17 May, 2019

ऑस्ट्रेलिया... ऑस्ट्रेलिया – एक





आम्ही ( मी आणि सदाबहार मित्र आत्माराम परब) एतिहाद एअरवेजने सिडनीला जायला निघालो. मुंबई आंतरराष्ट्रिय विमानतळावरच 'आम्ही आणि आमचे बाप'चे निर्माता मयूर रानडे, अभिनेता अतुल परचुरे भेटले आणि तिथेच गप्पांचा फड रंगला. ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथे साजर्‍या होणार्‍या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९साठी ते ही सदर नाटक सादर करण्याकरीता चालले होते. जेट एअरवेजची घरघर थांबली असल्याने आणि त्याना घरघर लागल्याने ऐन वेळी आम्हाला विमान कंपनी बदलावी लागली होती. मग दक्षिणेला जायच्या आधीच आम्हाला मुंबई-अबू धाबी असा द्रविडी प्राणायाम करावा लागला. अडीज तास मागे पश्चिमेला अबू धाबी करून मग सिडनी गाठायची होती. अबू धाबी जवळ आली तशी ती मरू भूमी दिसायला लागली. मनात अरेबियन नाईट्स, तेल, पैसा, बुरखा, आयसीस, इथलं तेल संपलं तर? नंतर...., असे विचार येत होते.


अबू धाबीला उतरलो, पुन्हा सिडनीकडे प्रयाण करायचं होतं. पुन्हा सुरक्षा तपासणी सुरू झाली. प्रत्येक ठिकाणी थोडा  वेग़ळा प्रकार असतो. इथे बुट, पट्टा, घड्याळ, आमचं लडाखी कंकण सगळं उतरवून हॅन्ड बॅगसह ट्रे मध्ये ठेवलं. माझी तपासणी होऊन मी पुढे जाऊन बसलो, बरोबर मयूर रानडे आणि अतुल परचुरेही होते. आत्मा मात्र पाठीमागे अडकला होता. त्याच्या जवळ मायीने खास बनऊन दिलेलं देशी गायीचं शुद्ध तूप होतं. 

मायीने दिलेलं तूप, त्यासाठी आत्माने केलेली छोटीसी लढाई, १०० ग्राम तूप एका बाटलीत भरून बाकीच त्या कौंटरवरच चाटून खाणं तोच करू जाणे.  आणि तेवढं करून पुन्हा ते अतुल पारचुरेना सांगणं याला हाईट म्हणतात,  त्याने ती कधीच गाठलीय, मध्ये मध्ये renew करतो एव्हढंच.
तू दिलेले तूप मी ते आवडीने खाईले

२०० ग्रामची तुपाची बाटली सुरक्षारक्षक पुढे घेऊन जायला देईनात तेव्हा या पठ्ठ्याने १०० ग्राम तूप एका बाटलीत भरून घेतलं आणि दुसर्‍या बाटलीमधलं तिथेच त्यांच्यासमोर चाटून खाल्लं. क्या बात हैआत्मा मायीला एक फोन करण्यासाठी ८० किमी पायपीट करीत केलॉंगला गेला होता तो प्रसंग आठवला. रात्रीचं जागरण आणि विमान प्रवासाचा थकवा या प्रसंगाने कुठच्या कुठे उडून गेला.                     

विमानाने अबुधाबीहून उड्डाण केलं आणि ते सिडॅनीच्या दिशेने निघालं. पुढचे १४ तास या विमानात बसून काढायचे होते. थोडी झोप, थोडं खाणं, थोडा सिनेमा असं करीत वेळ काढत होतो. जेवणात मात्र पाव आणि केक सदृश्य वस्तू आणि जुस मिळत होता. आता हे एवढं गोड कसं खायचं. वर ठेवलेल्या सॅकमधल्या गोळ्यासुद्धा घेता येत नव्हत्या कारण बाजुला बसलेला वृद्ध गृहस्थ (म्हातारा म्हणू का?) झोपला होता. मग गोड खाऊ नका असे हर्षदाचे (माझी बायको) शब्द कानी पडायला लागले. अजुबाजूला पाहिलं, मी जागाच होतो. कविता सुचायला लागली मग. फोन हाती घेतला आणि ती अशी अवतरली.:         

जिथे दिसतील शिते
तिथे याद तुझी येते
खाऊ नको गोड ते
शब्द आले ।

नको भात, खा चपाती
का खातो पुन्हा माती
नसताना मी संगती
शब्द आले ।

देतील पुरणपोळी
जिलेबीही ती वाटोळी
कितीदा करू टवाळी
शब्द आले 

करीता प्रवास मोठा
तरी आहे मागे सोटा
खाऊन पहा तू त्या
शब्द आले ।

(१७-०४-२०१९
अबू धाबी - सिडनी विमानातून)
     
थोडी डुलकी लागल्यानंतर जाग आली खिडकीमधून बाहेर पाहिलं तर सगळीकडे निळाई भरून उरलेली होती, वर आकाशात तशीच खालीही, इथे कोण कुणाशी स्पर्धा करतंय हा प्रश्नच होता, ते निळं आकाश की खाली अथांग पसरलेला सागर, अरबी समुद्र म्हणावं की दर्या? अरबी समुद्रच बरं, दर्या म्हटलं की मग आपले कोळी बांधव आठवतात आणि अर्थातच मासळी. इथे विमानात मांसाहार म्हणजे नुसतं चिकन, त्याला कोंबडी म्हणणं ही नकोच, उगाच कोंबडी वाड्याची आठवण जागी होते. ते आपलं व्हेज बरं, म्हणजे माझ्यासाठी, बाजूच्या म्हातारबाबाला काहीच पसंत नव्हतं, स्वतःच खाऊन झाल्यावर तो आपला माझ्या जेवणात लक्ष घालून होता.  "भराऊ का एक घास?" विचारावंस वाटत होतं. त्याला फळं हवी होती, अरे इथे कशी देणार...., ये कोकणात ये, तिकडे तूला बोन्डू देतो. जाऊदे

चला खाली पांढऱ्या ढगांनी थोडं चित्र बदललं. खाली गोवा आलं असावं, आता दर्याला उधाण आलं म्हणायला हरकत नाही. उधाण तसं ते मनालाही आलं होतं, खाली आपलं गाव आहे आणि आपण तिकडे न जाताच पुढे चाललोय असं वाटून मन खट्टू झालं. जोराची भूक लागली की घरंची आठवण येतेच. खाली तर प्रत्यक्ष गाव आहे. मालवणी जेवणाची अनीवार लहर आली बाजूच्या म्हात्यार्‍याकडे पाहून ती दाबून टाकली. परळच्या छितरमलकडून वळून जाणारी तांबडी एस्टी पाहिली की गावाहून मुंबईत आलो तेव्हा सुरूवातीला असं व्हायचं. सरळ ती गाडी पकडून गावी निघून जावं असं वाटायचं. गड्या आपला गाव खरंच बरा!

एक सिनेमा पाहून झाला, नंतर पुन्हा काढलेल्या एका प्रदीर्घ डुलकीनंतर खाली सिडनी आलं, आपण ऑस्ट्रेलिया खंडात येऊन पोचलो. आता १४ तासानंतर पुन्हा जमिनीला पाय लागणार. हे जग पहायची खुपच उत्सुकता लागून राहिली होती. विमानाची चाकं सिडनीला टेकली. 



                        

02 May, 2019

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९



ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथे १९ ते २१ एप्रिल २०१९ हे तीन दिवस अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ साजरं झालं. संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडातल्या एक हजारावर मराठी रसिकांनी यात भाग घेतला होता. यात ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड येथील मराठी बांधव तर होतेच पण ज्या महाराष्ट्रातून ही मंडळी हजारो मैलांवर जाऊन स्थाईक झाली त्या महाराष्ट्रामधून, मुंबईमधून अनेक मान्यवर या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर, तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते अच्युत गोडबोले, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू, ईशा टुर्सचे संचालक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक श्री. आत्माराम परब, चितळे बंधू मिठाईवालेचे श्री.केदार चितळे या मान्यवरांबरोबरच 'आम्ही आणि आमचे बाप'चे निर्माता मयूर रानडे, अभिनेता अतुल पारचुरे, आनंद इंगळे, पुष्कर स्त्रोत्री, अजित परब, 'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' चे लेखक नरेंद्र प्रभू, गायक कलाकार अनिरुद्ध जोशी, विश्वजीत बोरवणकर, शरयू दाते आणि प्रसन्नजीत कोसंबी सिडनीमध्ये दाखल झाले होते.

१९ एप्रिल २०१९ रोजी दुपारी ठिक दोन वाजता दिप प्रज्वलन करून या रंगारंग सोहळ्याला टाळ्यांच्या गजरात सुरूवात झाली. त्यानंतर आत्माराम परब यांच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटरसायकलवच्या प्रवासाची चित्तथरारक कथा असलेल्या ग्रंथाली प्रकाशनाच्या 'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' या वाचकप्रिय पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालं. त्यानंतर लगेचच डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रेरणादायी मुलाखत झाली. गिरगावतल्या गरिबांच्या शाळेत डॉ. माशेलकर यांचं शिक्षण झालं, पण त्याचे शिक्षक विचारांनी श्रीमंत होते. हळद आणि बासमतीचं पेटंट, रिलायंस Jio ची भरारी, Making impossible  possible, आयुष्यातल्या प्रयोगशाळेतलं ज्ञान, जुन्या नव्याचा संगम अशा अनेक विषयांना त्यानी आपल्या मुलाखतीत स्पर्श केला. संपूच नये असं वाटणारी ही मुलाखत जेव्हा संपली तेव्हा संपूर्ण स्त्रोतृवर्गाने उभं राहून टाळ्यांच्या प्रचंड गजरात डॉ. माशेलकरांना मनावंदना दिली.

भारलेल्या या वातावरणतच संमेलनात "आम्ही आणि आमचे बाप" या नाटकाचा प्रयोग साजरा झाला. महाराष्ट्राची दोन लाडकी व्यक्तिमत्व प्रल्हाद केशव अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या अष्टपैलू जीवाप्रवासावर आणि कलाजीवनावर आधारित हा अफलातून प्रयोग फारच रंगला आणि सर्वच कलाकारांनी वाहवा मिळवली.  महाराष्ट्राचं, मराठी मातीचं हे गतवैभव न्याहाळताना आपल्या मातीपासून दूर देशात स्थाईक झालेला नाट्यागारातील प्रत्येक मराठी रसिक आपापल्या स्मृतीरंजनात न्हाऊन निघाला होता. आचार्य अत्रे आणि पुल यांच्या कलागुणांचा हा गोफ म्हणजे एक अफलातून कलाकृती आहे. मयुर रानडे निर्माता असलेल्या या नाटकाचे तरुण दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी अत्रे आणि पु.ल. या दोन्ही महान कलाकारांना थोडक्या वेळात प्रभावीपणे रंगमंचावर सादर केलं आहे.

दुसर्‍या दिवशी प्रचिती लिमये दिग्दर्शित महाराष्ट्राची गोष्ट’, वैजयंती मोने दिग्दर्शितनाटक मेरी जान’, योगेश पोफळे दिग्दर्शितप्रतिक्षा आणि फ्लाईंग क्विन’, शलाका माळगावकर दिग्दर्शितरुजवा असे मनोरंजनाचे  रंगारंग कार्यक्रम सिडनीमधल्या मराठी कलाकारांनी सादर केले. शलाका माळगावकर यांनी सादर केलेला रुजवा हा नाट्य-नृत्य-गायनाचा-वादनाचा कार्यक्रम सगळ्यांच्याच दीर्घ स्मरणात राहील असा होता. आपल्या माती, संकृती आणि माणसांपासून हजारो मैलावर येऊन स्थाईक झालेल्या अखिल ऑस्ट्रेलियातील मराठी मनाची होणारी घालमेल आणि त्यावर दिलासा देणारी फुंकर या सादरीकरणाने घातली तेव्हा नाट्यगृह सद्गदीत झालं होतं. सिडनीमधल्या हौशी कलाकारांनी सादर केलेला हा कार्यक्रम व्यावसायीक कलाकारांच्या तोडीचा होता हे नक्की. दरम्यान चितळे बंधू मिठाईवालेचे श्री. केदार चितळे यांची मुलाखत इवलेसे रोप लावीयले व्दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी या काव्य पंगतींची आठवण करून देणारी होती. मुळ सांगलीकर असलेले चितळे पुण्यात येऊन स्थाईक झाले आणि आजच्या उंचीला पोचले त्याची खुसखुशीत कहाणी खुद्द केदार चितळे यांच्या तोडून ऐकण्यात वेगळीच मजा होती.

तिसर्‍या दिवशी प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू आणि किमयागार अच्युत गोडबोले यांच्या मुलाखतींनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ. मीना प्रभूंच्या भ्रमंतीची कहाणी आणि अच्युत गोडबोले यांचा जीवनाचा प्रवास यांचं कथन प्रेरणादायी होतं. अच्युत गोडबोले यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व, त्यांच्या शिक्षण, संगणक आणि लेखनाचा प्रवास स्त्रोत्यांना जीवनाकडे पहाण्याचा सखोल दृष्टीकोन देऊन गेला. एक माणूस अर्थशास्त्र, संगीत, जीवनगाथा, संगणक, विज्ञान, कलाकौशल्य, गणित, समिक्षा, वैचारिक, मानसशास्त्र, आत्मकथन         अशा विविध विषयातील तज्ज्ञ असू शकतो याचं कौतूक तर होतंच पण त्यांना जवळून ऐकता पाहाता आलं म्हणून रसिक धन्य पावले होते. त्यानंतर भांडा सौख्य भरे ही प्रांजली पळनिटकर दिग्दर्शित नाटीका आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी रंग स्वरांचे हा लोकप्रिय मराठी गीतांचा कार्यक्रम गायक कलाकार अनिरुद्ध जोशी, विश्वजीत बोरवणकर, शरयू दाते, प्रसन्नजीत कोसंबी आणि निहीरा जोशी-देशपांडे या भारतातून आलेल्या गायक कलाकारांनी सादर केला. संपूर्ण नाट्यगृहाने त्यांच्याबरोबर ताल धरला होता. लोकप्रिय गाण्यांवर थिरकताना सगळेच रसिक संमेलनाच्या रंगात न्हाऊन निघाले होते.

आपली मराठी माती, माणसं, भारत देश एवढंच नव्हे तर आशियाखंडही सोडून दूर खंडप्राय ऑस्ट्रेलियात स्थायीक झालेली सिडनी, मेलबर्न, कैर्न, गोल्डकोस्ट आदी ठिकाणची मराठी माणसं या तिन दिवसात मनानेही एकत्र नांदताना दिसली. आपली मराठी संकृती जपताना आणि ती ऑस्ट्रेलियातही वाढवताना दिसली. संमेलनातला उत्साह तर एखाद्या लग्न सोहळ्याला लाजवणारा होता. २०२२ साली मेलबर्न इथे होणार्‍या संमेलनात नक्की भेटायचं असं एकमेकांना सांगत हस्तांदोलनं झाली, निरोपाचे हात हलले आणि दूर देशातही मराठी संकृती जिवंत आहे याचा सार्थ अभिमान वाटला.                             
 
  
                 

01 May, 2019

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित





संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बुधवारी (दि.१) ही घोषणा केली आहे. या घोषणेमुळे भारताच्या प्रयत्नांना यश आले असून भारताचा हा मोठा विजय आहे.

भारतातील अनेक हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कुटनितीला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (युएनएससी) बुधवारी (दि.१) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ समितीकडून आयएसआयएल आणि अल-कायदा यादीमध्ये मसूद अझहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून समावेश करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. युएनएससीत ज्यांनी भारताला साथ दिली त्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले आहेत. फ्रान्स सरकारनेही या घोषणेचे जाहीर स्वागत केले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताकडून चौथ्यांदा मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी प्रस्ताव मांडला होता. यापूर्वी तीन वेळा चीनने आपला वीटो विशेषाधिकार वापरत या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, यंदा पुलवामा ह्ल्ल्यानंतर भारताच्या या मागणीला अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठींबा दिला. आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनला आपल्या भुमिकेत बदल करत नरमाईची भुमिका घ्यावी लागली. त्यामुळे कायम पाकला पाठिंबा देणाऱ्या चीननेच माघार घेतल्याने पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता मसूद अझहर पाकिस्तान सोडून इतर कुठल्याही देशात जाऊ शकणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या कुठल्याही सदस्य देशाला मसूदला अर्थपुरवठा किंवा हत्यारं पुरवता येणार नाहीत. यामुळे मसूदची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे कंबरडे मोडले जाणार आहे. मसूदच्या अटकेसाठी पाकिस्तानवर आता दबाव वाढेल किंबहुना पाकिस्तानला त्याच्यावर कारवाई करणे भाग पडणार आहे.

भारताने यापूर्वी २००९, २०१६, २०१९ मध्ये मसूद अझहरवर बंदी घालण्यात यावी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता. मात्र, यावेळी भारताच्या या प्रयत्नांना यश आले आहे. भारताच्या कुटनीतीचा हा विजय असल्याचे मानले जात आहे.

‘लडाख... प्रवास अजून सुरु आहे’च्या, चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन



ग्रंथाली प्रकाशनाच्या  'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' या नरेंद्र प्रभू लिखित वाचकप्रिय पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नुकतंच सिडनी; ऑस्ट्रेलिया इथे थाटात पार पडलं.


ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथे १९ ते २१ एप्रिल २०१९ हे तीन दिवस अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ साजरं झालं. संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडातल्या एक हजारावर मराठी रसिकांनी यात भाग घेतलेल्या संमेलनात आत्माराम परब यांच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटरसायकलवरच्या प्रवासाची चित्तथरारक कथा असलेल्या सदर पुस्तकाचं प्रकाशन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या शुभहस्ते झालं. या मंगल प्रसंगी मराठीतील लेखक आणि वक्ते अच्युत गोडबोले, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू, ईशा टुर्सचे संचालक श्री. आत्माराम परब, चितळे बंधू मिठाईवालेचे श्री.केदार चितळे, वसंत मासिकाचे संपादक श्री. दिलीपा देशपांडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.    

लडाख... प्रवास अजून सुरू आहे... ही आत्माराम परब यांच्या लडाखच्या अथक चाललेल्या प्रवासातील पहिली कथा. मुंबई-लडाख-मुंबई असा मोटारसायकलने प्रवास करायचा असं ठरऊन आत्माराम परब यांच्यासोबत आणखी सहा साहसीवीर मुंबईहून निघाले. पुढे अहमदाबाद-उदयपूर-चंदीगढ-दिल्ली करीत मनाली गाठली आणि इथूनच खरी मोहिमेला सुरूवात झाली. मनालीहून निघून रोहतांगपासची चढायी करतानाच हिमालयातल्या उंचच उंच पर्वत रांगा जशा सामोर्‍या येत होत्या तशी संकटाची चढती रांगही त्यांच्या समोर उभी ठाकली होती.

सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात हिंडताना आणि तिथला झोडपून कढणारा पाऊस अंगावर घेताना आत्मारामला कधी नको झाला नाही, पण इथे हिमालयाच्या रौद्र रुपाशी दोन हात करताना त्यांच्या नाकी नऊ आले. आत्मारम आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अक्षरश: मृत्युचं तांडव पाहिलं. तेही एक दोन दिवस नहे तर सतत पंचवीस दिवस. हाय अ‍ॅल्टिट्यड, बेफाम बर्फवृष्टी, अनोळखा प्रदेश आणि माणसं, पराकोटीची भूक, ढासळणारं मनोधैर्य, घरच्यांसाठी कालवाकालव होणारं मन आणि आसपास पसरलेली प्रेतं. चांगल्या घरातली, खात्यापित्या कुटंबातली ही मुलं चाहाच्या एका घोटाला महाग झाली. हे सगळं विलक्षण आहे.

लडाख, प्रवास अजून सुरू आहे... या पुस्तकाची अनुक्रमणिका जरी वाचली तरी याचा प्रत्यय येतो. हे सगळं झालं तरी आत्मारामनी लडाखची वाट काही सोडली नाही. दुर्दम्य आशावाद आणि जिद्दीच्या जोरावर आत्माराम लडाखला जातच राहिले. हजारो पर्यटकांना बरोबर नेताना आजवर सव्वाशेच्यावर लडाखवार्‍या त्यानी केल्या आहेत. उघडे पर्वत असले तरी रांगोळीचे रंग कमी वाटावेत असे मातीचे रंग, असंख्य छटा आणि आकार. निसर्गाची मनोहारी शिल्पं, बर्फाच्छादीत शिखरं, आकाशाशी स्पर्धा करणारे पासेस, खळाळत्या नद्या, गोठलेले प्रवाह, आथीत्यशील माणसं आणि खडा पहारा देणारे पराक्रमी सैनिक, पॅंगॉंग लेक, नुब्राव्हाली या सर्वाचं  चलत चित्रासारखं वर्णन करणारं हे पुस्तक नरेंद्र प्रभू यांनी लिहिलं आहे. वाचक प्रिय झालेल्या या पुस्तकाची चौथी आवृत्ती सिडनी; ऑस्ट्रेलिया इथे साजर्‍या झालेल्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ मध्ये प्रकाशीत झाली.                              

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates