वीर सावरकरांचं हे अप्रतिम नाटक गांधी जयंती दिवशीच साहित्य संघ मंदिरात पाहीलं. क्रांतिकारक, नेता, उत्तम वक्ता, समाजसुधारक, लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार, गीतकार असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे उत्कृष्ट नाटककारही होते हे प्रत्येक संवादातून आणि नाट्यगीतातून वारंवार जाणवत होतं. पण या सगळ्याहून माझ्या मनाला भावला तो त्या नाटकातून दिलेला संदेश. कपीलवस्तू या शकांच्या राज्यात गौतम बुद्धाच्या काळातला जवळ जवळ चाळीस वर्षांचा कालखंड या नाटकात दाखवलेला आहे. अपार करूणा आणि प्रेम या दोनच गोष्टी या पृथ्वीतलावर अनंत काळ वास करत राहतील हा गौतम बुद्धांचा संदेश त्यांच्या पिताजींच्याच राज्यात कसा फोल ठरतो ते या नाटकात नेमकेपणाने दाखवून दिले आहे. बुद्धंम्... शरणम्... गच्छामी म्हणत राज्यातील तमाम योद्धे, वीर, कर्तेपुरूष सन्यास घेऊन विहारात गेले आणि जेव्हा राज्यावर आक्रमण झालं तेव्हा लढायला कुणीच नव्हतं.
बुद्ध आणि महावीराच्या काळात वीररसाचा जो र्हास झाला तोच पुढे भारतभुमीच्या नाशाला कारणीभुत ठरला आणि भविष्यात परकीय आक्रमणं होतच राहिली. त्या काळात खड्ग म्हणजे तलवारीनेही कसा सन्यास घेतला होता ते पाहून मन हेलावतं. आत्यंतिक अहिंसा ही अहिंसा नसून हिंसाच आहे कारण समोरचा शत्रू हा नराधम असला की त्याच्या लेखी अहिंसाही नपुंसक असते आणि तो आपल्या स्वार्थासाठी लाखो निरपराधांचे बळी घेतो हा इतिहास आहे.
सध्या रंगभुमीवर असलेलं हे उत्तम संगीत नाटक प्रमोद पवार यांनी दिग्दर्शीत केलं असून त्यात गौतम बुद्धाची मध्यवर्ती भुमिकाही केली आहे. उपेन्द्र दाते, वंदना घांगुर्डे यांचं नाट्यगीत गायनही चांगलं. एकूणच नाटक त्या काळात घेऊन जाणारं. मजा आया....
No comments:
Post a Comment