कुबेराची संपत्ती आणि समुद्रातील धन कधी संपायचं नाही. त्यातली कुबेराची संपत्ती अजून पाहायची आहे पण समुद्रातील धन पाहीलं ते हर्णै बंदरावर. चमचमत्या चांदीचा वर्ख ल्यालेली मासोळी पुरा बंदर किनारा व्यापून उरली होती. जिकडे बघावं तिकडे मासळीच मासळी. शेकडो होड्या बंदराला लागल्या होत्या आणि त्या मधून आणलेलं ते धन कोळी लोक बैल गाड्यांमधून किनार्यावर आणून आणून ओतत होते. किती ओतलं तरी ते संपत नव्हतं. निवती, मालवणच्या समुद्र किनार्यावर रापण ओढून आणलेले मासे बघितले होते पण हे त्या हून कित्येक पटीने अधिक होतं. किनार्यावर आणल्या आणल्या त्याचे लिलाव पुकारले जात होते. मासळी घाऊक दरात विकली जात होती. थोड्या अंतरावर किरकोळ विक्री करणार्या कोळणी जोरदार आवाजात गिर्हाईकाशी बोलत होत्या. लिलाव करणार्यांचा आवाज टिपेला पोहोचला होता. सुर्य बुडायच्या आत बाजार आवरता घ्यायचा होता आणि साडेपाचच्या सुमारासच किरणं तिरकी होवून लांब सावल्या पडल्या होत्या.
दिड-दोन हजार लोकवस्ती असलेलं हर्णै गाव अर्ध अधिक किनार्यावर लोटलं होतं. दिवसभरातील हे सर्वात घाई गडबडीचे क्षण होते. दिड-दोन तासात सारा व्यवहार आटपायचा होता. बंदरावर गेल्या गेल्या धावत जाणारं एक मुंगूस दिसलं, त्यालाही दुसर्या दिवशीची बेगमी करायची होती. एक गाय टोपलीतलं काहीतरी चोरून खाताना दिसली, बैल गाडीवाले जेवढ्या फेर्या होतील तेवढ्या मारायच्या प्रयत्नात होते. लिलावाच्या आरोळ्या उठत होत्या. भाव केले जात होते. कुणाला उसंत म्हणून नव्हती. एका बाजूला मात्र बर्फाचे गोळे विकणारी बाई, बाजूलाच भाजी विकणारे असे लोक जरा निवांतपणे गडबडीतले लोक मोकळे होण्याची वाट पाहात होते. त्याही पेक्षा निवांत असं ते हर्णै गाव बंदर किनार्या पासून दूर शांत शांत भासत होतं.
(फोटो: रेखा भिवंडीकर)
छान माहिती... अभिनंदन
ReplyDeleteआभारी...!
ReplyDeletemazi Dapoli Ahech Ashi Sundar >>>>>...............
ReplyDeleteखरच दापोली सुंदर आहे.
ReplyDeleteprabhu da THANK U...masta lihle aahe...gr8.
ReplyDeleteरेखाताई आभारी, आपण काढलेले फोटो छान आहेत.
ReplyDelete