31 December, 2015

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे


मंगेश पाडगावकरांनी माझ्या पिढीला गाणं गायला लावलं. त्यानी गद्य माणसालाही पद्य म्हणायला लावलं.
कोकणातल्या माझ्या गावात डोगरावर हुंदडताना रंगभरल्या आकाशाकडे बघताना ‘रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली? ही त्यांची ओळ गुणगुणताना त्या वयात आकाशाची शोभा मी पाहिली, पाडगावकरानी ती ओळ लिहिली नसती तर कदाचीत समोरचं सुंदर आकाश मी न्याहाळलंच नसतं. ‘काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली’ तिन्हीसांजेचं एवढं समर्पक वर्णन आणखी कुणी केलं असेल असं मला वाटत नाही. ऋतू बदल होताना आता निसर्गाचा वेगळा अविष्कार पहायला मिळणार म्हणून मी खुश व्हायचो ते  त्यांच्याच ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ या ओळीमुळे. पुढे मग दुर्गाबाईंचं ‘ऋतूचक्र’ वाचनात आलं, पण ऋतूंबद्दलची आवड, जाण पाडगावकरांच्या त्या ओळीने लहानपणातच करून दिली. एकाच गाण्यातून एवढं चमत्कृतींनी भरलेलं जग दाखवण्याची ताकद या माझ्या कोकणातल्या मंगेशाकडे होती. त्यांचं पहिलं दर्शन सावंतवाडीच्या मोती तवाकाठच्या आमच्या कॉलेजमध्ये झालं, बरोबर बा.भ.बोरकर आमचे वसंत सावंत सर असे कविवर्य होते. थोड्याशा नाटकी ढंगाने केलेलं पाडगावकरांचं कविता वाचन ऎकून आम्ही प्रथमता हसत सुटलो होतो. पण लहानपणापसून  रेडिओवर आणि बालभारतीमधून भॆटणारा हा कवी असा प्रत्यक्ष पाहिल्यावर आम्ही हुरळून गेलो होतो.

पुढे मुंबईत आल्यावर पाडगावकर अनेक कार्यक्रमांमधून ऎकता आले. प्रत्यक्ष भेट झाली आणि हा कवी बापमाणूस म्हणूनही माहित झाला. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ म्हणणारा हा कवी तत्ववेत्ताच म्हणायचा. आत्महत्येला प्रवृत्त झालेला माणूस हे गाण ऎकून पुन्हा नव्या जोमाने आयुष्याला सामोर गेला, अशी या गाण्याबद्दलची एक आठवण अरुण दाते सांगतात.

‘पाचूच्या हिरव्या माहेरी उन हळदीचे आले’ हे पाडगावकरच लिहू शकतात.  ‘जिथे तिथे राधेला भेटे आता शाम मुरारी’, ‘एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना’ ‘चंद्र कोवळा पहिलावहिला झाडामागे उभा राहिला’, ‘अवती भवती असुन दिसेना शोधतोस आकाशी हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी’ ‘चांदण्यात भिजला गालावरचा तिळ’ ‘स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास’, ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’ ‘का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?’, ‘वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा’, ‘’त्या तरुवेली, तो सुमपरिमळ झर्‍यांतली चांदीची झुळझुळ’, ‘चांदण्याला नीज आली’, ‘मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे’, ‘लक्ष चंद्र विरघळले गात्री’, ‘मोजावी नभाची खोली घालावी शपथ ओली’, ‘जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातिल अनंद’, ‘लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रिती’, ‘माझे जीवन गाणे’ असे किती किती मोत्यांचे सर तुम्ही सहज ओवित गेलात, खरंच तुम्हाला अंतर्यामी चा सूर गवसलेला होताच. पाडगावकर, तुम्ही असे गीतातूनी सर्वस्व आहे वाहिले, ते शब्द आता राहिले......., ते शब्द आता राहिले....!                 


आकाशातल्या शुक्र तार्‍याकडे नजर जाईल तेव्हा कवीवर्य पाडगावकर तुमची नक्कीच याद येईल. भारलेले अनेक क्षण तुम्ही दिले  आणि आमचाही जन्म भारून टकलात. अनंत काळ दरवळत रहाणारा तुमच्या ‘अंतरीचा गंध’ तुम्ही आमच्यासाठी सोडून गेला अहातच.              

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates