01 May, 2019

‘लडाख... प्रवास अजून सुरु आहे’च्या, चौथ्या आवृत्तीचं प्रकाशनग्रंथाली प्रकाशनाच्या  'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' या नरेंद्र प्रभू लिखित वाचकप्रिय पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नुकतंच सिडनी; ऑस्ट्रेलिया इथे थाटात पार पडलं.


ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथे १९ ते २१ एप्रिल २०१९ हे तीन दिवस अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ साजरं झालं. संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडातल्या एक हजारावर मराठी रसिकांनी यात भाग घेतलेल्या संमेलनात आत्माराम परब यांच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटरसायकलवरच्या प्रवासाची चित्तथरारक कथा असलेल्या सदर पुस्तकाचं प्रकाशन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या शुभहस्ते झालं. या मंगल प्रसंगी मराठीतील लेखक आणि वक्ते अच्युत गोडबोले, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू, ईशा टुर्सचे संचालक श्री. आत्माराम परब, चितळे बंधू मिठाईवालेचे श्री.केदार चितळे, वसंत मासिकाचे संपादक श्री. दिलीपा देशपांडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.    

लडाख... प्रवास अजून सुरू आहे... ही आत्माराम परब यांच्या लडाखच्या अथक चाललेल्या प्रवासातील पहिली कथा. मुंबई-लडाख-मुंबई असा मोटारसायकलने प्रवास करायचा असं ठरऊन आत्माराम परब यांच्यासोबत आणखी सहा साहसीवीर मुंबईहून निघाले. पुढे अहमदाबाद-उदयपूर-चंदीगढ-दिल्ली करीत मनाली गाठली आणि इथूनच खरी मोहिमेला सुरूवात झाली. मनालीहून निघून रोहतांगपासची चढायी करतानाच हिमालयातल्या उंचच उंच पर्वत रांगा जशा सामोर्‍या येत होत्या तशी संकटाची चढती रांगही त्यांच्या समोर उभी ठाकली होती.

सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात हिंडताना आणि तिथला झोडपून कढणारा पाऊस अंगावर घेताना आत्मारामला कधी नको झाला नाही, पण इथे हिमालयाच्या रौद्र रुपाशी दोन हात करताना त्यांच्या नाकी नऊ आले. आत्मारम आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अक्षरश: मृत्युचं तांडव पाहिलं. तेही एक दोन दिवस नहे तर सतत पंचवीस दिवस. हाय अ‍ॅल्टिट्यड, बेफाम बर्फवृष्टी, अनोळखा प्रदेश आणि माणसं, पराकोटीची भूक, ढासळणारं मनोधैर्य, घरच्यांसाठी कालवाकालव होणारं मन आणि आसपास पसरलेली प्रेतं. चांगल्या घरातली, खात्यापित्या कुटंबातली ही मुलं चाहाच्या एका घोटाला महाग झाली. हे सगळं विलक्षण आहे.

लडाख, प्रवास अजून सुरू आहे... या पुस्तकाची अनुक्रमणिका जरी वाचली तरी याचा प्रत्यय येतो. हे सगळं झालं तरी आत्मारामनी लडाखची वाट काही सोडली नाही. दुर्दम्य आशावाद आणि जिद्दीच्या जोरावर आत्माराम लडाखला जातच राहिले. हजारो पर्यटकांना बरोबर नेताना आजवर सव्वाशेच्यावर लडाखवार्‍या त्यानी केल्या आहेत. उघडे पर्वत असले तरी रांगोळीचे रंग कमी वाटावेत असे मातीचे रंग, असंख्य छटा आणि आकार. निसर्गाची मनोहारी शिल्पं, बर्फाच्छादीत शिखरं, आकाशाशी स्पर्धा करणारे पासेस, खळाळत्या नद्या, गोठलेले प्रवाह, आथीत्यशील माणसं आणि खडा पहारा देणारे पराक्रमी सैनिक, पॅंगॉंग लेक, नुब्राव्हाली या सर्वाचं  चलत चित्रासारखं वर्णन करणारं हे पुस्तक नरेंद्र प्रभू यांनी लिहिलं आहे. वाचक प्रिय झालेल्या या पुस्तकाची चौथी आवृत्ती सिडनी; ऑस्ट्रेलिया इथे साजर्‍या झालेल्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ मध्ये प्रकाशीत झाली.                              

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates