शिशीरात काटा आणणारी थंडी तशी या वर्षी उशीरानेच अवतरली. दिवाळी पर्यंत लांबणार्या पावसामुळे थर्टी फस्ट पर्यंत थंडीची वाट पहावी लागली. गेल्या आठ दिवसात हवेत सुखद गारवा अनुभवायला मिळाला आणि सहलीचा मुड तयार झाला. आंजर्ल्याच्या केतकी बीच रिसॉर्ट ला जाऊया असा आत्मारामचा फोन आला आणि विचार पक्का झाला. आत्माराम आणि सहल हे समिकरण आता मनात पक्कं झालं आहे. आकाशात भरारी घेणारा विहंग जसा मनसोक्त मजा करत फिरत असतो तसाच आत्माराम वाटेतल्या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत मुशाफिरी करत असतो. त्यात कोकण हा त्याचा विक पॉईंट. दापोली जवळच्या आंजर्ल्याला जायचंय म्हटल्यावर तो जोशातच होता. कर्न्याळाला आमचे परममित्र महेश भिवंडीकर, रेखाताई येऊन या सहलीत सामिल झाले आले आणि उत्सव सुरू झाला. इंदापूरच्या आकार पॉट आर्ट या ठिकाणी पहिला हॉल्ट घेतला. कोकणच्या मातीत दडलेली कला आणि पुढे नदी, डोंगर यांच्या साथीने चाललेली निसर्गाची अदाकारी बघत असतानाच अचानक डाव्या बाजूला अथांग समुद्राचं दर्शन घडलं आणि आंजर्ला जवळ आल्याचा मैलाचा दगडही दिसला.
कोकणचं निसर्ग सौंदर्य आणि जुनी पण सुंदर घरं पहात असतानाच मुकामाचं ठिकाण आलं. रिसॉर्ट मध्ये प्रवेश केला आणि प्रथम दर्शनीच त्या परिसराच्या प्रेमात पडलो. स्वच्छ, सुंदर समुद्र किनारा, बागायतीतच रहायची सोय, सुखद गारवा आणि हवाहवासा वाटणारा मित्र परिवार.
इशा टुर्स ने आयोजित केलेली ही सह्यमित्र ची सहल होती. या पुर्वीही मी सह्यमित्र च्या ट्रेक ला गेलो होतो. व्यसनापासून दुर पण निसर्गाच्या, दर्या-खोर्यांच्या, कडे-कपार्यांच्या, गड-किल्ल्यांच्या सान्निध्यात ही मंडळी रमून गेलेली असतात. या वेळीही तसच घडलं. सागर सावंत या आमच्या मित्राने आल्या आल्या सुत्र हातात घेतली. सह्यमित्र गितांजली माने यांनी संयोजन केलं होतं. लहान थोर अशी पन्नास मंडळी होती पण कसलीही गडबड नव्हती की कोलाहल नव्हता. मुख्य म्हणजे ओरबाडून घेण्याची वृत्ती नव्हती. समुद्र स्नान करून मंडळी तृप्त होता होता गत वर्षीच्या शेवटच्या दिवसाचा सुर्य अस्ताला गेला. जवळच असलेल्या हर्णै बंदरावरून आणलेले मासे स्वयंपाक घरात सिद्ध होत असतानाच वेगवेगळे खेळ रंगात आले. जेवण्याचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा खेळांना रंगत आली. रात्रीचे बारा वाजले जल्लोशात नव वर्षाचं स्वागत झालं. उत्तर रात्री पर्यंत खेळ रंगला पण कसलाच उन्माद नव्हता. दारू, दारूकाम नव्हतं. विचारांचं आदान प्रदान, पुन्हा मिळण्याची इच्छा व्यक्त होत नव वर्षाला आरंभ झाला आणि खरच थर्टी फस्ट गोड झाला.
No comments:
Post a Comment