Showing posts with label म्युझिशियन्स. Show all posts
Showing posts with label म्युझिशियन्स. Show all posts

17 November, 2016

स्वरांचा जादूगार – सत्यजित प्रभू



महाराष्ट्रा मंडळ न्युयॉर्क, अमेरीका यांच्या ‘स्नेहदीप’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख     
’मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं म्हणतात. ही म्हण खरी ठरवणार्‍या एका मुलाचे पाय मात्र मी पाळण्यात पाहिलेत, त्या पुढे आयुष्यभर जेव्हा कधी त्याचं वादन, गप्पा ऎकण्याचं भाग्य लाभलं तेव्हा मौजच मौज अनुभवत आलो. पेटी (हार्मोनियम), त्याच्या न कळत्या वयात ती त्याच्या हातात आली आणि तो त्याच्याही नकळत सप्तस्वरांच्या या जादूयी नगरीत प्रवेश करता झाला. 

सत्यजित प्रभू, दिड वर्षाचा असताना त्याचे हात हार्मोनियमच्या भात्याकडेही पोहोचत नव्हते पण सुरांवर मात्र बोटं लिलया फिरत असत, ऎकणारे अवाक होत, बोटात जादू होती. या व्यासंगी वादकाने सुरांशी पक्की दोस्ती केली किंबहुना ते त्याच्या आतच होते म्हणाना. दिवसोंदिवस सुरांमध्ये डुंबत असताना तो व्यासपीठाचा अधीपती कधी झाला हे त्यालाच समजलं नसावं. याची सुरूवात त्याच्या बालवयातच झाली. एकदा असाच पाचवीत असताना सत्यजित आपल्या आई बरोबर तिच्या फोर्टमधल्या कार्यालयात चालला होता. फोर्टच्या फुटपाथवर कि-बोर्डची अनेक खोकी मांडलेली दिसत होती. सत्यजितच्या नजरेतून ते कि-बोर्ड सुटत नव्हते. त्या कि-बोर्डवर हात आजमाऊन बघण्याची त्याला अनिवार इच्छा झाली. शेवटी त्याने आईला ही गोष्ट सांगितली. त्यांचा मोर्चा त्या फुटपाथवरच्या दुकानात वळला. अनेक कि-बोर्ड तपासून सत्यजितने त्या पैकी एक पसंत केला. तिथल्याच एका मोडॅक्या स्टुलवर बसून त्याचं बजावणं सुरू झालं. ‘मेरा जुता है जपानी’ पासून सुरूवात झाली आणि त्या बालकाचं कौशल्य पहायला आणि गाण्याच्या सुरेल धुन ऎकलायला तिथे शंभरावर माणसांची गर्दी जमा झाली. सत्यजित ते वाद्य घेऊन आईच्या कार्यालयात गेला. त्याने ते पुन्हा तपासून पाहिलं, वाजऊन पाहिलं आणि त्या कि-बोर्डच्या मर्यादा त्याला जाणवू लागल्या. या किबोर्ड पेक्षा सरस कि-बोर्ड सत्यजितने तिथे त्या दुकानात पाहिला होता. त्याने ती गोष्ट आईला सांगितली. महागडा कि-बोर्ड घेतला तरी मी त्याची किंमत नक्कीच वसूल करीन असा आत्मविश्वास सत्यजितला होताच. दुसर्‍या दिवशी पुन्हा मंडळी त्या दुकानात पोहोचली आधी एक हजारला घेतलेला कि-बोर्ड परत करून ६००० रुपयांचा कि-बोर्ड घेऊन सत्यजित घरी आला. त्या कि-बोर्डकडून त्याने शक्य ते सर्व वसूल केलं. त्याची सर्व फिचर्स वापरून त्याने ऎकणार्‍याचे कान तृप्त केलेच. आज त्याच सत्यजितला जगातल्या सर्व कंपन्यांचे उत्तम कि-बोर्ड वश झाले आहेत.                                       

हिर्‍याचं तेज लपून रहात नाही तसं सत्यजितचं वाजवणं वाखाणलं जावू लागलं आणि अगदी चौदा वर्षांचा असतानाच तो अशोक हांडेंच्या ‘आवाज की दुनिया’,  ‘मराठी बाणा’ अशा गाजत असलेल्या कार्यक्रमांमधून सिंथेसायझरची करामत दाखवू लागला. काही वादनाचे तुकडे तर एवढे क्लिष्ट असत की ते वाजवल्यावर लोक मानायला तयार नसत की हे आत्ता प्रत्यक्ष वाजवलं गेलय, श्रोत्यांना ती रेकॉर्डच वाटायची. मग ते पुन्हा वाजवलं की ‘क्या बात है’ हे ठरलेलं. असंच एकदा यामाहाचा सिंथेसायझर घ्यायचा म्हणून सत्यजितला घेवून अशोक हांडे मुंबईतल्या वाद्यांच्या दुकानात गेले. तिथे महागडा सिंथेसायझर विकत घेण्याआधी त्यानी तो सत्यजितला वाजवून बघ आणि पसंत असेल तर घेऊया असं म्हणाले. दुकानाचा मालक एवढी किमती वस्तू पोरसवदा मुलाच्या हातात द्यायला कबूल होईना, शेवटी हांडे आपल्या लालबाग-परळच्या खास ठसक्यात त्याला म्हणाले “अरे, यही बजाने वाला है, वही परखेगा, वह हा बोलेगा तो मै लुंगा” ही भाषा त्याला समजली. सत्यजितने वाजवायला सुरूवात केली आणि त्या मालकाची खात्री पटली की ‘काम भारी आहे.’ तिथेही गर्दी जमा झाली. लोक उभे राहून ऎकत होते, त्या वेळ पासूनच कित्येक कार्यक्रमात प्रेक्षागारात बसलेल्या प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं कौतूक केलं आहे.

अष्टपैलू वादक आणि कुशल वाद्यवृंद संचालक असलेले सत्याजित प्रभू हार्मोनियम, सिंथेसायझर ऍकॉर्डियन आणि पियानीका ही वाद्य स्टेजवर तर वाजवतातच शिवाय मराठी-हिंदी चित्रपट संगीत तसंच जाहिरातील मोजक्या लक्षवेधी जागा त्यानी आपल्या सुरावटींनी सजवल्या आहेत. आघाडीच्या बहुतेक सर्व गायक-गायीकांना सत्यजित प्रभूंनी साथ-संगत केली असून जगभरातील अनेक मैफिली गाजवल्या आहेत. अमेरिकेत बीएमएम आणि दुबईच्या प्रेक्षकांसाठी त्यांचा ‘जादूची पेटी’ हा कार्यक्रम झाला आणि तिथल्या मंडळीनी तो डोक्यावर घेतला. भारतातही कानसेन असलेले सुजाण श्रोते त्यांना कौतूकाची थाप देण्यात जराही मागे नाहीत. अशाच एका कार्यक्रमात शिवसेना प्रमूख मा. बाळासाहेब ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्यजितचं वाजवणं ऎकून मंत्रमुग्ध झाले. मध्यंतरात त्यानी सत्यजितला बोलाऊन तूझी जादूयी बोटं आम्हाला दाखव म्हणून हात हातात घेऊन त्याला शाब्बासकीची दिली. अशा घटना मग त्याच्यासाठी नित्याच्याच झाल्या. ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’ किंवा ‘अप्सरा आली’, गाणं कुठलही असूद्या सत्यजितच्या हातून ते स्वर हुबेहूब निघतात आणि टाळ्यांसाठी हात आपसूकच एकत्र येतात.

स्टेजवर गाण्यांचे किंवा वादनाचे प्रयोग चालू असताना काही वेळा अक्षरश: क्रिकेट सारखी फिल्डीग लावावी लागते असं सत्यजितचं म्हणणं आहे. अनेकदा काही वादकांकडून एखादा पिस वाजवलाच जात नाही त्या वेळी क्षणाचाही विलंब न लावता तो ताल पकडून कि-बोर्डवर तो पीस तत्काळ वाजवावा लागतो. हे सांगणं सोपं असलं तरी एवढी हुकमत गाजवण्यासाठी अभ्यास आणि साधनाही तशीच दांडगी लागते. स्वरांनी तूमच्याशी मैत्री करावी लागते. कान तयारीचे लागतात आणि प्रसंगावधान राखावं लागतं. म्हणूनच सत्यजित ‘फिल्डीग लावावी लागते’ असं त्याचं सार्थ वर्णन करतात. कान किती तयारीचे लागतात त्याचा एक किस्सा त्यानीच सांगितलेला. एकदा गोव्याच्या एका मंदिरात एका  ख्यातनाम गायकाचा कार्यक्रम चालू होता, सत्यजित साथीला होते, लोक गायनाचा आनंद लुटत होते. गायक जरा अस्वस्थच होते. काही तरी गडबड आहे असं त्यांना वाटत होतं. साऊंड, साथ सगळं ठिक होतं. तरी त्याना करमेना शेवटी त्यानी सत्याजितना विचारलं काय गडबड आहे का? सत्याजितनी सगळं व्यवस्थित चाललय असं सांगितलं, पण खरंच काहीतरी चुकल्याचं गायकाला सारखं वाटत होतं. त्यानी पुन्हा सत्यजितकडे विचारणा केली तेव्हा शेवटी “तुमच्या हातातली पेटी....!” असं सांगताच त्यानीही सुटकेचा श्वास सोडला. काही कारणाने स्वत:च्या पेटी ऎवजी तिथल्या यजमानांची पेटी (हार्मोनियम) त्या दिवशी ते गायक वाजवत होते आणि तिथेच खरी गोम होती. स्टेजवर असताना अष्टावधानी असणं किती आवश्यक आहे आणि ते कसं असावं हे सत्यजितकडून शिकावं.

सत्यजित प्रभूंना कि-बोर्ड किमयागार किंवा वाद्याव्दारे गाणारा गायक असं अनेकदा संबोधलं जातं. एक माणूस शांत संयत राहून गाण्यामध्ये किती रंग भरू शकतो ते त्यांचं वाजवणं ऎकतानाच समजतं. ‘गगन सदन तेजोमय’ या गाण्यातील व्हायोलिंस, पियानोचे स्वर ऎकताना वाद्याना गातं करणार्‍या या वादकाला सलाम करावासा वाटतो. ट्रंपेट, व्हायोलिन, पियानो, सतार, सेक्साफोन, मेंडोलिन अशी कितीतरी वाद्यांचे स्वर हुबेहूब वठवणं ही जादू नव्हे तर काय? शंकर जयकिशनचं ‘अजी रुठकर अब कहा जायीयेगा’ मधली सतार, पियानो, व्हायोलिंस यांची एकत्रीत सुरावट असो की ‘निलेनिले अंबर’ मधली गिटार असो, की ‘ओ सजना बरखा बहार आयी’ मधली सतार कुठल्याही गाण्यातला प्राण श्रोत्यांपर्यत पोहोचवण्याचं काम सत्यजित प्रभूंचा कि-बोर्ड करतोच करतो.

खुप महाग कि-बोर्ड असला की त्या बरोबर रेडीमेड खुप साऊंडस मिळतात असा प्रकार नसतो. तर ते साऊंडस वादकाला तयार करावे लागतात. मुळ वाद्याच्या जवळ जाणारे स्वर तयार केले तरच ते वादन प्रत्ययकारी असू शकतं. सत्यजित हे साऊंड तयार तर करतातच पण इतर वादकांना जर ते हवे असतील तर ते कॉपी करून द्यायला ते सदैव तयार असतात.

एकाच वेळी दोन वेगवेगळ्या सुरावटी किंवा वेगवेगळी वाद्य वाजवण्याचं कसब असलेला हा कलाकार अनेक दिग्गजांकडून वाखाणला गेला आहे. पंचमदांच्या वाद्यमेळ्यात केरसी लॉर्ड (Kerasi Lord) ऍकॉर्डीयन आणि मनोहारी सिंह सेक्सोफोन वाजवात असत हे सर्वश्रूत आहे. ‘रुप तेरा मस्ताना’, ‘ये शाम मसतानी’ या सारखी गाणी त्यांच्या सुरावटींनी अजरामर झाली आहेत. संगितकार आणि संगित संयोजक कमलेश भडकमकरांच्या स्टुडिओमध्ये ‘गुलाबी आखे’ या गाण्याचं रेकॉर्डींग करायचं होतं. ‘गुलाबी आखे’ मधला ऍकॉर्डीयन चा पिस सत्यजितनी आदल्या दिवशी स्टुडिओत वाजऊन झाला होता. दुसर्‍या दिवशी मनोहारी सिंह सेक्सोफोन वाजण्याकरीता स्टुडीओत आले, त्यानी आदल्या दिवशी झालेलं रेकॉर्डींग ऎकलं आणि ‘ऍकॉर्डीयन किसने केरसी लॉर्डने बजाया है क्या?’ असा प्रश्न केला. मनोहारी सिंहसारख्या महान कलाकाराकडून अशी दाद मिळवणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. असाच एक किस्सा सारेगमप या झी वाहिनीवरच्या कार्यक्रमामधला आहे. त्या दिवशी लक्ष्मिकांत-प्यारेलाल या संगितकारांच्या जोडीमधले प्यारेभाई परिक्षक म्हणून आले होते. गायिका ‘आ... जानेजा’ गाण गात होती त्या गाण्यातली क्लिष्ट सुरावट सत्यजितनी हुबेहुब वाजवली तेव्हा प्यारेभाईना राहावलं नाही जागेवरच उभं राहून त्यानी सत्यजितना ‘सुरेख’ अशी खुण करून दाद दिली. वानगी दाखल हे दोन प्रसंग सागितले, असे अनेक उत्कट प्रसंग या वादकाच्या वाट्याला आले आहेत. सरेगमप या झी मराठी वाहिनीवरच्या कार्यक्रमात त्यांच्या वादनाचा आनंद जगभरातील प्रेक्षकांनी घेताना असे अनेक सुखद क्षण अनुभवले आहेतच. 

असाहा गुणी कलाकार ‘जादूची पेटी’, जिवलग प्रस्तूत  म्युZeeशियंस, आवाज की दुनिया, गाने सुहाने, अमृत लता, अजय-अतूल संगित रजनी अशा अनेक कार्यक्रमांमधून ऎकता येईलच, पण सुरेशजी वाडकर, अजत-अतूल, वैशाली सामंत या बरोबरच अनेक मराठी–हिंदी संगिताच्या कार्यक्रमात त्यांच्या वादनाचा आनंद लुटता येईल.

नरेंद्र प्रभू

                                                             



                                                

05 August, 2012

रौप्यमहोत्सवी ‘चौरंग’




‘अशोक हांडे’ हे नाव उच्चारताच जबरदस्त मनोरंजन, सादरीकरणातली श्रीमंती, उत्तम नियोजन, कसलेले कलाकार, अभ्यासातून आलेली परिपूर्णता, उत्सव आणि उत्साह अशा अनेक गोष्टींची दंगल मनात उसळते. हा हा म्हणता चौरंगला पंचवीस वर्ष पूर्ण झाली. मंगलगाणी दंगलगाणी पासून सुरू झालेल्या या संगीतमय प्रवासाचा प्रत्येक टप्पा आणि कार्यक्रम मी जवळून पाहिलाय. उत्तरोत्तर होत जाणारी प्रगती आणि प्रयोगातील सातत्य हे तर आहेच पण एक मराठी ‘शो मॅन’ हे सगळं करतो आहे हे पाहून प्रत्येक नव्या कार्यक्रमाच्यावेळी उर भरून यायचा, अभिमान वाटायचा. मंगलगाणी दंगलगाणी, आवाज की दुनिया, आजादी ५०, माणिकमोती, गाने सुहाने, गंगा जमुना, अमृत लता, मधुरबाला, आपली आवड आणि अर्थातच मराठी बाणा, हे सगळे कार्यक्रम पाहाणे म्हणजे केवळ आत्मानंद होता. कार्यक्रमातून भारावून जाणारा रसिक अशोक हांडे हे नाव आपल्या हृदयावर कोरणारच अशी त्या प्रयोगांची छाप असायची, अजूनही तो सिलसिला चालू आहे. अशोक हांडेंच्या  चौरंग या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आशोक हांडे आणि चौरंगच्या संपूर्ण टिमला मझ्या मना पासून शुभेच्छा!


अशोक हांडेंनी हे मनोरंजन विश्व कसं उभं केलं याची एक झलक आजच्या लोकसत्ताच्या रविवार वृत्तांत मध्ये त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून वाचता आली  ती पूढे देत आहे.

‘चौरंगा’वर डाव मांडला!
रोहन टिल्लू, रविवार, ५ ऑगस्ट २०१२

‘मंगलगाणी दंगलगाणी’, ‘अमृतलता’, ‘मधुरबाला’, ‘मराठी बाणा’ यांसारखे अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर करणाऱ्या ‘चौरंग’ या संस्थेला ७ ऑगस्ट रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा प्रवास अभिमानास्पद तर होताच, पण त्याचबरोबर आव्हानात्मकही होता. या आव्हानांबद्दल आणि ‘चौरंग’च्या वाटचालीबद्दल ‘चौरंग’चे सर्वेसर्वा अशोक हांडे यांच्याशी केलेली ही बातचित..

गेल्या २५ वर्षांत तुम्ही अनेक दर्जेदार कार्यक्रम दिलेत. पण या सर्व कार्यक्रमांसाठीचं सांगीतिक बाळकडू नेमकं कुठे मिळालं?

हे बाळकडू आम्हाला पाजण्यात अनेक गोष्टींचा आणि गावांचा हात आहे. माझ्या बालपणाचा सुरुवातीचा काळ हा खेडेगावात वगैरे गेला. उंब्रज तालुक्यात आमचं गाव होतं. त्यामुळे ग्रामीण जीवन, बारा बलुते वगैरे आम्ही खूप जवळून पाहिलं होतं. या ग्रामीण जीवनात संगीताला, त्यातही लोकसंगीताला खूप वरचं स्थान आहे. लग्नापासून धार्मिक उत्सवांपर्यंत सगळीकडे लोकसंगीत अगदी ठासून भरलं आहे. त्यात तमाशाची पंढरी मानलं जाणारं नारायणगाव हे आम्हाला खूप जवळ. त्यामुळे तमाशाचा नादही (चांगल्या अर्थाने) लहानपणापासूनच लागला. शेतावर राखणीला मामाबरोबर जायचो. आम्हाला तमाशाचं वेड लागलं, त्याला कारण आमचा हा मामा! आम्ही राखणीला म्हणून जायचो आणि पाच किलोमीटर लांब धावत जाऊन तमाशा बघून यायचो. तर तात्पर्य हे की, लोकसंगीताचे संस्कार आमच्यावर लहानपणापासूनच झाले.


मग मुंबईचा प्रभाव तुमच्यावर नेमका किती आणि कसा पडला?

मुंबईचा म्हणण्यापेक्षाही रंगारी बदक चाळीचा प्रभाव माझ्यावर जास्त पडला. ही चाळ म्हणजे मुंबईतला महाराष्ट्र होता. महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागातून लोक त्या चाळीत राहायला आले होते. ते आले ते त्यांची संस्कृती, लोकसंगीत वगैरेंची परंपरा घेऊनच आले. त्यामुळे रंगारी बदक चाळीत प्रत्येक सण साजरा करण्याची वेगवेगळी तऱ्हा होती. त्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लाऊडस्पीकरवरून चालणारी गाणी. जुनी गाणी सतत वाजायची आणि आमच्या कानी पडायची. त्यामुळे त्या गाण्यांचे शब्दच नाही, तर दोन कडव्यांमधलं संगीतही अगदी मनात कोरलं गेलंय. याचा फायदा मला ‘आवाज की दुनिया’, ‘अमृतलता’, ‘मधुरबाला’ वगैरे कार्यक्रम करताना झाला.


हे संस्कार तुमच्या बरोबरच्या प्रत्येकावरच झाले असतील. पण मग अशोक हांडे, चौरंग आणि एकापेक्षा एक यश संपादन करणारे अनेक कार्यक्रम हा सिलसिला कसा सुरू झाला?

अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण या संस्कारांबरोबरच चिकित्सक शाळेत मी नाटकंही करायचो. रुपारेल कॉलेजमधून एकांकिका केल्या होत्या. कॉलेजच्या एनएसएस युनिटचा प्रमुख म्हणूनही मी जबाबदारी सांभाळली होती. त्या वेळी इंटरला असताना मंगल वाचनात दुर्गाबाई भागवतांचा ‘महाराष्ट्राची दगडी शीर’ नावाचा धडा होता. त्याचबरोबर शि. म. परांजपे यांचा ‘खरं सोनं’ हा धडाही होता. या दोन धडय़ांवरून मला ‘पसायदान ते कसाईदान’ची कल्पना सुचली. त्यावेळी पु. लं.चा ‘तीन पैशांचा तमाशा’ जोरात चालू होता आणि त्यात हे कसाईदान होतं. त्यातून मी ते उचललं आणि १९७७मध्ये रुपारेल कॉलेजच्या एनएसएस युनिटसाठी हा कार्यक्रम पहिल्यांदा सादर केला. तो सगळ्यांना खूपच आवडला. मग त्याच वर्षी कॉलेज डेलाही तो केला. मी १९८०मध्ये मुलुंडला राहायला आलो. तिथे आम्ही ‘संस्था मुलुंड’ या संस्थेतर्फे तो मुलुंडमध्ये केला. मग विरंगुळा म्हणून गणपतीत वगैरे तो होतच राहिला. पुढे ३० एप्रिल १९८७मध्ये ‘नाटय़दर्पण रजनी’ या कार्यक्रमात ‘पसायदान ते कसाईदान’ आम्ही सादर केला. त्या वेळी एका वर्तमानपत्रात असं छापून आलं होतं की, यंदाच्या नाटय़दर्पण रजनीचं एकमेव फलित म्हणजे अशोक हांडे आणि त्याचा ‘पसायदान ते कसाईदान’ हा कार्यक्रम. तर त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम व्यावसायिक मंचावर आणण्याचं ठरवलं. त्यासाठी ७ ऑगस्ट १९८७ रोजी ‘चौरंग’ नावाची संस्था स्थापन केली आणि ‘पसायदान ते कसाईदान’चा ‘मंगलगाणी दंगलगाणी’ झाला.


‘आझादी ५०’ करताना भारताच्या स्वातंत्र्याची पन्नास वर्षे, हीच कल्पना डोक्यात होती का?

तसंच काही नाही. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने एखादा कार्यक्रम केला जावा, अशी इच्छा कोलकातामधील एका संस्थेने व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम हाती घेतला. पण या कार्यक्रमाची बीजं खूप लहानपणीच मनात रोवली गेली होती. मी चौथीत असताना आम्हाला शिंदे नावाचे सर शिकवायला होते. ते नेहमी एक कविता म्हणून दाखवायचे. 
‘
गजनी, घोरी, गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद, लोदी
सुलतान वेशी राज्य मिळविले, दिल्लीची गादी’
ही कविता मनात घर करून बसली होती. ‘आझादी ५०’ करताना या कवितेची खूपच मदत झाली. 


हात घालेल त्या कार्यक्रमात ‘चौरंग’ने तुफान यश मिळवलं. पण त्यामागे अशोक हांडे नावाच्या कलाकारासह त्यात दडलेला व्यावसायिक आणि व्यवस्थापकही होता. हा व्यवस्थापक कसा घडला?

याला सर्वात मुख्य कारण म्हणजे आमचा परंपरागत आंब्यांचा धंदा. या आंब्यांनी मला व्यवसायाचा रस पाजला. लहानपणापासून वडिलांबरोबर आम्ही या धंद्यात भाग घेतला होता. त्यांनीच आम्हाला धंदा कसा करावा, याचं प्राथमिक शिक्षण दिलं. मग पुढे आम्हीही अनुभवातून शिकत गेलो. तर माझ्यातला व्यावसायिक हा कदाचित त्या ‘जीन्स्’मधून घडला असावा. पण व्यवस्थापक मात्र मी स्वत: घडवला. कॉलेजमध्ये असताना माझ्या प्रत्येक एकांकिकेचं प्रॉडक्शन कंट्रोल नेहमी मीच केलं आहे. मुलुंडमधील आमच्या संस्थेचं व्यवस्थापनही मीच केलं होतं. सुरुवातीला ‘मंगलगाणी दंगलगाणी’ फार चालला नाही. पण आम्ही लंडनचा दौरा करून आल्यावर इथेही तो कार्यक्रम धो धो चालायला लागला. आमचे पहिले तीनशे-चारशे प्रयोग रिकामेच गेले होते. पण माझ्यातल्या व्यवस्थापकाने आणि व्यावसायिकाने हार मानली नाही. तसंच या आंब्याच्या धंद्यामुळे मी खूप फिरलो. त्याचाही फायदा मला दौरे आखताना झाला.


तुमच्या प्रत्येक कार्यक्रमापाठी एक तरी कथा आहे. त्याबाबत काही सांगाल का?

उगाच करायचा म्हणून मी कधीच कार्यक्रम केला नाही. त्या कार्यक्रमाला काही तरी हेतू हवा. तो नसेल, तर मग त्याला काही अर्थच राहत नाही. लताजींचा अमृतमहोत्सव झाला, तेव्हा एका वाहिनीवर त्यांच्या गाण्यांचा रिमिक्स कार्यक्रम सादर झाला होता. मला तो प्रचंड खटकला आणि त्याबाबत संतापही आला. एका महान गायिकेचा अमृत महोत्सव अशा प्रकारे साजरा व्हावा, याची खंत बोचत होती. त्यातूनच ‘अमृतलता’ समोर आला. माणिक वर्मा या शास्त्रीय आणि भावगीत हे दोन्ही प्रकार गाणाऱ्या माझ्या मते एकमेव गायिका. त्यांच्या मृत्यूनंतर भारती आचरेकर यांनी माझ्याकडे माणिक वर्मावर एखादा कार्यक्रम करावा, अशी विनंती केली होती. त्यातून ‘माणिकमोती’ तयार झाला. तीच कहाणी ‘गंगा-यमुना’ या कार्यक्रमाची. आपल्याकडे ‘रुपेरी पडद्याला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्न’ याच नजरेने मधुबालाकडे बघितलं जातं. पण त्या सौंदर्यवतीला आयुष्यात खूप सोसावं लागलं. ते सर्व मी ‘मधुरबाला’च्या रूपात मांडलं. ‘यशवंत’ या कार्यक्रमात तर यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याची संधी मिळाली.


पण तुमचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘मराठी बाणा’. तर हा ‘बाणा’ नेमका कसा तयार झाला?

आम्ही नवीन शतकाच्या स्वागतासाठी सांगलीत ‘स्वागत-२०००’ हा कार्यक्रम केला होता. त्यात गेल्या शतकात सांगलीचं नाव मोठं करणाऱ्या सांगलीच्या सुपुत्रांचा आढावा घेतला होता. त्या वेळी सांस्कृतिक आणि सांगीतिक क्षेत्रात भलंमोठं योगदान देणारे अनेक कलाकार आणि त्यांची कला समोर आली. त्या निमित्ताने इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. हा कार्यक्रम नंतर २२ ऑक्टोबरला गगनगिरी महाराजांच्या आश्रमात झाला होता. त्या वेळी तर लोक अक्षरश: बेभान झाले आणि त्याच वेळी आम्ही हा कार्यक्रम एका नव्या नावाने व्यावसायिक स्वरूपात आणायचं ठरवलं. नाव ठरलं, ‘मराठी बाणा’. विचार करा, २२ ऑक्टोबरला आम्ही हा कार्यक्रम करायचं ठरवलं आणि त्याचा पहिला प्रयोग अक्षरश: दहा दिवसांत मी दीनानाथ नाटय़मंदिरात १ नोव्हेंबर रोजी केला.


या यशात कलाकारांचा आणि ‘चौरंग’शी संबंधित सर्वाचाच वाटा असेल ना? मग हे कलाकार नेमके कसे निवडलेत आणि सांभाळलेत?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ‘चौरंग’मध्ये पंक्तिभेद अजिबात नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे, सर्वाना सारखी वागणूक मिळते. दौऱ्याच्या वेळी मी जे खातो तेच माझे कलाकारही खातात. तसंच आमच्याकडे चार बसेस आणि चार टेम्पो आहेत. सगळे कलाकार व्यवस्थित झोपून जातात आणि कपडेपट, सेट वगैरेही अगदी व्यवस्थित पोहोचतात. ‘चौरंग’साठी काम करणं, म्हणजे जास्तीत जास्त कार्यक्रम आणि कमीत कमी त्रास, हे कलाकारांना माहीत झालं आहे. त्यामुळे कलाकार आमच्याकडे अगदी आवर्जून काम करत असतात.


पंचवीस वर्षांची यशस्वी वाटचाल आणि एकापेक्षा एक दणकेबाज कार्यक्रम यानंतर आता ‘चौरंग’ काय घेऊन येणार आहे?

सुनील गावस्कर नेहमी सेन्चुरी केली की नव्याने गार्ड घ्यायचा. त्याचप्रमाणे आम्हीही आता पुन्हा एकदा गार्ड घेणार आहोत. आमचे सध्याचे कार्यक्रमच एवढे तुफान चालू आहेत की, सध्या तरी नवीन असं काहीच करत नाही. पण लवकरच आम्ही प्रेक्षकांसाठी नवीन कल्पनेवर आधारित कार्यक्रम नक्कीच घेऊन येऊ.  



27 November, 2011

सदाबहार ‘गीतमाला’





“देवी और सज्जानो.........., बहनो और भाईयो.......” अशी हाक देऊन तमाम भारतीयांना चाळीस वर्षाहून जास्त काळ ‘बिनाका गीतमाला’ या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडून ठेवणारे अमीन सायानी काल प्रत्यक्ष ऎकायला मिळाले. निमित्त होतं ‘स्वरगंधार’चे मंदार कर्णीक यांनी आयोजित केलेल्या ‘गीतमाला के सुरीले संगीतकार- अमीन सयानी के साथ’ या कार्यक्रमाचं. रेडीओ सिलोन वरून दर बुधवारी रात्रौ आठ वाजता सादर होणार्‍या ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमाने त्या काळी संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावलं होतं. तब्बल चाळीस वर्षाहून जास्त काळ ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमाने सर्व भारतीय एका सुत्रात बांधले जात होते. ‘श्रीलंका ब्रॉडकास्टींग कॉर्पोरॅशन’ किंवा रेडीओ सिलोन हा तेव्हा सगळ्याना जोडणारा एक समान धागा होता. कानात प्राण आणून रसिक ती गाणी ऎकत होते. चारशेहून जास्त रेडीओ क्लब स्थापन झाले होते. त्या काळी घरोघरी रेडीओ नव्हते, मग छोट्या-मोठया हॉटेलच्या परिसरात किंवा शेजारच्या घरी जमून मंडळी या कार्यक्रमाची मजा अनुभवत असत. आपली आवडती गाणी ऎकण्याचं तेव्हाचं ते एकमेव साधन होतं. नुसती गाणी ऎकणं वेगळं आणि अमीन सयानीसारख्या निवेदकाकडून किस्से ऎकता ऎकता एक  एका गाण्याचा आनंद घेण वेगळं. संपुर्ण तासभर तमाम जनतेला एका जागी खिळऊन ठेवण्याची ताकत अमीन सयानी यांच्या निवेदनात होती आणि आजही आहे. गायक गायीकांचा सुरीलास्वर ऎकतानाच सयानीसाहेबांचं निवेदनही सुश्राव्य असच असायचं. एका अर्थाने हा सुरांचा जादुगारच आहे. अनेक संगीतकार ‘गीतमालेत’ आपण कुठे आहोत यावरून आपली पातळी ठरवत असत.

हिंदी चित्रपट संगीत सृष्टीने तमाम भारतीयांचं जीवन खर्‍या अर्थाने सुसह्य बनवलं. लोक आपलं सुख-दुख: या गाण्यात शोधू लागले. लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, महंमद रफी, मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, हेमंत कुमार पासून अगदी अलका याज्ञीक या गायक-गायीका पर्यंत आणि नौशाद, हेमंत कुमार, ओ.पी. नय्यर, एस.डी बर्मन, सी. रामचंद्र, आर. डी बर्मन, शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम, रवींद्र जैन अशा अनेक दिग्गज संगीतकारांचं संगीत जनसामान्यापर्यंत पोहोचलं, रुढ केलं ते गीतमालेनं. शकील बदायुनी, राजेंद्र कृष्ण, शैलेंद्र, मजरूह सुलतानपुरी, भरत व्यास, शाहीर लुधीयानवी, हसरत जयपुरी, आनंद बक्षी, अंजान, समीर अशा अनेक गीतकारांना ओळख प्राप्त करून दिली आणि त्यांचे शब्द रसिकांच्या हृदयावर कायमचे कोरले गेले. सामान्यांच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण आणले. ‘गीतमाले’ची लोक चातका प्रमाणे वाट बघत असत. लहाणपणी कोकणातल्या कोचर्‍यासारख्या खेडेगावात असताना मी याचा अनुभव घेतला आहे.

‘स्वरगंधार’ने काल यशवंत नाट्यगृहात सादर केलेल्या या कार्यक्रमाला अंबरीश मिश्र यांचं निवेदन लाभलं होतं, काही मिनिटं स्वत: अमीन सयानीसाहेब रंगमंचावर अवतरले होते. बाकीच्या वेळात ते दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधत होते. जुन्या काळातील आठवणींना उजाळा देत होते. सोनाली कर्णीक अर्चना गोरे, हृषीकेश रानडे, संदीप शहा आदी गायकांनी आणि अमर ओक, सुराज साठे, अविनाश चंद्रचूड, मनीष कुलकर्णी, दत्ता तावडे  या मुझिशीयनसनी तर बहार आणली. सुमारे तीन तास चाललेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि जुन्या स्मृतींना उजाळा देत गेला. प्रत्येक क्षण मंतरलेला होता. भारलेला होता. श्रोतृवृंद आसनाला खिळलेला होता. कार्यक्रम संपल्यावर तरंगत आपापल्या घरी जाताना तरूण झाल्याचा भास प्रत्येकाला झाला असावा.                     

22 November, 2011

देवा काय देऊ तुला?





श्रेष्ठ संगीतकार, गीतकार, कवी, गायक आणि विशेष म्हणजे खरोखरीचा ‘देव’माणूस असलेलं एक उमदं व्यक्तीमत्व म्हणजे यशवंत देव. काल माटुंग्याच्या यशवंत नाट्य गृहात त्यांचा “माझा सन्मान” देऊन सत्कार करण्यात आला. वयाची पंच्याऎशी वर्ष पुर्ण करणार्‍या यशवंत देवांना नुकताच माहाराष्ट्र शासनाचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार देण्यात आला. त्या पुरस्काराची पुर्ण रक्कम रुपये दोन लाख यशवंत देवांनी दिवंगत संगीतकार श्रीनीवास खळे यांच्या कुटुंबीयांना तत्काल देऊन टाकली. या त्यांच्या दातृत्वामुळे भारावून गेलेल्या अशोक मुळे या वल्ली ने हा सत्काराचा घाट घातला होता.

अशोक मुळेंनी आयोजीत केलेला हा देवा... काय देऊ तुला? नामक सोहळा असल्याने नाट्य मंदिर हाऊस फुल्ल होतं हे वेगळं सागायला नकोच. भाऊ मराठेंनी निवेदनासाठी ध्वनीक्षेपक हातात घ्यायच्याआधी मुळे काका स्टेजवर आले (तसे ते स्टेज, नाट्यगृह, आत-बाहेर सगळीकडेच वावरत होते. कारण कार्यक्रमाची धुरा ते एकहाती वाहत होते.) कार्यक्रम हाऊस फुल्ल असूनही समोरच्या काही खुर्च्यांमध्ये अजूनही माणसं नाहीत हे पाहाताच त्यांनी तिथून स्टेजवरूनच पास घेऊन जाणार्‍यांची कडक शब्दात हजेरी घेतली. “मिटींगावर मिटींगा आणि हजार कामं होती तर पास मागितलेच कशाला? फुकट आहेत म्हणून?“ अशोक मुळे कडाडले. चला कार्यक्रमाचा नारळ अशा रितीने फुटला म्हणजे आता मजा येणार असं मनातल्या मनात म्हणत मी सावरून बसलो (मुळे काकांचा कार्यक्रम म्हणजे जे काही म्हणायचं ते मनातल्या मनातच, उघड बोलायची कुणाची हिम्मत आहे? ते सत्कार मुर्तीचीही पत्रास ठेवत नाहीत, मग आपण कोण पामर? शिवाय त्यांचा तो सर्वत्र होणारा संचार पाहाता कधी समोर प्रगट होतील असं सारखं वाटत राहतं.) “सगळे कलाकार फुकट गायला-वाजवायला तयार झाले असले तरी आज त्यांना दोन दोन पाकळ्या देणार आहे” मुळेंनी दुसरा षटकार मारला. सभागृह हास्यात बुडून गेलं. मांगिरीश इस्टेट्स चे नितिन नेरूरकर यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला आहे असं नमूद करून त्यांनी त्याना आणि महाराष्ट्र टाईम्सचे संपादक अशोक पानवलकर यांना स्टेजवर यायची विनंती केली आणि ते येत असतानाच म्हणाले “मला कार्यक्रम करायचा असला की पैसे कमी पडत नाहीत. कोण ना कोण देतच, आजच्या या कार्यक्रमाला नेरूरकरांनी दिले. लागतील ते सगळे पैसे त्यानी दिलेत. हो, हा आता पुष्पगुच्छ दोतोय ना, तो सुद्धा त्यांच्या पैशातून घेतला आहे.” (प्रचंड हशा) वाटत होतं मुळे काकांनीच बोलतच रहावं. एखादी मैफल जमून जाते. या गोष्टी ठरवून होत नसतात. कालची मैफल उत्तरोत्तर रंगतच गेली. खरच बहार आली राजे हो...!         

भाऊ मराठेंनी निवेदनाला सुरूवात केली, खुमासदार किस्से आणि आठवणीचे पट उलगडताना ‘देव’ हा शब्द केंद्रस्थानी ठेऊन गाणी म्हटली जात होती. देव देव्हर्‍यात नाही, देवा दया तुझी ही, देवाचीये दारी, देह देवाचे मंदिर अशी अनेक गाणी सादर होत होती. अरविंद पिळगावकर, अजित परब, अमोल बावडेकर, बकुळ पंडीत, सोनाली कर्णीक, अर्चना गोरे, निलिमा, मधुरा कुंभार, श्रीरंग भावे असे दिग्गज कलाकार आणि साथीला कमलेश भडकमकर, जगदीश मयेकर आणि त्यांची टिम, मध्यंतर कधी आला कळलच नाही.
  

मध्यंतरानंतर पडदा दूर झाला तेव्हा मुळे काका व्यासपीठावर अवतरले ते दोन खुर्च्या घेऊनच. त्यांनी पुन्हा माईक हाती घेतला. सेकंड इनींगला बॅटीगला आल्यासारखे ते बोलायला लागले, सगळं बोलणं अनौपचारीक होतं. “यशवंत देवांचा सत्कार म्हणून त्यांचीच गाणी पाहिजेत असं कुठे आहे? ही गाणी मी निवडलीत. त्यांची एक दोन ठेवलीत. ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे गाणं माझ्यासाठी ठेवलं. अजून घडी तशीच आहे...... काही घडलं नाही..... गायकांना सुद्धा सागितलं मी सांगेन ते गाणं म्हणायचं. बस्स...! तुमची ती संथ गाणी नकोत, कुणी म्हणालं, पण हे बरं वाटतं....., वाटू दे ...., ते तू घरी म्हण. इकडे सगळं कसं दणक्यात झालं पाहिजे. देवांनी सत्काराची एवढी मोठी रक्कम खळेंच्या कुटूंबीयांना दिली म्हणून सत्कार करावासा वाटला. त्यांच्या हृदयात ‘करूणा’ आहे. ती त्यांना सोडून गेली नाही. यांचा सत्कार केलाच पाहिजे. नाही तर ते तसं नको. घराताच एकमेकांना पुरस्कार द्यायचे आणि वर म्हणायचं मी हल्ली पुरस्कार स्विकारत नाही. इथं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, सगळे प्रेमाने येतात. हा साउंडवाला टिट्टू फार बिझी असतो, झाकिर हुसेनलाही हाच लागतो, म्हटल हा बिझी आहे, दुसर्‍याल बोलाऊया. पण हाच म्हणाला, मी येणारच, दुसरा आला तरी बाजूला लावेन. हे असं प्रेम आहे. म्हणून हा उत्सव होतो. (प्रत्येक गायक कलाकार सांगत होते मुळे काकांचा आदेश असतो, विनंती नाही. आम्ही तो पाळतोच.) मी मानपत्र अजिबात देत नाही. ज्यांना मानपत्र द्यायचं त्यांनाच त्यांची माहिती विचारायची आणि पुन्हा तेच त्याला माहीत असलेलच लिहून द्यायचं, हे असलं मी करणार नाही.” बोलण्यात जरा वेळच झाला पण सगळं अनौपचारीक होतं, पुन्हा म्हणाले ”आता निवेदन फार नको, पानवलकर बोलतील, मग भाऊ, मग यशवंत देव”

देवांचा सत्कार झाला. पानवलकर, भाऊंची भाषणं झाली. देव उत्तराला उभे राहिले. म्हणाले “ या माणसात माणूसकी आहे म्हणून सगळे बोलावल्या बरोबर येतात. हे मुळे नेहमी पांढर्‍या कपड्यात असतात. हा माणूस जसा बाहेरून तसा आतूनही आहे. यांचे अंतरंग आणि बहीर्रंगही पांढरे........ हौस भारी.... म्हणून यांना मी ‘व्हाईट हौस’ म्हणतो. तुम्हाला यांनी खुप हसवलं. तुम्ही आता खुप हसलात, हसलच पाहिजे. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की जो हसतो.  तुमच्या चेहर्‍यावरची हास्य रेषा हीच खरी भाग्य रेषा आहे.” त्या नंतर ‘एक शाम, हसी के नाम’ ही कविता त्यांनी म्हटली, रसिकांनीही कवितेचा भरपूर आनंद घेतला. पुढे यशवंत देव म्हणाले “देव असतो की नाही हे माहित नाही पण प्रत्येक माणसात परमेश्वर असतो हे मी ठामपणे सांगू शकतो.” नंतर ते आपल्या बालपणीच्या मित्राच्या आठवणीत रमून गेले. 

सोळावं वरीस होतं, मी मुंबईच्या शाळेत
मुरलीधर जयसिंगाने धरला माझा हात.

जयसिंग या मित्रामुळे आपण संगीताच्या क्षेत्रात आलो, आकाशवाणीवर गेलो. अशा आठवणी सांगताना देव साहेब सद्गदीत झाले होते.  

रात्र बरीच चढली होती. उत्तरार्धाचा शेवटही जवळ येत होता. “भाऊ.... चार गाणी एका निवेदनात मोकळी करा” मुळे काकांचा हुकूम झाला. पुन्हा गाण्यांची मैफल सुरू झाली आणि ‘आधी बिज एकले’ या ‘संत तुकाराम’ चित्रपटाच्या गाण्याने सांगता झाली. आसनाला खिळून राहिलेले देव साहेबांचे चाहते रसिक उठले, पण सगळ्यांच्याच ह्रदयात भाव होते. 

देवा काय देऊ मी तुला?
गीत दिले तू मला...!

नरेंद्र प्रभू

                                                     




02 September, 2011

पद्मभूषण श्रीनिवास खळे अनंतात विलीन




आपल्या सर्वांगसुंदर रचनांनी तमाम मराठी मनाला गुंतवून करणारे संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे हे आज अनंतात विलीन झाले 
"जय महाराष्ट्र माझा", "गोरी गोरी पान", "शुक्रतारा मंदवारा", "बगळ्यांची माळ फुले", "श्रावणात घन निळा', "निज माझ्या नंदलाला', "या चिमण्यांनो परत फिरा रे', "सावळे सुंदर रुप मनोहर' अशा अनेक गाण्यांना खळेकाकांनी अप्रतीम स्वरसाज चढविला. भावगीत, अभंग, बालगीते, पोवाडा, लावणी अश्या सर्वच क्षेत्रात त्यांचा हातखंडा होता. अगदी लहानपणापासून मनाला रिझवणारी अनेक गाणी ज्या खळेकाकांमुळे ऎकायला मिळाली ते आता आपल्यात नाहीत याचं वाईट वाटतं.

संगीतासाठीच जगणारे खळेकाका गेले, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना.   

14 June, 2010

द म्युझिशियन - निलेश परब



तालवाद्याच्या तालाबरोबर नाचणारा आणि नाचवणारा अशी निलेशची एका वाक्यात ओळख करून देता येईल. या कलाकाराच्या नसानसातच ताल भरलेला आहे. ढोलक, ढोलकी, ड्रमसेटवर जेव्हा निलेशचा हात चालतो तेव्हा कानाबरोबरच डोळेही तृप्त होतात. स्टेजवर निलेश असला की एक जिवंतपणा असतो. संगीतात तो आकंठ बुडालेला असतो. वाजवण्या बरोबरच गाण्याचे बोलही त्याच्या तोंडी असतात. एरवी लावणीच्या वेळी ढोलकी वादकावर प्रकाशझोत टाकला जातो आणि प्रेक्षकांचं तिकडे लक्ष जात पण निलेशच्या बाबतीत तस नसतं तो रंगमंचावर आहे म्हणजे आपसूकच आपलं लक्ष त्याच्याकडे जातच.

झि मराठीच्या ‘सारेगमप’ मुळे निलेश सर्वांच्याच परिचयाचा झाला असला तरी त्या आधीपासूनच संगीताच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘द म्युझिशियन्स’ या केवळ वाद्यमेळ्याच्या कार्यक्रमात वादकांचे कसब पणाला लागते आणि इतर कलाकारांबरोबरच निलेशही आपली छाप या कार्यकमाद्वारे पाडतोच. ढोलक, ढोलकी, तबला, या बरोबरच जेम्बे हे आफ्रिकन वाद्यही निलेश तेवढ्याच ताकदीने वाजवतो. नुकताच दुरदर्शनच्या  M2G2  या कार्यक्रमात निलेशने स्वतः तयार केलेलं एक वाद्य वाजवून दाखवलं. कोकणात, गोव्यात खासकरून वाजवलं जाणारं ‘घुमट’ हे वाद्य. त्यात बदल करून त्या घुमटाला एका बाजू ऎवजी दोन्ही बाजूला पानं लावून त्यातून कर्णमधूर नाद निलेशने वाजवून दाखवला. अशा प्रकारे परंपरागत वाद्यांबरोबरच सतत प्रयोगशील राहून नवीन काही करून दाखवायची वृती असणारा एक कलावंत म्हणूनही रसिकांना निलेश हवाहवासा वाटतो. आता निलेश म्हटलं की ढोलकीवरची थाप आणि त्याचं ते निखळ हास्य सहज नजरे समोर येतं.  

08 June, 2010

द म्युझिशियन – सत्यजित प्रभू



अगदी दिड-दोन वर्षाचा असल्यापासून रेडिओवर लागलेली गाणी हार्मोनियमवर वाजवणार्‍या सत्यजितला वादनाची कला उपजतच आहे. कुणाकडेही वादनाच शिक्षण न घेताही सगळी वाद्य सत्यजितला वश होतात हे नंतरच्या काळात समजत गेलं. प्रथम हार्मोनियम आणि नंतर हाती येईल ते वाद्य जेव्हा सत्यजित वाजवत असे तेव्हा सर्वानाच आश्चर्य वाटे. दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात गेल्यापासून प्रत्येक वर्षीच्या  स्नेहसंमेलनात सत्यजितचं वादन हा अविभाज्य घटक बनलेला होता. जेमतेम चौदा वर्षाचा असतानाच सत्यजित अशोक हांडेंच्या संपर्कात आला आणि मग ‘मंगल गाणी- दंगल गाणी’ पासून ‘मराठी बाणा’पर्यंत आणि ‘आवज की दुनिया’ पासून ‘अमृत लता’ पर्यंत हजारो प्रयोगाना सत्यजित साथसंगत देताना, तसच इतर वादकांना सुरांचा फॉलोअप देताना दिसला. मुळ गाण्यात असलेली अनेक वाद्य प्रत्यक्षात स्टेजवर नसताना त्यांचा आवाज मात्र ऎकू यायचा तेव्हा अनेक जाणकार श्रोत्यांना ही गाणी रेकॉर्डवर वाजताहेत की काय असा प्रश्न पडायचा, पण ती सत्यजितच्या कि बोर्डची किमया आहे हे समजल्यावर प्रत्येकजण त्याचा चाहता व्हायचा. तो सिलसिला आजही तसाच सुरू आहे. झि मराठीच्या ‘सारेगमप’मध्ये तर अनेकदा ही जादू प्रेक्षकांना पहायला मिळते आणि मान्यवर परिक्षकही भारावून जातात. अशोक हांडे, विजय कदम, आप्पा वढावकर, अवधूत गुप्ते, अजय-अतूल, कौशल इनामदार, अजित परब, सलिल कुलकर्णी, श्रीनिवास खळेंपासून बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरेंपर्यंत विवीध क्षेत्रातले दिग्गज सत्यजितला हात उंचावून दाद देतात. पं. सुरेश वाडकर, पद्मजा फेणाणी, अरूण दाते यांची साथसंगतीसाठी सत्यजितहाच 'पहिली पसंद' आहे.

किबोर्डवर मुळ वाद्याबर हुकूम टोनस् तयार करावे लागतात तेव्हाच ते वाजवता येतात आणि ऎकायला मिळतात. अनेक वाद्यांचे असे टोनस् सत्यजितने तयार केले आहेत. म्हणूनच ‘सारेगमप’च्या एका कार्यक्रमात एकामागोमाग एक असे स्वर ऎकून अवधूत गुप्तेंनी सत्यजितचं ‘प्रभू’ हे आडनाव बदलून ‘ब्रम्हदेव’ ठेवलं पाहिजे असे उद्-गार काढले होते. ‘द म्युझिशियन्स’ या वाद्यमेळ्याच्या कार्यक्रमात तर सत्यजित  एक मॉजिशियन म्हणूनच वावरत असतो. त्या प्रयोगात सत्यजितचं अँकॉर्डीयन आणि पियानिका वाजवताना पाहाणं आणि ऎकणं हा एक देवदुर्लभ असा अनुभव असतो. दोन वेगळ्या प्रकारची वाद्य (किबोर्ड व पियानिका) एकाच वेळी एकाच कलाकाराने एकहाती वाजवणं हे सत्यजितच करू जाणे. त्याच्या या कौशल्याची पारख आप्पा वढावकरांसारख्या कलाकाराने सतरा-अठरा वर्षांपुर्वीच केली आणि स्वतःचं अँकॉर्डीयन सत्यजितच्या हवाली केलं. आप्पांना आता त्याचं चीज होताना पाहायला मिळालं असेल. टेलिव्हीजनच्या माध्यमातून हा कलाकार आता रसिकांच्या दिवाणखान्यात पोहोचला आहेच पण मला खात्री आहे त्याचं संगित त्यांच्या हृदयाला भिडेल. आता लवकरच सुरू होणार्‍या ‘लिट्टील चॅम्स् २’ मध्ये सत्यजितच्या बोटांची फुलपाखरं पुन्हा एकदा बागडताना दिसतील, त्याची वाट पाहूया.        

25 May, 2010

द म्युझिशियन – अमर ओक


‘बासरी’ म्हटलं की श्रीकृष्ण आणि कृष्ण म्हटलं की बासरी हे समिकरण ठरुन गेलेलं आहे. म्हणजे किमान द्वापारयुगापासून त्या बासरीने सर्वानाच मोहित केलं आहे. बांबूचा एक तुकडा आणि त्याला पाडलेली सहा भोकं, पण ती बालक़ृष्णाच्या ओठांना लागली की मग गोप-गोपीं बरोबर गायी-वासरंही त्याच्या भोवती गोळा होत, सर्वजण त्या अपुर्व सुरांनी मोहित होत असत आणि म्हणूनच कृष्णाचं एक नाव मनमोहन पडलं असावं. सद्ध्या असाच एक मनमोहन आपल्या बासरीच्या सुरावटी द्वारे उभ्या महाराष्ट्राला गुंग करून टाकत आहे. म्हणूनच अमर ओक म्हटलं की ते बासरीवाले का? असा प्रश्न विचारला जातो. या ब्लॉगवर  'द म्युझिशियन्स' पन्नासावा प्रयोग   या  पोस्टवर आलेली एक प्रतिक्रियाच बघाना फार बोलकी आहे  वाचक म्हणतात " बहुतांश नवीन कलाकारांची कला मला उथळ वाटते; एका उत्तम सतारवादकानीही माझ्याशी बोलताना आधीच्या कलाकारांची कला फार उच्च पातळीवरची होती आणि तशी विविधता आणि खोली संगीतात आणणं कठीण आहे, अशी कबुली दिली होती. अमर ओक हा एक कलाकार मात्र याला अपवाद आहे.  अमर ओकांबद्‌दल मात्र हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की ते दुसरे हरिप्रसादच आहेत. आणि ते खरंच आहे. त्यांच्या बासरीत जादू आहे. बासरीचा सर्वोत्कृष्ट वापर करणार्‍या हृदयनाथसारख्या संगीतकाराकडून ओकांना पावती मिळाली, याचा मला आनन्द झाला. मुख्य म्हणजे ओक संगीताचे तुकडे आहेत तसे वाज़वतात. स्वत:चं प्रभुत्व दाखवण्याची अनावश्यक धडपड, विचित्र कपडे, बोलताना मर्कट हातवारे वगैरे चाळे ते करत नाहीत. चौरसियांचे अत्यन्त कठीण असे एकदोन तुकडे वाज़वताना ओकांची ज़रा गडबड झाली, पण तो दोष अगदीच किरकोळ आहे. त्यांच्या कलेचं चीज़ करणारी नवीन गाणी आज़ कोणीही रचू शकत नाही हे ओकांचं दुर्दैव.हृदयनाथसारखा संगीतकार ओकांना मिळायला हवा होता." 

एखाद्या कलेशी जेव्हा तो कलाकार एकरूप होऊन जातो तेव्हा ती कला त्याला वश होते. अमर ओकांची बासरी त्यांना अशीच वश झालेली आहे. ‘चुरा लिया है’ किंवा ‘गोरी तेरा गाव बडा प्यारा’ हे गाणं जेव्हा आपण अमरच्या बासरीमधून ऎकतो तेव्हा आपण थक्क होऊन जातो. म्हणूनच टाइम्स मुझिक सारख्या कंपनीने ‘प्यार मोहब्बत’ ही अमर ओकनी वाजवलेल्या बासरीची सिडी बाजारात आणली आहे. झि मराठीच्या ‘सारेगमप’ मध्ये जेव्हा ही बासरी वाजते तेव्हा बर्‍याच वेळा अख्खा पडदाच अमर ओकने व्यापलेला असतो. समोर कोणतीही महनीय व्यक्ती परिक्षक म्हणून असो अमर ओकच्या बासरीला दाद मिळाली नाही असं कधी होत नाही. ‘द म्युझिशियन्स्’ या वाद्य मैफिलीत ‘सावन का महिना’ असो की ‘कही दूर जब दिन ढल जाये’ असो समोरचे प्रेक्षक भाराऊन जातात आणि उभे राहून मानवंदना देतात. एवढं असलं तरी अशा या गुणी कलाकाराचे पाय जमिनीवरच आहेत. बासरीच्या सहा छिद्रांवाटे काम, क्रोध, मद, मत्सर आदी षड्-रिपू आपल्यातून निघून जातात असं ते म्हणतात ते खरं असावं. ऎकणार्‍याला सुद्धा जो अलौकीक आनंद मिळतो त्याला तोड नाही. ती सुरावट ऎकतच रहावी असं वाटत रहातं, ती बासरी बस रे असं कधी वाटतच नाही.     
         

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates