22 June, 2010

चौधरी बाग – बोर्डीहर्षदाने लगीनघाईत काढलेला महिना आणि ऋचाच्या अभ्यासाची घाई सुरू होण्याआधी श्रम परिहार करावा, जवळपास कुठेतरी दोन दिवसांसाठी जावून यावं म्हणून आम्ही बोर्डीच्या चौधरी बागेत गेलो होतो. मुंबई-सुरत रेल्वे मार्गावरच्या घोलवड स्थानकात उतरून आम्ही रिक्षाने चौधरी बागेत जात होतो. ट्रेनने अहमदाबादला जाताना या भागाची तशी कल्पना येत नाही. मी विरार पर्यंतचा भाग फिरलो होतो. पुढे क्वचितच असणारे डोंगर आणि खारवट प्रदेश यामुळे मला तो भाग कधी फिरावासा वाटला नव्हता. पण या वेळी गेलो आणि बोर्डीच्या प्रेमात पडलो. स्वच्छ सुंदर रस्ता आणि दुर्तफा असणारी झाडं, मधेच एकाबाजूला दिसणारा अथांग समुद्र किनारा, दुपारचा वेळ असूनही मजा येत होती. वाटेत शनिवारी भरणारा बोर्डीचा आठवडे बाजार लागला. गाव मागे पडलं, वाटेत चिक्कूच्या वाड्या आणि मध्ये एखादा बंगला, सगळा प्रदेश हिरवागार, चौधरी बागेबद्दलची उत्सुकता ताणली जावू लागली. एवढ्यात रेल्वेचं फाटक लागलं, तिथेच बोरीगाव स्टेशन होतं. (या स्टेशनला उतरायला फलाट नाही म्हणून आम्ही अलिकडच्या घोलवड स्टेशनवर उतरलो होतो.) पुढे दोन किलोमिटरवर चौधरी बाग असा बोर्ड दिसला. आम्ही प्रवेश करत असतानाच चंद्रहास चौधरी हसत मुखाने सामोरे आले. पुढचे पंचवीस-तीस तास मजेत जाणार याची ती नांदी होती.

दुपारच्या चवदार जेवणाने रसना तृप्त झाली होती. रोजच्यापेक्षा पोटात चार घास जास्तच गेल्याने वामकुक्षीला पर्याय नव्हता. ऋचाने मात्र पंधरा-वीस मिनीटं तळमळून काढली कारण तिला टारझन रोप खुणावत होता. सर्कस पाहताना त्यातले काही प्रयोग आपणाला करावेसे वाटतात. चौधरी बागेत त्याला बर्‍यापैकी वाव आहे. त्या टारझन रोपवर आम्ही सगळ्यानी सर्कस करून पाहिली. आमच्या बरोबर सरंगले कुटुंबही होतं ते आमचे खर्‍या अर्थाने फॅमिली फ्रॆंड. टारझन रोपवर कसरत करता करता चहा झाला आणि चंदहास आम्हाला बागेत फिरायला म्हणून घेऊन गेले. तिकडे बर्मा ब्रिज होता. भारताच्या पुर्वेकडच्या भागात खोल नाले पार करून जाण्यासाठी दोरखंडापासून तयार केलेले असे ब्रिज वापरले जातात. बर्मा ब्रिज प्रथम ऋचा आणि नंतर सगळ्यानीच पार केला. पण खरी कसोटी होती ती लाकडाच्या एकाच वाश्यावरून पलिकडे जाण्याची. तिथेही प्रथम ऋचाने बाजी मारली. नंतर अशोक, वैभव, हर्षदा, मी सगळ्यानीच चंद्रहासच्या मदतीने तो थरार अनुभवला. त्या एकाच वाश्यावरून चालल्यावर डोंबारी किती महान असतो याचा साक्षात्कार झाला. पोगो स्टीकवरून चालणं हा आणखी एक प्रकार चंद्रहास काकांनी करून दाखवला आणि मग ऋचा त्याच्या मागेच लागली. दुसर्‍या दिवशी निघेपर्यंत ती पोगोस्टीकवरून सफाईदारपणे चालायला लागली होती.   बागेत सगळीकडेच झोपाळे, मचाण, टाझन हट असे प्रकार होते.

संध्याकाळी बोर्डीच्या समुद्रकिनार्‍यवर फेरफटका मारला. घोड्यावरून फिरलो. सुर्यास्त होताना पहाणं शक्य नव्हतं कारण हवा कुंद झाली होती. वारा थांबला होता. थोड्याच वेळात आकाश भरून आलं, पुर्वेला ढगांनी दाटी केली. आता हा कोसळणार. हरकत नाही, आज चिंब भिजायच असं आम्ही ठरवलं. पण तसं नसतच, ती निसर्गाची लहर असते. जोराचा वारा आला, विजा कडाडल्या, पुर्वेला गर्दी करून असलेले ढग आभाळभर पसरले, एखाद्याने अक्षता टाकल्या. हवेतला उष्मा मात्र गायब झाला. थंड वार्‍याची झुळूक आली. मातीच्या सुगंधाने आसमंत दरवळलं. तिन्हीसांजा होत असताना आम्ही माघारी फिरलो. पावसाचा शिडकावा सुरू होता. बागेतल्या टेंभुर्णीच्या पारावर बसून चहाचा आस्वाद घेत घेत गप्पा सुरू झाल्या. चंद्रहास आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञावहिनी या दोघांनीच मोटरसायकलवरून केलेल्या लडाखवारीचे अनुभव ऎकता आले. पावसाळी वातावरणात गप्पांची मैफ़ल जमली असतानाच आतून येणारा बोंबील फ्रायचा सुगंध अस्वस्थ करत होता. मच्छी करी, बोंबील फ्राय सोबत लुसलुशीत उकडीच्या भाकर्‍या असा जेवणाचा बेत होता. या वेळीही आडवा हात मारला. चौधरी बाग म्हणजे फळांचीच बाग. तीसुद्धा सेंद्रीय खतांवर बहरलेली. हल्ली मुंबईत हापूस किंवा एकूणच फळांना रंग-रुप असलं तरी पुर्वीचा तो सुगंध आणि स्वाद नसतोच. त्याचं कारण रसायनं. या फळांच्या केमिकल लोच्याने सगळी चवच नष्ट करून टाकली आहे. जेवणं आटोपल्यावर राजापुरी, सिंधू, हायब्रिड असे एकापेक्षा एक सरस चवीचे आणि स्वादाचे आंबे सामोर आल्याने तुडूंब भरलेल्या पोटात जागा करावी लागली. केमिकलची बाधा न झालेली या बागेतली फळं एकदा तरी जऊन खाल्लीच पाहिजेत. आंबे खाऊन झाल्यावर त्याच्या साली सशांना द्यायला ऋचाबरोबर सगळेच गेले. चार ससुले त्या साली खाण्यासाठी कोण धडपड करीत होते.

सकाळी पक्षांच्या किलबिलाटांने जेव्हा जाग आली तेव्हा अजुन सहा वाजायचे होते. स्वच्छ, प्रदुषण मुक्त वातावरणात छान झोप झाली होती. सकाळचा चहा झाला तेव्हा जवळच्याच डोंगरावर एक छोटासा ट्रेक करुन येऊया असं चंद्रहास म्हणाले आम्ही सगळे उत्साहात निघालो. थोडा कठीण चढ असलेली ती वाट चढताना पावलं जरा जपूनच टाकावी लागत होती. सभोवार गर्द हिरवाईने भरून राहीलेली व्हॅली आणि पलिकडे उंचावर धुक्यात बुडालेला बारड्याचा डोंगर. कुडा, टाकळा, बेहर्डा, साग अशा वनस्पतींची माहिती घेत, गंजाच्या वेलीची गोड पान खात आमचं मार्गक्रमण सुरू होतं. शेवटी डोंगरमाथ्यावर आम्ही पोहोचलो. शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर छापा टाकला होता तेव्हा वाटेत याच बारड्याच्या गुहेत त्यांनी रात्रीचा मुक्काम केला होता. तसच पारसी लोक जेव्हा प्रथम  संजाणला आले तेव्हा त्यानी आपल्याबरोबर आणलेला पवित्र अग्नी याच गुहेत ठेवला होता असं म्हटलं जातं अशी माहिती चंद्रहासनी आम्हाला दिली. आमच्या पोटातला अग्नी आता प्रज्वलित होण्याच्या बेतात होता. आम्ही एका सोप्या उतारावरून झप-झप खाली आलो. टेंभुर्णीखाली बटाटे पोहे आमची वाट बघत होतेच. चौधरी-बागेचा कुक रजेवर गेल्याने प्रज्ञावहिनींच्या हातच्या सुग्रास भोजनाचा आम्ही आस्वाद घेत होतो.

काल पासुन बागेतला पोहण्याचा तलाव ऋचाला सारखा खुणावत होता, पण अशोकजी सोडून आम्हाला कुणालाच पोहण्याची कला अवगत नसल्याने आम्ही तिकडे फिरकलो नव्हतो. मग आमचा नाद सोडून ऋचाने सरळ चंद्रहास काकांनाच विचारणा केली. ते एका पायावर तयारच होते. मग आम्ही सगळेच एक-एक करून आत उतरलो. चंद्रहास पट्टीचे पोहणारे आणि चांगले प्रशिक्षक असल्याने आम्ही सगळेच हात-पाय मारू लागलो. लाईफ गार्ड जॅकेटवरून टायर पर्यंत अशी प्रगती झाली. पुढच्या वेळी पुर्ण शिकणार म्हणत पाण्याबाहेर आलो तेव्हा दोन अडीच तास केव्हा गेले ते समजलच नव्हत.

आता निघायची वेळ जवळ येऊन ठेपली. जेवणाची गोडी लागली होती. जेवताना आता पुन्हा कधी येऊ याच्या विचाराला लागलो. बेस्ट सिझन कुठचा असं विचारलं तर चंद्रहास म्हणाले आता तुम्ही आलात ते अगदी चुकीच्या वेळी. ऑगस्ट मध्ये या., छान धबधबे असतील. बागेत मधमाशा पालन केलं होतं. मध, आंबे, पपई घेतले. तृप्त मनाने पण जड अंत:करणाने पुन्हा कधी येता येईल याचा विचार करीत निघालो. मुंबई जवळचं एक उत्तम विश्रांती स्थळ आम्हाला गवसलं होतं


21 June, 2010

सर आली'ऋतू हिरवा'च्या पावसाळी अंकात प्रसिद्ध झालेली माझी कविता

सरसर ही सर आली ग
तृषार्त धरणी न्हाली ग ॥धृ॥

आला सोसाट्याचा वारा
खग़ सावरती घरा
कडाडते वीज वरती ग
निवार्‍यास मी आले ग ॥१॥

झाल्या चिंब रानवाटा
ओथंबल्या तरूलता
मृदगंधीत होती वारे ग
पालटले रुप सारे ग ॥२॥

बैल जोडी उभी लांब
आता नको म्हणू थांब
माती लोणी झाली ग
बिजा जाग आली ग ॥३॥

किती जोराचा पाऊस
उतार नाही कोसों कोस
उरले दूर घर माझे ग
रडत तान्हुला असेल ग ॥४॥

पिक तरारून आले
वार्‍यासंगे हाले डोले
सुखात हे मन न्हाले ग
दवात हळवे झाले ग ॥५॥


नरेंद्र प्रभू16 June, 2010

स्वप्नभूमी हिमालय


मला संपूर्ण हिमालयच एखाद्या आध्यात्मीक मंदिरा सारखा भासतो. एकदा आपण तिकडे गेलो की पुन्हा पुन्हा जावस वाटत राहतं. आणि मुद्दामहून कुठची साधना न करताही जे समाधान मिळतं ते खरच उच्च पातळीचं असतं. तेरा वर्षांपूर्वी प्रथम हिमाचल प्रदेशात पाऊल ठेवल्यापासून जी हिमालयाची ओढ लागली ती प्रत्येक भेटी गणीक वाढतच चालली आहे. धरमशाला जवळून शुभ्र चांदण्यात न्हावून निघालेल्या हिमालयाच्या धवलाधर रांगा पाहिल्या तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. पर्वताचं एवढं भव्य दर्शन मी प्रथमच घेत होतो. बघता बघता मी त्याचाच एक भाग बनलो. डोळे उघडे असोत की मिटलेले दृष्टीपटलावरच ते दृष्य हालायला तयार नव्हतं. अती भव्य हिमालय आणि एखाद्या कणा एवढा मी, आपण किती नगण्य आहोत या विश्वाच्या पसार्‍यात? हिमाच्छादीत शिखरांच दर्शन लांबून अथवा जवळून कुठूनही घ्या आपण त्याच्याशी तादात्म्य पावतो.

दूर उत्तर-पुर्वेला अरूणाचलप्रदेशा मध्ये तवांगला जाताना पुन्हा हिमालयाच्या भव्यतेने मला व्यापून टाकलं. आता मी हिमालयाच्या रांगामधूनच प्रवास करत होतो. एक पर्वत ओलांडून दुसर्‍या पर्वतावर जाण्यासाठी लागणारी खिंड (से-ला पास) पार करताना लांबून उंच वाटणार्‍या पर्वतरांगांना पार करत मी जात होतो. हा अनुभवही रोमांचकारी होता. पुढे गोरीचेन शिखराजवळची तळी आणि बर्फाची पांढरी चादर मनमोहून टाकत होती. कुमाव भागात नैनिताल-रानिखेत-बिनसर फिरताना ती शिखरं जरी दूर राहिली तरी नागमोडी वळणाच्या वाटा, चीड आणि पाईनचे वृक्ष, खोल दर्‍या आणि उंचच उंच पर्वत रांगा, मधूनच वाहणारी नदी आणि निळेशार तलाव, बिनसरचं घनदाट जंगल  पाहून पुन्हा हिमालयाच्या प्रेमात पडलो. 

कुलू-मनाली हे तर हिमालयातलं नंदनवन पण ती हिरवाई पाहून रोहतांग-पास, खोकसार,  केलाँग, बारलाचला पास पार करत जेव्हा मी लेह मध्ये पोहोचलो तेव्हा त्या निष्पर्ण प्रदेशाच्याही मी प्रेमात पडलो. सियाचीन भागातलं डीस्कीट खेड आणि हुंडरचं वाळवंट तर केवळ लाजवाब..!!! छांगला पास पारकरून तिबेटच्या दिशेने गेल्यावर निळाशार खारं पाणी असलेला पँगगाँग लेक  आणि त्याच रंगाचं आभाळ, रंगछटांचा खेळ एकमेकांशी खेळताना पाहून भान हरपून जातं. लेह लडाखचा हा नितांत सुंदर भाग म्हणजे हिमालयाचा आणखी एक देखणा चेहरा.  

गढ़वाल ही तर देव भूमीच. प्रत्यक्ष शिव-शंकराच्या जटेमधून गंगा अवतरली ती इथेच. गंगोत्रीच्याही पुढे जावून गोमुखचं दर्शन मी जेव्हा घेतलं तेव्हा याला देवभूमी का म्हणतात त्याचा साक्षात्कार झाला. या अफाट सृष्टीची रचना तो विधाताच करू जाणे. गंगा नदीच्या त्या उसळत्या प्रवाहात आणि त्याच्या कलकल निनादात सारं मी पण विरून जातं. रंध्रा रंध्रातून पावन धारा वाहायला लागतात. सारे षड्-रीपू पळून जातात. म्हणूनच त्या स्वर्गिय प्रवाहात सारं पाप वाहून जात म्हणतात.

हिमालयात कोठेही जा, तो आपल्याला वेगवेगळ्या पण विलोभनीय रुपात भेट देतो. प्रथम दर्शनीच आपण त्याच्या प्रेमात पडतो आणि मग वारंवार हिमालयाची वारी करतच राहतो. हिमालय आपल्याला बोलावतच राहातो.                      
               

14 June, 2010

द म्युझिशियन - निलेश परबतालवाद्याच्या तालाबरोबर नाचणारा आणि नाचवणारा अशी निलेशची एका वाक्यात ओळख करून देता येईल. या कलाकाराच्या नसानसातच ताल भरलेला आहे. ढोलक, ढोलकी, ड्रमसेटवर जेव्हा निलेशचा हात चालतो तेव्हा कानाबरोबरच डोळेही तृप्त होतात. स्टेजवर निलेश असला की एक जिवंतपणा असतो. संगीतात तो आकंठ बुडालेला असतो. वाजवण्या बरोबरच गाण्याचे बोलही त्याच्या तोंडी असतात. एरवी लावणीच्या वेळी ढोलकी वादकावर प्रकाशझोत टाकला जातो आणि प्रेक्षकांचं तिकडे लक्ष जात पण निलेशच्या बाबतीत तस नसतं तो रंगमंचावर आहे म्हणजे आपसूकच आपलं लक्ष त्याच्याकडे जातच.

झि मराठीच्या सारेगमप मुळे निलेश सर्वांच्याच परिचयाचा झाला असला तरी त्या आधीपासूनच संगीताच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. द म्युझिशियन्स या केवळ वाद्यमेळ्याच्या कार्यक्रमात वादकांचे कसब पणाला लागते आणि इतर कलाकारांबरोबरच निलेशही आपली छाप या कार्यकमाद्वारे पाडतोच. ढोलक, ढोलकी, तबला, या बरोबरच जेम्बे हे आफ्रिकन वाद्यही निलेश तेवढ्याच ताकदीने वाजवतो. नुकताच दुरदर्शनच्या  M2G2  या कार्यक्रमात निलेशने स्वतः तयार केलेलं एक वाद्य वाजवून दाखवलं. कोकणात, गोव्यात खासकरून वाजवलं जाणारं घुमट हे वाद्य. त्यात बदल करून त्या घुमटाला एका बाजू ऎवजी दोन्ही बाजूला पानं लावून त्यातून कर्णमधूर नाद निलेशने वाजवून दाखवला. अशा प्रकारे परंपरागत वाद्यांबरोबरच सतत प्रयोगशील राहून नवीन काही करून दाखवायची वृती असणारा एक कलावंत म्हणूनही रसिकांना निलेश हवाहवासा वाटतो. आता निलेश म्हटलं की ढोलकीवरची थाप आणि त्याचं ते निखळ हास्य सहज नजरे समोर येतं.  

08 June, 2010

द म्युझिशियन – सत्यजित प्रभूअगदी दिड-दोन वर्षाचा असल्यापासून रेडिओवर लागलेली गाणी हार्मोनियमवर वाजवणार्‍या सत्यजितला वादनाची कला उपजतच आहे. कुणाकडेही वादनाच शिक्षण न घेताही सगळी वाद्य सत्यजितला वश होतात हे नंतरच्या काळात समजत गेलं. प्रथम हार्मोनियम आणि नंतर हाती येईल ते वाद्य जेव्हा सत्यजित वाजवत असे तेव्हा सर्वानाच आश्चर्य वाटे. दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात गेल्यापासून प्रत्येक वर्षीच्या  स्नेहसंमेलनात सत्यजितचं वादन हा अविभाज्य घटक बनलेला होता. जेमतेम चौदा वर्षाचा असतानाच सत्यजित अशोक हांडेंच्या संपर्कात आला आणि मग मंगल गाणी- दंगल गाणी पासून मराठी बाणापर्यंत आणि आवज की दुनिया पासून अमृत लता पर्यंत हजारो प्रयोगाना सत्यजित साथसंगत देताना, तसच इतर वादकांना सुरांचा फॉलोअप देताना दिसला. मुळ गाण्यात असलेली अनेक वाद्य प्रत्यक्षात स्टेजवर नसताना त्यांचा आवाज मात्र ऎकू यायचा तेव्हा अनेक जाणकार श्रोत्यांना ही गाणी रेकॉर्डवर वाजताहेत की काय असा प्रश्न पडायचा, पण ती सत्यजितच्या कि बोर्डची किमया आहे हे समजल्यावर प्रत्येकजण त्याचा चाहता व्हायचा. तो सिलसिला आजही तसाच सुरू आहे. झि मराठीच्या सारेगमपमध्ये तर अनेकदा ही जादू प्रेक्षकांना पहायला मिळते आणि मान्यवर परिक्षकही भारावून जातात. अशोक हांडे, विजय कदम, आप्पा वढावकर, अवधूत गुप्ते, अजय-अतूल, कौशल इनामदार, अजित परब, सलिल कुलकर्णी, श्रीनिवास खळेंपासून बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरेंपर्यंत विवीध क्षेत्रातले दिग्गज सत्यजितला हात उंचावून दाद देतात. पं. सुरेश वाडकर, पद्मजा फेणाणी, अरूण दाते यांची साथसंगतीसाठी सत्यजितहाच 'पहिली पसंद' आहे.

किबोर्डवर मुळ वाद्याबर हुकूम टोनस् तयार करावे लागतात तेव्हाच ते वाजवता येतात आणि ऎकायला मिळतात. अनेक वाद्यांचे असे टोनस् सत्यजितने तयार केले आहेत. म्हणूनच सारेगमपच्या एका कार्यक्रमात एकामागोमाग एक असे स्वर ऎकून अवधूत गुप्तेंनी सत्यजितचं प्रभू हे आडनाव बदलून ब्रम्हदेव ठेवलं पाहिजे असे उद्-गार काढले होते. द म्युझिशियन्स या वाद्यमेळ्याच्या कार्यक्रमात तर सत्यजित  एक मॉजिशियन म्हणूनच वावरत असतो. त्या प्रयोगात सत्यजितचं अँकॉर्डीयन आणि पियानिका वाजवताना पाहाणं आणि ऎकणं हा एक देवदुर्लभ असा अनुभव असतो. दोन वेगळ्या प्रकारची वाद्य (किबोर्ड व पियानिका) एकाच वेळी एकाच कलाकाराने एकहाती वाजवणं हे सत्यजितच करू जाणे. त्याच्या या कौशल्याची पारख आप्पा वढावकरांसारख्या कलाकाराने सतरा-अठरा वर्षांपुर्वीच केली आणि स्वतःचं अँकॉर्डीयन सत्यजितच्या हवाली केलं. आप्पांना आता त्याचं चीज होताना पाहायला मिळालं असेल. टेलिव्हीजनच्या माध्यमातून हा कलाकार आता रसिकांच्या दिवाणखान्यात पोहोचला आहेच पण मला खात्री आहे त्याचं संगित त्यांच्या हृदयाला भिडेल. आता लवकरच सुरू होणार्‍या लिट्टील चॅम्स् २ मध्ये सत्यजितच्या बोटांची फुलपाखरं पुन्हा एकदा बागडताना दिसतील, त्याची वाट पाहूया.        

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates