09 April, 2011

प्रत्यक्ष कृती (Direct Action)आपल्या डोळ्यासमोर अनेक चुकीच्या गोष्टी घडत असताना आपण तिकडे दुर्लक्ष करतो किंवा चालायचच म्हणून पुढे जातो. हे असं वारंवार घडत जातं आणि आपण आपल्या आयुष्यात संवेदनशीलताच गमावून बसतो. मुंबईसारख्या शहरात तर अशा कितीतरी गोष्टीकडे आपणाला कानाडोळा करावा लागतो, पण या मुळेच गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावते. माणसांवर होणार्‍या अन्यायाला इतर कुणी नाही तरी तो स्वत: वाचा फोडू शकतो. पण प्राण्यांवर होणार्‍या अन्यायाचं तसं नसतं. त्याला सजग नागरीकांनी वाचा फोडावी लागते. असच एक पुण्यकर्म माझे मित्र विलास आम्रे यांनी नुकतच केलं आणि मला हे पोष्ट लिहावं लागलं. त्याचं असं झालं.....

मालाड-मार्वे रस्त्यावरून विलास तिन्हीसांजेच्या वेळी घाईत निघाले होते. रस्त्याच्या कडेला दोन कामगार सिमेंटच्या पिशवीत काहीतरी घेऊन बसले होते. त्या पिशवीची थोडी हालचाल होताना दिसली म्हणून विलासनी जवळ जावून पाहिलं, तर त्या पिशवीमधून चिखल बाहेर येताना दिसत होता. निरखून पाहिल्यावर ते एका कासवाचं डोकं असल्याच ध्यानात आलं. त्या कामगाराला त्यानी प्रश्न केला हे काय आहे ?
तो    : कछुवा है ।
विलास : इसका क्या करोगे?
तो    : बेचना है।
विलास : कितने मे?
तो    : दो सौ।
विलास : किधरसे लाया?
तो    : बगलवाले नाले से।
विलास : आप यह बेच नही सकते। ऎसा करना गुनाह है।
एवढा संवाद झाल्यावर विसंवाद सुरू झाला. त्या कामगाराचा साथीदार विकण्यावर ठाम होता. आजूबाजूचे लोकही जमा झाले. त्यात काही तो कासव विकत घेणारे आणि त्याचं मटण करून खाणारे होते. बाचाबाची वाढत असतानाच विलासनी आपल्याजवळ असलेलं BNHS (Bombay Natural History Societyचं कार्ड काढलं,त्याला दाखवलं, त्या कामगाराला बकोटीला घरून उभा केला आणि पोलिसांकडे चलं म्हणाले. वन्यप्राणी कायद्यानुसार तुम्हाला कारावासाची शिक्षा होवू शकते. असे प्राणी पकडून ते विकणे हा गुन्हा आहे. आता मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत बघता बघता विलासनी उग्र रुप धारण केलं. त्या गर्दीत असलेल्या काही तरूणांनी विलासनां सपोर्ट केला.

हेच ते तेली कासव ज्याला विलासनी जीवदान दिले. 
एव्हाना ते कामगार चांगलेच वरमले होते. विलासच्या म्हणण्यानुसार ते त्या कासवाला सोडायला तयार झाले. विलासनासुद्धा त्या हातावर पोट असणार्‍या कामगारांची मनातून  दया आली होती. त्यानी त्या कामगाराना शंभर रुपये दिले. ते कासव ताब्यात घेतलं आणि आपल्या काही निसर्गप्रेमी मित्रांना फोन करून ही हकिकत सांगितली आणि बोलावून घेतलं. आता ते कासव पालिकेच्या तलावात सुटकेचा श्वास घेत आहे आणि जीवदान मिळालं म्हणून विलासना आशिर्वाद देत आहे.

नुसतं हळहळत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला किती महत्व आहे नाही का? 


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates