11 October, 2009

एक चमत्कार – हिवरे बाजार


सर्व राजकीय पक्षांनी पायघड्या पसरल्य़ा असताना, आमदार, खासदार सहज होण्याची संधी उपलब्ध असताना गावचा सरपंचच राहण्यात धन्यता मानणारा माणूस त्याचं नाव पोपटराव पवार. भारतीय क्रिकेट संघाची दारं किलकिली झालेली दिसत असताना त्याकडे पाठ फिरवून गावी परतणारा द्विपदवीधर त्याचं नाव पोपटराव पवार. कस्टम, विमान कंपनीच्या नोकरीचं बोलावण हाती असताना गावचा सरपंचपद ही ‘फुकट फौजदारी’ गेली वीस वर्ष सांभाळणारा माणूस त्याचंही नाव पोपटराव पवार. अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं ‘हिवरे बाजार’ हे गाव स्वयंपुर्ण खेडं बनवणारा आघुनिक भगीरथ म्हणजे पोपटराव पवार. अत्यंत बिकट परिस्थितीत असलेल्या गावाचा कायापालट करून त्या गावाला जागाच्या नकाशावर स्थान प्राप्त करून देण्याची किमया करणारा किमयागार पाहीला ‘त्रिमिती’ च्या ‘त्यांच्या स्वप्नांचा प्रवास...!’ या कार्यक्रमात. हे चैतन्य व्यासपीठावर आलं आणि त्याने मुंबईकराना भारून टाकलं. गावाच्या भरभराटीसाठी, ऎक्यासाठी, स्वयंपुर्णतेसाठी आपलं आयुष्य वेचणारा माणूस आपल्यातच आहे ही गोष्टच आजच्या दिशाहीन झालेल्या समाजाला दिलासा देणारी आहे.

प्रगतीची सुत्र समजावून सांगताना पोपटराव म्हणतात - सरकार म्हणजे कोण ? आपणच, हे मीठ, मिरची, कांदा, लसूण, धान्य-कडधान्य आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा त्या वरच्या करातूनच सरकार चालतं. तेव्हा त्याची भिती बाळगण्याची किंवा बाऊ करण्याची काही आवश्यकता नाही. पण हे समजायला समाज शिकून साक्षर नव्हे तर सुसंकृत झाला पाहीजे. एकदा का हे झालं की निवडणूका आल्या की प्रचार करावा लागणार नाही. आपलं हित-अहित समाजाला समजेल आणि तो भुलथापांना बळी पडणार नाही. विकास हा माथा ते पायथा झाला पाहीजे. सर्व वर्गातील समाज जेव्हा विकासाची फळं चाखेल तेव्हा ते गाव समृद्ध झाल्याशिवाय रहाणार नाही. पाण्याचा प्रश्न हा अनादी काळापासून मानवाला सतावत आला आहे. त्याचं योग्य नियोजन केलं तर केवळं १०० मी.मी. पाऊस पडला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. २०० मी.मी. पावसावर एक पीक घेवू शकतो, आणि ३०० मी.मी. पाऊस झाला तर दुबार पीकं घेणं शक्य आहे. आपल्या देशात भगीरथ हा जलअभियंता, कपीलमुनी भुवैज्ञानिक, गंगा जलदेवता तर भगवान शंकर प्रधान वनसंरक्षक होवून गेले. म्हणजे आदी काळापासून पाण्याचं महत्व आणि नियोजन यावर लक्ष दिलं गेलं होतं. हिमालयापासून गंगेचा विचार केला तरी भगीरथाने स्ट्रेंचींग, पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असं सर्व त्याच वेळी करून पाण्याची सुबत्ता या भागात राहील याची काळजी घेतली होती. त्याचा कित्ता गिरवला तरी आपणाला पाण्याची कमी भासणार नाही.

हिवरे गावात २३ कुटूंब मुंबईतून परत आली आणि ‘खेड्याकडे चला’ हा गांधीजींचा संदेश त्यानी प्रत्यक्षात आणला, पण गावात परतण्यासारखी परिस्थिती पोपटरावांनी निर्माण केली तेव्हाच हे शक्य झालं. २६ जानेवारी १९९० ला गावात पहिली ग्रामसभा झाली आणि हिवरे गावात दुसर्‍या स्वातंत्र्याच्या लढाईला प्रारंभ झाला. त्या नंतर आलेल्या अनंत अडचणींवर मात करत पोपटरावांनी गावाला आजचं वैभव प्राप्त करून दिलं. सगळ्या प्रलोभनांना दुर सारत काम करत राहिले, नोकरीच्या मागे गेले नाहीत आणि आता त्याकडे वळून पाहताना ‘बरे झाले देवा निघाले दिवाळे’ ही तुकाराम महाराजांसारखीच भावना आहे. अडचणी आल्याशिवाय आता मन रमत नाही आणि त्या आल्या की चार्ज व्हायला होतं असं म्हणणारा हा आधुनिक संत महाराष्ट्राला लाभला आहे.

‘जागते रहो’ आणि ‘उपकार’ या चित्रपटांपासून प्रेरणा घेवून गावातली भांडणं सोडवत राहीलो आणि आता गावात एकही भांडण नाही, एकही बेरोजगार नाही, भुमीहीन नाही. दारीद्र्यरेषेखालील तीन कुटूंब येत्या वर्षात तो टप्पा पार करतील आणि संपुर्ण गाव सधन होईल असा विश्वास पोपटरावांनी व्यक्त केला. अशा या गावाला रोज चारशे ते पाचशे देशी विदेशी लोक भेट देतात. त्यात विविध देशातील अर्थतज्ञ, शेतीतज्ञ, समाजसेवी संस्था असतात. नुकतच अलिप्त राष्ट्रांचं एक शिष्टमंडळ गावाला भेट देवून गेलं. भारतालल्या जवळ-जवळ प्रत्येक राज्याने पोपटरावांकडे मदतीचा हात मागितला आहे या वरून त्यांच्या कामाचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. अशा या गावात फक्त एक असलेल्या मुस्लिम कुटूंबासाठी गावकर्‍यानी मस्जिद बांधली. अख्ख्या गावात आज पर्यंत एकच सार्वजनिक गणेशोत्सव होत होता मात्र आता त्याचं स्वरूप आणि आवशकता पहाता देव घरातच असलेला बरा म्हणून पुढील वर्षापासून कोकणाप्रमाणे गणपती घरा-घरातच येईल. जिवंतपणीच स्वतःचे पुतळे उभारणारे राजकारणी आणि ‘प्रेरणास्थानं कमी नाहीत पण गावात एकही पुतळा नाही’ असं अभिमानाने सांगणारे पोपटराव पवार या मध्ये आता कुणाचं अनुकरण करायचं आणि कुणाच्या पाठी जायचं हे आता आपणच ठरवलं पाहीजे.

‘त्रिमिती’ने मनाला भिडणारा हा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करून आताच्या जमान्यातही अशी माणसं आहेत याची जाणीव करून दिली आणि ‘त्यांच्या स्वप्नांच्या प्रवासाचे’ आम्ही दोन तास तरी साक्षीदार झलो या बद्दल त्रिमितीचेही मनापासून आभार. सिंधूताई सकपाळ, रेणूताई गावस्कर आता प्रकाशभाई मोहाडीकर आणि पोपटराव पवार या मालेत आणखीही अनेक पुष्प गुंफली जातील. अशी प्रेरणास्थानं बघायची, ऎकायची असतील तर ‘त्रिमिती’च्या कार्यक्रमांना जरूर हजेरी लावली पाहीजे.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates