Showing posts with label कला. Show all posts
Showing posts with label कला. Show all posts

07 May, 2024

मी आणि नथूराम


मी आणि नथूरामहे. शरद पोंक्षेंचं चटका लावणारं पुस्तक वाचायला  घेतलं आणि एखाद्या कलाकाराने एका भूमिकेसाठी किती सोसावं याचं आश्चर्य वाटलं. वीस वर्षाच्या कालावधीत ज्या घटना घडत होत्या त्या, त्या त्या वेळी वाचनात येत होत्या पण त्याचं कलाकारानेच केलेलं एकत्रित कथन वाचताना अंगावर काटा उभा राहतो. एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नाटक सिनेमातून खोटेपणाचा कळस होत असताना दुसरीकडे सत्य कथन बळजबरीने बंद पाडणं, जाळपोळ आणि जीवघेणे हल्ले करणं असे प्रकार सर्रास सुरू होते. आणि या सगळ्याशी झुंज देत हा कलाकार आपलं काम कसं करत राहीला हे वाचताना अनेकदा कंठ दाटून येतो. जीवावर उदार होत, दुष्ट प्रवृत्तीचा सामना करत, प्रचंड अपमान आणि हाल सहन करत नथूराम जगवला,

नाटकासाठी एवढं सहन केलं हे समजण्या पलीकडचं आहे. एका मागोमाग एक घटना वाचकावर आघात करीत जातात आणि शरद पोंक्षें या प्रथित यश कलाकाराने या प्रत्यक्ष भोगलेल्या आहेत वाचून मन भरून येतं.          

मी नथूराम गोडसे बोलतोयहे नाटक मी तीन वेळा पाहीलं. शिवाजी मंदिरचा तिसरा प्रयोग, नंतर बंदी उठल्यावरचा पार्ल्यातला दीनानाथ मधला प्रयोग आणि शेवटी नाटक बंद होतय असं समजलं तेव्हा हे राम नथूरामपुन्हा एकदा दीनानाथलाच. एक नाटक नव्हे तर प्रत्यक्ष घटनाच समोर घडत आहे एवढा जिवंत अभिनय मराठी रंगभूमीवर पहायला मिळणं याला सुद्धा भाग्य लागतं.

नथूराम नाटकासाठी श्री. शरद पोंक्षेंनी जे भोगलं त्याला तोड नाही. ज्यांना काहीतरी अस्सल वाचायचं असेल त्यानी हे पुस्तक विकत घेऊन वाचावं आणि संग्रही ठेवावं. शब्दांमृत प्रकाशनाने हा निखारा वाचकाच्या हाती ठेवला म्हणून त्यांचंही अभिनंदन!  

27 February, 2022

Memoir

 


फुल फुलल्यानंतर त्याचा सुगंध सर्वदूर पसरतो पण ते उमलताना पहीलं म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे काय त्याची प्रचिती येते. कला विकसीत होताना पहायला मिळणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. सौ. रेखाताई भिवंडीकर या त्यापैकी एक आहेत. त्याच्या कलेची परीपक्वता न्याहाळायची असेल तर अशी संधी आपणाला उद्याच चालून येणार आहे. 


सुप्रसिद्ध चित्रकर्त्या सौ. रेखाताई भिवंडीकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या 

चित्रांचं
मेमोयरहे एकल चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, हिरजी जहांगीर कलादान,१६१ बी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे मांडण्यात येणार आहे.  सदर प्रदर्शन दि. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.


सौ. रेखाताई भिवंडीकर या उत्तम छायाचित्रकार आहेत. उत्तम निसर्ग छायाचित्रं टिपणं हा त्यांचा छंद आहे. पण कुंचल्यातून चित्र साकार करताना कॅनव्हासवर जे उमटतं त्यांची रचना त्यांच्या स्मृतीपटलावर कितीरती आधीच झालेली दिसते. त्यांच्या संस्मरणातून साकार झालेली चित्रं पहाताना आपण आपल्याच बालपणातील जगात कधी पोचतो हे समजत देखील नाही. विविध माध्यमातील आणि शैलीमधील चित्रं साकारताना त्याना नकळत त्यांची स्वता:ची अशी एक शैली सापडली आणि मग रंग-कुंचल्याचा जो अविष्कार कॅनव्हासवर झाला त्यातून ही चित्रमालीका कला रसिकांच्या भेटीला येत आहे.   

आई आणि मुलीचं साधेपणात व्यतीत झालेलं जीवन, त्यालील बारकावे, प्रेम, जिव्हाळा, निखळ मैत्री, ममता अशी सौदर्य स्थळं,आणि उमदेपणा, भावूकपणा  यथार्थवादी शैलीमध्ये रेखातांईंच्या चित्रांमधून प्रतिबिंबित झाला आहे. मानवी जीवनाची ही लड त्यानी किती हळूवारपणे कॅनव्हासवर उतरवली आहे ते अनुभवण्याची सुवर्णसंधी मुंबईकर कला रसिकांनी मिळणार आहे याचा जरूर लाभ घ्यावा.

नरेंद्र प्रभू

       


09 February, 2022

हिम्मतवान



कितीही मोठं संकट आलं तरी हार न मानता त्याला सामोरं जात प्रयत्नांची पराकाष्ठा करत यशस्वी होणारी माणसं आपल्याला सतत प्रेरणा देतात. मित्रवर्य आत्माराम परब यांच्यामुळे सौ. स्मिता बापट-जोशी यांच्याशी परिचय झाला आणि त्यांचा चिरंजीव सिद्धार्थ याच्याशी दोस्ती झाली. जसं सिद्धार्थ हा स्मिता बापट-जोशी यांचा मुलगा एवढीच त्याची ओळख सांगाता येणार नाही तशीच सौ. स्मिता बापट-जोशी या सिद्धार्थची आई एवढीच त्यांची ओळख सांगता येणार नाही. ही दोन्ही व्यक्तिमत्व जाणून घ्यायची तर राजहंस प्रकाशनाचं आयुष्याचं जिगसॉ पझल सोडवणारा सिद्धार्थ हे पुस्तक वाचलं पाहिजे.



ईशाटूर्सच्या नुकत्याच पार पडलेल्या वाराणसी-प्रयागराज-अयोध्या-लखनौ या सहलीत या दोन्ही मायलेकाला जवळून वाचता आलं आणि जीवनाचे अनेक पैलू पुन्हा एकदा समजून घेता आले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस, २०१९ मध्ये चमकाणारा सिद्धार्थ स्वत:ला सिद्ध करतोच पण हे घडताना त्याला स्मिता ताईंनी कसे पैलू पाडले असतील याचा अचंबा वाटतो. उव्दिगनेती खोल खाई याचा अर्थ खुप खोल आहे. स्वत:चा गुंता सोडवताना माणसांना आपल्यात गुंतवणारा सिद्धार्थ आज आपल्या पायावर उभा रहात आहे, आईवर खुप माया करणारा सिध्दार्थ आपल्याही मनात घर करतोच पण घराबाहेर पडून अनेक समाजोपयोगी उपक्रमात आनंदाने भाग घेतो हे ऐकून स्तिमित व्हायला होतं.

कोरोना काळात अनेकांनी हात-पाय गाळले पण याही काळात यांनी मन-मानी करून आणखी एक पाऊल पुढे टाकलंच. आईने डिझाईन केलेले टी-शर्टस सिद्धार्थने वितरीत करायला सुरूवात केली, केल्याने होत आहे रे हे सिद्ध केलं. खरं तर स्मिता ताई रोज जिगसॉ पझल सोडवत आहेत, एक एक भाग जोडत आहेत.


28 February, 2021

या दिसाची आहुती ही

 


प्रिय मित्र आत्माराम परब यांनी हा सुंदर फोटो काढला आणि त्या चष्म्यामधून सुर्यच आपल्याकडे पहात आहे असं वाटलंमग ही कविता सुचली. सूर्य म्हणतोय:

 

रोजचा दिस ढळत जाता सांज होई मी पहातो

तू तिथे काठावरी रे घुटमळोनी का परत जातो?

उतर या दर्यात आता तोडूनी ते पाश सारे 

कवळूनी घे स्वप्ने तुझी ती, बघ आता येतील तारे

 

दे झुगारून बंधने ती, जी तुझी तू घातलेली 

वेळ थोडा राहिला अन, ती निशा बघ थांबलेली

रे तुझ्या बाहूत आहे स्फुरण माझ्या लालिमेचे

कर आता साकार स्वप्ने आर्त जे आहे मनीचे 

 

चांदण्याचे राज्य येईल, अन कळ्याही उमलतील 

सज्य हे आकाश सारे, येत आहे तारकादल 

कर जरा घाई जराशी पाहुदे रे पूर्णताही 

जाऊदे रे दिनकराला या, या दिसाची आहुती ही 

 

नरेंद्र प्रभू

२८ फेब्रुवारी २०२१

09 November, 2019

तेजाची आरती





गीत रामायण हा मराठी गीत, गायन आणि सादरीकरणाचा मुकूटमणी. गीत रामायण हे एप्रिल १९५५ ते एप्रिल १९५६ या कालावधीत ग. दि. माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेलं, सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं आणि गायीलेलं महाकाव्य आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालं होतं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या 'गीतरामायणा'स भरीव लोकप्रतिसाद मिळाला होता.

अनघा मोडक
या वर्षी आकाशवाणीने ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्या दोघांच्याही कारकिर्दीवर आधारित मालिका २५ जुलै २०१९ पासून प्रत्येक गुरूवारी सकाळी प्रसारीत केली होती. १३ भागातली ही मालिका श्रोत्यांना आनंदाचा खजिनाच रिता करून गेली आहे. अतिशय तरल, भावमय आणि ओजस्वी वाणी असलेल्या अनघा मोडक यांनी त्या मालिकेचं लेखन आणि निवेदन केलं आहे. आकाशवाणीच्या सुजाता परांजपे (क्रेंद संचालक) आणि नेहा खरे (कार्यक्रम अधिकारी) यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या मालिकेला चेतना झांजे यानी निर्मिती सहाय्य केलं आहे.       

गदिमा आणि बाबूजी या दोन महान व्यक्तीमत्वांच्या एकुणच जीवनाचा आणि कारकिर्दीचा अतीशय रंजक असा अभ्यासपूर्ण आढावा या तेरा भागात घेतला गेला आहे. अनेक रंजक किस्से, डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग आणि उद्बोधक माहिती या प्रसारणातून मिळाली. हे तेरा भाग प्रसारित झाल्यानंतर गेल्या गुरूवारी या चमूने श्रोत्यांशी संवाद साधण्याचाही कार्यक्रम प्रसारीत केला तेव्हा त्याला जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला, श्रोत्यांनी आपले सद्गदीत करणारे अभिप्राय दिले. गदिमा आणि बाबूजींच्या जीवन कार्याचा अभ्यास करून तो अल्प वेळात सादर करण्याचं शिवधनुष्य या कार्यक्रमाच्या लेखिका आणि निवेदिका अनघा मोडक यांनी लिलया पेललं आहे. 

नेहा खरे

लहानपणापासून दर्जेदार कार्यक्रम देणार्‍या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत आलोय. माहिती आणि मनोरंजना बरोबर विश्वासार्हता हे आकाशवाणीचं वैशिष्ट्य. बदलत्या युगात नवनव्या प्रसिध्दी माध्यमात मध्यंतरी आकाशवाणी काहिशी झाकोळून गेली होती. पण एफएम वाहिन्या आणि मुख्य म्हणजे मोबाईल अ‍ॅप (NewsOnAir)  या नव्या तंत्रज्ञानाचा वापर आकाशवाणीने सुरू केला आणि जगभरात पसरलेल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना पुन्हा एकदा जुने दिवस, जुनी गोडी आपल्या मुठीत आल्याचा आनंद झाला. मोबाईल अ‍ॅपमुळे तर कुठेही असलं तरी कार्यक्रम ऐकता येतात किंवा महत्वाच्या बातम्या कधीही ऐकता, पहाता, वाचता येतात.                   

हे भाग ऐकताना ते पुन्हा पुन्हा ऐकावे असं वाटत होतं, नेहा खरे आणि त्यांच्या चमूने ही बाब लक्षात घेऊन पहिले दोन भाग YouTube वर कधीही ऐकण्यासाठी उपलब्ध  करून दिले आहेत (पुढचे भागही लवकरच उपलब्ध होतील अशी आशा आहे)रसिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. एवढा सुश्राव्य कार्यक्रम सादर केल्याबद्दल आकाशवाणीचे धन्यवाद.   




02 May, 2019

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९



ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथे १९ ते २१ एप्रिल २०१९ हे तीन दिवस अखिल ऑस्ट्रेलिया मराठी सम्मेलन २०१९ साजरं झालं. संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडातल्या एक हजारावर मराठी रसिकांनी यात भाग घेतला होता. यात ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड येथील मराठी बांधव तर होतेच पण ज्या महाराष्ट्रातून ही मंडळी हजारो मैलांवर जाऊन स्थाईक झाली त्या महाराष्ट्रामधून, मुंबईमधून अनेक मान्यवर या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर, तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते अच्युत गोडबोले, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू, ईशा टुर्सचे संचालक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक श्री. आत्माराम परब, चितळे बंधू मिठाईवालेचे श्री.केदार चितळे या मान्यवरांबरोबरच 'आम्ही आणि आमचे बाप'चे निर्माता मयूर रानडे, अभिनेता अतुल पारचुरे, आनंद इंगळे, पुष्कर स्त्रोत्री, अजित परब, 'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' चे लेखक नरेंद्र प्रभू, गायक कलाकार अनिरुद्ध जोशी, विश्वजीत बोरवणकर, शरयू दाते आणि प्रसन्नजीत कोसंबी सिडनीमध्ये दाखल झाले होते.

१९ एप्रिल २०१९ रोजी दुपारी ठिक दोन वाजता दिप प्रज्वलन करून या रंगारंग सोहळ्याला टाळ्यांच्या गजरात सुरूवात झाली. त्यानंतर आत्माराम परब यांच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटरसायकलवच्या प्रवासाची चित्तथरारक कथा असलेल्या ग्रंथाली प्रकाशनाच्या 'लडाख.. प्रवास अजून सुरु आहे' या वाचकप्रिय पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालं. त्यानंतर लगेचच डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रेरणादायी मुलाखत झाली. गिरगावतल्या गरिबांच्या शाळेत डॉ. माशेलकर यांचं शिक्षण झालं, पण त्याचे शिक्षक विचारांनी श्रीमंत होते. हळद आणि बासमतीचं पेटंट, रिलायंस Jio ची भरारी, Making impossible  possible, आयुष्यातल्या प्रयोगशाळेतलं ज्ञान, जुन्या नव्याचा संगम अशा अनेक विषयांना त्यानी आपल्या मुलाखतीत स्पर्श केला. संपूच नये असं वाटणारी ही मुलाखत जेव्हा संपली तेव्हा संपूर्ण स्त्रोतृवर्गाने उभं राहून टाळ्यांच्या प्रचंड गजरात डॉ. माशेलकरांना मनावंदना दिली.

भारलेल्या या वातावरणतच संमेलनात "आम्ही आणि आमचे बाप" या नाटकाचा प्रयोग साजरा झाला. महाराष्ट्राची दोन लाडकी व्यक्तिमत्व प्रल्हाद केशव अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या अष्टपैलू जीवाप्रवासावर आणि कलाजीवनावर आधारित हा अफलातून प्रयोग फारच रंगला आणि सर्वच कलाकारांनी वाहवा मिळवली.  महाराष्ट्राचं, मराठी मातीचं हे गतवैभव न्याहाळताना आपल्या मातीपासून दूर देशात स्थाईक झालेला नाट्यागारातील प्रत्येक मराठी रसिक आपापल्या स्मृतीरंजनात न्हाऊन निघाला होता. आचार्य अत्रे आणि पुल यांच्या कलागुणांचा हा गोफ म्हणजे एक अफलातून कलाकृती आहे. मयुर रानडे निर्माता असलेल्या या नाटकाचे तरुण दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी अत्रे आणि पु.ल. या दोन्ही महान कलाकारांना थोडक्या वेळात प्रभावीपणे रंगमंचावर सादर केलं आहे.

दुसर्‍या दिवशी प्रचिती लिमये दिग्दर्शित महाराष्ट्राची गोष्ट’, वैजयंती मोने दिग्दर्शितनाटक मेरी जान’, योगेश पोफळे दिग्दर्शितप्रतिक्षा आणि फ्लाईंग क्विन’, शलाका माळगावकर दिग्दर्शितरुजवा असे मनोरंजनाचे  रंगारंग कार्यक्रम सिडनीमधल्या मराठी कलाकारांनी सादर केले. शलाका माळगावकर यांनी सादर केलेला रुजवा हा नाट्य-नृत्य-गायनाचा-वादनाचा कार्यक्रम सगळ्यांच्याच दीर्घ स्मरणात राहील असा होता. आपल्या माती, संकृती आणि माणसांपासून हजारो मैलावर येऊन स्थाईक झालेल्या अखिल ऑस्ट्रेलियातील मराठी मनाची होणारी घालमेल आणि त्यावर दिलासा देणारी फुंकर या सादरीकरणाने घातली तेव्हा नाट्यगृह सद्गदीत झालं होतं. सिडनीमधल्या हौशी कलाकारांनी सादर केलेला हा कार्यक्रम व्यावसायीक कलाकारांच्या तोडीचा होता हे नक्की. दरम्यान चितळे बंधू मिठाईवालेचे श्री. केदार चितळे यांची मुलाखत इवलेसे रोप लावीयले व्दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी या काव्य पंगतींची आठवण करून देणारी होती. मुळ सांगलीकर असलेले चितळे पुण्यात येऊन स्थाईक झाले आणि आजच्या उंचीला पोचले त्याची खुसखुशीत कहाणी खुद्द केदार चितळे यांच्या तोडून ऐकण्यात वेगळीच मजा होती.

तिसर्‍या दिवशी प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू आणि किमयागार अच्युत गोडबोले यांच्या मुलाखतींनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ. मीना प्रभूंच्या भ्रमंतीची कहाणी आणि अच्युत गोडबोले यांचा जीवनाचा प्रवास यांचं कथन प्रेरणादायी होतं. अच्युत गोडबोले यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व, त्यांच्या शिक्षण, संगणक आणि लेखनाचा प्रवास स्त्रोत्यांना जीवनाकडे पहाण्याचा सखोल दृष्टीकोन देऊन गेला. एक माणूस अर्थशास्त्र, संगीत, जीवनगाथा, संगणक, विज्ञान, कलाकौशल्य, गणित, समिक्षा, वैचारिक, मानसशास्त्र, आत्मकथन         अशा विविध विषयातील तज्ज्ञ असू शकतो याचं कौतूक तर होतंच पण त्यांना जवळून ऐकता पाहाता आलं म्हणून रसिक धन्य पावले होते. त्यानंतर भांडा सौख्य भरे ही प्रांजली पळनिटकर दिग्दर्शित नाटीका आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी रंग स्वरांचे हा लोकप्रिय मराठी गीतांचा कार्यक्रम गायक कलाकार अनिरुद्ध जोशी, विश्वजीत बोरवणकर, शरयू दाते, प्रसन्नजीत कोसंबी आणि निहीरा जोशी-देशपांडे या भारतातून आलेल्या गायक कलाकारांनी सादर केला. संपूर्ण नाट्यगृहाने त्यांच्याबरोबर ताल धरला होता. लोकप्रिय गाण्यांवर थिरकताना सगळेच रसिक संमेलनाच्या रंगात न्हाऊन निघाले होते.

आपली मराठी माती, माणसं, भारत देश एवढंच नव्हे तर आशियाखंडही सोडून दूर खंडप्राय ऑस्ट्रेलियात स्थायीक झालेली सिडनी, मेलबर्न, कैर्न, गोल्डकोस्ट आदी ठिकाणची मराठी माणसं या तिन दिवसात मनानेही एकत्र नांदताना दिसली. आपली मराठी संकृती जपताना आणि ती ऑस्ट्रेलियातही वाढवताना दिसली. संमेलनातला उत्साह तर एखाद्या लग्न सोहळ्याला लाजवणारा होता. २०२२ साली मेलबर्न इथे होणार्‍या संमेलनात नक्की भेटायचं असं एकमेकांना सांगत हस्तांदोलनं झाली, निरोपाचे हात हलले आणि दूर देशातही मराठी संकृती जिवंत आहे याचा सार्थ अभिमान वाटला.                             
 
  
                 

24 July, 2018

मेमरीज - रेखा भिवंडीकर यांची उत्कट चित्रं





सुप्रसिद्ध चित्रकार रेखा भिवंडीकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रकृतींचं मेमरीजहे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे मांडण्यात आलं आहे.  सदर प्रदर्शन दि. २३ ते २९ जूलै  २०१८ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.

चित्रकार रेखा भिवंडीकर यांनी त्यांच्या बालपणी आपल्या कुटुंबाच्या विशेषत:  आईच्या सहवासात जे आनंदाचे क्षण अनुभवले त्याचं साधंसरळ पण उत्कट चित्र आपल्या अनोख्या शैलीत रेखाटलं आहे. बालपणापासून चित्रकलेचा ध्यास घेतलेल्या या चित्रकर्तीने मुंबईच्या सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स मधून आपला कलेचा अभ्यास पुर्ण केल्यावर वारली आणि मधुबनी चित्रशैलीचा विशेष अभ्यास केला, पण आता सादर होणारी ही चित्रमालिका त्यांच्या स्वत:च्या शैलीची ठसा उमटवणारी आहे. बालपाणीच्याआठवणींचं त्यांचा प्रतिभेने घेतलेलं रुप आणि मोजक्या रेषांमधून सादर होणारं आई आणि मुलीच्या भावबंधाचं आगळं स्वरूप या प्रदर्शनात अनुभवता येणार आहे.

मुलीच्या भावविश्वातली चाळीतली खोली, तीचं कुटुंब, सहज वृत्तीने डोकाऊन पहाणारे शेजारी, पायाशी घोटाळणारी मांजरी, गावचं घर, आजीचा वावर, प्राजक्ताचं झाड, आईचं वात्सल्य अशा दृश्यांच्या साथीने भूतकाळ उलगडत जातो आणि दर्शक आपसूकच स्वत:चा भूतकाळ यात शोधू पहातो. चित्रकर्तीने आठवणीतील प्रतिमा आणि आपल्या अंतरमनातील हळूवार भावनांना या चित्रमालिकेत दृश्य रुप दिलं असून ते खरंच प्रत्ययकारी झालं आहे.

जलरंगांच्या सहाय्याने कॅनव्हासवर साकार झालेली ही चित्रं म्हणजे आठवणींचा सुगंधीत दरवळ असून मुंबईकर कलारसिकांनी याचा जरूर लाभा घ्यावा.     
  

07 April, 2018

शामसुंदर




सुप्रसिद्ध चित्रकार रेखा भिवंडीकर यांनी श्रीकृष्णाचं अप्रतिम चित्र साकार केलं ते पाहून मला लगेच सुचलेली ही कविता त्यांच्या कलेला अर्पण.     

कृष्ण ठाकला उभा सखे ग वाजवीतो बासरी
जसा साजीरा पाहात होती राधा ही बावरी  

लोभस कमळे अशी उमलली निळ्या सरोवरी
कमल दलेही धुंद जाहली हरीच्या नेत्रापरी  

कमला वरती कोमल पद अन पावा तो अधरी
कमल फुलांची माला रुळते अलंकार ते वरी

मोरपीसांचा मुकुट शोभतो हरीच्या भाळावरी
कमलनयनी ओघळली प्रित जी राधेच्या अंतरी

असा शोभतो मदन सखा हा लेऊन पितांबरी
शामसुंदरा तुझेच दर्शन अपार कृपा करी  
      

नरेंद्र प्रभू
०७/०४/२०१६


04 July, 2017

विठ्ठल-विठ्ठल













































तुळस साजिरी कपाळी घेऊन
चालली गोजिरी सान्वी पुढे
मेळा गोपाळांचा मागून चालला
गजर विठूचा कानी पडे   

आषाढ मेघांचा वरुनी वर्षाव
आनंदा या पार नाही असा
नामाचा गजर, डोळा पंढरपूर
विठ्ठल-विठ्ठल हृदयी वसा

उधळीत रंग अबिर-गुलाल
पडती नाचत पाउले मंदिरी
कसा शिल्पाकार ठाकलेला विठू
प्रसाद सर्वांना देई करी  

दयेचा सागर, प्रेमाचाच भार
कृपाळू ही माय हात धरी
करी वारंवार प्रेमाची सावली
ताप हा सर्वथा दूर करी   
   

नरेंद्र प्रभू
०४/०७/२०१७


16 January, 2017

सावरकर स्मारकात लाईट ऍन्ड साऊंड शो



दादर, मुंबई येथील वीर सावरकर स्मारकात नुकताच लाईट ऍन्ड साऊंड शो पाहिला. शिवाजी पार्कला लागून असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरच्या सावरकर स्मारकात दर शनिवार आणि रविवारी सायंकाळी आठ वाजता हा शो आयोजित करण्यात येतो. संपुर्ण भारतातील सर्वात मोठा असा हा 3D wall mapping equipment चा वापर करून दाखवण्यात येणारा शो आहे. वीस मिनिटाच्या या शो मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अमुल्य क्रातीकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. 

हा कार्यक्रम तरुणांपर्यत  पोहोचल्यामुळे अनेक स्वातंत्र्य सैनिकांच आणि क्रातीकारकांच  जीवन आजच्या पिढीला दृकश्राव्य स्वरूपात सहज पाहता येईल आणि देश प्रती असलेली प्रेमाची भावना अधिक वृद्धींगत होईल. कला आणि विज्ञान याचा संगम असलेला हा शो असून या दोन्ही क्षेत्रात पारंगत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना ही खरी श्राद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. दिग्दर्शक ओम राउउत यांनी दिग्दर्शीत केलेला हा भारतातला पहिलाच 3D शो आहे. असे शो परदेशात दाखवले जातात, परंतू भारतातला हा अशा प्रकारचा पहिलाच शो आहे.   


तात्रीक दृष्ट्या उच्च दर्जाची अशी असलेली ही सकस कलाकृती करमणूकीच्या अतिरेकात झाकोळली जाता कामा नये. शिवाजीपार्कवर येणारा जनसमुदाय या तिर्थक्षेत्राकडे वळला पाहिजे. मुंबई दर्शन करणार्‍या अनेक सहलींचा विराम घेण्याआधी सहलीची उच्चतम पातळी गाठण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. स्वातंत्र्य सग्राम आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ज्वलंत इतिहास इथे थोडक्या वेळात प्रभावीरित्या मांडला गेला आहे. प्रत्येक मुंबईकराने स्वत: पहावा आणि आलेल्या पाहुणे मंडळीना आवर्जून दाखवावा असा हा खेळ आहे.              

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates