हिरकणी बुरूज सर्वानाच माहीत आहे आणि जिच्यावरून हे नाव पडलं ती हिरकणी सुद्धा. हिरकणी आणि बुरूज काल दोन्ही पावन झाले. इतिहासातली ती हिरकणी काल मी प्रत्यक्ष पाहिली यशवंत नाट्यगृहात. हिरकणीवत अपार मायेने ओथंबलेली आणि त्या रायगडाच्या बुरूजा प्रमाणे अभेद्य न डगमगणारी. मृदुमुलायम आणि कर्तव्य कठोर एकाचवेळी दोन रुपात.
रेणूताई गावस्करांचे लोण्यासारखे शब्द कानाला गोड वाटत होते, पण ह्रदयाला भिडायचे तेव्हा थांबा, पुढचं बोलायच्या आधी हे पचऊद्या म्हणावं असं वाटत होतं. माझी १० वर्षाची मुलगी रेणूताईंना म्हणाली " तुमची मुलाखत सिनेमा सारखी बघत होते.” खरच रेणूताईनी सगळ्यांच्या ह्रदयाचा ताबा घेतला होता. त्याची ती पावती होती.
हल्ली सारखं अंतर्मुख व्हायला होतं, मुंबई वरचे ह्ल्ले, रेणूताईची मुलाखत..., मुळापासून हादरवून टाकणार्या घटना. आपल्यासारख्याना भिती निर्माण झालीय की आपल्या अस्तित्वाचं काय होणार ? या ब्लॉग मध्ये मी पुर्वी उल्लेख केलाय (जागे व्हा ! अजून हल्ला बाकी आहे !!! त्या मुलाखतीत तज्ञांच्यामते "आपलं अस्तित्व रहाणार का ? “ हाच आता खरा प्रश्न आहे ) पण या मुलाखतीत ज्यांच्या अस्तित्वाला जन्मा पासुनच समाजाने नाकारलंय त्यांचा हात रेणूताईंनी हातात घेतला आणि काय घडलं ते अनुभव ऎकून थक्क व्हायला झालं.
मुलांना गोष्टी सांगताना एक आटपाट नगर होतं अशी सुरवात असावी असं रेणूताई म्हणाल्या. (माझ्या ब्लॉगची सुरवात तशीच झाली म्हणून मला खूप बरं वाटलं) तर तीन तास मंतरलेले होते यात शंका नाही. संवेदनाक्षम मनाला जागं करणारी ही मुलाखत चिकाटीने काम करायला लावेलच. कृतितून बोलावं असं रेणूताई म्हणाल्या तेव्हा थांबतो, पण एक गोड बातमी आहेः " दुर दर्शनच्या सह्याद्री वाहिनीने रेणूताईंना यंदाचा हिरकणी पुरस्कार जाहीर केला आहे. " खरच खुप आनंदाची गोष्ट. रेणूताई, अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment