सुप्रसिद्ध चित्रकार रेखा भिवंडीकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रकृतींचं
‘मेमरीज‘ हे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा
गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे मांडण्यात आलं आहे. सदर प्रदर्शन दि. २३ ते २९ जूलै २०१८ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत
सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.
चित्रकार रेखा भिवंडीकर यांनी त्यांच्या बालपणी आपल्या कुटुंबाच्या
विशेषत: आईच्या सहवासात जे आनंदाचे क्षण अनुभवले
त्याचं साधंसरळ पण उत्कट चित्र आपल्या अनोख्या शैलीत रेखाटलं आहे. बालपणापासून
चित्रकलेचा ध्यास घेतलेल्या या चित्रकर्तीने मुंबईच्या सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स
मधून आपला कलेचा अभ्यास पुर्ण केल्यावर वारली आणि मधुबनी चित्रशैलीचा विशेष अभ्यास
केला, पण आता सादर होणारी ही चित्रमालिका त्यांच्या स्वत:च्या
शैलीची ठसा उमटवणारी आहे. बालपाणीच्याआठवणींचं त्यांचा प्रतिभेने घेतलेलं रुप आणि
मोजक्या रेषांमधून सादर होणारं आई आणि मुलीच्या भावबंधाचं आगळं स्वरूप या
प्रदर्शनात अनुभवता येणार आहे.
मुलीच्या भावविश्वातली चाळीतली खोली, तीचं कुटुंब, सहज वृत्तीने
डोकाऊन पहाणारे शेजारी, पायाशी घोटाळणारी मांजरी, गावचं घर, आजीचा वावर, प्राजक्ताचं
झाड, आईचं वात्सल्य अशा दृश्यांच्या साथीने भूतकाळ उलगडत जातो
आणि दर्शक आपसूकच स्वत:चा भूतकाळ यात शोधू पहातो. चित्रकर्तीने आठवणीतील प्रतिमा
आणि आपल्या अंतरमनातील हळूवार भावनांना या चित्रमालिकेत दृश्य रुप दिलं असून ते
खरंच प्रत्ययकारी झालं आहे.
जलरंगांच्या सहाय्याने कॅनव्हासवर साकार झालेली ही चित्रं म्हणजे आठवणींचा
सुगंधीत दरवळ असून मुंबईकर कलारसिकांनी याचा जरूर लाभा घ्यावा.
No comments:
Post a Comment