27 February, 2022

Memoir

 


फुल फुलल्यानंतर त्याचा सुगंध सर्वदूर पसरतो पण ते उमलताना पहीलं म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे काय त्याची प्रचिती येते. कला विकसीत होताना पहायला मिळणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. सौ. रेखाताई भिवंडीकर या त्यापैकी एक आहेत. त्याच्या कलेची परीपक्वता न्याहाळायची असेल तर अशी संधी आपणाला उद्याच चालून येणार आहे. 


सुप्रसिद्ध चित्रकर्त्या सौ. रेखाताई भिवंडीकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या 

चित्रांचं
मेमोयरहे एकल चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, हिरजी जहांगीर कलादान,१६१ बी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे मांडण्यात येणार आहे.  सदर प्रदर्शन दि. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.


सौ. रेखाताई भिवंडीकर या उत्तम छायाचित्रकार आहेत. उत्तम निसर्ग छायाचित्रं टिपणं हा त्यांचा छंद आहे. पण कुंचल्यातून चित्र साकार करताना कॅनव्हासवर जे उमटतं त्यांची रचना त्यांच्या स्मृतीपटलावर कितीरती आधीच झालेली दिसते. त्यांच्या संस्मरणातून साकार झालेली चित्रं पहाताना आपण आपल्याच बालपणातील जगात कधी पोचतो हे समजत देखील नाही. विविध माध्यमातील आणि शैलीमधील चित्रं साकारताना त्याना नकळत त्यांची स्वता:ची अशी एक शैली सापडली आणि मग रंग-कुंचल्याचा जो अविष्कार कॅनव्हासवर झाला त्यातून ही चित्रमालीका कला रसिकांच्या भेटीला येत आहे.   

आई आणि मुलीचं साधेपणात व्यतीत झालेलं जीवन, त्यालील बारकावे, प्रेम, जिव्हाळा, निखळ मैत्री, ममता अशी सौदर्य स्थळं,आणि उमदेपणा, भावूकपणा  यथार्थवादी शैलीमध्ये रेखातांईंच्या चित्रांमधून प्रतिबिंबित झाला आहे. मानवी जीवनाची ही लड त्यानी किती हळूवारपणे कॅनव्हासवर उतरवली आहे ते अनुभवण्याची सुवर्णसंधी मुंबईकर कला रसिकांनी मिळणार आहे याचा जरूर लाभ घ्यावा.

नरेंद्र प्रभू

       


09 February, 2022

हिम्मतवान



कितीही मोठं संकट आलं तरी हार न मानता त्याला सामोरं जात प्रयत्नांची पराकाष्ठा करत यशस्वी होणारी माणसं आपल्याला सतत प्रेरणा देतात. मित्रवर्य आत्माराम परब यांच्यामुळे सौ. स्मिता बापट-जोशी यांच्याशी परिचय झाला आणि त्यांचा चिरंजीव सिद्धार्थ याच्याशी दोस्ती झाली. जसं सिद्धार्थ हा स्मिता बापट-जोशी यांचा मुलगा एवढीच त्याची ओळख सांगाता येणार नाही तशीच सौ. स्मिता बापट-जोशी या सिद्धार्थची आई एवढीच त्यांची ओळख सांगता येणार नाही. ही दोन्ही व्यक्तिमत्व जाणून घ्यायची तर राजहंस प्रकाशनाचं आयुष्याचं जिगसॉ पझल सोडवणारा सिद्धार्थ हे पुस्तक वाचलं पाहिजे.



ईशाटूर्सच्या नुकत्याच पार पडलेल्या वाराणसी-प्रयागराज-अयोध्या-लखनौ या सहलीत या दोन्ही मायलेकाला जवळून वाचता आलं आणि जीवनाचे अनेक पैलू पुन्हा एकदा समजून घेता आले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस, २०१९ मध्ये चमकाणारा सिद्धार्थ स्वत:ला सिद्ध करतोच पण हे घडताना त्याला स्मिता ताईंनी कसे पैलू पाडले असतील याचा अचंबा वाटतो. उव्दिगनेती खोल खाई याचा अर्थ खुप खोल आहे. स्वत:चा गुंता सोडवताना माणसांना आपल्यात गुंतवणारा सिद्धार्थ आज आपल्या पायावर उभा रहात आहे, आईवर खुप माया करणारा सिध्दार्थ आपल्याही मनात घर करतोच पण घराबाहेर पडून अनेक समाजोपयोगी उपक्रमात आनंदाने भाग घेतो हे ऐकून स्तिमित व्हायला होतं.

कोरोना काळात अनेकांनी हात-पाय गाळले पण याही काळात यांनी मन-मानी करून आणखी एक पाऊल पुढे टाकलंच. आईने डिझाईन केलेले टी-शर्टस सिद्धार्थने वितरीत करायला सुरूवात केली, केल्याने होत आहे रे हे सिद्ध केलं. खरं तर स्मिता ताई रोज जिगसॉ पझल सोडवत आहेत, एक एक भाग जोडत आहेत.


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates