29 April, 2011

तो आणि तीदोन मने जुळताना
मनात घर करून राहातात तो आणि ती
नवा संसार उभारताना
बाहेर घर शोधत राहातात तो आणि ती

दोन मने जुळताना
दोन घरात रहात असतात तो आणि ती
नवा संसार उभाराताना  
घरां बाहेर घर करण्यासाठी धडपडतात तो आणि ती

दोन मने जुळताना
आपल्याच परक्या घरात राहातात तो आणि ती
नवा संसार उभाराताना 
माय बापाचा जाच सहन करतात तो आणि ती

दोन मने जुळताना
काटेरी वास्तवाला सामेरी जातात तो आणि ती
नवा संसार उभाराताना 
घायाळ होत राहातात तो आणि ती

दोन मने जुळल्यावर
बंधनं जुगारून देतात तो आणि ती
नवा संसार उभारायला   
हिमतीने बाहेर पडतात तो आणि ती


नरेंद्र प्रभू

  

17 April, 2011

चिमणं घरटं बाधू द्या...!
काही वर्षांपुर्वीपर्यंत घराच्या आजूबाजूला सतत चिमण्यांचा वावर असे, कित्येकदा पहाटे जाग यायची ती त्यांच्या चिवचिवाटानेच. पण आता त्या सगळ्या आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत. जेव्हा त्या चिमण्या होत्या तेव्हा त्याचं महत्व वाटायचं नाही. पण असे पक्षी, प्राणी दिसले की नकळत आपल्या मनावरचा ताण हलका होतो. सहजीवनासाठी ते अवश्यकही आहे. असं असलं तरी चिमण्यांना घरटं बनवण्यासाठी सोयीचे ठरणारे आसरे जसे कमी कमी होत गेले तसा त्यांनी शहरातून काढता पाय घेतला असावा. मोबाईल टॉवर आणि फ्रिक्वेंसी मुळे चिमण्यांची संख्या रोडावली असं म्हटलं जातं पण परवा बांद्रा कुर्ला कॉम्लेक्समध्ये गेलो असताना तिकडे बांधकामं चालू आहेत त्या बाजूला चिमण्यांची उपस्थिती बर्‍यापैकी जाणवत होती. याचा अर्थ त्यांचे खुराडे करण्याच्या जागा नाहीश्या झाल्याने त्या आता दूर निघून गेल्या आहेत.

जे चिमण्यांचं तेच माणसांचंही, मुंबईसारख्या शहरात नवा संसार थाटायला गेलं की जागेचा गहन प्रश्न उभा राहातो. चाळ, वन-रुम-किचन, वन-बि-एच-के या गोष्टी नव्याने होताना दिसत नाहीत आणि जुन्या झापाट्याने पाडल्या जात आहेत. या सगळ्यामुळे कमी उत्पन्न गटातील नव्याने संसार थाटणारी मंडळी हद्दपारच होत आहेत. नव्या संसाराची गोड स्वप्न पाहायची तर स्वस्थ झोप लागेल असा आशियाना तरी मिळाला पाहिजे ना? 

09 April, 2011

प्रत्यक्ष कृती (Direct Action)आपल्या डोळ्यासमोर अनेक चुकीच्या गोष्टी घडत असताना आपण तिकडे दुर्लक्ष करतो किंवा चालायचच म्हणून पुढे जातो. हे असं वारंवार घडत जातं आणि आपण आपल्या आयुष्यात संवेदनशीलताच गमावून बसतो. मुंबईसारख्या शहरात तर अशा कितीतरी गोष्टीकडे आपणाला कानाडोळा करावा लागतो, पण या मुळेच गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावते. माणसांवर होणार्‍या अन्यायाला इतर कुणी नाही तरी तो स्वत: वाचा फोडू शकतो. पण प्राण्यांवर होणार्‍या अन्यायाचं तसं नसतं. त्याला सजग नागरीकांनी वाचा फोडावी लागते. असच एक पुण्यकर्म माझे मित्र विलास आम्रे यांनी नुकतच केलं आणि मला हे पोष्ट लिहावं लागलं. त्याचं असं झालं.....

मालाड-मार्वे रस्त्यावरून विलास तिन्हीसांजेच्या वेळी घाईत निघाले होते. रस्त्याच्या कडेला दोन कामगार सिमेंटच्या पिशवीत काहीतरी घेऊन बसले होते. त्या पिशवीची थोडी हालचाल होताना दिसली म्हणून विलासनी जवळ जावून पाहिलं, तर त्या पिशवीमधून चिखल बाहेर येताना दिसत होता. निरखून पाहिल्यावर ते एका कासवाचं डोकं असल्याच ध्यानात आलं. त्या कामगाराला त्यानी प्रश्न केला हे काय आहे ?
तो    : कछुवा है ।
विलास : इसका क्या करोगे?
तो    : बेचना है।
विलास : कितने मे?
तो    : दो सौ।
विलास : किधरसे लाया?
तो    : बगलवाले नाले से।
विलास : आप यह बेच नही सकते। ऎसा करना गुनाह है।
एवढा संवाद झाल्यावर विसंवाद सुरू झाला. त्या कामगाराचा साथीदार विकण्यावर ठाम होता. आजूबाजूचे लोकही जमा झाले. त्यात काही तो कासव विकत घेणारे आणि त्याचं मटण करून खाणारे होते. बाचाबाची वाढत असतानाच विलासनी आपल्याजवळ असलेलं BNHS (Bombay Natural History Societyचं कार्ड काढलं,त्याला दाखवलं, त्या कामगाराला बकोटीला घरून उभा केला आणि पोलिसांकडे चलं म्हणाले. वन्यप्राणी कायद्यानुसार तुम्हाला कारावासाची शिक्षा होवू शकते. असे प्राणी पकडून ते विकणे हा गुन्हा आहे. आता मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत बघता बघता विलासनी उग्र रुप धारण केलं. त्या गर्दीत असलेल्या काही तरूणांनी विलासनां सपोर्ट केला.

हेच ते तेली कासव ज्याला विलासनी जीवदान दिले. 
एव्हाना ते कामगार चांगलेच वरमले होते. विलासच्या म्हणण्यानुसार ते त्या कासवाला सोडायला तयार झाले. विलासनासुद्धा त्या हातावर पोट असणार्‍या कामगारांची मनातून  दया आली होती. त्यानी त्या कामगाराना शंभर रुपये दिले. ते कासव ताब्यात घेतलं आणि आपल्या काही निसर्गप्रेमी मित्रांना फोन करून ही हकिकत सांगितली आणि बोलावून घेतलं. आता ते कासव पालिकेच्या तलावात सुटकेचा श्वास घेत आहे आणि जीवदान मिळालं म्हणून विलासना आशिर्वाद देत आहे.

नुसतं हळहळत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला किती महत्व आहे नाही का? 


03 April, 2011

आनंदोत्सव
'रन'विर
तो एक क्षण आणि त्यानंतरचा सगळा वेळ केवळ अनंद आनंद आणि आनंदानेच भरून राहिलेला होता. विजयाची झिंग काय असते ते काल सार्‍या भारताने अनुभवलं. विश्वचषकाच्या सगळ्या प्रबळ दावेदारांना चीत करत काल क्रिकेटच्या पंढरीत भारताच्या विरांनी झळाळता चषक उंचावला तेव्हा खरच आकाश ठेंगणं वाटू लागलं. संघनायक ढोणीने षट्कार लगावून चेंडू प्रेक्षकात भिरकावला तेव्हा फटाके फुटत राहीले आकाशात आणि मनातही.
उधाण आनंदाचे 
सहावा वल्डकप खेळणारा सचीन आनंदाने उसळत होता आणि त्याचे सहकारी त्याला डोक्यावर घेवून नाचत होते. देवदुर्लभ असा तो क्षण याची देही याची डोळा पाहिला आणि उर भरून आला. हा विजय रडत रखडत नव्हता तर सहा गडी राखून मिळवलेला दणदणीत विजय होता. प्रचंड महागाई आणि घोटाळ्यांचे षट्कार अशा काळवंडलेल्या वातावरणात अख्या देशाने जल्लोष करावा असा क्षण ज्या खेळाडूंनी दाखवला त्यांना मानाचा मुजरा आणि मन:पुर्वक अभिनंदन...!          

याचसाठी केला होता अट्टाहास...!  
बाप माणूस 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates