Showing posts with label जीवनानुभव. Show all posts
Showing posts with label जीवनानुभव. Show all posts

11 July, 2026

गाजलेली मैफिल आणि निळाईची गाज



थबकल्या झिम्माड धारा, स्तब्ध ही उनाड वारा

नाविकाचे गीत माझ्या, ऐकती करिती किनारा

लोक भेटायास आले, निशब्द होऊन गेले

शब्द-शब्द कवितेतला अन् भावही वेचून गेले

सागराचे गुज त्याच्या, साठले गीतात होते   

वादळाची स्पंदने, धडकून कापरे भरीते

 आदळे हदयात माझ्या, आंधळा अफाट दर्या

स्वार तो झाला तयावर, पेलले आकाश लिलया  

सचैल न्हाली सांज होती, हरपलेले भान होते

कोण कोणाला मिळाले? का कुणा ठाऊक होते?  

                                                 नरेंद्र प्रभू

काल प्रभादेवी मुंबईत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या ‘पु. ल. कट्ट्यावर’ लेखक, कवी कॅप्टन वैभव दळवी यांचा ‘निळाईची गाज’ हा बहारदार कार्यक्रम सादर झाला आणि गेले आठ दिवस मुंबईत बरसणारा पाऊस दोन तासात रसिक मनावर कोसळून गेला. तुडुंब भरलेल्या ‘नॅनो’ सभागृहात गर्दी ओसंडून वहायला लागली आणि आयोजकांना रसिकांसाठी दुसरं दालन खुलं करावं लागलं. ‘निळाईची गाज’ ऐकायला सागराला उधाण यावं तशीच गर्दी लोटली होती आणि जमलेल्या श्रोत्यांना कॅप्टन वैभव दळवी यांनी तृप्त करून सोडलं. त्यांच्या कवितेचा भावार्थ, अत्यंत नेटकं आणि प्रभावी सादरीकरण, त्याला लाभलेली दृकश्राव्य माध्यमाची साथ आणि टाळ्यांचा कडकडाट मैफिलीला ‘सातवे आसमान’ पार घेऊन गेला.

·         कविता आणि आयुष्याची लय: संवादाची सुरुवात कवितेच्या सामर्थ्याबद्दल झाली. कॅप्टन दळवी यांनी स्पष्ट केले की, आपल्या दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टींपासून ते विश्वाच्या विशालतेपर्यंत सगळीकडे कवीचे मन आणि गाणे दडलेले असते.

·         लहानपणीचे संस्कार: कॅप्टन दळवी यांनी शिवडी-लालबाग येथील गिरणगावातील त्यांच्या बालपणाबद्दल सांगितले. त्यांचे वडील, जे स्वतः एक कवी होते, त्यांनी त्यांना अनेक नामवंत साहित्यिक व्यक्तींशी ओळख करून दिली, ज्यामुळे त्यांची साहित्यातील आवड निर्माण झाली.

·         समुद्र आणि वादळाचे अनुभव: समुद्राशी त्यांचे नाते खूप घट्ट आहे. त्यांनी 'भरून आलं आभाळ' आणि 'जहाज बुडता बुडता' या कवितांद्वारे समुद्राचे सौंदर्य आणि वादळातील त्याचे रौद्र रूप यावर भाष्य केले आहे.

·         शिस्त आणि सर्जनशीलता: गणवेशातील शिस्त आणि कवितेतील मुक्त अभिव्यक्ती यांचा मेळ कसा साधता, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, युनिफॉर्म हे त्यांचे कर्तव्य आहे, तर कविता ही त्यांची आत्माभिव्यक्ती आहे .

·         जीवघेणा प्रसंग: त्यांच्या कारकिर्दीतील एक अत्यंत थरारक प्रसंगाचे वर्णन त्यांनी केले, जेव्हा अटलांटिक महासागरात त्यांचे जहाज बुडत होते. त्यांनी आणि त्यांच्या टीमने धैर्याने आणि युक्तीने त्या संकटावर कशी मात केली, हा प्रसंग अतिशय प्रेरणादायी मुळापासून ऐकण्यासारखा आहे.

·         भारतीय सैनिकांना आदरांजली: कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी त्यांची गाजलेली कविता 'कोण लागतो रे तो तुमचा?' सादर केली. आपल्या भारत देशाच्या सियाचीन सारख्या दुर्गम सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या त्यागाचे आणि त्यांच्या संघर्षाचे मर्म या कवितेतून त्यांनी मांडले आहे.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी च्या ‘पु. ल. कट्ट्यावर’ दर शुक्रवारी अशी मैफिल जमत असते, जमलं तर नव्हे जमवून याच.

ता. क. या कार्यक्रमाचा दुसरा भाग इथेच सादर व्हावा अशी मागणी रसिकांमधून कार्यक्रम संपता संपता केली गेली हेच या कार्यक्रमाचं फलित आहे.      



09 July, 2026

निळाईची गाज

 


स्पिती व्हॅली मधलं लांझा हे जीवाश्म गाव (Fossil village). समुद्रसपाटीपासून १४५०० फुट उंचीवरच्या या गावात फिरताना पायाखालच्या जमिनीवर तुम्हाला जीवाश्म सापडले तर ते नवल नाही. लाखो वर्षांपूर्वी समुद्र तळाला झालेल्या फार मोठ्या हालचालीतून हिमालयाची निर्मिती झाली आणि त्यावेळी समुद्रात असलेले जलचर अचानक पणे एवढ्या उंचीवर उचलले गेले आणि कालौघात जीवाश्मांची घडण झाली. नील नभाने मंडित बर्फाच्छादित हिमालयाचे दर्शन घेत असतानाच कधीकाळी समुद्राचा भाग असलेले हे जीवाश्म न्याहाळत होतो आणि सोबत लाभली होती ती सागरांच्या लाटांवर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या कॅप्टन वैभव दळवी या अवलियाची. मुंबई ते चंदीगड हा विमान प्रवास करत असताना साधारण अशाच उंचीवर कॅप्टन वैभव दळवी यांनी त्यांचं ‘समुद्रायन’ हे पुस्तक भेट म्हणून दिलं आणि कॅप्टन दळवींची प्रत्यक्ष ओळख व्हायच्या आधीच पुस्तक रूपाने त्यांच्याशी जवळीक साधली गेली होती. प्रवासाच्या धामधुमीत पुस्तक वाचायला मिळालं नाही पण या पुस्तकाचे लेखक वैभव दळवी बरोबर असल्याने त्यांच्या अनेक सागर सफारींच्या चित्तवेधक कहाण्या ऐकायला मिळाल्या. लांझा  गावात महासागराची भेट अशा दोन प्रकारे झाली आणि नंतरच्या प्रवासात ती वृद्धिंगत होत गेली.

आपला निसर्ग सुंदर भारत देश उत्तुंग हिमालय आणि अथांग दर्या यांनी संपन्न आहे पण या सागराची अनेक भली बुरी रूपं गेली तीस-पस्तीस वर्षं अनुभवलेल्या कॅप्टन वैभव दळवी यांनी लिहिलेलं ‘समुद्रायन’ पुस्तक खूप गाजलं, माहितीजालत उपलब्ध असलेल्या त्यांच्या अनेक कविताही दळवींच्या प्रतिभेची चुणूक दाखवतात. अशा या दर्यावर्दी लेखक कवीला प्रत्यक्ष भेटण्याची आणि ऐकण्याची संधी आपल्याला चालून आली आहे.

'पु. ल. कट्टा'  उपक्रमांतर्गत “निळाईची गाज” हा खास कार्यक्रम उद्या म्हणजे शुक्रवारी, १० जुलैला रसिकांसाठी विनामूल्य सादर होणार आहे. संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत चालणार्‍या या कार्यक्रमाला आपण नक्की यायचं आहे कारण पाऊसही  निळाईची गाज ऐकायला उसंत घेणार असे म्हणाला आहे. कॅप्टन वैभव दळवी आपल्या कवितेत म्हणतात:

 

झेलला मी सागराचा वार ऐसा जीवघेणा,

काय होता भार त्याचा, हे तुम्हा कैसे कळावे?

धाडशी त्या नविकांचे शूर असे झुंजणे की;

पाहता ते वादळांनी थांबुनी मागे वळावे.

 

ती अनुभूती, ती गाज लेखकासोबत वाटून घ्यायची असेल तर नक्की याच!   





15 December, 2025

आत्माची भ्रमणगाथा

 


असे पाहतो जीवन त्याचे फिरत्या चाकावरी
किती पहा हे देश पाहिले धडकी भरते उरी
जरा विसावा नसतो त्याला उडतो तो अंबरी
आत्माची ही भ्रमणगाथा देशोदेशांतरी


जरा जाऊन येतो म्हणतो इतके का ते सोपे?
वळणा वळणा वरती बसले दडून असतील धोके
संकटांवरी स्वार होऊन ऐटीत येतो जातो
किती अनोखे देश नेत्री भरुनी येतो

दीडच दशकामध्ये त्याने पार केली शंभरी
नाही विसावा अजून म्हणतो जाईन देशांतरी
वायुपुत्र हनुमानच जणू हा हुंकार पुन्हा भरी
गड्यांनो... चला जाऊया देऊन हात अपूला त्याच्या करी

नरेंद्र प्रभू
१५ डिसेंबर २०२५






23 November, 2025

घन बरसू दे

 


धावत होती कालच दुडूदुडू असे वाटते

मनात उरले कधीच सरले असे वाटते

सोनपावले घेऊन आली क्षण सोन्याचे

तालावरती पदन्यास करी स्वछंदी नाचे

 

अशी अचानक लयीत येऊन जरा थबकली

वाळूसम ती कितीक वर्षे सरकून गेली

रंगमंच हा फिरतो आहे आयुष्याचा

जरा थांबना वेध घेऊ दे तुझ्या मनाचा

 

धृतलयीतच खेळ चालला तुझा असा हा

कधीच सरला काळ तुझा तो बालपणाचा

अशीच पडू दे  तालावरती तुझी पाऊले

घन बरसू दे तुझ्यावरी तो आनंदाचा

 

नरेंद्र प्रभू

११ ऑगष्ट २०२५


13 September, 2025

निसर्ग सृजन

 


निसर्गात कलाकृती घडताना पाहाणे हे अत्यंत आनंददायी असतं . सृजनाची ती पहाट होताना जर आपण त्याचे साक्षीदार असलो तर....  ZZ वनस्पतीचा एक बोटा एवढा टणक तुकडा कुंडीतून वेगळा करावा लागला तेव्हा वाटलं याच्यात प्राण आहे, काही दिवस पाण्यात ठेवून पाहूया काय होतं ते. तसा हा तुकडा पाण्यात ठेवला. पहिले तीन महिने तो होता तसाच राहिला, ना कुजला, ना मऊ पडला. मग त्याला तीळा एवढं मुळ फुटतयं असं वाटू लागलं. ते मुळ किंचित वाढायला लागलं आणि त्याला आणखी एक मुळ फुटलं. हे मुळं वाढायला लागली आणि आता याला अंकुर कसा आणि कुठून फुटतो याचं कुतुहल वाटायला लागलं. पुढचे पंधरा-वीस दिवस फक्त ही मुळं वाढत होती आणि एके दिवशी आणखी एक मोठे जाड आकाराचं मुळ येत की काय असं चिन्ह दिसू लागलं. या जगात येताना संरक्षक कवच घेऊन यावं तसं ते जाड कवच वाढत गेलं आणि एका सकाळी अगदी छोटं सानुलं पान त्याच्यामधून डोकावू लागलं. त्या बोटा एवढा टणक तुकड्याला एकाच जागेवरून मुळं आणि पानं येतील असं वाटलंच नव्हतं.

चार-साडेचार महिने आत मध्ये अनेक क्रिया घडत असतील, सुप्तावस्तेत असताना बाहेरच्या जगाला कोणतेही संकेत न देता नवोन्मेशाचं नाट्य आतल्या आत आकार घेत असावं. समोरच्या मेजावर हे सगळं घडत होतं, निसर्ग सृजन आकार घेत होतं.  


01 June, 2025

मी मलाच हरवून बसलो

 

मी मलाच हरवून बसलो

या निखळ निर्झरापाशी

सय येते आणि भिडते

स्मरणात किती या राशी

 

संगीत  सरींच्यामधले

मज कानी पडते आहे

कोसळती धारा इथल्या

तो नाद निनादत आहे

 

जल निर्मल वाहे पुढती 

जणू अधिर मिलनासाठी

ते सागर झाले आहे अन्

घागर माझ्या हाती

 

ही धारच अवखळ आहे

जणू जीवन धावत राहे

मुरलेल्या आठवणींचा

मी दर्या झालो आहे

 

या सागरतिरीच्या लाटा

फेसाळत येती कधी अन्

कधी संथ पसरती भवती

हलकेच लागते ध्यान

 

नरेंद्र प्रभू

17 March, 2025

निर्मळ

 

‘निर्मळ’ म्हणजे ‘मळ’ नसलेलं; ‘स्वच्छ’ मग ते जल अथवा मन काहीही असो त्याचा आस्वाद घेणारी किंवा सहवासात आलेली प्रत्येक व्यक्ती पावन होते. म्हणूनच गंगाजलाला या शृष्टीत अनन्यसाधारण महत्व आहे. गंगाजलासारखं स्वच्छ मन असणार्‍या ‘माई’ने (प्रिय मित्र आत्माराम परब यांच्या आईने) आणखी एक सुखद धक्का दिला त्याची ही गोष्ट. १५ मार्च २०२५ रोजी ‘आत्माची डायरी’ या आमच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. प्रकाशन समारंभात व्यासपिठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये माई होतीच (‘माई’ होती म्हणण्यात तिचा उपमर्द करण्याचा हेतू नाही तर आमच्या मालवणी मुलखात आईला गे ‘आवशी’ आणि देवाला रे ‘भावाशी’ असंच म्हणतात आणि समोर जे कुणी असेल ते त्याला ओ... देखील देतं.) तर माईने व्यासपिठावर हातात धरलेलं पुस्तक सोबत नेलं नाही. कार्यक्रम संपला, माई आपल्या नातवंडासोबत बाहेर पडली, दारात गर्दी होती तिथे काही काळ थांबली असताना मला माई दिसली तेव्हा निरोप घेण्याकरता मी पुढे झालो, बोलता बोलता तिची नजर हेड्विग प्रकाशनाच्या स्टॉलवर गेली. मला माईने विचारलं “पुस्तकाची किंमत काय?” मी “२५० रुपये” असं म्हणताच तिने स्वत:च्या पाकीटातले २५० रुपये काढून दिले आणि “माका एक पुस्तक व्हया” असं म्हटलं तेव्हा मी स्तंबीत झालो, ‘स्तंबीत झालो’ हा शब्द अनेक वेळा वापरला आहे पण खरंच तसा अनुभव येतो तेव्हा आपण निर्जीव खांबासारखे झाले आहोत हे जाणवतं. प्रथम मी म्हटलं थांब, पैसे नको, मी पुस्तक आणून देतो. पण माईच्या आग्रह पाहून ते पैसे घेतले, पुन्हा तिच्याच हातात देत तिला स्टॉलपर्यंत नेलं आणि तिने पुस्तक विकत घेतलं. जन्मभराची ठेव हातात धरावी तशी ती पुस्तकाला न्याहाळत होती. आपल्या बाळूला कृथार्थ भावाने पहात होती. (आत्माचा सर्वप्रकारचा विरोध डावलून त्याचं छायाचित्रं असलेलं मुखपृष्ठ मी तयार करायला लावलं होतं.)नंतर फोन करून माईला विचारलं तू ते पुस्तक विकत का घेतलं? तर म्हणाली “आपण सुरवात करून देवक व्हयी मा!, म्हणान कनवटीचे पैसे काढून दिलय. तशे काय ते माझे पैसे नाय तेच्याच वडलांचे, तेंची पेन्शन गावता तेच्यातलेच दिलय, मी खय कमऊक जातय?” हे तीचं ‘इदंनमम’ ऐकून मी पुन्हा अवाक झालो.

स्वत:च्या मुलाची ‘ईशा टुर्स’ ही कंपनी आता देशात नावारूपाला आली आहे. देशाची सिमा उलंघून ‘ईशा टुर्स’ आज घडीला पंचवीस पेक्षा  जास्त विदेशी सहली आयोजित करीत आहे. ‘लडाख... प्रवास अजून सुरू आहे’ आणि ‘हे प्रवासी गीत माझे’ अशी दोन पुस्तकं प्रकाशीत झाली आहेत आणि आता हे तिसरं पुस्तक कालीदास नाट्यगृहात पर्यटकांच्या भरगच्च उपस्थित प्रकाशीत झालं आहे याची पुरे पूर कल्पना असूनही माई आपल्या मुळ भूमिकेत कायम आहे. हे ईश्वराचं देणं आहे, ही तिची मनोधारणा कायम आहे. पुस्तकाला हा असा आशीर्वाद मिळाला, मी धन्य झालो.  

ता.क. माईने “बाळू लडाखाक जावक कीती पैसे लागतत रे...?” असं विचारलं तो किस्सा आमच्या ‘आत्माची डायरी’ या पुस्तकात लिहिला आहे तो जरूर वाचा.                               

20 October, 2024

सोनेरी क्षण

 


असा विसावा मनास लाभे
तनास करीतो शांत निवांत
पुन्हा एकदा पुढती नेतो
करण्या कामे अविश्रांत
 
पायामध्ये मासोळीची
लाडीक हुळहुळ पुन्हा एकदा
कानांमध्ये नाजुक गुंजन
झुळूझुळू वाहे अखंड सरिता
 
निळ्या आभाळी मेघ विहरती
हिरवळ ल्याली श्रुष्टी भवती
निल समुंदर अवचित भेटे
गलबत होते खाली-वरती
 
शंख भेदीतो निरव शांती
दुरून कानी पडते हलगी
असते रानी चिवचिव हळवी
झुळूक करीते नाजूक सलगी
 
फुले माळूनी पतीर येते
गोसाव्यांची असते लगबग
आमंत्रण करी भंडार्‍याचे
मनात पडले मागे हे जग
 
क्षण सोनेरी वेचित होतो
प्राजक्ताची होती सोबत
माड पोफळी डोलत होते
ओंजळीतही फुले न मावत

 

नरेंद्र प्रभू

२०/१०/२०२४










07 May, 2024

मी आणि नथूराम


‘
मी आणि नथूराम’ हे. शरद पोंक्षेंचं चटका लावणारं पुस्तक वाचायला  घेतलं आणि एखाद्या कलाकाराने एका भूमिकेसाठी किती सोसावं याचं आश्चर्य वाटलं. वीस वर्षाच्या कालावधीत ज्या घटना घडत होत्या त्या, त्या त्या वेळी वाचनात येत होत्या पण त्याचं कलाकारानेच केलेलं एकत्रित कथन वाचताना अंगावर काटा उभा राहतो. एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नाटक सिनेमातून खोटेपणाचा कळस होत असताना दुसरीकडे सत्य कथन बळजबरीने बंद पाडणं, जाळपोळ आणि जीवघेणे हल्ले करणं असे प्रकार सर्रास सुरू होते. आणि या सगळ्याशी झुंज देत हा कलाकार आपलं काम कसं करत राहीला हे वाचताना अनेकदा कंठ दाटून येतो. जीवावर उदार होत, दुष्ट प्रवृत्तीचा सामना करत, प्रचंड अपमान आणि हाल सहन करत नथूराम जगवला,

नाटकासाठी एवढं सहन केलं हे समजण्या पलीकडचं आहे. एका मागोमाग एक घटना वाचकावर आघात करीत जातात आणि शरद पोंक्षें या प्रथित यश कलाकाराने या प्रत्यक्ष भोगलेल्या आहेत वाचून मन भरून येतं.          

‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ हे नाटक मी तीन वेळा पाहीलं. शिवाजी मंदिरचा तिसरा प्रयोग, नंतर बंदी उठल्यावरचा पार्ल्यातला दीनानाथ मधला प्रयोग आणि शेवटी नाटक बंद होतय असं समजलं तेव्हा ‘हे राम नथूराम’ पुन्हा एकदा दीनानाथलाच. एक नाटक नव्हे तर प्रत्यक्ष घटनाच समोर घडत आहे एवढा जिवंत अभिनय मराठी रंगभूमीवर पहायला मिळणं याला सुद्धा भाग्य लागतं.

नथूराम नाटकासाठी श्री. शरद पोंक्षेंनी जे भोगलं त्याला तोड नाही. ज्यांना काहीतरी अस्सल वाचायचं असेल त्यानी हे पुस्तक विकत घेऊन वाचावं आणि संग्रही ठेवावं. शब्दांमृत प्रकाशनाने हा निखारा वाचकाच्या हाती ठेवला म्हणून त्यांचंही अभिनंदन!  

08 May, 2022

सदाफुली


सदाफुलीचं फुलझाड मला नेहमीच आवडत आलंय. एखाद्या हसतमुख माणसासारखी सदाफुली रोजच फुलत असते. दोन रंगांची ही फुलं लहानपणापासून पहाता आली तरी आता अनेक रंगी सदाफुलीची फुलझाडं हे  नाविन्य राहिलेलं नाही. नर्ससरीतल्या रक्तवर्ण रंगांच्या छोट्याश्या सदाफुलीने माझं लक्ष वेधून घेतलं  आणि इतर झाडांबरोबर ती गॅलरीत दाखलही झाली. झुपकेदार फुलांनी रोज स्वागत करणारं हे झाड एक दिवशी सकाळी जरा नाराज दिसलं. सध्याच्या गरमीत सकाळ-संध्याकाळ पाणी देवूनही एका फांदीने मान टाकली होती आणि तिच्यावरील फुलं कोमेजून गेली होती. जवळ जावून पाहिलंतर त्या फांदीला किड  लागलेली. माहित असलेले उपाय करूनही एक-एक फांदी सुकत गेली आणि आता ही एकच राहिली, पण आज तीच्यावर हे बहारदार फुल उमललं, हे निसर्गाचं देणं...!

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वधर्म न सोडता आनंद देत रहायचं हा मंत्र निसर्ग आपल्या अशा कृतींमधून सतत देत असतो. आपल्या अर्ध्याअधिक फांद्या गमाऊनही उरलेला देह घेऊन हे फुलझाड असं तजेलदार फुल मिरवतय...., हे किती दिवस टिकणार माहित नाही पण त्याने दिलेला हा आनंद मात्र दिर्घकाळ स्मरणात राहील. असं एक तरी सदाफुलीचं झाड नजरेसमोर असावं; जे सदोदीत आनंदीत रहायला शिकवेल, सदाच्या कटकटीतही फुलत राहील.



01 May, 2022

हे असे चिरंतन नाते

 

काल ऋचाचा पदवीदान समारंभ झाला, तीच्यासाठी स्पुरलेली कविता.

 

हे असे चिरंतन नाते, तू मला बापपण दिधले

मन हळवे होते आता, हळूहळू बालपण सरले

दुडूदुडू धावत जाशी, खेळात हवी असे सरशी

हरण्याचे मजला सुख, तू मनापासूनी हसशी

 

लडिवाळ गुंफुनी हात तू गळा घातले कितीदा

शाळेला जाऊ नकोच बस गेली तर जाऊद्या

यश सह्यासाने लाभे, तू धडे गिरवले होते

लय-ताल नृत्य सारे जे सहजी जुळून येते

 

दिस दिसामागुनी सरले, शाळेचे कुंपण नूरले

अवकाश कवळीशी आता जे दोनच बोटे उरले

जीवनाचे गाणे व्हावे, तू अमृताने न्हावे

सुख त्यातच आहे माझे, परि तुला दिव्य लाभावे

 

नरेंद्र प्रभू

०१/०५/२०२२


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates