27 November, 2010

अधिक शिरोडकर – एक ग्रेट भेट


छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करताना अधिक शिरोडकर साहेब 
तसे शिरोडकर साहेब नेहमीच भेटत असतात. कधी वर्तमान पत्रातून, कधी दूरदर्शन वाहिन्यांवर, कधी त्यांच्या छायाचित्रांतून, तर कधी एखाद्या कार्यक्रमात. काल भेटले ते मात्र माझा मित्र आत्माराम परब याच्या गोठलेलं लडाख या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात. एक साधा नगरसेवक (माफ करा चुकून म्हटलं साधा, नगरसेवक म्हटला की तो दादाच जास्त असतो.) किती छाती फुगवून चाललेला असतो. पण खासदार राहिलेले अधिकजी कसलाच बडेजाव राखून नव्हते. वॉंन्डरर्सच्या मागच्या एका प्रदर्शनात झालेली ओळख त्यांनी लक्षात ठेवली होती आणि काल समोर गेल्या गेल्या हात हातात दिला. गप्पांच्या ओघात अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या पण कुठेच मी पणा नव्हता. जीवनाकडे बघायचा दृष्टीकोनही अगदी सरळ साधा पण मुद्द्यांवर बोट ठेवणारा.

मागच्या प्रदर्शनाला ते आले तेव्हा काही वेळ स्वतःमध्ये हरवलेले वाटले. थोड्या वेळाने फोटो पहाण्यात रमून गेले. मग बोलता बोलता म्हणाले मला पुन्हा नवी उभारी आली. तीन दिवसांपुर्वीच त्यांची लाडकी मुलगी देवाला प्यारी झाली होती. त्या दुःखातून उठून दुसरासा आला नसता पण अधिकजी आले. आमच्यात रममाण झाले. काल सुद्धा म्हणालेच गेल्या चार वर्षात पायाची दोन ऑपरेशनस् झाली, बायको गेली, मुलगी गेली हे व्हायचच, पण अशा ठिकाणी आल्यावर बरं वाटतं. आता वय झालं तरी अजून मला फिरावसं वाटतं. देवाच्या मनात असेल तर मी पुन्हा नक्की लडाखला जाणार. वय झालं तरी उत्साहं कायम आहे आणि त्यांच्या चेहर्‍यावर बालकाचं हास्य मी सतत पहात होतो.

छायाचित्रण हा तर त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. नुकतच जहांगिर आर्ट गॅलरीत त्यांचं वन्य जीवनावरचं छायाचित्र प्रदर्शन झालं. हे त्यांच आठवं छायाचित्र प्रदर्शन. परंपरागत फोटोग्राफित पारंगत असलेले अधिकजी सध्याच्या डिजिटल फोटोग्राफितही तेवढेच वाकबगार आहेत. ऎशी वय झालं तरी त्यांनी मानसिक वय वाढू दिलेलं नाही. नवं तंत्रज्ञानही तेवढ्याच आवडीने अवगत केलं. देशातले आघाडीचे कायदेतज्ञ आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे छायाचित्रकार म्हणून त्यानी त्यामुळेच नाव कमावलं.

जंगलात जाऊन केवळ फोटोग्राफी केली म्हणजे झालं असं न मानता त्यानी जंगलाच्या संवर्धनासाठीही कार्य केलं. संसदेच्या पर्यावरण विषयक समितीवर असताना आणि आता पायउतार झाल्यावरही   त्यांचं जंगलाविषयीचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. भरतपूरवर तर त्यांचं विशेष प्रेम. बंदी असलेल्या भागात गाडी घेऊन आलेल्या मंत्र्याला त्यांनी परत पाठवलं त्याचा किस्सा काल ऎकताना पर्यावरणावरचं त्यांचं प्रेम हे बेगडी नसल्याचं जाणवत होतं.

खर्‍या कार्यकर्त्याचा उत्साहं वाढवण्याचं कसब तर काल थोडक्या वेळातही दिसून आलं. गंगाजलचे श्री. विजय मुडशिंगीकर, नेत्रहिनांचा नेत्र असलेले श्रीपाद आगाशे यांना त्यानी दिलेलं उत्तेजन विचार करायला लावणारं होतं. आत्माच्या गोठलेलं लडाख या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर बोलताना त्यानी आत्माचं मुक्तकंठाने कौतूक केलं. लोक निसर्गाला विसरत चालले असताना आत्मारामने लोकाना पुन्हा निर्सगाकडे नेण्याचं काम केलं आहे. लडाखसारख्या ठिकाणी पर्यटकाना नेणं ही साधी गोष्ट नाही. आणि तिथला निसर्ग छयाचित्रातून मांडणं ही त्याहून कठिण बाब असल्याचं अधिकजींनी नमूद केलं.  स्वतः श्रेष्ठ छयाचित्रकार असूनही तेवढ्याच चांगल्या छयाचित्रकाराला दाद देणं मी मी म्हणणार्‍यांना जमेलच असं सांगता येत नाही. अधिकजींना दिर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभो आणि लडाखला जायची त्यांची इच्छा आत्मारामच पुरी करो हिच सदिच्छा. 
                        

25 November, 2010

निसर्गाशी दोन हात आणि निसर्गाच्या हातात हात


गोठलेल्या लडाखसफरीवर आत्माराम परब
निसर्गाच्या करामती त्याचे विभ्रम आणि एकुणच निसर्ग आपल्या सर्वानाच आवडतो पण तो कितपर्यंत तर तो आपल्याला अनुकूल असतो तोपर्यंत. त्याने जरा डोळे वटारले तर आपली पळता भुई थोडी होते. सद्ध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाने उभ्या माहाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. या वर्षीचा पावसाळा देशवासीयांना जास्तसा छळणाराच आहे. सुरवात झाली ती लेह-लडाखच्या ढगफुटीपासून. लडाख प्रांतात ढगफुटी झाली आणि काही मिनिटातच होत्याचं नव्हतं झालं. लडाखवर, तिथल्या निसर्गावर प्रेम करणार्‍या महाराष्ट्रातल्या हजारो पर्यटन प्रेमींना तर धक्काच बसला. लडाखपासून हजारो मैल दूर असूनही गेली पंधरावर्ष सातत्याने लडाखवारी करणारे माझे मित्र आत्माराम परब यांच्या ते जिव्हारी लागलं. इतर पर्यटक लडाखमधून आपली सुटका करून घेत असताना आत्मारामचा मात्र उलटा प्रवास सुरू होता. मिळेल ती मदत घेऊन त्यानी लडाख गाठलं. सर्वस्व गमावलेल्या लडाखी मित्रांना तिथे जाऊन मदत केली, धिर दिला. त्या ढगफुटीमुळे लडाखच्या पर्यटन व्यवसायावर तर आभाळच कोसळलं. सगळ्या सहली ठप्पा झाल्या. असं असलं तरी खचून न जाता आत्माराम परब यांच्या इशा टुर्सने लगेचच आपली टुर लडाखला नेली आणि पर्यटनाचा ओघ चालू ठेवला पाहिजे असा धडा आपल्या कृतीतून घालून दिला.

लडाखचा पर्यटनाचा हंगाम अचानक थांबला आणि तिथला हिवाळा सुरू झाला. ढगफुटीमुळे लडाखची जी हानी झाली, तिथल्या जनतेचा रोजगार बुडाला त्याला काहीना काही हातभार लावावा हे सतत मनात असल्याने इशा टुर्सच्या माध्यमातून या वर्षी गोठलेल्या लडाखला सहली नेण्याचा आत्मारामचा मानस आहे. गेली काही वर्ष हिवाळ्यात लडाखला जाऊन व्हिंटर लडाखची अनुभूती आत्मारामनी घेतली आहे. त्या भ्रमंती दरम्यान काढलेली चद्दर ट्रेक, फ्रोजन लडाखची छायाचित्र आणि आपले अनुभव घेऊन आत्माराम आपल्याला भेटणार आहे आजपासून पुढचे चार दिवस.

गोठलेलं लडाख छायाचित्र प्रदर्शन
दिनांक २५ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर, २०१०,
सकाळी ११ ते सायंकाळी  वाजेपर्यंत
(सर्वांसाठी विनामुल्य प्रवेश)
स्थळ: पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई २५.
निसर्गाशी दोन हात करता करता त्याच्या हातात हात कसे घालावेत याची कला शिकण्यासाठी या प्रदर्शनाला जरूर भेट द्या. मुंबईच्या उकाड्यात लडाखचा हिवाळा अनुभवा.   


संबंधीत वृत्त:
 


22 November, 2010

यशवंताची शिकार
वन्यजीव कायद्या प्रमाणे आता बहुतेक प्राण्यांची शिकार करण्यावर बंदी आहे. पण असा कायदा होण्यापुर्वीची ही गोष्ट आहे. कोकणात शिकार करणे म्हणजे रानटी डुक्कर मारणे असं समिकरण आहे. शिकारीचं नुसतं नाव घेतलं तरी गावात भलताच उत्साह संचारतो. शिकारी संबंधीच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. पारावर होणार्‍या गप्पांना वेगळाच रंग चढतो. पुर्वी झालेल्या शिकारी, त्यात झालेल्या गमती-जमती, कुणाचा नेम कसा आहे , कोणी किती डुक्कर मारले पासून ठासणीची बंदूक कुणाकडे आहे आणि काडतूसची बंदूक कुणाकडे याचीही उजळणी केली जाते. मागच्यावेळी आपल्या वाट्याला कमी मटण आलं, फसवलं म्हणून एखाद्याची तक्रार असते. तर चलाखी करून कोणी डबल वाटा घेतला त्याची नक्कल करून दाखवली जाते. ' धुकटात पेट, खडपावर पेट ' या म्हणी मालवणी माणूसच जाणे. धुकटात पेट म्हणजे अंदाजाने बंदूक चालवणे आणि नेम लागला तर मात्र मिरवणे, खडपावर पेट म्हणजे जनावर समजून खडकावर गोळी घालणे. तर बघा, नुसत शिकार म्हणताच एवढ्या गोष्टी आठवल्या.

प्रत्यक्ष शिकारीचा दिवस उजाडला की त्यादिवशी कुणी शेतीच्या कामाला जात नसे. पेजेची न्याहरी करून सगळे तयार व्हायचे. त्यात बंदूक चालवणारे हाकारे  आणि हरकामे सारख्याच उत्साहाने एकत्र यायचे, व्युहरचना व्हायची, मागे केलेल्या चुका पुन्हा नको म्हणून एकमेकाना ताकीद दिली जायची. आधीच साफसूफ केलेल्या बंदूका खांद्यावर मारल्या जायच्या, देवाला गार्‍हाणं घातलं जायचं, जाणत्यांचे आशिर्वाद आणि हे सर्व पसंत नसणार्‍याच्या गाळी (शिव्या) घेउनच मंडळी निघायची.डोंगर-रानात जोरदार आरडा-ओरड करून डुक्कर उठवले जायचे. सकाळी सुरू केलेला हा प्रकार कधी-कधी दिवसभर चालायचा. कधी नशीबाने लवकरच यश यायचं. डुक्कर उठला, तो दिसला की एकच धावपळ उडायची. ' मार, अरे समोरच आहे, सोडूनको, आटकेचो आसा (आटकेचो म्हणजे आठ माणसानी उचलून नेण्या एवढ्या वजनाचा) एकच हलकल्लोळ माजायचा. डुक्कर दिसला, गोळी लागली तरी तो जखमी अवस्थेत जंगलात दुरवर जायचा. त्याला शोधून, पुर्ण मारून, त्याचे चारही पाय एका ओल्या वाशाला बांधून, शिकार सहा-आठ माणसांच्या खांद्यावरून गावात आणली जायची, सगळे विजयी वीर परतायचे, तेव्हा अख्खा गाव, पोरं-टोरं, बाया-बापडे, समस्त ग्रामस्त सगळे सगळे स्वागताला हजर असायचे. डुक्कर कापून सागोती (मटण)घेतल्याशिवाय कुणीच जागचा हालत नसे. वाटा घेऊन निघाले की मग प्रत्येकच्या घरात मटण शिजत असे. अख्ख्या अवाठालाच (वाडीला) रश्याचा दरवळ सुटत असे. त्या दिवशी तृप्त मनाने सगळा अवाठ झोपी जाई. पुन्हा एकदा शिकारीच्या गजाली ताजेपणाने करण्या साठी.

अख्ख्या अवाठाला सारख्या प्रमाणात सागोती वाटली तरी बंदूक मालकाला आणि शिकार्‍याला अधिकचा मोठा वाटा मिळत असे. यशवंत त्यापैकी एक होता. शिकारी आणि बंदूक मालक सुध्दा. पट्टीचा नेमबाज, उठलेला डुक्कर त्याच्या हातून कधीसुटला नाही. शिकारीला जायचं तर य़शवंत हवाच. पुढे पुढे तर त्याच्या सोईनेच शिकारीचा दिवस ठरायचा. यशवंताला वाटायचं शिकार मी करणार आणि त्यात एवढे वाटेकरी कशाला ? पण समजा त्याने एकट्याने शिकार केली तरी त्या दिड-दोनशेकिलो मटनाचं तो काय करणार होता ? गोव्याला रहाणार्‍या त्याच्या भावाने ही समस्या सोडवली. यशवंताने शिकार करायची आणि ते मटण भावाने गोव्याला आपल्या दुकानात विकायला ठेवायचं असं ठरलं. यशवंताला अख्खा डुक्कर फस्त करायचा मार्ग सापडला. शेतात भुईमूग तयार झाला की तो खायला रात्रीच्यावेळी डुक्कर येत. यशवंत मचाणावर दबा धरून बसू लागला. रात्रीचा अंधार, सोबत कुणी नाही अशा परिस्थितीत डुक्कर आले तरी नेहमीच शिकार व्हायचीच असे नाही. पण यशवंतला काहीतरी सावज मिळायचच. तो एकदा असाच बसला असताना डुक्कराची चाहूल लागली, यशवंत सावध झाला. चांदणी रात्र असल्याने त्याला सावज दिसत होतं. नीट नेमधरून त्याने बंदूक चालवली. जनावर ओरडलं. वर्मी गोळी लागलीय हे यशवंतानेअनुभवाने ओळखलं. झुडूपाच्या दिशेने हालचाल झाली. डुक्कर त्या दिशेने गेला होता. डुक्कराच्या ओरडण्याचा आवाजा येत होता. थोड्या वेळाने त्याचं ओरडणं थाबलं.

पहाट झाली तसा यशवंत खाली उतरला. आता त्याला घाई होती. शिकार शोधायची,  घरच्याना कळवायचं, डुक्कर कापायचा,  मटण साफ करायचं, डबे भरायचे आणि गोव्याला घेऊन जायचं. किती वेळ लागणार, सगळा हिशेब करतच यशवंत डुक्करालाशोधू लागला. चांगलं उजाडल्यावर डुक्कराच्या पायाचे ठसे दिसू लागले. त्या खुणांचा आणि रक्ताचा मागोवा घेत यशवंत एका पाणंदीपाशी आला. पलिकडे एका डबक्यात पाणी साचलेलं होतं. त्याच्या शेजारीच डुक्कराचं प्रचंड धुड पडलेलं होतं. यशवंतस्वतःवरच खुश झाला. उतावीळ झाला. आज खुप पैसे मिळतील, घरची मंडळी खुश होतील. मनातल्या मनात असे विचार करतच यशवंत डुक्कराजवळ गेला, समोर बसला, सुळ्याना हात घालून त्याला हालवण्याचा प्रयत्न केला तोच डुक्कर सर्वताकद एकवटून उठला, यशवंतला ढुश्शी देवून त्याने त्याला खाली पाडलं आणि एक..दोन.. अनेक वार त्याच्यावर करत राहीला. यशवंत बेशुध्द होई पर्यंत.


इकडे घरची मंडळी वाट बघत होती. रोज ठराविक वेळात परतणारा यशवंत आज दिवस वर चढला तरी कसा आला नाही म्हणून त्याचा मुलगा शेताकडे निघाला. मचाणापासून पाऊलखूणा धुंडाळत तो पाणंदी जवळ आला, समोर बघतोतर काय,यशवंताचीच शिकार झालेली. तो गलितगात्र होवून पडला होता. पोराने बोंब ठोकली, गावकरी जमा झाले. यशवंताची पालखी सरकारी दवाखान्यात अणण्यात आली. पायाची, बरगड्याची हाडं पार मोडून गेली होती. बर्‍याच उपचारानंतर यशवंत बरा झाला, जगला पण अपंग झाला. त्या प्रसंगा नंतर कुणी गावात अधाशीपणा केला तर लोक म्हणतात " यशवंताचा म्हायती आसा मा ? "

नरेंद्र प्रभू

15 November, 2010

मुख्यमंत्र्यांचे ‘होर्डिग हटवा’कोणतेही कारण शोढून काढून मोठ्या पदावर असणार्‍या व्यक्तींबरोबर आपली छबी झळकवायचा सोपा मार्ग म्हणजे होर्डिग्ज. शुभेच्छुक म्हणून स्वतःबरोबर इतर बगलबच्चांची पंगत त्या फ्लेक्सवर कशी चमकेल याचाच ध्यास या महाशयांनी घेतलेला असतो. फ्लेक्सचं आगमन झाल्या पासून शहरं तसच गावांचं विद्रुपीकरण झपाट्याने होत आहे, पर्यावरणाची हानी होत आहे. खरं म्हणजे स्थानीक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतल्या शिवाय असे फलक लावता येत नाहीत पण तिकडे लक्ष कोण देतो. भ्रष्टाचाराच्या इतर बाबींमध्ये आकंठ बुडालेल्या पदाधिकारी आणि कर्मचार्‍यांना या छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये लक्ष द्यायला वेळच नसतो. महाघोटाळ्यात तोंड काळं झाल्यावर एक मुख्यमंत्री गेला आणि त्याच्या जाग्यावर दुसरी व्यक्ती आली, उभ्या महाराष्ट्राची मान खाली गेली. या वेळीसुद्धा या चमकेश बहाद्दरांनी संधी साधली आणि आपली हौस भागवून घेतली. पण या वेळी नव्या मुख्यमंत्र्यानी ती होर्डिग्ज हटवा असा आदेश दिला आणि आपण खुशमस्कार्‍यांची फौज बाळगणार नाही असाच जणू संदेश दिला. ते काहीही असो पर्यावरणाला घातक अशी ही होर्डिग्ज उभारली जाऊ नयेत असा संदेश नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला हे ही नसे थोडके. खरं म्हणजे असे अनधिकृत बॅनर लावणार्‍यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. पण करणार कोण?      

10 November, 2010

इंग्रजी माध्यम, मराठी कविताहल्ली वर्गात कविता एका सूरात म्हटल्या जाताहेत असं क्वचितच ऎकायला येतं. मराठी माध्यमाच्या शाळाही त्याला अपवाद नाहीत, इंग्रजीची तर बातच सोडा. कवितेला चाल लाऊन ती वर्गात एका तालात म्हटल्याने ती पुन्हा पाठ करावी तर लागत नाहीच पण ती लक्षातही चांगली राहते. अर्थ उमगत जातो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून ही गोष्ट होणं कठीण याच स्वानुभवातून सौ. कल्पना प्रभु यांनी इंग्रजी माध्यम, मराठी कविता ही ऑडीओ सिडी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केली आहे. सौ. कल्पना प्रभु या नुकत्याच गोरेगाव, मुंबई येथील कॉनव्हेंट स्कूल मधून सेवा निवृत्त झाल्या असून दहाविच्या अभ्यासक्रमातला मराठी कवितांचा बोजा कमी व्हावा, त्यामध्ये ग्येयता यावी म्हणून लगेचच त्यानी हा उपक्रम हाती घेऊन तडीस नेला आहे. हे करत असताना स्वतःच्या पदराला खार लावून त्यांनी निवृत्त झाल्यावरही आपला विद्यार्थ्याप्रती असलेला प्रेम, जिव्हाळा व्यक्त केला आहे.

१ गुरू हा संतकुळीचा राजा
२ भक्ताचिया लोभा
३ वैकुंठीचा हरि
४ काय करू आता
५ खेळणी
६ निरोप
७ तहान
८ संघर्ष
९ अंधार पखाली
१० कसं चालेल
११ शब्दशस्त्र
१२ श्वास

वरील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता दहावीच्या मराठी पुस्तकातील सर्व कविता सदर सिडीमध्ये आहेत. प्रत्येक कवितेच्याआधी असलेलं अर्थपुर्ण निवेदन आणि संगीताचा  बाज या मुळे या कविता श्रवणीय तर झाल्या आहेतच, पण सहज ऎकता ऎकता विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करणार्‍याही आहेत. संगीतकार संजय गायकवाड यांनी या कवितांना सुंदर चाली लावल्या आहेत तसच काही कविताना आपला आवाजही दिला आहे. कु. ऎश्वर्या चव्हाण, कु. वरूण बिड्ये यांच्या बरोबरच स्वतः सौ. कल्पना प्रभु यांनी गायनाची बाजूही सांभाळली आहे. याबद्दल अधिक माहीतीसाठी: सौ. कल्पना प्रभु (9969104365) किंवा श्री. संजय गायकवाड (9867444076) यांच्याशी संपर्क साधावा आणि दहावीचे विद्यार्थी तसेच शाळांनी याचा जरूर लाभ उठवावा.   

09 November, 2010

गंगापुत्र श्री.विजय मुडशिंगीकर
दिवाळी सारखे सण आले की हल्ली मुंबईत रहावत नाही. फटाक्यांचा अतिरेक आणि कानठळ्या बसवणारा आवाज याने जीव हैराण होतो. आवाज, हवा यांच्या प्रदुषणात कमालीची वाढ होते. या वर्षी ऎन दिवाळीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मुंबईत होते. त्यांची सुरक्षा व्यवस्था चोख असली तरी त्यांच्यापर्यंत हे प्रदूषित हवा नक्कीच पोहोचली असणार. आपण प्रगत राष्टाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. ओबामानी तर भारत प्रगतीशील नव्हे तर प्रगत देश आहे असे म्हटले आहे. पण त्यानी तसं म्हणून काय उपयोग. ते इथल्या प्रत्येक कृतीतून दिसून आलं पाहिजे. मुंबईवरून ओबामा उडत असताना त्यानी शहराचा झालेला उकिरडा नक्कीच बघितला असणार. विमानतळाजवळची मिठी नदी ओबामांच्या नजरेस पडली असती तरी त्याना भारत अजून किती मागे आहे हे समजलं असतं. हे आपणच असं का करतोय?  एकेकाळी मिसिसिपी गंगेसारखीच होती. पण अमेरिकेने तीला तीचं मुळ रूप प्राप्त करून दिलं. गंगेला ते कधी प्राप्त होणार?

ओबामांनी भाराताबाद्दल आशावादी विचार मांडले. इथली मुलं, तरूण यांना पाहून ते प्रभावीतही झाले. एकप्रकारची ताकद आणि इच्छाशक्ती इथल्या वातावरणात त्यांना दिसून आली. खरच एक दिवस भारत सामर्थ्यवान देश बनेल अशी आशा त्यांना, तुम्हा आम्हा सर्वांना आहे त्याचं कारण एक ध्येय्य घेऊन झटणारी माणसं अजून या देशात आहेत. ओबामा भारतात यायला निघाले आणि सर्वच वृत्तपत्रात त्यांच्याबद्दल लिहून यायला लागलं. लोकसत्तामध्ये याच दरम्यान मिसिसिपी ते गंगा! हा अग्रलेख आला होता. मनात आणलं तर एक सामान्य माणूस काय करू शकतो हे त्या नमूद केलं होतं. गेल्या काही वर्षांत विजय मुडशिंगीकर या महाराष्ट्रातील एका एकांडय़ा शिलेदाराने गंगेच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. निवृत्तीनंतरची पुंजी म्हणून जमा करून ठेवलेला भविष्य निर्वाह निधी त्यांनी पूर्णपणे या मोहिमेत ओतला आहे. असा उल्लेख त्या अग्रलेखात होता. श्री. मुडशिंगीकरानी केलेलं काम नक्कीच दाद देण्यासारखं आहे, विचार करायला लावणारं आहे.

आदर्श सारखे घोटाळे, सत्ताधिश, नोकरशहा, बिल्डर, दलाल हे सगळे देश विकून खात असताना हा देश अजून तगून आहे तो मुडशिंगीकरांसारख्या प्रामाणिक लोकांमुळेच. एक सोडून दोन वेळा मणक्याची ऑपरेशन झाली तरी त्यानी त्या आजारपणात ध्यास घेतला तो गंगा शुद्धीकरणाचा. ते आपल्या या भुमिकेशी एवढे प्रामाणिक राहिले की या भ्रमणयात्रे दरम्यान काढलेल्या छायाचित्रांना चांगली किंमत येत असतानाही त्यांनी ती विकली नाहीत. सगळ्याच क्षेत्रात होणारं प्रदुषण रोखण्याच्या बाबतीत ते आग्रही असतात.

गंगोत्री 
गंगा ते आदर्श सगळीकडेच भ्रष्टाचार, प्रदुषण. सगळ्या देशाचाच चेहरामोहरा विद्रूप होत असताना अशी काही माणसं (अण्णा हजारे, पोपटराव पवार) आपलं काम निष्ठेने करत रहातात म्हणून काही अंशी आपण हे विष पचवू शकतो. मुडशिंगीकरांसारख्यांच्या प्रयत्नाला हातभार लावला तर आणि तरच गंगाजल पुन्हा शुद्ध होईल. पवित्र होईल.    
   

08 November, 2010

अंतु बर्वा अमर आहे...!


ओबामा मुंबईत येऊन गेले. त्यानी सर्वच मुंबईकरांची मनं जिंकली. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या देशाचा प्रमुख असूनही कसलीच प्रौढी त्यानी मिरवली नाही. ज्यांना ओबामांची प्रत्यक्ष  भेट लाभली ते खरच सुदैवी म्हटले पाहिजेत. मणीभवनची ओबामांची भेट गाजली. पण त्या आधी त्याच मणीभवन मध्ये एक नाट्य रंगलं होतं. मणीभवन मध्ये ओबामा येणार म्हणून अमेरिकन अधिकारी तिकडे गेले. ओबामा आल्यावर कोणी कुठे किती अंशाच्या कोनात वाकून उभं रहायचं, काय करायचं, काय बोलायचं याच्या सुचना दिल्या जात होत्या. एक गांधीवादी मात्र म्हणाला हे जमणार नाही. अधिकारी चक्रावले. का? असं आवासून त्यानी विचारलं तेव्हा मला माझ्या पुर्व नियोजीत कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला येता येईल असं वाटत नाही असं तो गांधीवादी म्हणाला. अधिक चौकशी केल्यावर समजलं की त्या जेष्ठ गांचीवाद्याने कोकणकन्या एक्सप्रेसचं तिकिट काढलं होतं आणि भेटीच्या आदल्या रात्री त्यांना कोकणकन्याने रत्नागीरीला जायचं होतं. प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी आपला पुर्वनियोजीत कार्यक्रम न बदलणारा हा गांधीवादी पुलंच्या अंतु बर्व्याच्याच गावचा. मान लिया उस्ताद. वाचा: महत्त्वाचं काय? ओबामांची भेट की मोठय़ा मुश्किलीने मिळालेले कोकणकन्या एक्स्प्रेसचे तिकीट?                  

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates