नेहरू सेंटरचा तेरावा नाट्य महोत्सव सुरू झाला आहे. काल पहिल्याच दिवशी ‘मदन भूल’ हे नाटक होतं. या नाटकाचं नाव तसं कुठे ऎकलं नव्हतं त्यामुळे उत्सूकता होतीच. पडदा वर झाला आणि ते नेपथ्य पाहूनच मन प्रसन्न झालं. नाटक संपेपर्यंत जे काही चालू होतं त्याला केवळ आपण आनंद उत्सवच म्हणू शकतो. खरच अप्रतिम. गिरीश कर्नाडांच्या एका कथानकाचा संदर्भ घेऊन हे नाटक करायचं असं नेहरू सेंटरचे श्री. काझी यांनी ठरवलं आणि लेखक प्रदीप ओक, गीतकार सदानंद डबीर, संगीतकार आनंद मोडक, दिग्दर्शक लक्ष्मीकांत कर्पे यांनी त्याचं अक्षरशः सोनं केलं. केवळ एका प्रयोगासाठी केवढी ही मेहनत ? सगळ्या कलाकारांचा अभिनय तर सतत टाळ्या देण्यासारखा. भुमिकेच्या मागणीनूसार पात्रांचे वयं, त्यांचे अभिनय याना दाद द्यावी तेवढी थोडी. अमोल बावडेकर आणि अपर्णा अपराजीत यांचं गायन हासुद्धा सुखद अनुभव होता. माणसांच्याच विविध हावभावांनी नदी, झाडं, रान, दगड, प्रवाह हे दिग्दर्शक लक्ष्मीकांत कर्पे यांनी उभं केलेलं दृष्य तर कायमचं स्मरणात राहील असं.
हिमालयातल्या एका शिवमंदीराचा पुजारी शिवभक्तीत एवढा मग्न असतो की स्वतःच्या सुस्वरूप तरूण बायकोकडे सुद्धा त्याने कधी लक्षपुर्वक पाहिलं नव्हतं. प्रत्यक्ष शिवशंकर आपल्या या भक्ताला थोपटून झोपवतात. अशा शिवपुजेत लीन झालेल्या त्या पुजार्याला त्या राज्याचा राजाही त्याने केलेल्या फुलांची आरास पाहून रत्नजडीत अंगठी बक्षिस देतो. पण एके दिवशी राजनर्तकी त्या मंदीरात येते, ती फुलांची आरास पाहते, तत्क्षणी त्याच्या प्रेमात पडते. पुजारीही मंत्रमुग्ध होतो, महादेवाची पुजा विसरतो, महादेवाची फुलं तिला वाहतो. मंदीर सोडून तिच्या प्रासादात जात राहतो. राजा मंदीरात येणार म्हणून तिच्या शैयेवर सजवलेलीच फुलं पुन्हा महादेवाच्या पिंडीवर घाईघाईने मांडतो. राजाला प्रसाद म्हणून फुल देतो, त्या फुलात रंगनायिकेचा केस असतो. राजा संतापतो. पिंडीला केस फुटताहेत वाटतं, असा टोमणा मारतो. महादेवाच्या मनात असेल तर तसं घडेलही असं पुजारी उत्तर देतो आणि खरोखरचं तसं घडतं. राजा सद्- गदीत होतो, पुजार्याला आपली चुक उमजते. तो पुन्हा शिव भक्तीत गढून जातो. असं हे कथानक. मनाचा ठाव घेणारं.
No comments:
Post a Comment