जालरंग प्रकाशनाच्या 'शब्दगारवा' या अंकात प्रसिद्ध झालेली माझी कथा.
वार्षिक परीक्षा संपली होती. अजून रिझल्ट लागायला वेळ होता. शाळेत जा की नको जाऊ, कुणीच विचारत नव्हतं, ना रागावत होतं. अशा दिवसात मी जवळपासच्या डोंगरावर जास्त रमायचो. परीक्षेच्या दिवसात अभ्यासामुळे कित्येक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असत. नारायण धारप, बाबूराव अर्नाळकरांपासून बाबा कदम, वि.स.खांडेकरांपर्यंत जे मिळेल ते वाचावं आणि काजू, आंबे, फणस, करवंदं, जांभळं खात डोंगररानात मनसोक्त भटकावं, या दिनक्रमामुळे परीक्षा आटोपल्या तरी उसंत म्हणून नसायची. वेळेचं भान नसायचं की ऊन्हातानाची पर्वा नसायची. घराजवळच्या डोंगरात तर मी एकटाच जायचो. आमच्या काजूच्या झाडांच्या काजू वेचून आणायचो. तिथल्या झुडुपांना लागलेली तोरणं मला खूपच आवडायची. काटेरी झुडुपांना लागणारी ही पांढुरकी दोन-तीन गुंजाएवढी फळं गोड चवदार असतात.
असाच एका दुपारी मी डोंगरावर गेलो. सगळं कसं शांतं शांतं. पक्षी, प्राणी सुद्धा रानमेव्याचा आस्वाद घेऊन विसावले असावेत. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं. एका झुडुपाजवळ मी तोरणं काढण्यात मग्न होतो. तिथून दुसर्या झाडाजवळ जाताना सहज वर नजर गेली तर काय, एका उंच झाडावर डोक्याला पंचा गुंडाळून बसलेला माणूस माझ्याकडे एकटक पाहत होता. मी त्याच्याकडे लक्ष न देता तोरणं काढू लागलो. पण पुन्हा-पुन्हा नजर त्याच्याकडेच जात होती. हा मला निरखून का बघतोय......? आता माझं तोरणं काढण्याकडे लक्ष लागेना. मी त्यांच्या हद्दीत आल्यामुळे तर हा मला बघत असेल का? घरी वडिलांना येऊन सांगितलं तर? पण तोरणं काय कुणीही कुठलीही काढतात. त्यासाठी कोण कशाला रागावणार? माझ्याजवळ काजूसुद्धा होत्या पण त्या आमच्या झाडाच्या. वेगळ्या आकाराच्या असल्याने मी तसं दाखवून देऊ शकतो असे विचार मनात येत होते. पण नको लोकांच्या जागेत. आपण आपलं घरी परतावं म्हणून मी काढता पाय घेतला. घरी आलो तरी तो माणूस काही डोक्यातून जाईना.
संध्याकाळ झाली, मला परत डोंगरावर जावंसं वाटायला लागलं. बघूया तरी म्हणून पुन्हा त्या जागेवर गेलो. वर बघितलं तो दिसला नाही. आणखी पुढे गेलो आणि अचानक तो पुन्हा दिसला, तसाच डोळे रोखून बघणारा. माझी भितीने गाळण उडाली. पुन्हा वर बघितलं, तो अजून माझ्याकडेच बघत होता. कोण रे...! मी जीवाच्या आकांताने ओरडलो. पण त्याचं रोखून बघणं सुरूच, हाकेला, आवाजाला मात्र कसलाच प्रतिसाद नव्हता. अंगावर नखशिखान्त काटा उभा राहिला. जवळपास कुणीच नव्हतं. मी आणि तो माझ्यावर डोळे वटारून बघणारा. मी तिथून धूम ठोकली. थेट घराच्या अंगणात पोहोचलो. अजून तिन्हीसांजा व्हायच्या होत्या. देवळाजवळ गेलो, तिकडे मुलं खेळत होती. माझा मित्र शशी भेटला. त्याला ही हकिगत सांगितली, त्यावर तो म्हणाला तिकडे एकटा कशाला गेलास, तिकडे भुतं, मुंजे असतात. तो मुंज्या असणार. मला ते खरं वाटू लागलं. असेल, मुंज्या असेल. मी तर त्याला दोनदा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून आलोय. एप्रिल-मे मध्ये आम्ही अंगणात झोपत असू. त्या दिवशी मी घरातच झोपलो. रात्री धड झोप लागली नाही, सारखा तो डोळ्यासमोर येत राहिला.
दुसर्या दिवशी उठल्या उठल्या तोंड धुतल्याबरोबर पुन्हा त्या जागेवर जावंसं वाटू लागलं. एकीकडे वाटत होतं नको. तो आज खाली जमिनीवर आला तर? पण स्वस्थ बसवेना. धीर करून, हातात काठी घेऊन, तोंडाने जोरजोरात गाणं म्हणत गेलो. पुन्हा तेच, तो बघतच होता. माझ्या हातात काठी होतीच. पुढे झालो, नजर त्याच्यावरच, तो मलाच पाहत होता. आणखी पुढे गेलो. तरी तो बघतो आहेच. चार पावलं पुढे गेलो तर तो दिसेनासा झाला. आता काय करावं? शूरवीर मराठे तानाजी, शिवाजी, तेहतीस कोटी देव, सगळ्यांचं स्मरण केलं. बळ एकवटलं आणि पुन्हा वर पाहिलं, तो गायबच. पुन्हा चार पावलं मागे, तो परत दिसला. मग झुडूप बाजूला करून सरळ झाडाखाली गेलो आणि सगळा उलगडा झाला. त्या झाडाची माणसाच्या डोक्या एवढी होईल अशी फांदी कुणीतरी अशी तोडली होती की लांबून ते डोकं वाटावं. नाक, डोळे, मुंडासं थेट माणसा सारखं. झाडाच्या चिकामुळे ते सगळं हुबेहूब दिसत होतं. खाली लाकडं पडलेली होती. मी पुन्हा मागे जाऊन पाहिलं तर तो तिथेच, मला रोखून बघत होता. आता मात्र मजा वाटत होती. म्हणजे मुंज्या माझ्या मनात होता आणि वर झाडावर तोडलेली फांदी.
लेखक: नरेंद्र प्रभू
आशा आल्या प्रतिक्रीया:
विशाल नी म्हटले...
वाह काका !
मस्त किस्सा.
अशाच गैरसमजातून भुते वगैरे जन्माला येतात. आपण अंधश्रद्धांना खतपाणी न घालता परिस्थिती व्यवस्थित समजून घेतलीत याबद्दल धन्यवाद.
मस्त किस्सा. बरेचदा असं होतं.
आमच्याही गावी स्मशानाजवळील झाडावरच्या एका फांदीवर कुणीतरी पांढर्या रंगाचा शर्ट टाकला होता. हवेने तो हलत होता. आम्ही एकदा रात्री त्या रस्त्याने येत असताना तो शर्ट पाहीला आणि आम्ही तिथून प्रकाशाच्यापण दुप्पट वेगात पळ काढला.
khup chan aahe.
ReplyDeletekhup chan. Mast
ReplyDelete