20 September, 2009

हा छंद जीवाला लावी पिसे.....

पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

एखादा छंद आपलं जीवन आनंदी करतो, फुलवून टाकतो. पण असा एखादा छंद असेल जो स्वतः बरोबरच दुसर्‍यालाही आनंद देईल तर मग त्याचं महत्व अधिक असतं. माझे मित्र विलास आंब्रे हे त्यातील एक. शांत, हळूवार बोलण्यामुळे असेल कदाचित त्याना जंगलातले पक्षी वश झाले असावेत. एरवी आपणाला बघून भूर्र्sss करून उडून जाणारे पक्षी त्याना मात्र पोज द्यायला थांबतात. पक्षाचा उत्तम फोटो म्हटला म्हणजे त्यात त्याचा डोळा पुर्णपणे दिसला पाहिजे. रंग, आकार, पिसं यांच्याबरोबरच त्याचा डौल छायाचित्र पाहताना डोळ्यात भरला पाहिजे. पक्षांच्या हालचाली, त्यांचे स्वभाव, सवयी आणि जागा माहित असल्याशिवाय असे फोटो काढणं केवळ अशक्य. हे सगळं माहित असलं तरी पक्षी सहसा कॅमेर्‍यात बंद करता येत नाही. ऎन वेळी तो उडून जातो आणि आपण हळहळतो. एका जागेवरून दुसर्‍या जागेवर सारखी हालचाल करणारे पक्षी कॅमेर्‍याने टिपण्यासाठी खुप संयमाची आवश्यकता असते. तासनतास अवघडलेल्या स्थितीत बसून किंवा उभं राहून वाट पहावी लागते. आणि असा क्षण आल्यावर आपण क्लिक करतो तेव्हा फ्रेम मध्ये पक्षी असतोच असं नाही. (माझ्या फ्रेम मधून बर्‍याचवेळा पक्षी गायब असतो.) आणखी एक गोष्ट अशी की बाहेरगावी फिरायला गेल्यावर एखाद्या रम्य सकाळी, गारव्यात स्वतःला पांघरूणात गुरफटून घ्यावस वाटत असताना रामप्रहराच्याही आधी उठून जंगलाची वाट धरावी लागते, कारण पक्षांच्या बहूतेक हालचाली या सकाळच्या प्रहरीच होत असतात. आता या सगळ्या बरोबरच छायाचित्रणाचं तंत्र अवगत असायला पाहिजे हे सांगायला नकोच.

स्वतःच्या व्यवसायामध्ये व्यग्र असताना त्या मधून वेळ काढून, केवळ पैशाच्या मागे न लागता आपला पैसा आणि वेळ खर्च करून देशाच्या विविध भागात जावून आंब्रेनी जी छायाचित्र काढली आहेत ती खरोखरच अप्रतिम आहेत. अशी छायाचित्र पाहिल्यावर काही मंडळींची प्रतिक्रीया असते छान फोटो आलाय, तुमचा कॅमेरा चांगला आहे. तर तसं नसतं महाराजा.. कॅमेर्‍या बरोबरच त्या मागचा माणूसही तेवढाच महत्वाचा. असो, तर अशी मेहनत घेवून काढलेले फोटो पहायचे आहेत ना ? मग आपल्याला ती संधी आहे. तेव्हा भेटू. वेळ आणि पत्ता आहे :

फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडीया

साहेब बिल्डींग, पाचवा माळा,

१९५ डी. एन. रोड, फोर्ट,

मुंबई ४०० ००१.


वेळ: सकाळी ११ ते सायं. ७

तारीख २६/०९/२००९

ते ०३/१०/२००९
नरेन्द्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates