15 July, 2021

स्वर्गारोहण

पट रंगांचे अन् पाचूंचे
हिमशिखरे ही ऋषीपरी
मनात भरती तरीही उरती
वाटा इथल्या खरोखरी

त्या प्रसन्न सकाळी मनाली सोडून रोहतांच्या दिशेने निघालो तेव्हा इनोव्हा गाडीत आम्ही पाच (मी, डॉ. रमेश मडव, विलास आम्ब्रे, नितीन कीर, सागर कर्णिक) आणि आमचा ड्रायव्हर कुंभ असे सहा जण होतो. गाडी घाट चढू लागली. हिरवाईचा ताजेपणा, निर्झरांचं संगीत, हवेतला सुखद गारवा, रानफुलांचा ताटवा, निळं आकाश आणि क्षणाक्षणाला चकीत करणारे देखावे, आम्ही जणू स्वर्ग रोहणाला चाललो होतो. दर पाच मिनिटांनी गाडी थांबवून सारखे फोटो काढत होतो. वर उंचावर वाटणारी शिखरं आता खालच्या बाजूला पहायला मिळत होती. रोहतांग पास जवळ आला तशी तिथे वाहनांची गर्दी दिसू लागली. आम्हाला तिथे थाबू नका असं सांगण्यात आलं होतं. रोहतांग पासनंतर पुन्हा उतार लागला. वाटेत सिसू या गावाजवळ एक मनोहारी धबधबा आणि नदीचं पात्रं आहे. रम्य पण अस्पर्शीत अशा प्रदेशातून चाललेली ती सफर खुपच आनंद देत होती. हिमाचल प्रदेशच्या लाहोल-स्पिती जिल्ह्याचं ठिकाण केलॉन्ग जवळ आलं, आमचा आजचा मुक्काम इथेच होता.

दुसर्‍या दिवशी पहाटेच केलॉन्गचं हॉटेल सोडलं, घर सोडल्यापासून आज रात्री पाचव्यादिवशी आम्ही लडाखमध्ये पाऊल ठेवणार होतो. चंदीगढ (१,०५३ फुट), मनाली (६,७३० फुट), केलॉन्ग (१०,१०० फुट), लेह (११,५०० फुट) असा चढा अलेख होता. मध्ये रोहतांग (१३,०५१ फुट), हा पास लागला होता, आता लेह यायच्या आधी असे आणखी अधिक उंचीचे पास लागणारच होते. केलॉन्ग जागं व्हायच्या आत आम्ही त्याला निरोप दिला होता आणि एका नदीच्या खोर्‍यात उतरायला सुरूवात केली होती. काल सिसू खेड्याला बिलगून वाहणारी ती चंद्रा नदी होती आणि आज आम्ही जिच्या खोर्‍यात उतरत होतो ती  होती भागा नदी. मनात ‘चंद्रभागे’ची आठवण आली. चंद्रा आणि भागा या दोन्ही नद्या बार-लाच-ला (पास) वरच उगम पावतात आणि मग विरूद्ध दिशांना प्रवाहीत होतात. काल लागलेला होता तो रोहतांग ‘पास’,  आता पुढे पासचं नामकरण ‘ला’ असं होतं म्हणून आता येणार होता तो बार-लाच-ला. बर्‍याच वेळा त्याला ‘बार-लाच-ला पास’ असं म्हटलं जातं ते म्हणजे ‘खाली अंडर लाईन’ सारखं झालं, असो. 

भागा नदी खोर्‍यात उतरताना समोरच्या बर्फाछादीत शिखरांनी सोनेरी मुकूट परीधान केलेले दिसले, हे असं स्वच्छ आकाश असलं की हिमालयातील प्रवास आनंददायी होतो. पुढे ‘दारच्या’ नामक गाव लागलं. या ‘दारच्या’नेच पंचवीस वर्षांपूर्वी  आत्मारामना ना ‘घरका’ ना घाटका करून टाकलं होतं. या इथेच ते सतरा दिवस अडकून पडले होते. त्यांच्या त्या प्रवासावर मी लिहिलेलं ग्रंथाली प्रकाशनाचं ‘लडाख... प्रवास अजून सुरू आहे’ हे पुस्तक खुप वाचक प्रिय ठरलं आहे. भागा नदीच्या पात्रातून आम्ही पलिकडे गेलो आणि पुन्हा उभा चढ सुरू झाला, आमचं सारखे फोटो काढणं सुरू होतं. किती काढणार? अशा ठिकाणी तासंतास बसून तो नजारा पाहिला पाहिजे. मनात खोल उतरवून घेतला पाहिजे. आपला देश समृद्ध आहे तो असा, हजारो मैलांवरून विदेशी पर्यटक येतात आणि अशा ठिकाणी सायकलने प्रवास करतात. हिमालय तर आपल्याजवळच आहे. तर तो पाहिलाच पाहिजे. नुकतीच आत्माराम परबांनी याच भागाची १२ दिवसांची आडवाटेच्या हिमाचलाची यात्रा केली, तशी मनसोक्त भटकंती केली पाहिजे. आता तर ईशा टूर्सने अपरिचीत हिमाचलच्या सहली जाहीर केल्या आहेत.                                      

बार-लाच-ला जवळ आला आणि बर्फाचं साम्राज्य सुरू झालं. मनालीपासून जसे जसे आम्ही वर वर येत गेलो तसतशी झाडं, पान-फुलं असं एकुणच वनश्रीचं दिसणं बदलत गेलं आणि आतातर ते दुर्मिळ होवून गेलं. आता मातीने आणि गतीने आपला रंग दाखवायला सुरूवात केली होती. सगळा नजाराच विलक्षण होता, कधीही न पाहिलेला. ना अनुभवलेला. बार-लाच-ला उतरलो आणि फोटो काढले. पुन्हा पटकन गाडीत बसून प्रवास सुरू झाला. आमच्या बरोबरच्या सगळ्या गाड्या पुढे निघून गेल्या होत्या. कुंभ मध्येच उतारावर रस्ता सोडून शॉर्ट कट घेत चालला होता. 

उन्हाचा कडाका वाढला, थोडी डोकेदुखी सुरू झाली. आठ हजार फुटपेक्षा जास्त उंचीवर गेलंतर हाय अ‍ॅल्टीट्यूड सिकनेस सुरू होतो. आताची डोकेदुखी त्यातलाच भाग होती. (हे नंतर समजलं) असं असलं तरी बाहेरचं दृश्य सारखं कॅमेर्‍याला खुणावत राही. किती तर्‍हेचे आकार आणि केवढ्या रंग छटा, कधी मनोमन पाहून तर कधी दुसर्‍याला दाखऊन आम्ही त्याचा आनंद घेत होतो. आपल्याकडे गणपती विसर्जनाला चौपाटीवर खुप गणपतींच्या मुर्ती पहायला मिळतात. इथे नदीच्या पात्रात निसर्गात: अनेक आकार निर्माण झालेले पहायला मिळाले. आपापल्या नजरेने पाहून त्यात आपला देव शोधावा अशी स्थिती होती. निसर्गाने इथे चितारलेले देखावे, घडवलेल्या मुर्ती कल्पनेच्या पलिकडल्या होत्या. (या पोस्ट खाली इथे वर्णन केलेली आणि अवर्णनीय अशी दोन्ही प्रकारची मी काढलेली छायाचित्रं दिलेली आहेत.) 

एक वळण घेताना समोरच्या बाजूला तंबू दिसू लागले, कुंभ म्हणाला ‘अपना ढाबा आगया’. पाच मिनिटातच आम्ही पांगच्या धाब्यांजवळ पोहोचलो. आमच्याबरोबरच्या बाकीच्या गाड्या आधीच पोचल्या होत्या. आत्मारामनी हात दाखऊन आम्हाला तिथल्या डोलमाच्या धाब्यात यायला सांगितलं. तिथे असलेल्या पदार्थांपैकी काहीही घ्या अशा सुचना दिल्या. जोराची डोकेदुखी सुरू झाली आणि काहीच नको असं वाटायला लागलं. काहीच नको म्हटलं तर आत्मारामनी निदान ब्लॅक टी, लेमन टी किंवा सुप तरी प्या असा आग्रह केला. उपाशी राहिलात तर त्रास होईल असंही सांगितलं. नकोच असं वाटायला लागलं. राजमा, डाल-राईस, आम्लेट असे अनेक पर्याय असताना काही नको वाटत होतं. थोडं सुप घेतलं आणि बाहेरच्या बाजूला विश्रांतीसाठी असलेल्या जागेवर अंग टाकलं. आम्ही चार जण आडवे झालो होतो तिथेच सागरही आला आणि डॉ. मडवांना जरा सरका आणि हात बाजूला घ्या म्हाणायला लागला. ते म्हणाले “ए बाबा तूच व्हयोतर तो हात उचलून खय तो ठेव, आणि माका सरकाक जमाचा नाय” सागर बाजूला गेला, त्याही परिस्थितीत आम्हाला हसू आवरेना. विलास आब्रे तर खुपच दमले होते. कितीही दमायला झालं तरी धाब्यावरचा मुक्काम हा हालवावाच लागतो. निघालो. याच पांगच्या धाब्यावर..... (जाऊ दे, पुढच्या पोस्टवर भेटूया ती गोष्ट तिथेच सांगतो)   क्रमशा...

(छायाचित्रं: नरेंद्र प्रभू)  

भाग १: मुक्काम तर येणारच

भाग २: क्यामेरा क्या तेरा

भाग ३: जागेपणीचं स्वप्न

भाग ४: स्वर्गारोहण



Our Hotel in Keylong
Our Hotel in Keylong 

भागा नदी



Sissu







Darcha
Barlachala













सरमिसळ







1 comment:

  1. मनाली लेह प्रवास, in my bucketlist...
    Due to flight option many people like miss it.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates