Showing posts with label नाटक. Show all posts
Showing posts with label नाटक. Show all posts

07 May, 2024

मी आणि नथूराम


‘
मी आणि नथूराम’ हे. शरद पोंक्षेंचं चटका लावणारं पुस्तक वाचायला  घेतलं आणि एखाद्या कलाकाराने एका भूमिकेसाठी किती सोसावं याचं आश्चर्य वाटलं. वीस वर्षाच्या कालावधीत ज्या घटना घडत होत्या त्या, त्या त्या वेळी वाचनात येत होत्या पण त्याचं कलाकारानेच केलेलं एकत्रित कथन वाचताना अंगावर काटा उभा राहतो. एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नाटक सिनेमातून खोटेपणाचा कळस होत असताना दुसरीकडे सत्य कथन बळजबरीने बंद पाडणं, जाळपोळ आणि जीवघेणे हल्ले करणं असे प्रकार सर्रास सुरू होते. आणि या सगळ्याशी झुंज देत हा कलाकार आपलं काम कसं करत राहीला हे वाचताना अनेकदा कंठ दाटून येतो. जीवावर उदार होत, दुष्ट प्रवृत्तीचा सामना करत, प्रचंड अपमान आणि हाल सहन करत नथूराम जगवला,

नाटकासाठी एवढं सहन केलं हे समजण्या पलीकडचं आहे. एका मागोमाग एक घटना वाचकावर आघात करीत जातात आणि शरद पोंक्षें या प्रथित यश कलाकाराने या प्रत्यक्ष भोगलेल्या आहेत वाचून मन भरून येतं.          

‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ हे नाटक मी तीन वेळा पाहीलं. शिवाजी मंदिरचा तिसरा प्रयोग, नंतर बंदी उठल्यावरचा पार्ल्यातला दीनानाथ मधला प्रयोग आणि शेवटी नाटक बंद होतय असं समजलं तेव्हा ‘हे राम नथूराम’ पुन्हा एकदा दीनानाथलाच. एक नाटक नव्हे तर प्रत्यक्ष घटनाच समोर घडत आहे एवढा जिवंत अभिनय मराठी रंगभूमीवर पहायला मिळणं याला सुद्धा भाग्य लागतं.

नथूराम नाटकासाठी श्री. शरद पोंक्षेंनी जे भोगलं त्याला तोड नाही. ज्यांना काहीतरी अस्सल वाचायचं असेल त्यानी हे पुस्तक विकत घेऊन वाचावं आणि संग्रही ठेवावं. शब्दांमृत प्रकाशनाने हा निखारा वाचकाच्या हाती ठेवला म्हणून त्यांचंही अभिनंदन!  

12 November, 2018

हे मृत्युंजय- एक प्रेरणादायी नाट्य


  

साक्षात मृत्यु  आणि अंदमानच्या सेल्युलर कारागृहत कैद्यांचा थरकाप उडवणारा जेलर बारी यांच्यावर विजय मिळवणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हा विषय असलेलं ‘हे मृत्युंजय’ हे प्रेरणादायी आणि अंगावर शहारे आणणारं नाटक पहाण्याचा आज योग आला. पहिल्याच प्रवेशापासून प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेणारं हे नाटक पाहातना पहिल्यांदा सुत्रधाराच्या भुमिकेत वाटणारा ‘मृत्यु’ शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकरांना शरण येतो. वेळोवेळी आपल्या मिठीत येऊन अंदमानच्या अनंत यातनादायी जगण्यातून सुटका करून घेण्याचं सुचवतो पण:
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारीला रिपु मजसी असा कवण जन्मला?
असं विचारणारे स्वातंत्र्यवीर शेवटी ‘भिउनी मला भ्याड मृत्यु पळत सुटतो’ म्हणतात ते किती सार्थक होतं त्याची प्रचिती हे नाटक पाहाताना येतेच येते.

सेल्यलर जेलचं वातावरण हुबेहूब उभं केलय यात शंकाच नाही. अंदमानला सेल्युलर जेलमध्ये  मी दोन वेळा जाऊन आलो आहे म्हणून मी असं खात्रीपुर्वक म्हणू शकतो.  त्या जेलचा परिणामकारक  सेट, तो कोलू, काळ कोठडी या नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर रंगत जाणारा हा प्रयोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मठेपेच्या काळातला जिताजागता इतिहास आहे, तो काळ पुन्हा नव्याने जनमानसासमोर आणला गेला, जो पहण्याण्यासारखा, अनुभवण्यासारखा आणि त्याचावेळी अंतरमुख होण्यासारखाही आहे. कारागृहात किंवा त्याबाहेर असताना स्वातंत्र्यवीर सावरकरानी आपल्या क्रांतीकार्यात खंड पडू दिला नाही, पण जेलर बारीसारख्या क्रुरात्म्यासमोरही हार न मानता त्यानी हे महत्कार्य सुरूच ठेवलं हे विशेष. सहकैद्यांना प्रेरणा देत, इतिहासाचे केवळ दाखले न देता तो पुन्हा घडवण्याचा पराक्रम (आग्र्याहून सुटका/अंदमानच्या काळकोठडीतून सुटका) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केला हे पाहून आपण स्तिमित होतो.                            

सर्वच कलाकारांनी समरसून केलेलं काम, संहिता, संबाद, संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना सरस असलेला हा उत्तम नाट्य प्रयोग तिकिट न लावता  ‘स्वेच्छा देणगी’ ती ही प्रयोग संपल्यावर स्विकारण्याचं निर्मात्यांनी ठरवलं आहे हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य.  राष्ट्र भावनेचं स्पुलिंग चेतवणारा हा नाट्य प्रयोग प्रत्येक भारतीयाने अवश्य पाहिला पाहिजे.              

ता.क. राजकीय बंद्यांना अट्टल गुन्हेगारांहुनही वाईट वागणूक सेल्युलर कारागृहात दिली जात होती. त्याला सावरकरांच्या प्रेरणेने राजकैद्यांनी विरोध केला, एकाने कैद्याने “जेवणात गोम सापडली, मी शाकाहारी आहे “ असं म्हणतच जेलर बारीने त्याच्या तोंडावर मानवी मल भरलेली बालदी रिकामी करायला लावली असा प्रसंग आहे. आज मात्र एका राजकीय पप्पूने स्वत:च्या हाताने तो मल ग्रहण केला. काय करणार देवा ! ‘तेथे पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे काम नोहे.’  


  

30 August, 2016

CODE मंत्र



दहा दिवसांपूर्वी लेह मध्ये सीमेवर तैनात झालेल्या सैनिकांबरोबर लेह मध्ये होतो. तिथे त्यांच्या बरोबर रक्षाबंधनाचा कार्यक्रम ‘ईशा टूर्स’ ने आयोजित केला होता. दूर सीमेवर सैनिकांना भेटण्यात वेगळाचं थरार असतो, तो तिथे अनुभवला आणि आज परल्याच्या दिनानाथ मंदीरात ‘CODE मंत्र’ हे नाटक पाहिलं. संपूर्ण नाटक सीमारेषेच्या पार्श्वभूमीवर घडतं. या नाटकात चाळीसच्यावर कलाकार आहेत आणि त्या मधले बहुतेक सैनिकी वेषात आहेत. तिकडे खर्‍या सीमाभागात वावरणारे सैनिक, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमामधलं त्यांचं संचलन आणि इथे या नाटकात सैनिकाची भूमिका वठवणारे कलाकार यांच्या देहबोलीत फरक जाणवला नाही. स्टेजवर भूमिका हुबेहुब वठवणं हे सोपं काम नव्हतं.

आता नाटका विषयी. मराठी रंगभूमीवर अशा प्रकारचं, या विषयावरचं हे कदाचीत एकमेव नाटक असेल. अतिशय संपन्न नाट्यानुभूती! पहिल्या क्षणापासून हे नाटक प्रेक्षकाच्या हृदयाचा ठाव घेतं. नाटक संपेपर्यंत दूसरा विचारही मनाला शिवत नाही. एका थराराचे आपण प्रत्यक्ष साक्षिदार आहोत असं वाटत रहातं. सगळ्यांच्याच भूमिका लाजबाब.

‘लोकसत्ता संपादक शिफारस पात्र’ असं; मुक्ता बर्वे, अजय पुरकर, संजय महाडीक यांच्या अप्रतिम भूमिका असलेलं हे नाटक मराठी नाट्य रसिकांनी आवर्जून पहावं असंच आहे. इतरत्र चालू असलेल्या मनोरंजनाच्या गदारोळात एक अस्सल कलाकृती पाहिल्याच्या आनंद दीर्घकाळ टिकून राहील असं हे पैसा वसूल आणि अखेर पर्यंत खिळवून ठेवणारं नाटक पहाच.
      



   

                          

17 January, 2016

दोन स्पेशल – खरंच स्पेशल


‘नटसम्राट’ नाटक पाहिलं होतं, चित्रपट बघणार आहे, पण काल जितेंद्र जोशी, गिरीजा ओक आणि रोहित हळदीकर(ही) यांचं ‘दोन स्पेशल’ पाहिलं आणि त्या नाटकातच हरवून गेलो. एरवी नाटक, सिनेमे पाहताना पाठेमागे मनात काहितरी चालू असतं, पण या नाटकाने मनाची अशी काय पकड घेतली की भान हरपून जाणं म्हणजे काय ते समजलं.

जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक यांचा अभिनय हा ‘अभिनय’ न वाटता असं काही समोर प्रत्यक्षात घडत आहे असं वाटत रहावं इतका तो प्रत्ययकारी होता. नट ताकदीने आपली भुमिका वठवत असतो असं म्हटलं तर ते पेहेलवानच होते, नट भुमिका जगतो म्हणलं तर ते जगत होते. 

कुठेही अतिशयोक्ती नाही, निम्न मध्यमवर्गीय पात्र असूनही विलाप नाही, परिस्थितीशरणता नाही आणि दुसर्‍यावर दोषही नाही. हे सगळं नाटककाराचं कसब असलं तरी नट म्हणून जितेंद्र जोशींनी त्याला पुर्ण न्याय दिलाय, तसा तो गिरीजा ओक यांनी पण दिला.

काही घटना समोर घडत होत्या तर काही वर्णनामधून व्यक्त होत होत्या, पण त्या दोन्ही तितक्याच ताकदीने रसिकांसमोर मांडणं यासाठी हाडाचा कलावंत लागतो. जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक यांनी मौखीक अभिनयामधून समोर आणलेले प्रसंग ही म:नपटलावर चित्रीत केल्यासारखे उमटत होते. ही त्यांच्या संवादातली ताकद.                               

मनोरंजनाच्या गदारोळात आणि मालिकांच्या महामारीत एक उत्कृष्ठ कलाकृती पहायची असेल आणि उद्याचा नटसम्राट आज रंगमंचावर पहायचा असेल तर मित्रहो हे नाटक पहाच.  
     

याना बक्षिसी म्हणून काय द्यायचं.......  पुन्हा एकदा ते नाटक बघणारच. 


ता.क. पुढच्या रांगेत मृणाल देव, प्रतिक्षा लोणकर, प्रशांत दळवी, आसावरी जोशी अशी मराठी कलाकार मंडळी तर होतीच पण परेश रावल हा कसलेला कलावंतही या नाटकाचा आस्वाद घेत होता. 
         

05 August, 2012

रौप्यमहोत्सवी ‘चौरंग’




‘अशोक हांडे’ हे नाव उच्चारताच जबरदस्त मनोरंजन, सादरीकरणातली श्रीमंती, उत्तम नियोजन, कसलेले कलाकार, अभ्यासातून आलेली परिपूर्णता, उत्सव आणि उत्साह अशा अनेक गोष्टींची दंगल मनात उसळते. हा हा म्हणता चौरंगला पंचवीस वर्ष पूर्ण झाली. मंगलगाणी दंगलगाणी पासून सुरू झालेल्या या संगीतमय प्रवासाचा प्रत्येक टप्पा आणि कार्यक्रम मी जवळून पाहिलाय. उत्तरोत्तर होत जाणारी प्रगती आणि प्रयोगातील सातत्य हे तर आहेच पण एक मराठी ‘शो मॅन’ हे सगळं करतो आहे हे पाहून प्रत्येक नव्या कार्यक्रमाच्यावेळी उर भरून यायचा, अभिमान वाटायचा. मंगलगाणी दंगलगाणी, आवाज की दुनिया, आजादी ५०, माणिकमोती, गाने सुहाने, गंगा जमुना, अमृत लता, मधुरबाला, आपली आवड आणि अर्थातच मराठी बाणा, हे सगळे कार्यक्रम पाहाणे म्हणजे केवळ आत्मानंद होता. कार्यक्रमातून भारावून जाणारा रसिक अशोक हांडे हे नाव आपल्या हृदयावर कोरणारच अशी त्या प्रयोगांची छाप असायची, अजूनही तो सिलसिला चालू आहे. अशोक हांडेंच्या  चौरंग या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आशोक हांडे आणि चौरंगच्या संपूर्ण टिमला मझ्या मना पासून शुभेच्छा!


अशोक हांडेंनी हे मनोरंजन विश्व कसं उभं केलं याची एक झलक आजच्या लोकसत्ताच्या रविवार वृत्तांत मध्ये त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून वाचता आली  ती पूढे देत आहे.

‘चौरंगा’वर डाव मांडला!
रोहन टिल्लू, रविवार, ५ ऑगस्ट २०१२

‘मंगलगाणी दंगलगाणी’, ‘अमृतलता’, ‘मधुरबाला’, ‘मराठी बाणा’ यांसारखे अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर करणाऱ्या ‘चौरंग’ या संस्थेला ७ ऑगस्ट रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा प्रवास अभिमानास्पद तर होताच, पण त्याचबरोबर आव्हानात्मकही होता. या आव्हानांबद्दल आणि ‘चौरंग’च्या वाटचालीबद्दल ‘चौरंग’चे सर्वेसर्वा अशोक हांडे यांच्याशी केलेली ही बातचित..

गेल्या २५ वर्षांत तुम्ही अनेक दर्जेदार कार्यक्रम दिलेत. पण या सर्व कार्यक्रमांसाठीचं सांगीतिक बाळकडू नेमकं कुठे मिळालं?

हे बाळकडू आम्हाला पाजण्यात अनेक गोष्टींचा आणि गावांचा हात आहे. माझ्या बालपणाचा सुरुवातीचा काळ हा खेडेगावात वगैरे गेला. उंब्रज तालुक्यात आमचं गाव होतं. त्यामुळे ग्रामीण जीवन, बारा बलुते वगैरे आम्ही खूप जवळून पाहिलं होतं. या ग्रामीण जीवनात संगीताला, त्यातही लोकसंगीताला खूप वरचं स्थान आहे. लग्नापासून धार्मिक उत्सवांपर्यंत सगळीकडे लोकसंगीत अगदी ठासून भरलं आहे. त्यात तमाशाची पंढरी मानलं जाणारं नारायणगाव हे आम्हाला खूप जवळ. त्यामुळे तमाशाचा नादही (चांगल्या अर्थाने) लहानपणापासूनच लागला. शेतावर राखणीला मामाबरोबर जायचो. आम्हाला तमाशाचं वेड लागलं, त्याला कारण आमचा हा मामा! आम्ही राखणीला म्हणून जायचो आणि पाच किलोमीटर लांब धावत जाऊन तमाशा बघून यायचो. तर तात्पर्य हे की, लोकसंगीताचे संस्कार आमच्यावर लहानपणापासूनच झाले.


मग मुंबईचा प्रभाव तुमच्यावर नेमका किती आणि कसा पडला?

मुंबईचा म्हणण्यापेक्षाही रंगारी बदक चाळीचा प्रभाव माझ्यावर जास्त पडला. ही चाळ म्हणजे मुंबईतला महाराष्ट्र होता. महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागातून लोक त्या चाळीत राहायला आले होते. ते आले ते त्यांची संस्कृती, लोकसंगीत वगैरेंची परंपरा घेऊनच आले. त्यामुळे रंगारी बदक चाळीत प्रत्येक सण साजरा करण्याची वेगवेगळी तऱ्हा होती. त्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लाऊडस्पीकरवरून चालणारी गाणी. जुनी गाणी सतत वाजायची आणि आमच्या कानी पडायची. त्यामुळे त्या गाण्यांचे शब्दच नाही, तर दोन कडव्यांमधलं संगीतही अगदी मनात कोरलं गेलंय. याचा फायदा मला ‘आवाज की दुनिया’, ‘अमृतलता’, ‘मधुरबाला’ वगैरे कार्यक्रम करताना झाला.


हे संस्कार तुमच्या बरोबरच्या प्रत्येकावरच झाले असतील. पण मग अशोक हांडे, चौरंग आणि एकापेक्षा एक यश संपादन करणारे अनेक कार्यक्रम हा सिलसिला कसा सुरू झाला?

अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण या संस्कारांबरोबरच चिकित्सक शाळेत मी नाटकंही करायचो. रुपारेल कॉलेजमधून एकांकिका केल्या होत्या. कॉलेजच्या एनएसएस युनिटचा प्रमुख म्हणूनही मी जबाबदारी सांभाळली होती. त्या वेळी इंटरला असताना मंगल वाचनात दुर्गाबाई भागवतांचा ‘महाराष्ट्राची दगडी शीर’ नावाचा धडा होता. त्याचबरोबर शि. म. परांजपे यांचा ‘खरं सोनं’ हा धडाही होता. या दोन धडय़ांवरून मला ‘पसायदान ते कसाईदान’ची कल्पना सुचली. त्यावेळी पु. लं.चा ‘तीन पैशांचा तमाशा’ जोरात चालू होता आणि त्यात हे कसाईदान होतं. त्यातून मी ते उचललं आणि १९७७मध्ये रुपारेल कॉलेजच्या एनएसएस युनिटसाठी हा कार्यक्रम पहिल्यांदा सादर केला. तो सगळ्यांना खूपच आवडला. मग त्याच वर्षी कॉलेज डेलाही तो केला. मी १९८०मध्ये मुलुंडला राहायला आलो. तिथे आम्ही ‘संस्था मुलुंड’ या संस्थेतर्फे तो मुलुंडमध्ये केला. मग विरंगुळा म्हणून गणपतीत वगैरे तो होतच राहिला. पुढे ३० एप्रिल १९८७मध्ये ‘नाटय़दर्पण रजनी’ या कार्यक्रमात ‘पसायदान ते कसाईदान’ आम्ही सादर केला. त्या वेळी एका वर्तमानपत्रात असं छापून आलं होतं की, यंदाच्या नाटय़दर्पण रजनीचं एकमेव फलित म्हणजे अशोक हांडे आणि त्याचा ‘पसायदान ते कसाईदान’ हा कार्यक्रम. तर त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम व्यावसायिक मंचावर आणण्याचं ठरवलं. त्यासाठी ७ ऑगस्ट १९८७ रोजी ‘चौरंग’ नावाची संस्था स्थापन केली आणि ‘पसायदान ते कसाईदान’चा ‘मंगलगाणी दंगलगाणी’ झाला.


‘आझादी ५०’ करताना भारताच्या स्वातंत्र्याची पन्नास वर्षे, हीच कल्पना डोक्यात होती का?

तसंच काही नाही. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने एखादा कार्यक्रम केला जावा, अशी इच्छा कोलकातामधील एका संस्थेने व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम हाती घेतला. पण या कार्यक्रमाची बीजं खूप लहानपणीच मनात रोवली गेली होती. मी चौथीत असताना आम्हाला शिंदे नावाचे सर शिकवायला होते. ते नेहमी एक कविता म्हणून दाखवायचे. 
‘
गजनी, घोरी, गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद, लोदी
सुलतान वेशी राज्य मिळविले, दिल्लीची गादी’
ही कविता मनात घर करून बसली होती. ‘आझादी ५०’ करताना या कवितेची खूपच मदत झाली. 


हात घालेल त्या कार्यक्रमात ‘चौरंग’ने तुफान यश मिळवलं. पण त्यामागे अशोक हांडे नावाच्या कलाकारासह त्यात दडलेला व्यावसायिक आणि व्यवस्थापकही होता. हा व्यवस्थापक कसा घडला?

याला सर्वात मुख्य कारण म्हणजे आमचा परंपरागत आंब्यांचा धंदा. या आंब्यांनी मला व्यवसायाचा रस पाजला. लहानपणापासून वडिलांबरोबर आम्ही या धंद्यात भाग घेतला होता. त्यांनीच आम्हाला धंदा कसा करावा, याचं प्राथमिक शिक्षण दिलं. मग पुढे आम्हीही अनुभवातून शिकत गेलो. तर माझ्यातला व्यावसायिक हा कदाचित त्या ‘जीन्स्’मधून घडला असावा. पण व्यवस्थापक मात्र मी स्वत: घडवला. कॉलेजमध्ये असताना माझ्या प्रत्येक एकांकिकेचं प्रॉडक्शन कंट्रोल नेहमी मीच केलं आहे. मुलुंडमधील आमच्या संस्थेचं व्यवस्थापनही मीच केलं होतं. सुरुवातीला ‘मंगलगाणी दंगलगाणी’ फार चालला नाही. पण आम्ही लंडनचा दौरा करून आल्यावर इथेही तो कार्यक्रम धो धो चालायला लागला. आमचे पहिले तीनशे-चारशे प्रयोग रिकामेच गेले होते. पण माझ्यातल्या व्यवस्थापकाने आणि व्यावसायिकाने हार मानली नाही. तसंच या आंब्याच्या धंद्यामुळे मी खूप फिरलो. त्याचाही फायदा मला दौरे आखताना झाला.


तुमच्या प्रत्येक कार्यक्रमापाठी एक तरी कथा आहे. त्याबाबत काही सांगाल का?

उगाच करायचा म्हणून मी कधीच कार्यक्रम केला नाही. त्या कार्यक्रमाला काही तरी हेतू हवा. तो नसेल, तर मग त्याला काही अर्थच राहत नाही. लताजींचा अमृतमहोत्सव झाला, तेव्हा एका वाहिनीवर त्यांच्या गाण्यांचा रिमिक्स कार्यक्रम सादर झाला होता. मला तो प्रचंड खटकला आणि त्याबाबत संतापही आला. एका महान गायिकेचा अमृत महोत्सव अशा प्रकारे साजरा व्हावा, याची खंत बोचत होती. त्यातूनच ‘अमृतलता’ समोर आला. माणिक वर्मा या शास्त्रीय आणि भावगीत हे दोन्ही प्रकार गाणाऱ्या माझ्या मते एकमेव गायिका. त्यांच्या मृत्यूनंतर भारती आचरेकर यांनी माझ्याकडे माणिक वर्मावर एखादा कार्यक्रम करावा, अशी विनंती केली होती. त्यातून ‘माणिकमोती’ तयार झाला. तीच कहाणी ‘गंगा-यमुना’ या कार्यक्रमाची. आपल्याकडे ‘रुपेरी पडद्याला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्न’ याच नजरेने मधुबालाकडे बघितलं जातं. पण त्या सौंदर्यवतीला आयुष्यात खूप सोसावं लागलं. ते सर्व मी ‘मधुरबाला’च्या रूपात मांडलं. ‘यशवंत’ या कार्यक्रमात तर यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याची संधी मिळाली.


पण तुमचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘मराठी बाणा’. तर हा ‘बाणा’ नेमका कसा तयार झाला?

आम्ही नवीन शतकाच्या स्वागतासाठी सांगलीत ‘स्वागत-२०००’ हा कार्यक्रम केला होता. त्यात गेल्या शतकात सांगलीचं नाव मोठं करणाऱ्या सांगलीच्या सुपुत्रांचा आढावा घेतला होता. त्या वेळी सांस्कृतिक आणि सांगीतिक क्षेत्रात भलंमोठं योगदान देणारे अनेक कलाकार आणि त्यांची कला समोर आली. त्या निमित्ताने इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. हा कार्यक्रम नंतर २२ ऑक्टोबरला गगनगिरी महाराजांच्या आश्रमात झाला होता. त्या वेळी तर लोक अक्षरश: बेभान झाले आणि त्याच वेळी आम्ही हा कार्यक्रम एका नव्या नावाने व्यावसायिक स्वरूपात आणायचं ठरवलं. नाव ठरलं, ‘मराठी बाणा’. विचार करा, २२ ऑक्टोबरला आम्ही हा कार्यक्रम करायचं ठरवलं आणि त्याचा पहिला प्रयोग अक्षरश: दहा दिवसांत मी दीनानाथ नाटय़मंदिरात १ नोव्हेंबर रोजी केला.


या यशात कलाकारांचा आणि ‘चौरंग’शी संबंधित सर्वाचाच वाटा असेल ना? मग हे कलाकार नेमके कसे निवडलेत आणि सांभाळलेत?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ‘चौरंग’मध्ये पंक्तिभेद अजिबात नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे, सर्वाना सारखी वागणूक मिळते. दौऱ्याच्या वेळी मी जे खातो तेच माझे कलाकारही खातात. तसंच आमच्याकडे चार बसेस आणि चार टेम्पो आहेत. सगळे कलाकार व्यवस्थित झोपून जातात आणि कपडेपट, सेट वगैरेही अगदी व्यवस्थित पोहोचतात. ‘चौरंग’साठी काम करणं, म्हणजे जास्तीत जास्त कार्यक्रम आणि कमीत कमी त्रास, हे कलाकारांना माहीत झालं आहे. त्यामुळे कलाकार आमच्याकडे अगदी आवर्जून काम करत असतात.


पंचवीस वर्षांची यशस्वी वाटचाल आणि एकापेक्षा एक दणकेबाज कार्यक्रम यानंतर आता ‘चौरंग’ काय घेऊन येणार आहे?

सुनील गावस्कर नेहमी सेन्चुरी केली की नव्याने गार्ड घ्यायचा. त्याचप्रमाणे आम्हीही आता पुन्हा एकदा गार्ड घेणार आहोत. आमचे सध्याचे कार्यक्रमच एवढे तुफान चालू आहेत की, सध्या तरी नवीन असं काहीच करत नाही. पण लवकरच आम्ही प्रेक्षकांसाठी नवीन कल्पनेवर आधारित कार्यक्रम नक्कीच घेऊन येऊ.  



26 June, 2011

हे नाटक बघाच




काल बर्‍याच दिवसांनी शिवाजी मंदिरला नाटक बघायला गेलो होतो. पहिल्या काही मिनिटातच ‘लव्हबर्डस’ या नाटकाने मनाची पकड घेतली आणि ती नाटक संपेपर्यंत कायम राहिली. रंगमंचावर अतिशय वेगाने घटना घडत होत्या आणि त्या प्रेक्षागृह मंत्रमुग्ध होवून पाहात होतं. बर्‍याच वर्षांनंतर असा थरार रंगमंचावर पाहिला.

अमृता सुभाष, अनिकेत विश्वासराव, गिरीश साळवी आणि केतकी सराफ सर्वांचेच अभिनय वाखणण्याजोगे, अमृता सुभाष तर भुमिका जगतेय असंच वाटत होतं. थोडक्यात काय, एक सर्वांगसुंदर नाटक बघायलाच हवं असं. हे नाटक बघाच.  

04 December, 2010

अवघा रंग एकचि झाला, सर्वांग सुंदर संगीत नाटक



कालच ‘अवघा रंग एकचि झाला’ हे नाटक बघीतलं. बर्‍याच वर्षांनंतर संगीत नाटक बघायला गेलो होतो, गेल्या काही वर्षात संगीत नाटकाची परंपरा खंडीत झाल्यासारखी झाली होती. जुने कलाकार पडद्याआड गेले आणि नव्या पिढीला संगीत नाटक आवडेल की नाही किंवा जुनी संगीत नाटकं आताच्या काळानुरूप नसल्याने ती चालतील का? या साठमारीत प्रेक्षक संगीत नाटकांना मुकले होते, पण ‘अवघा रंग एकचि झाला’ या नाटकाने ती उणीव भरून काढली असं नाटक पाहिल्यावर आपण नक्की  म्हणू शकतो. किंबहूना जुनी आणि नवी पिढी यातला वैचारीक संघर्ष, जनरेशन गॅप, आणि मुळात स्वार्थी नसल्याने जमवून घेण्याची वृत्ती हाच या नाटकाचा मुळ गाभा आहे. जुनं ते सोनंच पण ते नव्या युगात मंडताना त्याला झाळाळी कशी प्राप्त होईल हे पाहिलं पाहिजे हा नव्या पिढीचा आग्रह शेवटी मान्य होतो.

अमोल बावडेकर
ग्लोबल खेड्यात आता जात, धर्म या गोष्टींना थारा नाही. माणसं मनाने एकत्र आली पाहिजेत मग भाषा, प्रांत, जात, देश यांची बंधनं तुटून पडतात आणि अशी जवळ आलेली माणसं गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकतात हा संदेश या नाटकाने दिला आहे.

प्रसाद सावकार, अमोल बावडेकर, गौतम मुर्डेश्वर, जान्हवी पणशीकर, रश्मी मोघे या सर्वांचेच अभिनय आणि गायकी यांना प्रेक्षकांची दाद मिळत राहते आणि नाटक उत्तरोत्तर रंगतच जातं.  नाट्यसंपदाचं हे नाटकही यांच्या लौकीकाला शोभेलसच आहे. लवकरच या नाटकाचा तीनशेवा प्रयोग सादर होणार आहे. आपल्या जवळच्या नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग लागेल तेव्हा तो पहाच, आपल्याला एक सर्वांग सुंदर संगीत नाटक पाहिल्याचा आनंद नक्कीच मिळेल.  
           

22 November, 2009

वस्त्रहरणचा पाच हजारी प्रयोग


प्रयोग पाच हजारावा

काल षण्मुखानंद हॉलमध्ये वस्त्रहरणचा पाच हजारावा प्रयोग जल्लोषात साजरा झाला. गेल्या आठ दिवसांपुर्वीच शो हाऊसफुल्ल झाल्याच्या बातम्या होत्या. प्रेक्षागृह तुडुंब भरलं होतं. सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती मछिंद्र कांबळींवरचा स्नेह प्रगट करत होती. पाहुणे कलाकर सर्वश्री प्रशांत दामले, भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे, अतुल परचुरे, सिद्धार्थ जाधव, पंढरीनाथ कांबळे, जितेंद्र जोशी, किशोर चौघुले, जयवंत वाडकर यांनी तर बहारच उडवून दिली होती. एवढा हशा त्या प्रेक्षाग़ृहाने क्वचितच पाहीला असेल. नेहमी समरस झाल्याचं नाटक करणारे राजकिय नेते खुर्चीला खिळून होते.

मच्छिंद्र कांबळीं हे विनोदाचे बादशहा होते हे निर्विवादपणे मान्य करावं लागेल. नाटक मग ते मालवणी असो की मराठी रंगमंचावर प्रवेश केल्याक्षणी ‘तो आला, त्याने पाहीलं आणि त्याने जिंकलं’ हे समिकरणच होवून गेलं होतं. मच्छिंद्र कांबळींची अनेक नाटकं पाहीली संवाद फेक, टायमींग आणि अभिनय या सर्वातच तो ‘बाप’ माणूस होता. कारकीर्दीच्या अत्युच्य शिखरावर असतानाच त्यानी घेतलेलीच एक्झीट म्हणूनच चटका लावणारी होती. कालचा प्रयोग जसा उत्सवी होता तसाच तो मच्छिंद्र कांबळींना आदरांजली वाहणारा पण होता. जातीचा कलावंत असलेल्या मच्छिंद्र कांबळींनी मालवणीला प्रतिष्ठा मिळवून दिली तिला सातासमुद्रापलिकडे नेलं. त्या मालवणी राजाक मानाचो मुजरो.

10 November, 2009

वस्त्रहरण प्रयोग क्र. ५०००


तमाम मराठी मुलूखाला, नाट्यरसिकांना आणि विशेषकरून मालवणी जनतेला आनंदाची पर्वणी म्हणजे वस्त्रहरण या नाटकाचा होऊ घातलेला ५००० वा प्रयोग. मा. गंगाराम गव्हाणकर यांनी लिहीलेलं आणि स्व.मच्छिंद्र कांबळी यानी गाजवलेलं आणि जगवलेलं हे नाटक खरंतर शिवाजी पार्क येथे देशाच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत साजरं व्हावं अशी मच्छिंद्र कांबळींची इच्छा होती. ते हयात असते तर ते झालंही असतं. तसा योग नव्हता, पण आता वस्त्रहरणचा ५००० वा प्रयोग षण्मुखानंद हॉलमध्ये २१ नोव्हेंबरला होत आहे. पु.ल. देशपांडे यांनी अस्सल फार्स म्हणून गौरवलेलं हे नाटक जेव्हा सातासमुद्रा पलिकडे पयोग करायला चाललं होतं तेव्हा, मास्टर भगवान, डॉ.काशिनाथ घाणेकर, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, अचिन पिळगावकर, विजू खोटे, बाळ धुरी ह्या रथी-महारथीनी मदतीसाठी एक प्रयोग षण्मुखानंद हॉलमध्येच केला होता. आता २१ नोव्हेंबरला पाहुणे कौरव-पांडव आहेत, प्रशांत दामले, भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे, अतुल परचुरे, सिद्धार्थ जाधव, पंढरीनाथ कांबळे, जितेंद्र जोशी, किशोर चौघुले, जयवंत वाडकर आणि तात्या सरपंच संतोष मयेकर.

मराठी नाट्य क्षेत्रातले हे सुवर्ण क्षण याची देही याची डोळा पहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. मी त्या दिवसची आतुरतेने वाट पहात आहे.


04 October, 2009

मदन भूल


नेहरू सेंटरचा तेरावा नाट्य महोत्सव सुरू झाला आहे. काल पहिल्याच दिवशी ‘मदन भूल’ हे नाटक होतं. या नाटकाचं नाव तसं कुठे ऎकलं नव्हतं त्यामुळे उत्सूकता होतीच. पडदा वर झाला आणि ते नेपथ्य पाहूनच मन प्रसन्न झालं. नाटक संपेपर्यंत जे काही चालू होतं त्याला केवळ आपण आनंद उत्सवच म्हणू शकतो. खरच अप्रतिम. गिरीश कर्नाडांच्या एका कथानकाचा संदर्भ घेऊन हे नाटक करायचं असं नेहरू सेंटरचे श्री. काझी यांनी ठरवलं आणि लेखक प्रदीप ओक, गीतकार सदानंद डबीर, संगीतकार आनंद मोडक, दिग्दर्शक लक्ष्मीकांत कर्पे यांनी त्याचं अक्षरशः सोनं केलं. केवळ एका प्रयोगासाठी केवढी ही मेहनत ? सगळ्या कलाकारांचा अभिनय तर सतत टाळ्या देण्यासारखा. भुमिकेच्या मागणीनूसार पात्रांचे वयं, त्यांचे अभिनय याना दाद द्यावी तेवढी थोडी. अमोल बावडेकर आणि अपर्णा अपराजीत यांचं गायन हासुद्धा सुखद अनुभव होता. माणसांच्याच विविध हावभावांनी नदी, झाडं, रान, दगड, प्रवाह हे दिग्दर्शक लक्ष्मीकांत कर्पे यांनी उभं केलेलं दृष्य तर कायमचं स्मरणात राहील असं.

हिमालयातल्या एका शिवमंदीराचा पुजारी शिवभक्तीत एवढा मग्न असतो की स्वतःच्या सुस्वरूप तरूण बायकोकडे सुद्धा त्याने कधी लक्षपुर्वक पाहिलं नव्हतं. प्रत्यक्ष शिवशंकर आपल्या या भक्ताला थोपटून झोपवतात. अशा शिवपुजेत लीन झालेल्या त्या पुजार्‍याला त्या राज्याचा राजाही त्याने केलेल्या फुलांची आरास पाहून रत्नजडीत अंगठी बक्षिस देतो. पण एके दिवशी राजनर्तकी त्या मंदीरात येते, ती फुलांची आरास पाहते, तत्क्षणी त्याच्या प्रेमात पडते. पुजारीही मंत्रमुग्ध होतो, महादेवाची पुजा विसरतो, महादेवाची फुलं तिला वाहतो. मंदीर सोडून तिच्या प्रासादात जात राहतो. राजा मंदीरात येणार म्हणून तिच्या शैयेवर सजवलेलीच फुलं पुन्हा महादेवाच्या पिंडीवर घाईघाईने मांडतो. राजाला प्रसाद म्हणून फुल देतो, त्या फुलात रंगनायिकेचा केस असतो. राजा संतापतो. पिंडीला केस फुटताहेत वाटतं, असा टोमणा मारतो. महादेवाच्या मनात असेल तर तसं घडेलही असं पुजारी उत्तर देतो आणि खरोखरचं तसं घडतं. राजा सद्- गदीत होतो, पुजार्‍याला आपली चुक उमजते. तो पुन्हा शिव भक्तीत गढून जातो. असं हे कथानक. मनाचा ठाव घेणारं.


03 October, 2009

संन्यस्त खड्ग


वीर सावरकरांचं हे अप्रतिम नाटक गांधी जयंती दिवशीच साहित्य संघ मंदिरात पाहीलं. क्रांतिकारक, नेता, उत्तम वक्ता, समाजसुधारक, लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार, गीतकार असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे उत्कृष्ट नाटककारही होते हे प्रत्येक संवादातून आणि नाट्यगीतातून वारंवार जाणवत होतं. पण या सगळ्याहून माझ्या मनाला भावला तो त्या नाटकातून दिलेला संदेश. कपीलवस्तू या शकांच्या राज्यात गौतम बुद्धाच्या काळातला जवळ जवळ चाळीस वर्षांचा कालखंड या नाटकात दाखवलेला आहे. अपार करूणा आणि प्रेम या दोनच गोष्टी या पृथ्वीतलावर अनंत काळ वास करत राहतील हा गौतम बुद्धांचा संदेश त्यांच्या पिताजींच्याच राज्यात कसा फोल ठरतो ते या नाटकात नेमकेपणाने दाखवून दिले आहे. बुद्धंम्... शरणम्... गच्छामी म्हणत राज्यातील तमाम योद्धे, वीर, कर्तेपुरूष सन्यास घेऊन विहारात गेले आणि जेव्हा राज्यावर आक्रमण झालं तेव्हा लढायला कुणीच नव्हतं.

बुद्ध आणि महावीराच्या काळात वीररसाचा जो र्‍हास झाला तोच पुढे भारतभुमीच्या नाशाला कारणीभुत ठरला आणि भविष्यात परकीय आक्रमणं होतच राहिली. त्या काळात खड्ग म्हणजे तलवारीनेही कसा सन्यास घेतला होता ते पाहून मन हेलावतं. आत्यंतिक अहिंसा ही अहिंसा नसून हिंसाच आहे कारण समोरचा शत्रू हा नराधम असला की त्याच्या लेखी अहिंसाही नपुंसक असते आणि तो आपल्या स्वार्थासाठी लाखो निरपराधांचे बळी घेतो हा इतिहास आहे.

सध्या रंगभुमीवर असलेलं हे उत्तम संगीत नाटक प्रमोद पवार यांनी दिग्दर्शीत केलं असून त्यात गौतम बुद्धाची मध्यवर्ती भुमिकाही केली आहे. उपेन्द्र दाते, वंदना घांगुर्डे यांचं नाट्यगीत गायनही चांगलं. एकूणच नाटक त्या काळात घेऊन जाणारं. मजा आया....

08 August, 2009

आकाशवाणीचे मुकुटमणी (भाग:२)



निलम ताईंना या पुर्वी प्रत्यक्ष पाहिल होतं पण बाळ कुडतरकरांना प्रथमच पहात होतो. खरच ते अडिज तीन तास मंतरलेले होते. वयाच्या ८८ व्या वर्षीसुद्धा असलेला कुडतरकरांचा खणखणीत आवाज आणि उमदा स्वभाव, रसिकांची सतत मिळणारी दाद याने धुरूसभागृह एका चांगल्या कार्यक्रमाचं साक्षीदार बनलं. जुन १९३९ पासून आकाशवाणीच्या सेवेत असलेल्या कुडतरकरांनी आकाशवाणीच्या सुवर्णकाळाचा लेखाजोखा मांडला आणि सभागृह त्या भुतकाळात रमून गेलं. गम्मत-जम्मत, वनिता मंडळ, प्रपंच, पुन्हा प्रपंच, या कार्यक्रमांची निर्मिती प्रक्रिया सांगताना तेव्हा कार्यक्रमासाठी किती मेहनत घेतली जायची हे ऎकून चांगल्या कार्यक्रमा मागे काय साय्यास असायचे याची कल्पना आली.

महिन्याचा पगार २५ रुपये असताना तेव्हा एम्पायर सिनेमा हॉल मध्ये सुंदराबाईंचा असलेला गाण्याचा कार्यक्रम आणि त्याचं पहिल्या काही रांगांसाठी असलेलं ५० रुपये तिकीट, त्या कार्यक्रमाचे प्रमूख पाहूणे हैदराबादचे निज़ाम, पुढे सुंदराबाईंची झालेली परवड, झेड. ए. बुखारी या स्टेशन डायरेक्टरनी त्याची घेतलेली दखल आणि आता हल्ली बाळ कुडतरकर आकाशवाणीत गेले असताना या सुंदराबाई कोण? आणि ही कोणती गाणी? असा त्याना विचारलेला प्रश्न, या गोष्टी मुळातून ऎकण्या सारख्या होत्या.

पुन्हा प्रपंचसाठी वि. आ. बुवा, शं.ना. नवरे, शाम फडके आदी लेखकांची फळी कशी काम करत होती. त्याच वेळी तो कार्यक्रम सादर करणारे आम्हाला पहायचे आहेत म्हणून दिलीपकुमार आणि विजय मर्चट या दिग्गजांची मागणी, पुन्हा प्रपंच ची १२ वर्ष, अमेरीकन शिष्टमंडळाची भेट, योग्य शब्दोच्चारांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांची घेतलेली भेट इथपासून अंधेरीच्या ‘पुन्हा प्रपंच’ को,ऑ.सोसायटीचा किस्सा हे सगळं ऎकुन एका वेगळ्याच दुनियेत गेल्याचा भास झाला.

त्या नंतर आवाजाचे चढ-उतार आणि भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसं बोलावं याचं प्रात्यक्षीक म्हणून ‘गुंतता ह्रदय हे’ या नाटकातील प्रवेशाचं सादरीकरण ऎकून कान तृप्त झाले. आकाशवाणीचा बेताब बादशहा प्रभाकर पंत आणि मीना वहिनींची पुन्हा एकदा भेट घडवून आणल्या बद्दल दादर सार्वजनीक वाचनालय आणि श्री. विलास गुर्जर यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.

नरेन्द्र प्रभू

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates