मुंबई पासून २२५ कि.मी. अंतरावर असलेलं आंजर्ले हे दापोली जवळ असलेलं एक सुंदर गाव. कोकणातल्या उत्तम निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा गावात गेलं पाहिजे. डोंगरमाथा आणि तो उतरताच पायथ्याशी असणारा अथांग सागर किनारा हे कोकणातल्या बहुतेक समुद्र किनार्यांचं वैशिष्ठ्य, आजर्ल्याचा किनारा तसाच, मनाला भुरळ पाडणारा. शांत सुंदर गाव आणि तशीच त्या वातावरणाला शोभतील अशी माणसं. नागमोडी रस्ते, ठिक ठिकाणी असलेली मंदिरं, नारळी-पोफळीच्या बागा, जणू काही स्वप्नातलं गाव.
‘केतकी बीच रिसॉर्ट’ हे त्या गावातलच समुद्र किनार्याला खेटून असलेलं रिसॉर्ट. या रिसॉर्ट मध्ये जाण्याचा नुकताच योग आला. रस्त्यालगतच्या पायवाटेने नारळीच्या बागेत प्रवेश केला. त्या बागेतच असलेल्या बारा-तेरा कॉटेज आणि नंतर थेट समुद्र किनाराच. अगदी प्रायव्हेट बीच म्हणाना. गेल्या गेल्या हा निसर्ग सोडला तर आमचं स्वागत करायला कुणी नव्हतं. थोड्या वेळाने मालक आले. कामात असावेत. त्रोटक बोलणं, हो नाही अशी उत्तरं. (दुसर्या दिवशी थर्टी फस्टसाठी येणार्या मोठ्या ग्रुपचं त्यांना टेंशन असावं) मनात म्हटलं कठीण आहे...... त्यांचा विचार बाजूला सारून आम्ही समुद्रावर फिरण्यात रममाण झालो. रात्रीचं जेवण मात्र छान होतं. कॉटेज आतून खुप छान अशा नाहीत, पण ठिक ठाक. (कोकणात जास्त अपेक्षा करू नयेत.) तिथे अनेक सुचना असलेला बोर्ड थोडा खटकतोच. अशा ठिकाणी येणार्या माणसांनीच त्याना शहाणं केलं असावं कदाचीत.
दुसर्या दिवशी मालक-मालकिण सकाळपासूनच कामाला लागले. तो ग्रुप आल्यावर उत्तम पोहे आणि चहा समोर आला. मंडळी खुश झाली. मालकाही आज हसतमुख होते. आग्रह करत होते. दुपारच जेवण, संध्याकाळचा चहा सगळं वेळेवर. ओळख झाल्यावर ते खुलेपणाने बोलू लागले. कोकणी माणूस असाच, त्याला म्हणूनच फणसाची उपमा देतात. बाहेरून काटेरी वाटेल पण आतून गोड. हे तसेच निघाले. आता तीथे राहायला आपलेपणा वाटायला लागला.
जवळच असलेलं हर्णै बंदर म्हणजे मासळी प्रेमींना पर्वणीच. मालकांनी तिकडूनच मासे आणले. सामीष पोटभर जेवणाचा आस्वाद घेत मंडळी खुश झाली. घरगुती जेवणाची चवही तशीच न्यारी होती. बागायतीत रहाणं. दोन माडांना बांधलेल्या झोपाळ्यावर झुलणं, समोर १८० अंशात पसरलेला समुद्र, तिथून येणारा गार वारा, आवाज काय तो त्या लाटांचाच. सुख म्हणजे नक्की हे च असावं. मला तरी तसं वाटलं. आपण जावून पहा. मुख्य म्हणजे या रिसॉर्ट ची वेब साईट आहे, बघा क्लिक करून.
Nice snaps.........
ReplyDeletegiftwithlove.com