आयुष्यात काही मिळवायचं असेल तर आधी उद्दिष्ट नक्की करावं लागतं. ध्येयपुर्ती होईल असं स्वप्न बघावं लागतं, त्या दिशेने वाटचाल करावी लागते. वाटेत येणार्या संकटांचा सामना करून पुढे जावं लागतं. जिद्दीने, चिकाटीने, सतत प्रयत्न करून आपण ते साध्य करू शकतो. अशी झुंज घेत असताना एखादा मार्गदर्शक, गुरू मिळाला तर..., तर तो मार्ग प्रशस्त होतो, यश कित्तेक पटीने मोठं होतं. एकेकाळी आपल्या सारखीच सामान्य असलेली पण आता त्यांच्या क्षेत्रात उच्च शिखरावर विराजमान झालेली एक सोडून दोन व्यक्तीमत्व आपल्या भेटीसाठी येत आहेत, प्रा. प्रविण दवणे आणि कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार. कवी, गीतकार, लेखक, नाटकार, वक्ता आणि उत्तम प्राध्यापक म्हणून प्रविण दवणे मराठी जगताला माहीत आहेतच पण निराश मनाला उभारी देण्याची ताकद त्यांच्या साहित्यात आहे. वृत्तपत्रात आलेला त्यांचा एखादा लेखही मरगळलेल्या मनात नवीन आशा पल्लवीत करतो. हेच प्रा. प्रविण दवणे ‘स्वप्न बघा, स्वप्न जगा’ या मालेतलं पहिलं पुष्प गुंफणार आहेत. आपल्याला काय आवडायला हवं आणि यशाच्या वाटेवर कसं जावं, कसं चालावं या विषयी ते आपणाशी संवाद साधणार आहेत. दुसरे वक्ते नितीन पोतदार हे त्यांच्या आश्वासक लिखाणामुळे वचकाना परिचित आहेत. नवीन विचारांना चालना देणारे नितीन पोतदार हे कॉर्पोरेट लॉयर या काहीशा सामान्याना माहीत नसलेल्या क्षेत्रात कार्यरत असून देश-विदेशातील उद्योगांचं, ‘विलिनीकरण आणि सहकार्य करार’ या महत्वाच्या कामात प्रतिनिधित्व करतात, तसच विदेशी गुंतवणूकतज्ञ म्हणूनही ते जागतिक स्तरावर मान्यता पावलेले आहेत. जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी ‘कळेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट तरच होईल जय महाराष्ट्र’ हे आपलं ब्रीद असायला हवं असं ते म्हणतात. ‘प्रोग्रेसिव मराठी समाज’ हे त्यांचं स्वप्न आहे आणि त्या विषयावरच ते आपल्याशी बोलणार आहेत. येत्या रविवारी, १८ ऑक़्टोबर २००९ रोजी सकाळी ठीक १० वा. परळ, मुंबई येथील दामोदर नाट्यगृहात ‘त्रिमिती’ या संस्थेने हा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
जागतिकीकरणाच्या या युगात स्पर्धेला आलेला प्रचंड वेग, त्या वेगाशी जुळवून घेताना भांबावलेला मराठी तरूण, नेमक्या कोणत्या मार्गावर चालावं याची दिशा शोधतो आहे. त्याला या विचारांमधून नक्कीच प्रेरणा मिळेल.
No comments:
Post a Comment