अहवालात काय आहे ते सांगता येईल, नंतर तुम्ही काय तो निर्णय घ्या. मात्र, त्यांनी भेट नाकारली.
मग लोकांनी माहिती अधिकाराखाली तो अहवाल मागितला व माहिती आयुक्तांनी आणि नंतर उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढून तो जाहीर करायला लावला..
पर्यावरण तज्ज्ञ आणि पश्चिम घाट परिसर अभ्यासाच्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख डॉ.माधव गाडगीळ यांनी लोकसत्ताच्या आयडिया एक्स्चेंजकार्यक्रमात साधलेला मुक्त संवाद. पुढे वाचा>>>  


09 April, 2011

प्रत्यक्ष कृती (Direct Action)



आपल्या डोळ्यासमोर अनेक चुकीच्या गोष्टी घडत असताना आपण तिकडे दुर्लक्ष करतो किंवा चालायचच म्हणून पुढे जातो. हे असं वारंवार घडत जातं आणि आपण आपल्या आयुष्यात संवेदनशीलताच गमावून बसतो. मुंबईसारख्या शहरात तर अशा कितीतरी गोष्टीकडे आपणाला कानाडोळा करावा लागतो, पण या मुळेच गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावते. माणसांवर होणार्‍या अन्यायाला इतर कुणी नाही तरी तो स्वत: वाचा फोडू शकतो. पण प्राण्यांवर होणार्‍या अन्यायाचं तसं नसतं. त्याला सजग नागरीकांनी वाचा फोडावी लागते. असच एक पुण्यकर्म माझे मित्र विलास आम्रे यांनी नुकतच केलं आणि मला हे पोष्ट लिहावं लागलं. त्याचं असं झालं.....

मालाड-मार्वे रस्त्यावरून विलास तिन्हीसांजेच्या वेळी घाईत निघाले होते. रस्त्याच्या कडेला दोन कामगार सिमेंटच्या पिशवीत काहीतरी घेऊन बसले होते. त्या पिशवीची थोडी हालचाल होताना दिसली म्हणून विलासनी जवळ जावून पाहिलं, तर त्या पिशवीमधून चिखल बाहेर येताना दिसत होता. निरखून पाहिल्यावर ते एका कासवाचं डोकं असल्याच ध्यानात आलं. त्या कामगाराला त्यानी प्रश्न केला हे काय आहे ?
तो    : कछुवा है ।
विलास : इसका क्या करोगे?
तो    : बेचना है।
विलास : कितने मे?
तो    : दो सौ।
विलास : किधरसे लाया?
तो    : बगलवाले नाले से।
विलास : आप यह बेच नही सकते। ऎसा करना गुनाह है।
एवढा संवाद झाल्यावर विसंवाद सुरू झाला. त्या कामगाराचा साथीदार विकण्यावर ठाम होता. आजूबाजूचे लोकही जमा झाले. त्यात काही तो कासव विकत घेणारे आणि त्याचं मटण करून खाणारे होते. बाचाबाची वाढत असतानाच विलासनी आपल्याजवळ असलेलं BNHS (Bombay Natural History Societyचं कार्ड काढलं,त्याला दाखवलं, त्या कामगाराला बकोटीला घरून उभा केला आणि पोलिसांकडे चलं म्हणाले. वन्यप्राणी कायद्यानुसार तुम्हाला कारावासाची शिक्षा होवू शकते. असे प्राणी पकडून ते विकणे हा गुन्हा आहे. आता मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत बघता बघता विलासनी उग्र रुप धारण केलं. त्या गर्दीत असलेल्या काही तरूणांनी विलासनां सपोर्ट केला.

हेच ते तेली कासव ज्याला विलासनी जीवदान दिले. 
एव्हाना ते कामगार चांगलेच वरमले होते. विलासच्या म्हणण्यानुसार ते त्या कासवाला सोडायला तयार झाले. विलासनासुद्धा त्या हातावर पोट असणार्‍या कामगारांची मनातून  दया आली होती. त्यानी त्या कामगाराना शंभर रुपये दिले. ते कासव ताब्यात घेतलं आणि आपल्या काही निसर्गप्रेमी मित्रांना फोन करून ही हकिकत सांगितली आणि बोलावून घेतलं. आता ते कासव पालिकेच्या तलावात सुटकेचा श्वास घेत आहे आणि जीवदान मिळालं म्हणून विलासना आशिर्वाद देत आहे.

नुसतं हळहळत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला किती महत्व आहे नाही का? 


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates