Showing posts with label मालवणी बाणा. Show all posts
Showing posts with label मालवणी बाणा. Show all posts

27 August, 2022

असा खयंच नाय खावक

Audio Link असा खयंच नाय खावक



 

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

 

घावणे, आंबोळ्यो, खापरोळी आणि ताटाभोवतीची रांगोळी

नारळाचो रस, वाटाण्याचा सांबार बगून आंघोळीक मारतलस गोळी

आवशीच्या हातचा कुळताचा पिठला आणि तांदळाची भाकरी

अरे नाष्टो काय खायत रवलस फुडे गम्मत आसा खरी

ती विचारतली... आता काजी भाजूया काय कलिंगण व्हया खावक

उताणी पडान म्हणशीत आवशी पोटात जागा नाय गे रवाक

म्हणान, मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

 

दुपारच्या जेवणाक गोलम्याची कोशंबीर आणि बांग़ड्याचा तिकला

भाताबरोबर भुरकूक कर्लीचा निसत्याक आणि वांग्या पण भरला

ताजो फडफडीत इसवण आजून वाट बगतलो तव्यार

अर्दाच जेवन झाला तरी येतला ता आंगार

ती म्हणतली इतक्याय जमणानाय तर इलं कित्या झकमारूक

आणि मगे तेच्यार जिरवणी म्हणान देतली सोलकडी पिऊक

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

 

आरावलेलो कोम्बो अचानक गप जातलो

सागोती म्हणान वड्याबरोबर ताटात येतलो

दुपारी इतक्या जोवलस तरी आडवो हात मारतलस

पोटाकडे बगून आता खुप झाला म्हणतलस

आजून आये बगतली वाकान तूका वाडूक

चवच तशी म्हणत चघळत रवतलस हाडूक

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

 

कितीय रवलस तरी म्हणतली आणखी दोन दिवस रव

आजून खय बगलस तू जत्रा आणि फिरान ह्या गाव

जत्रेतला खाजा आणि लाडू देतली बांदून

परड्यातली ताजी भाजी देतली कुशीक सारून

म्हणतली परत येशीत तेवा मात्र दिवस काड रवाक

ह्या पावटी इलस तरी कायच नाय खावक

म्हणान तुका सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय खावक

  नरेंद्र प्रभू    



16 July, 2019

तो माका काय शिकयतलो (विडंबन)




“तो माका काय शिकयतलो!” या एका वाक्यात समस्त गुरूजनांका विचार करूक लावणारी मालवणी कविता”    


तो माका काय शिकयतलो, मीच तेका शिकवीन
मास्तराच्या हातातली पट्टी, तेच्यासकट वाकविन

माका सांगता आईन्सटायनान ऍपल पडताना बगल्यान
हेना आंबो काय आकाशातसून उडताना जिकल्यान?

तो माका काय शिकयतलो, मीच तेका शिकवीन
माज्या वाटेक गेलो तर लिंबू फिरवीन

नेमबाजी कसली शिकयतास, ढपो बगलात माजो?
काजी मोजा नुसते, आताय डाव माजोच

तो माका काय शिकयतलो, मीच तेका शिकवीन
चिपनळीतसून तिरफळा जागेर शेकवीन

माका शिकव नको... सांगान ठेवतय
आसलस कितीय मोठो ना..., तरी तुका पावशेरान मोजतय

तू माका काय शिकयतस, मीच तूका शिकवीन
बगतस काय असो, कानाखाली वाजवीन  

  


17 May, 2019

ऑस्ट्रेलिया... ऑस्ट्रेलिया – एक





आम्ही ( मी आणि सदाबहार मित्र आत्माराम परब) एतिहाद एअरवेजने सिडनीला जायला निघालो. मुंबई आंतरराष्ट्रिय विमानतळावरच 'आम्ही आणि आमचे बाप'चे निर्माता मयूर रानडे, अभिनेता अतुल परचुरे भेटले आणि तिथेच गप्पांचा फड रंगला. ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथे साजर्‍या होणार्‍या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९साठी ते ही सदर नाटक सादर करण्याकरीता चालले होते. जेट एअरवेजची घरघर थांबली असल्याने आणि त्याना घरघर लागल्याने ऐन वेळी आम्हाला विमान कंपनी बदलावी लागली होती. मग दक्षिणेला जायच्या आधीच आम्हाला मुंबई-अबू धाबी असा द्रविडी प्राणायाम करावा लागला. अडीज तास मागे पश्चिमेला अबू धाबी करून मग सिडनी गाठायची होती. अबू धाबी जवळ आली तशी ती मरू भूमी दिसायला लागली. मनात अरेबियन नाईट्स, तेल, पैसा, बुरखा, आयसीस, इथलं तेल संपलं तर? नंतर...., असे विचार येत होते.


अबू धाबीला उतरलो, पुन्हा सिडनीकडे प्रयाण करायचं होतं. पुन्हा सुरक्षा तपासणी सुरू झाली. प्रत्येक ठिकाणी थोडा  वेग़ळा प्रकार असतो. इथे बुट, पट्टा, घड्याळ, आमचं लडाखी कंकण सगळं उतरवून हॅन्ड बॅगसह ट्रे मध्ये ठेवलं. माझी तपासणी होऊन मी पुढे जाऊन बसलो, बरोबर मयूर रानडे आणि अतुल परचुरेही होते. आत्मा मात्र पाठीमागे अडकला होता. त्याच्या जवळ मायीने खास बनऊन दिलेलं देशी गायीचं शुद्ध तूप होतं. 

मायीने दिलेलं तूप, त्यासाठी आत्माने केलेली छोटीसी लढाई, १०० ग्राम तूप एका बाटलीत भरून बाकीच त्या कौंटरवरच चाटून खाणं तोच करू जाणे.  आणि तेवढं करून पुन्हा ते अतुल पारचुरेना सांगणं याला हाईट म्हणतात,  त्याने ती कधीच गाठलीय, मध्ये मध्ये renew करतो एव्हढंच.
‘तू दिलेले तूप मी ते आवडीने खाईले’

२०० ग्रामची तुपाची बाटली सुरक्षारक्षक पुढे घेऊन जायला देईनात तेव्हा या पठ्ठ्याने १०० ग्राम तूप एका बाटलीत भरून घेतलं आणि दुसर्‍या बाटलीमधलं तिथेच त्यांच्यासमोर चाटून खाल्लं. ‘क्या बात है‘। आत्मा मायीला एक फोन करण्यासाठी ८० किमी पायपीट करीत केलॉंगला गेला होता तो प्रसंग आठवला. रात्रीचं जागरण आणि विमान प्रवासाचा थकवा या प्रसंगाने कुठच्या कुठे उडून गेला.                     

विमानाने अबुधाबीहून उड्डाण केलं आणि ते सिडॅनीच्या दिशेने निघालं. पुढचे १४ तास या विमानात बसून काढायचे होते. थोडी झोप, थोडं खाणं, थोडा सिनेमा असं करीत वेळ काढत होतो. जेवणात मात्र पाव आणि केक सदृश्य वस्तू आणि जुस मिळत होता. आता हे एवढं गोड कसं खायचं. वर ठेवलेल्या सॅकमधल्या गोळ्यासुद्धा घेता येत नव्हत्या कारण बाजुला बसलेला वृद्ध गृहस्थ (म्हातारा म्हणू का?) झोपला होता. मग ‘गोड खाऊ नका’ असे हर्षदाचे (माझी बायको) शब्द कानी पडायला लागले. अजुबाजूला पाहिलं, मी जागाच होतो. कविता सुचायला लागली मग. फोन हाती घेतला आणि ती अशी अवतरली.:         

जिथे दिसतील शिते
तिथे याद तुझी येते
खाऊ नको गोड ते
शब्द आले ।

नको भात, खा चपाती
का खातो पुन्हा माती
नसताना मी संगती
शब्द आले ।

देतील पुरणपोळी
जिलेबीही ती वाटोळी
कितीदा करू टवाळी
शब्द आले  ।

करीता प्रवास मोठा
तरी आहे मागे सोटा
खाऊन पहा तू त्या
शब्द आले ।

(१७-०४-२०१९
अबू धाबी - सिडनी विमानातून)
     
थोडी डुलकी लागल्यानंतर जाग आली खिडकीमधून बाहेर पाहिलं तर सगळीकडे निळाई भरून उरलेली होती, वर आकाशात तशीच खालीही, इथे कोण कुणाशी स्पर्धा करतंय हा प्रश्नच होता, ते निळं आकाश की खाली अथांग पसरलेला सागर, अरबी समुद्र म्हणावं की दर्या? अरबी समुद्रच बरं, दर्या म्हटलं की मग आपले कोळी बांधव आठवतात आणि अर्थातच मासळी. इथे विमानात मांसाहार म्हणजे नुसतं चिकन, त्याला कोंबडी म्हणणं ही नकोच, उगाच कोंबडी वाड्याची आठवण जागी होते. ते आपलं व्हेज बरं, म्हणजे माझ्यासाठी, बाजूच्या म्हातारबाबाला काहीच पसंत नव्हतं, स्वतःच खाऊन झाल्यावर तो आपला माझ्या जेवणात लक्ष घालून होता.  "भराऊ का एक घास?" विचारावंस वाटत होतं. त्याला फळं हवी होती, अरे इथे कशी देणार...., ये कोकणात ये, तिकडे तूला बोन्डू देतो. जाऊदे

चला खाली पांढऱ्या ढगांनी थोडं चित्र बदललं. खाली गोवा आलं असावं, आता दर्याला उधाण आलं म्हणायला हरकत नाही. उधाण तसं ते मनालाही आलं होतं, खाली आपलं गाव आहे आणि आपण तिकडे न जाताच पुढे चाललोय असं वाटून मन खट्टू झालं. जोराची भूक लागली की घरंची आठवण येतेच. खाली तर प्रत्यक्ष गाव आहे. मालवणी जेवणाची अनीवार लहर आली बाजूच्या म्हात्यार्‍याकडे पाहून ती दाबून टाकली. परळच्या छितरमलकडून वळून जाणारी तांबडी एस्टी पाहिली की गावाहून मुंबईत आलो तेव्हा सुरूवातीला असं व्हायचं. सरळ ती गाडी पकडून गावी निघून जावं असं वाटायचं. गड्या आपला गाव खरंच बरा!

एक सिनेमा पाहून झाला, नंतर पुन्हा काढलेल्या एका प्रदीर्घ डुलकीनंतर खाली सिडनी आलं, आपण ऑस्ट्रेलिया खंडात येऊन पोचलो. आता १४ तासानंतर पुन्हा जमिनीला पाय लागणार. हे जग पहायची खुपच उत्सुकता लागून राहिली होती. विमानाची चाकं सिडनीला टेकली. 



                        

23 February, 2019

प्रेरणास्रोत आप्पा परब



आज आप्पा परबांच्या लग्नाला ५० वर्षं झाली. सह्य मित्रांनी नेटका सोहळा आयोजित केला. आप्पा परब..., कोकणच्या भूमीचा हा पुत्र आपल्या कर्मभूमी मुंबईत कार्यरत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि सह्याद्रीला विसरला नाहीच पण त्या महर्षीने हजारो तरुणांना सह्यकड्याचं वेड लावलं. ‘मी आणि माझं’ एवढ्यापूरतं संकुचीत झालेलं तरूणमन आभाळाएवढं झालं पाहिजे तर त्याने आपल्या इतिहासाबरोबरच सह्याद्री पालथा घातला पाहिजे. आप्पानी तो वसा आयुष्यभर सांभाळला आणि आता शेकडो सह्यमित्र तो पुढे चालवत आहेत.


असाच सह्याद्रीच्या कुशीत रमणारा आत्माराम परब हा जिप्सी आता वेगाने जगभर भ्रमंती करतो आहे. सुनिल, उषा, स्वप्नील, सागर सारखी मित्रमंडळी आपापल्या क्षेत्रात व्यग्र असूनही शनीवारी रात्री शेवटची लोकल पकडून कर्जतला जातात आणि पहाटे-पहाटे गड-किल्ल्यांची वाट धरतात. मुंबईत राहून नोकरी, व्यवसाय, घर सांभाळून आठवड्याचा एकच सुट्टीचा दिवस दर्‍या-डोंगरात व्यतीत करणं सोप काम नाही. ‘येड्यागबाळ्याचे काम नाही’. हे करण्यासाठी जी एक प्रेरणा हवी असते ती मला वाटतं आप्पा परबांनी त्यांच्याठायी निर्माण केली.

आप्पांचा एक चेला आत्माराम परब मी जवळून अनुभवला आहे. निधडी छाती, निर्णय घेण्याची धडाडी, उपजत परोपकाराची वृत्ती, माणसं जोडण्याची हातोटी आणि स्वछंदीपणा हे त्याचे गुण या सह्यप्रवासातच जोपासले गेले असावेत. इतरांच्या जीवनाचा प्रवास सुगंधीत करणारी आप्पांसारखी माणसं हा आपल्या समाजाचा ठेवा आहे. आई-आप्पांना दिर्घायुरोग्य लाभो अशी इश्वर चरणी प्रार्थना. सह्यमित्रांनी हा समयोचीत सोहळा आयोजित केला म्हणून त्यांचं अभिनंदन.  

नरेंद्र प्रभू             



13 November, 2015

बॉडी लॅंग्वेज


मराठी, हिंदी, इंग्रजी आशा भाषा (लॅंग्वेज) बोलल्यावर कित्येकवेळा समोरच्याला त्याचा अर्थबोध होतोच असं नाही, पण सद्ध्या माझ्याशी ज्या भाषेत हा माणूस बोलतोय ती भाषा कुणाही भाषीक इसमाला (किंवा इसमीला) सहज समजेल यात शंकाच नाही. या माणसाच्या शरिरात किती नटबोल्ट किंवा खटके असतील देव जाणे. सारखा आपला वेगवेगळ्या तर्‍हेवाईक मुद्रा करून हा आपलं म्हणणं मांडत असतो. दरवाजा उघडला हे दाखवताना प्रत्यंचा ओढल्याचा अविर्भाव असतो तर,  वायर सोडली हे सांगताना तो   धनुष्यातून जणू बाणच सोडतो. ड्रॉवरमध्ये हात अडकेल हे सांगताना तो कासाराने बांगड्या भरल्याचा देखावा उभा करतो, तर मागे जायला होईल असं म्हणताना रंगमंचावरचा पडदा ओढल्यासारखा मागे वाकतो. हा खरंच तिथे रंगमंचावरच हवा होता. त्या सोफ्यावर बसून बघा किती रिलॅक्स वाटतं हे पटवताना याने सुखीमाणसाचा सदरा घालून आल्याचा भास होतो.

गेल्या कित्येक वर्षात असा कलाकार रंगमंचाविना पहायला मिळाला नाव्हता. त्या दिवशी अगदी तळाचा ड्राव्हर असा उघडला जाईल हे दाखवताना तो असा काय वाकला आणि मागे सरला कि मला वाटलं एखादा हत्ती नदीकाठी हळूवार पाय रोवून प्रवाहातलं पाणी पितोय. ....इथे ग्रानाईटवर आरामात पडून संगीत ऎकता येईल असं म्हणता म्हणता तो चक्क आडवा झाला. डुलकी लागली  तर आपटायला होईल असं म्हणत असताना त्याने एक हिसका मारला आणि मग म्हणाला इथे मोल्डींगपट्टी लावतो.  रस्त्याने चालताना असे काही हावभाव असतात की बाबुराव जणू दिवाणखान्यात उभे राहून गप्पा हाणताहेत.  अंगावर पडेल असं दाखवताना हा जणू अदनान सामी बनतो, अहो कुणालाही बघून वाटेल की ‘हमको भी लिप्ट करादो’ म्हणतोय. वस्तू इथून उचलली, इथे ठेवली असं त्याने म्हटल्यावर मला बापू वाणी भजी अलगद तेलात सोडयचा त्याची आठवण झाली. एखादा कसलेला नर्तकही एवढी सफाईदार हालचाल करू शकेल की नाही अशी शंका यावी. मोबाईलवरचं बोलणं संपवताना तो एवढ्यावेळा बाय.. बाय अशा अर्थाचं पुटपुटतो की मला शंका यायला लागते.... हा मोबाईल कंपनीचा एजंट आहे की काय, थांबता थांबत नाही तो; आता मी सावध असतो; पटकन फोन कट करतो, काय सांगाव उद्या बाय.. बाय नंतर बाबू.. बाबू म्हणेल. 

टिव्हीच्याखाली बसायची बैठक नको असं सांगताना त्याने हवेतच अशी काय माकडबैठक मारली की मी लोटपोट होता होता वाचलो. (वाचलो म्हणजे, जर माझं हसू बाहेर फुटलं असतं तर त्याने हे काम सोडून द्यायला मागे पुढे पाहिलं नसतं.) मात्र समोरच्या नियोजित बैठक व्यवस्थेवर तो बेहद्द खुश होता, “इथे कसं छान वाटेल” असं म्हणत त्याने शेषशायी विष्णूचं रुप धारण केलं. त्याच्या त्या रुपाला मी मनोमन साष्टांग प्रणीपात केला. हे वर केलं, ते खाली केलं असं म्हणत असताना तो जणू वेटलिप्टींग करतोय की काय असं वाटत रहातं.   
कामाला थोडा उशीरच होतो आहे अशी नाराजी मी प्रगट केल्यावर त्याचं रुप पार पालटून गेलं. कितीतरी वेळ फक्त हातवारे करीत घालवल्यावर मग म्हणाला “आपलं चालेंज आहे, एवढं फास्ट काम कुणी करून दिलं तर” आणि मग हातवार्‍यांबरोबर पायवारेही सुरू झाले.                   

स्टडी टेबलला कि बोर्डचा ड्राव्हर लावला की काय होणार हे सांगताना तो हवेतल्या खुर्चीवर बसला आणि त्याने सफाईदारपणे बाजाची पेटी वाजवली, जणू काय डबलबारीचं भजनच चाललय. कि बोर्डवर असा कुणाचाच हात चालला नसेल महाराजा! 
        
कार्य स्थळावरचा त्याचा पदन्यास तर हा एव्हाना माझ्यासाठी खरोखर न चुकवण्यासारखा भाग झालाय, इतका की हा निघून गेल्यावर मी कुणाकडे बघू असं होवून जाईल.

पण एवढ्या सढळ हालचाली करणारा हा विरार लोकल मध्ये कसा उभा राहू शकतो? तिथे त्याला बॉडी हालवायलासुद्धा मिळत नसणार, मग तीची 'लॅंग्वेज' ही दूर की बार. तो तिथे काय करत असेल? खरच कोडं आहे.      
      

                       

08 August, 2015

व्दैतअव्दैत



चित्रकार शरद तावडे
नामांकित चित्रकार शरद तावडे यांचं ‘व्दैतअव्दैत’ हे चित्रप्रदर्शन मुंबईत मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन हिरजी जहांगीर आर्ट गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी. रोड, काळा घोडा, मुंबई ४०० ०२३  येथे दिनांक १० ते १६  ऑगस्ट २०१५ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील. सदर प्रदर्शनाचं उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार श्री. वासुदेव कामत यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.     

चित्रकार शरद तावडे यांची विविध विषयांवरची अनेक समुह आणि एकल  प्रदर्शनं देशाच्या विविध भागात झाली असून आताचं ‘व्दैतअव्दैत’ हे प्रदर्शन अध्यात्मिक दिशेने जाणारं आहे. कैलास मानसरोवर, ग्रामिण महाराष्ट्र, देऊळ अशा अनेक विषयांना वाहिलेली तावडे यांची चित्रं रसिकांनी आतापर्यंत वाखाणलेली आहेत.

मानवी मनाचा अविभाज्य भाग असलेलं व्दैत जेव्हा साधनेच्या मार्गावर जाताना एकरूप होवून जातं तेव्हा अव्दैताची प्रत्ययकारी अनुभूती येते. अशा समाधी अवस्थेत जो अवर्णनीय आनंद होतो त्याची झलक या चित्रांमधून आपल्याला अनुभवता येईल. टाळाच्या नादमधूर स्वर ऎकायचा असेल तर त्यांचा एकमेकांवर हलकेच आघात व्हावा लागतो, पिस्तूलालाही गोळ्यांशिवाय धाक दाखवता येणार नाही, सृंखलेचही तेच आणि अगदी नेहमीच्या वापरातल्या चापालाही एकत्र आणणार्‍या  तारेशिवाय त्याला कुणी चाप म्हणणारच नाही. रोजच्या वापरातल्या वस्तूंची नेमकेपणाने मांडणी करून चित्रकाराने आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार घडवला आहे. आध्यात्मिक विषयाची कॅनव्हासवर उमटलेली ही चित्रं विरळीच म्हणावी लागतील.

आपल्या या अनोख्या चित्रांबद्दल चित्रकार शरद तावडे म्हणतात:   



सदर प्रदर्शनाचा मुंबईकर कलारसिकांनी जरूर लाभ घ्यावा. 

08 February, 2015

‘स्नेह’संमेलन


खरं तर अशा संमेलनात मी बावचळून जातो.  स्नेहसंमेलनात, लग्नाच्या हॉलमध्ये बसून नेमकं काय करायचं? एवढ्या गजबजाटात ना धड कुणाशी बोलता येत, ना सर्वांची खुशाली विचारू शकत. त्यात पुन्हा एखादा राहून गेला तर पुन्हा रुसवा! (असं आपलं उगीचच आपण वाटून घ्यायचं.)  पण काल ईशा टूर्सच्या स्नेहसंमेलनात खरी मजा आली, कारण तिथे जमलेली मंडळी आत्माराम परब या माझ्या लाडक्या मित्राच्या प्रेमाखातर जमली होती आणि त्यामुळे उद्देश स्पष्ट होता. त्या पैकी कित्तेकाना मी ओळखच नव्हतो त्यामुळेही डॉ. दिपक रेवंडकर, नाईक काका, धायीमाडे दांपत्य, साळसकर दांपत्य  असे मोजके लोकंच संवाद साधण्यासाठी मला उपलब्ध होते. आणखी एक म्हणजे आपली नेहमीची ‘टीम ईशा’ बर्‍याच दिवसांनी भेटणार होती.



 कालचं संमेलन वेगळं होतं. वर उल्लेखलेले सगळे भेटलेच पण मला व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाल्याने तिथून मला जमलेल्या मंडळींचे चेहरे न्याहाळता येत होते. ती मंडळी खरंच आत्माच्या प्रेमापोटी वेळ काढून आली होती. सगळ्यांच्या चहर्‍यावर उत्साह होता आणि ती आत्माने सांगितलेल्या गोष्टी मनापासून ऎकत होती. मी सुद्धा मला माहित असलेल्याच गोष्टी पुन्हा नव्याने ऎकत होतो. या  माणसाला ऎकणं, त्याच्या सहवासात चार घटका व्यतीत करणं म्हणजे एक आनंद सोहळा असतो. सतत उत्साहाचं कारंजं जवळ घेवून हा माणूस वावरत असतो. नवनवीन कल्पना, नवी माणसं, सहलीचं सोनं व्हावं म्हणून होणारी धडपड आणि मुख्य म्हणजे सकारात्मक विचार यामुळे माणसं त्याच्याकडे खेचली जाताता, त्याचीच होवून जातात.  काल हे मी अनुभवत होतो.


‘ईशा टूर्स’ च्या सहलींना गेलेले पण त्या सहलींना आत्माराम गेला नव्हता असे अनेकजण ईशा टूर्स बद्दल बोलत होते ते ऎकून आणखी बरं वाटलं कारण आत्माच्या अनुपस्थितीतही त्या सहली तेवढ्याच यशस्वी झाल्या होत्या. आम्ही ईशा टूर्सबरोबरच सहलीला का जातो यावरचं प्रत्येकाचं मत ऎकताना मुठभर मास अंगावर चढत होतं.    
मित्रहो, जीवन हा एक प्रवासच आहे. त्या प्रवासात येणारी सगळीच ठिकाणं आपल्याला आवडतीलच असं नाही, पण आपण ठरवून केलेल्या सहली मात्र अशा चीरस्मरणीय होणार असतील तर त्याहून चांगलं असं काही नसतं. त्या सहलींचा दरवळ आठवणींच्या रुपाने असा पुन्हा पुन्हा अनुभवता यावा म्हणून अशा सहलींना गेलं पाहिजे, अशी संमेलन होत राहिली पाहिजेत. काल त्याचा एक भाग बनता आलं आणि सुखद स्मुतींच्या हिंदोळ्यावरचे ते क्षण पुन्हा एकदा जगता आले. “टीम ईशा’, आत्मा धन्यवाद.

असा विसावा या भूमीवर 

तुझ्या संगती सदा घडूदे!

स्नेहाळांच्या हिंदोळ्यावर

पुन्हा एकदा मला झुलूदे! 

ता.क. काल मांडलेल्या खुर्च्या कमी पडल्या आणि त्या आणखी मागवाव्या लागल्या. अनीला मॅडम तुम्ही इतरांच्या कष्टाचं सोनं केलत. 

वैद्यसर उत्तम सुत्रसंचालन, किती गोड बोलता तुम्ही!     

नरेंद्र प्रभू 





16 December, 2014

आत्मास


प्रिय आत्मा...

तुझ्या यशाच्या दिव्य पताका
पुण्य भूमीवर फडकू दे
तुझ्या ‘ईशा’च्या या वळणावर
सकल चांदणे बहरू दे

सह्य-हिमालय करीशी सोपा
सुविधांचा तो पुर्वांचल
दुर्गम नाही उरला आता
अंदमानचा सेल्युलर

कर भ्रमण कर विदेशातही
तुझाच आहे धृव उत्तर
त्रिखंडातही नाव होवूदे
नसेल जागा धरणीवर

तू सहलसाथी हो सर्वांचा अन
दाखव जग हे सकल जना
उदंड होईल ईशकृपेने
‘ईशा’ नाव हे मना मना

तुझ्या यशाच्या दिव्य पताका
या भूमीवर फडकू दे
तुझ्या साथीने देश-विदेशी  
सफर जनांना घडवू दे


(आज ईशा टूर्सच्या पुण्याच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे, मी जावू शकलो नाही पण हे शब्द तरी जावूदे)
नरेंद्र प्रभू
१६ डिसेंबर २०१४ 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates