परिक्षीत राजाला राज्य कारभार सोपवून पांडव
हिमालयात निघून गेले, भगवान श्रीकृष्णांनी
वैकुंठाला प्रस्थान केलं आणि नेमकी त्याच वेळी कलीयुगाला सुरूवात झाली. कलीयुगाचा आरंभ
झाला आणि सत्ययुग, त्रेतायुग आणि व्दापारयुगातले
नियम बाजूला पडून कलीयुगातल्या सुंदोपसुंदीला सुरूवात झाली. प्रजाहित दक्ष आणि कर्तव्यनिष्ठ
राजा परिक्षीत एकदा शिकारीला गेला असताना त्याचा कलीशी वाद झाला, राजाने कलीला पृथ्वीवरून
निघून जायला सांगितलं पण आता व्दापारयुगाची समाप्ती झाली असून माझं इथेच रहाणं आवश्यक
आहे असं कलीने सांगितलं आणि रहायला जागा मागितली, मग परिक्षीत राजाने त्याला द्यूत, मद्यपान, परस्त्रीगमन आणि हिंसा
या चार ठिकाणी रहायची परवानगी दिली. पण एवढी चारच ठिकाणं पुरेशी नसून आणखी एखादं ठिकाण
तरी द्यावं अशी कलिने मागणी केली. परिक्षीत राजाने मग त्याला सोन्यात रहाण्याची परवानगी
दिली. मान हालवून कली निघून गेला आणि काही वेळातच गुप्तरुपात येवून राज्याच्या मुकुटात राहू लागला.
दिवसभर जंगलात फिरून राजा दमून गेला, फिरता फिरता तो शमिक
ऋषिंच्या आश्रमाजवळ आला. ऋषि ध्यानात मग्न होते, राजाने प्यायला पाणी मागितलं पण ऋषिंची समाधी लागली
होती. राजाने तीन-चारदा विनंती करूनही ऋषि बोलेनात तेव्हा मुकुटातल्या कलीने संधी साधली
आणि राज्याच्या विवेकाला हुलकावणी देवून, विवेकाला बाजूला सारून त्याला क्रोधयुक्त केलं, राजाने मरून पडलेला
साप ऋषिंच्या गळ्यात अडकवला. तेव्हढ्यात शमिक ऋषिंचा पुत्र शृंगी नदीवरून परत आला.
त्याने ते दृष्य पाहून राजाला शाप दिला की सात दिवसात महाविषारी तक्षकाच्या दंशामुळे
तू मरण पावशील.
महालात परत येवून राजाने जेव्हा मुकूट काढून
ठेवला तेव्हा त्याला आपली चूक कळून चुकली. त्या तक्षकापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने
एका बंद पिंजर्यात स्वत:ला कोंडून घेतलं पण भुकेने व्याकूळ झाल्याने त्याला फलाहाराची
इच्छा झाली. राजाने गोड बोरं मागवली, त्या बोरात लपलेल्या तक्षकाच्या अळीचा पिंजर्यात प्रवेश झाला. तीच्या दंशाने
राजाचा अंत झाला.
कोरोनाच्या विषाणूने आपल्याला असंच कैद केलं
आहे किंवा त्याच्यामूळे आज आपण घरात बंद झाले आहोत. राज्याच्या फळाच्या आशेने जशी तक्षकाला
संधी मिळाली तशी संधी आपण कोरोनाला देता कमा नये. आज राजा आणि रंक सगळेच एका पातळीवर
आले आहेत किंवा आपण सगळेच राजा झालो आहोत. परिक्षीतासारखी चूक करूया नको.
No comments:
Post a Comment