18 March, 2010

जन जोडो गंगा अभियानाची यशश्वी सांगता


काहीवेळा खुप बोलण्या पेक्षा एखादी कृतीच बरच काही सांगून जाते. समर्थानी म्हटलच आहे क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. समाजकारण, राजकारण आणि पर्यावरण या बाबतीत बरच काही बोललं जातं, लिहिलं जातं पण फारशी कृती होताना दिसत नाही या पार्श्वभुमीवर गंगाजल नॅचर फाउंडेशन ची जन जोडो गंगा यात्रा आपल्याला बरच काही सांगून जाते. कोणत्याही प्रकारचा गवगवा न करता गेली कित्येक वर्षं श्री. विजय मुडशिंगीकर गंगा शुद्धीकरणाच्या ध्यासाने कार्यरत आहेत. गंगाजल हे त्यांचं प्रदर्शन मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरात आजपर्यंत लागलं आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून गंगेसारख्या पवित्र नदीचं झालेलं ओंगळवाणं रुप जन जागृतीसाठी लोकांसमोर आणणं हा एकचं ध्यास त्यानी घेतला आहे. गंगा नदीला जर तीचं गतवैभव प्राप्तकरून द्यायचं असेल तर तीच्याकाठी असलेल्या गावा-गावात, शहरा-शहरात गेलं पाहीजे. तीथल्या जनतेला गंगेच्या शुद्धीकरणाचं महत्व पटवून दिलं पाहीजे. वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा मुळातच उपाय केला पाहीजे हे ओळखून गंगाजल नॅचर फाउंडेशन ने  जन जोडो गंगा यात्रा हे अभियान हाती घेतलं होतं.

मुडशिंगीकर यांच्याबरोबरच मुंबईतील सुरेंद्र मिश्रा, मच्छिंद्र पाटील, संतोष मरगज, माहितीपट निर्माते उन्मेश अमृते, मुंबई दूरदर्शनचे केवल नागवेकर हेही या अभियानात सहभागी झाले होते. गंगोत्री जवळील मुखवा, उत्तरकाशी, ऋषिकेश, हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद,  बनारस,  पटना, कोलकाता, गंगासागर असा हा प्रदीर्घ पल्ला पार करून नुकतीच गंगासागर येथे ही यात्रा यशश्वीपणे पुर्ण झाली. सामान्य लोक, विद्यार्थी, साधू, जवान अशा अनेकांपर्यंत हा संदेश पोहोचला. एकेका ठिकाणी चार-चार दिवस थांबण्याचा स्थानिक जनतेचा आग्रह होता पण निधीअभावी तसं करणं शक्य झालं नाही. पण हाती घेतलेलं काम पुर्ण झालं, पंधरा दिवस का होईना गंगा शुद्धीकरणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवता आला. स्वर्गीय गंगा आपलं विलोभनीय रुप घेवून पृथ्वीवर आली. इथल्या मातीचं तीने सोनं केलं. जनतेची भरभराट केली. त्याच्या बदल्यात आपण मात्र तीची विटंबना केली. आतातरी जागं होवूया. पाणी आणि त्याचं महत्व यावर अजून किती कंठसोस करावा लागणार हा आजचा खरा प्रश्न आहे.      

नरेंद्र प्रभू
        


4 comments:

  1. ह्या विषयावर फारसा अभ्यास नाही पण बलाची उपासना करा ह्या विवेकानंदांच्या उक्तीप्रमाणे ओंगळवाणे प्रदर्शन शक्यतो टाळून स्वच्छतेची कृती करत राहिल्यास जास्त यश येईल असे वाटते.

    ह्या गंगा अभियानाच्या बाबतीत मी एक करंटाच कारण एकतर मला त्याची माहिती नाही आणि कृती तर दररोज गंगेची प्रार्थना करतो तेवढीच तरीही राहविले नाही म्हणून हा प्रतिसाद दिला...

    घरातील निर्माल्य नदीत टाकायला सतत विरोध केला इतकीच आमची काय ती प्रत्यक्ष कृती...

    शुभेच्छा

    ReplyDelete
  2. नमस्कार शिरीष,
    पिण्याचे पाणी स्वच्छ पाहिजे त्याला अभ्यासापेक्षा जाणीव असणं महत्वाचं, ‘गंगाजल नॅचर फाउंडेशन’ चं संकेतस्थळ पहा म्हणजे आपल्याला या कार्याची कल्पना येईल. घरातील निर्माल्य नदीत न टाकणे ही कृती छोटी असली तरी त्याचा परिणाम मोठा आहे. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  3. गंगानदीचे हिमालयातील सौंदर्य इतके मोहक आहे की, कोणालाही तीचे ओंगळवाणे प्रदर्शन पहायला अन् मांडायला आवडणार नाही. अस असल तरीही कोंबड्याला झाकल्याने सुर्योदय व्हायचा काही थांबत नाही. गंगानदीच्या प्रदूषणाने कळस गाठला आहे. तीचं अस्तित्वच धोक्यात आल आहे. ते करणारे अन् ते होऊ नये म्हणून काळजी घेणारे (सरकार आणि सर्वसामन्य) सूस्त झाले आहेत. त्यांना जाग करणे गरजेचं आहे मग त्यासाठी माध्यम काहीही असो, गंगेच सवर्धन होणं महत्वाच.

    ReplyDelete
  4. विजयजी, आपला सात्वीक संताप बरोबर आहे, पण आपण केवळ संताप व्यक्त करून थांबत नाही तर कृतीसुद्धा करता, ती अधिक महत्वाची आहे.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates