Showing posts with label पक्षी निरिक्षण. Show all posts
Showing posts with label पक्षी निरिक्षण. Show all posts

08 March, 2017

जुगल तिवारी



जुगल तिवारी

कच्छच्या रणात जाऊन पक्षी वैभव पहायचं म्हटलं तर ते नवख्या माणसाला अशक्यप्राय वाटेल, मुळात कच्छच्या रणात पक्षी पहाणं ही संकल्पनाच पचनी पडणारी नाही. असं असलं तरी जुगल तिवारी हा माणूस तिथले पक्षी दाखवण्याची किमया करून दाखवतोच. मोटी-विरानी या गावात आपल्या होमस्टेच्या माध्यमातून आपल्याशी संपर्कात आलेला हा अवलीया अथक जगभ्रमंतीवर असणारा माझा मित्र आत्माराम परब याला कसा काय भेटला (अशी माणसं आकर्षीत करणारा चुंबक त्याच्याजवळ आहे) हे अजून माहित करून घ्यायचं आहे. तर आत्मामुळेच मी या जुगल तिवारीच्या वाटेला गेलो. आणि एकदा का तुम्ही जुगल तिवारींना भेटला की ते तुम्हाला हाताला धरून आजू-बाजूचा सगळा परीसर दाखवतात. तसा वैराण वाळवंटात गणती होणारा हा प्रदेश एरवी फिरण्यासाठी कुणीच निवडणार नाही. पण आत्माने हा माणूस पारखला आणि मग आत्मा, त्याचा मित्र-परिवार आणि ईशा टुर्सचे पर्यटक गेली सात-आठ वर्षं इथे जात आहेत आणि या परिसराची आणि अर्थातच जुगल तिवारीच्या सान्निध्याची मजा लुटत आहेत.

जवळचं काटेरी झुडुपांचं रान, बनी ग्रासलॅंड, चारी-ढंड वेटलॅंड, लायलारी नदीचं कोरडं पात्र, व्हाईट रन, मांडवी, मोढवा किनारा अशी ठिकाणं पहावी तर ती जुगल तिवारी यांच्या सोबतच. एरवी फारसं इथे कुणी फिरकणार नाही, आपण जातो तेव्हाही तिथे कुणी माणसं आलेली नसतातच. डिस्कव्हरी चानेललाही पाच-पाच एपिसोड एवढी सामग्री पुरवणारा आणि चित्रणादरम्यान स्वत: त्याचा भाग असलेला हा महाभाग आपल्यासोबत असला की काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. जुगल तिवारींचा कटाक्ष पण तसाच असतो, प्रत्येक गोष्ट पत्येकाला समजलीच पाहिजे, काही चुकलं तर तेच जरा नाराज होतात. हा माणूस त्या रणच्या प्रेमात पडला आहे. स्वत: पक्षी तज्ज्ञ असलेला, जैव विविधतेची माहिती असलेला, बिएचएनएसचा पक्षी अभ्यासक, विज्ञानाचं पदवीत्तर शिक्षण घेतलेला, मुख्य म्हणजे परीसर आणि निसर्गाची आवड, जाण तसंच अभ्यास असलेला, तिथल्या माणसांना रोजगार पुरवणारा माणूस सोबतीला असला की कोणत्याही सिजनमध्ये ‘रण’ हा ‘उत्सव’ बनून जातो. तिथे एकदा तरी गेलंच पाहिजे.    












01 April, 2016

भरतपूर राजस्थान


पक्षांच्या जगात पायी फिरण्याचं मस्त ठिकाण.






























25 February, 2016

वसंत येता....


आजचा दिवस यांचाच होता. हे सगळे पाहूणे ओळीने येऊन गेले. वसंत ऋतूची गोड चाहूल देऊन.






   

08 January, 2015

किरण पुरंदरेंची धम्माल शीळ


Kika profile
दिवसभराच्या कामाचा थकवा क्षणार्धात दूर करणारी शीळ काल ऎकली आणि एरवी या आनंदाला आपण का मुकतो असा प्रश्नही पडला. मुळात निसर्गाचाच एक भाग असलेले आपण त्याच्यापासून एवढे दूर जातो की मग अरे! हे रोज आपणाला साद घालत असतं हे ही विसरून जातो. मॅजेस्टिक गप्पांमध्ये काल किरण पुरंदरेंची मुलाखत होती. ‘सखा नागझिरा’ पासूनची त्यांची ओळख काल आणखी दृढ झाली. हा माणूस पक्षांशी बोलतो एवढं माहित होतं पण काल त्यांची सुभग, नाचण, गरूड, पोपट यांच्या आवाजातली शीळ ऎकली आणि थक्क झालो.



वानरांच्या नेत्याचा 'भद्या' चा आवाज 

जंगल, पक्षी, प्राणी हे तर आपणाला नातेवाईकांहून ही प्रिय आहेत असं सांगताना लहनपणापासून आपण त्यांच्या प्रेमात कसे पडलो याचा सगळा पट किरण पुरंदरेंनी काल उलगडवून दाखवला आणि निसर्ग प्रेम म्हणजे काय याचा साक्षात्कार घडवला. नागझिर्‍याचे चारशे दिवस, तिथे घडलेले वाघीणीचे दर्शन, मग थरकाप उडवून देणारा जंगलचा माहोल,  भल्यामोठ्या अस्वलीणीचं तीच्या पिलावळीसह घडलेलं दर्शन, यांचं प्रत्ययकारी वर्णन ऎकताना अंगावर रोमांच उभे राहिले. खरंच हा माणूस आपल्याला  आवडेल त्या प्रकारेच आपलं आयुष्य जगला. किती वेगळे अनुभव त्यांनी घेतले. व्यंकटेश माडगूळकरांपासून सालीम अली पर्यंत निसर्ग प्रेमींचा त्यांना लाभलेला सहवास सगळंच जाणून घेताना प्रथमच गाव सोडून मुंबईला आल्याचं वैशम्य वाटलं.


अस्वलाचा आवाज

भूतदया दाखवण्यासाठी पक्षांना खावू घालू नये, त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम तर होतोच पण कबूतरासारख्या पक्षांचा त्रासच माणसाला जास्त होतो आणि कबूतरांच्या विष्ठेत वीस हून जास्त विषाणू असतात, जे दम्यासारख्या रोगाला आमंत्रण देतात. अशोकासारखी निरुपयोगी झाडं लावण्यापेक्षा काटेसावर, पळस आणि पांगारा ही झाडं लावावीत. काटेसावर ज्याला शाल्मली असंही नाव आहे त्या झाडावर साठ पेक्षा जास्त पक्षी येतात. भारतीय झाडं लावल्यानेच इथल्या पर्यावरणाला त्याचा फायदा होणार आहे.

सुभगाशी केलेला संवाद





  
 

22 December, 2011

वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन





जंगलात फिरण्याचा आनंद काही औरच असतो. जंगलवाचन करायला शिकल्यावर तीथले बारकावे, वन्यप्राण्यांच्या सवयी या सगळ्याची हळूहळू ओळख व्हायला लागते. जंगलात गेल्यावर जर जंगलचे बहूतेक नियम पाळले तर वन्य प्राण्यांचं दर्शन होण्याची शक्यता असते. पण जर त्यांची छायाचित्र काढायची असतील तर मात्र बरीच मेहनत घ्यावी लागते. अशी मेहनत माझे मित्र विलास आम्रे यांनी नक्कीच घेतली आहे. भारतातल्या बहूतेक सर्व राष्ट्रीय उद्यानाना भेटी देऊन त्यानी फर छान अशी छायाचित्र काढली आहेत. आम्रेंनी वन्य जीवनावरची अनेक प्रदर्शनं या पुर्वी आयोजित केली होती. अशाच एका छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन मुंबईत होत आहे. मुंबई येथील फोटोग्राफी सोसायटीच्या गॅलरी मध्ये २४ ते २९ डिसेंबर २०११, सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ते सर्वांना विनाशुल्क पाहाता येईल. सदर प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या संध्याकाळी सहा वाजता होत आहे. या वेळी कोणती नवी छायाचित्र पाहता येतील याची उत्सुकता आहे, मी जाणारच आपणही जरूर या.  

वेळ आणि पत्ता आहे :
फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडीया
साहेब बिल्डींग, पाचवा माळा,
१९५ डी. एन. रोड, फोर्ट,
मुंबई ४०० ००१.

२४ ते २९ डिसेंबर २०११,
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७

23 June, 2011

साद त्यांनी ऎकली अन......!


या वर्षी ही जोडी जरा उशीराच आली. कुणी जाल का, सांगाल का ? अशी आर्जवंसुद्धा करावी लागली. पण एकदा आल्यावर ताना मारण्यात कोकीळ जराही कमी पडला नाही. पंधरा दिवसांनंतर लडाखहून परतलो तर पाहूणे मंडळी गायब झालेली होती. (तशी ती होणारच होती म्हणा. अजून त्यांनी प्रकृतीधर्म सोडलेला नाही)......... आता पुन्हा वसंताची वाट बघायची.     


कोकीळा (मादी)


कोकीळ (नर, हाच गातो) 

साद त्यांनी ऎकली, अन  
साथ मजालाही दिली
सरल्या वसंतात ती
गोडी अवीट वाटली

ऋतुराज आता संपला
घनमेघ गगनी दाटला
कोकीळकवीचा आजला
स्वरभारही तो लोपला

शब्द जो मजला दिला
परतून होईल सोहळा
कवी कोकीळ वसंतातला 
लावील सकलांना लळा
  

कुणी जाल का, सांगाल का ?
        

21 March, 2011

कुणी जाल का, सांगाल का ?





मुंबईत निसर्गाचं दर्शन होणं तसं मुश्कील म्हणण्यापेक्षा तिकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसतो. तरी बरं अजून बोरिवलीचं नॅशनल पार्क अतिक्रमीत होवूनसुद्धा शाबूत आहे. निसर्गप्रेमी मंडळी मुद्दाम वेळ काढून तिकडे जातात. हे नॅशनल पार्कच आमच्या पथ्यावर पडलय, बर्‍याचवेळा तिकडे ये जा करणारे पक्षी घटकाभर का असेना आमच्या इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या झाडांवर विसावतात आणि त्यांचं दर्शन घडतं. हे पाहूणे जरी काही वेळच थांबणारे असले तरी दरवर्षी वसंत ऋतू येताच कोकीळ इमारती शेजारच्या झाडावार ठाणमांडून बसायचा तो अगदी मे महिन्या पर्यंत. भल्या पहाटे त्याचं कुहू कुहू सुरू व्हायचं आणि एरवी आनंद देणारं ते त्याचं गाणं ओरडणं वाटायला लागायचं. पहाटे पाच वाजल्यापासून उठायचं नसलं तरी त्याच्या गाण्यामुळे पर्याय नसायचा. असं असलं तरी मुंबईसारख्या शहरात असूनही कुहू कुहू ऎकायला मिळतं याचं आम्हाला कोण कौतूक वाटायचं. पण......, यावर्षी तो अजून आलाच नाही. लांबलेली थंडी, नंतर अचानक वाढलेलं तपमान या सगळ्या बदलत्या वातावरणात तो कोकीळ कुठे दडून बसलाय? एरवी तो गायचा तेव्हा अती झालं की मला वसंतराव देशपांड्यानी गायीलेलं
‘कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ?
रात्री तरी गाऊ नको, खुलऊ नको अपुला गळा’

हे गाणं हमखास आठवायचं, पण यंदा तो अजून आला नाही म्हणून आम्ही म्हणतोय

कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा ?
असा उशीर लाऊ नको, खुलऊ न ये अपुला गळा...........!

09 July, 2010

नान्नजचा माळढोक


माळढोक हा दुर्मिळ पक्षी. एकेकाळी महाराष्ट्राच्या गवताळ भागात आढळणारा हा पक्षी बेसुमार शिकार आणि त्याच्या आधिवासावर होणार्‍या अतिक्रमणामुळे महाराष्टातून हद्दपारच झाला होता. सोलापूरचे प्राध्यापक बी.एस्. कुलकर्णी यांना तो १९७२ च्या दरम्यान पुन्हा आढळून आला. माळढोकचा पुन्हा शोध लागल्यावर सोलापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरच्या नान्नज इथल्या माळरानाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. माळढोक पक्षांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. माळढोक हा उंच, डौलदार, देखणा पक्षी पहावा म्हणून माझे मित्र रत्नदिप पाटील यांच्या सोबत नान्नजला जायचा बेत आखला.

सोलापूर शहर सोडून बार्शीकडे जाणार्‍या रस्त्यालाच नान्नजला जाणारा फाटा आहे. सभोवतालचा गवताळ प्रदेश आणि रानफुलं पाहता पाहता मधूनच होणारी पक्षांची कुजबुज आपलं लक्ष वेधून घेते. आजुबाजुच्या झुडूपांवर उडणारी फुलपाखरं मन प्रसन्न करतात तरीपण माझी नजर शोधत होती ती त्या माळढोक पक्षाला. आल्या सारखा दिसला पुरे अशी रुखरुख लागून राहिलेली. वाटेत दिसणारे वेडा राघू, सातभाई, चंडोल, टिटवी, धावीक असे पक्षी आणि बागडणारी हरणं यांची नजाकत टिपत त्यांच्या हालचाली, सवयी यांची माहिती रत्नदिपकडून घेत आमचं मार्गक्रमण सुरू होतं. आता आम्ही अभयारण्याच्या गाभ्यात येऊन पोहोचलो होतो. जवळच असलेल्या गेट मधून आत गेल्यावर जंगल वाचनाच्या नियमाप्रमाणे सगळे आवाज बंद केले. जवळच असलेल्या एका उंच मचाणावर चढून अख्खा परिसर न्याहाळला. गवताळ रानमाळ असल्याने दुरवरचा विस्तीर्ण प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत होता. पण इथून माळढोक दिसण्याची शक्यता नव्हती.

माळरानात चालत पुढे गेलो. तिथे एका ठिकाणी एक झोपडी होती. त्या झोपडीत बसून पक्षांचं निरिक्षण करता येईल अशी तिची रचना होती. थोड्याच वेळात दुरवर माळढोक पक्षांची हालचाल दिसू लागली. ते आमच्याच दिशेने येत होते. सुरवातीपासून वाटत असलेली चिंता क्षणात मिटली. आम्ही दुर्बिणी सरसावून बसलो. उंच पांढरी मान प्रथम दिसली. लांबूनच त्याच्या उंचीची कल्पना येत होती. थोड्याच वेळात मानेखालचा राखाडी मातकट रंग दिसू लागला. आमच्या पासून काही अंतरावर चरणार्‍या त्या पक्षाची ऎट पाहण्याजोगी होती. पावसाळ्यात या पक्षांचा विणीचा हंगाम असल्याने ते एवढ्या सहज दृष्टीस पडतात. आम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो. 

हाच तो माळढोक काही वर्ष अज्ञातवासात जावून पुन्हा एकदा परतला होता. त्याने आम्हाला तर दर्शन दिलं पण तो असाच दिसत रहावा असं वाटत असेल तर त्याचं निट संवर्धन झालं पाहिजे. त्यांची कमी होत जाणारी संख्या आणि वनअधिकार्‍यांची अनास्था यामुळे हा पक्षी पुन्हा संकटात आहे. त्याच्या आधिवासाला पोषक असलेलं गवत समुळ नष्ट करून कृत्रिम गवत लागवड करणारे अधिकारी जोवर वनखात्यात चरताहेत तो पर्यंत माळढोक संकटात आहे हे नक्की.   

29 April, 2010

घर चिमणीचं


आम्ही जेव्हा सांताकृझला राहायला आलो तेव्हा पहाटे जाग यायची ती चिमण्यांच्या चिवचिवाटाने आणि पक्षांच्या किलबिलाटाने. गेल्या दहा-अकरा वर्षात तो आवाज हळूहळू कमी-कमी होत गेला आणि आता चिमणी शोधूनही सापडत नाही. कावळे आणि कबुतरं तेवढी आहेत. मधूनच दिसणारा एखादा पक्षी सोडला तर समस्त पक्षीगणांनी आमच्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षापर्यंत कलकलाट करणार्‍या मैनासुद्धा आता दिशेनाश्या झाल्या आहेत. समोरच्या झाडावर बसून आपल्या उच्चरवाने लक्ष वेधून घेणारे पोपटही आता अभावानेच दिसतात. या सगळ्यांच्या सहवासाने आम्ही खरच आनंदीत व्हायचो, ते सगळे पक्षी आम्हाला सोडून कुठे गेले? का गेले? मोबाईलच्या जाळ्यामुळे त्यांची संख्या रोडावली की वाढत्या प्रदुषणामुळे? या सगळ्यावर उपाय काय? वृत्तपत्रात चिमणीच्या घरट्याविषयी वाचलं होतं, नुकतच महेंद्र कुलकर्णींनी आपल्या ब्लॉगवर चिमणीच्या घराविषयी चांगलं पोस्ट लिहीलय. म्हटलं चला आपण प्रयत्न करून बघूया.


ऋचाची परिक्षा संपली आणि आता सुट्टी सुरू झाली ती संधी साधून आम्ही दोघांनी चिऊताईसाठी घर बनवायला घेतलं. साधनांची जमवाजमव केली. ऋचाला वाटलं आता झटक्यात घर बनवून होईल. पण कसचं काय. प्लाय कापता कापताच नाकी नऊ आले. पण आम्ही हट्टालाच पेटलो (बरं झालं त्या धर्माने ऋचाला श्रमाचं मोल कळलं. मी असले धंदे बर्‍याच वेळा केले असल्याने मला ते आधीच माहीत होतं.) शेवटी एकदाच ते घर आकाराला आलं. गॅलरीत त्याची स्थापना झाली. समोर पाणी ठेवलं, आता बघूया चिमणी कधी प्रसन्न होते ते.

चिमण्यांचा निवारा आपण माणसांनीच उध्वस्त केला आहे. आता त्यांच्यासाठी घर बांधलं तर त्या परत येतील अशी आशा करूया.              
         






06 February, 2010

पाहूणा




आधी न कळवता अनाहूतपणे आलेला पाहूणा आता शहरात तरी कुणालाच नको असतो. पण आम्हाला हवाहवासा वाटणारा आमचा हा पाहूणा गेली दोन वर्ष झाली याच दरम्यान एक दोन दिवसांसाठी योतोच. घराबाजूच्या झाडावर बसतो. चटकन लक्ष वेधून घेतो. गेली दोन वर्ष तो आम्हाला दिसला पण फोटो काढण्यासाठी कॅमेरा हातात घेईपर्यंत स्वारी लांब कुठेतरी निघून गेलेली असायची. कालसुद्धा तसच झालं. शेवटी आज फोटो काढता आला. आणखी एखादा दिवस दिसेल आणि पुन्हा वर्षाला राखण लागेल. त्या आधी त्याची ही आठवण पोस्ट करुया म्हटलं. हा सुभग आहे का ?


20 September, 2009

हा छंद जीवाला लावी पिसे.....





पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

एखादा छंद आपलं जीवन आनंदी करतो, फुलवून टाकतो. पण असा एखादा छंद असेल जो स्वतः बरोबरच दुसर्‍यालाही आनंद देईल तर मग त्याचं महत्व अधिक असतं. माझे मित्र विलास आंब्रे हे त्यातील एक. शांत, हळूवार बोलण्यामुळे असेल कदाचित त्याना जंगलातले पक्षी वश झाले असावेत. एरवी आपणाला बघून भूर्र्sss करून उडून जाणारे पक्षी त्याना मात्र पोज द्यायला थांबतात. पक्षाचा उत्तम फोटो म्हटला म्हणजे त्यात त्याचा डोळा पुर्णपणे दिसला पाहिजे. रंग, आकार, पिसं यांच्याबरोबरच त्याचा डौल छायाचित्र पाहताना डोळ्यात भरला पाहिजे. पक्षांच्या हालचाली, त्यांचे स्वभाव, सवयी आणि जागा माहित असल्याशिवाय असे फोटो काढणं केवळ अशक्य. हे सगळं माहित असलं तरी पक्षी सहसा कॅमेर्‍यात बंद करता येत नाही. ऎन वेळी तो उडून जातो आणि आपण हळहळतो. एका जागेवरून दुसर्‍या जागेवर सारखी हालचाल करणारे पक्षी कॅमेर्‍याने टिपण्यासाठी खुप संयमाची आवश्यकता असते. तासनतास अवघडलेल्या स्थितीत बसून किंवा उभं राहून वाट पहावी लागते. आणि असा क्षण आल्यावर आपण क्लिक करतो तेव्हा फ्रेम मध्ये पक्षी असतोच असं नाही. (माझ्या फ्रेम मधून बर्‍याचवेळा पक्षी गायब असतो.) आणखी एक गोष्ट अशी की बाहेरगावी फिरायला गेल्यावर एखाद्या रम्य सकाळी, गारव्यात स्वतःला पांघरूणात गुरफटून घ्यावस वाटत असताना रामप्रहराच्याही आधी उठून जंगलाची वाट धरावी लागते, कारण पक्षांच्या बहूतेक हालचाली या सकाळच्या प्रहरीच होत असतात. आता या सगळ्या बरोबरच छायाचित्रणाचं तंत्र अवगत असायला पाहिजे हे सांगायला नकोच.

स्वतःच्या व्यवसायामध्ये व्यग्र असताना त्या मधून वेळ काढून, केवळ पैशाच्या मागे न लागता आपला पैसा आणि वेळ खर्च करून देशाच्या विविध भागात जावून आंब्रेनी जी छायाचित्र काढली आहेत ती खरोखरच अप्रतिम आहेत. अशी छायाचित्र पाहिल्यावर काही मंडळींची प्रतिक्रीया असते “ छान फोटो आलाय, तुमचा कॅमेरा चांगला आहे. “ तर तसं नसतं महाराजा.. कॅमेर्‍या बरोबरच त्या मागचा माणूसही तेवढाच महत्वाचा. असो, तर अशी मेहनत घेवून काढलेले फोटो पहायचे आहेत ना ? मग आपल्याला ती संधी आहे. तेव्हा भेटू. वेळ आणि पत्ता आहे :

फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडीया

साहेब बिल्डींग, पाचवा माळा,

१९५ डी. एन. रोड, फोर्ट,

मुंबई ४०० ००१.


वेळ: सकाळी ११ ते सायं. ७

तारीख २६/०९/२००९

ते ०३/१०/२००९




नरेन्द्र प्रभू


10 August, 2009

रोहित पक्षी



मुंबईच्या माहूल गावात दिड वर्षा पुर्वी टिपलेले हे काही रोहित पक्षांचे फोटो. बघा आवडतात का? खासकरून हे साधकासाठी...!




LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates