" श्री. बाबी कलिंगण यांना राज्यस्तरीय लोककला पुरस्काराने गौरविण्यात आले " या वृताने मी अगदी भारावून गेलो आहे. सिंधुदूर्गात दशावतारी म्हणजे " रात्री राजा आणि सकाळी कपाळावर बोजा " अशी स्थिती एके काळी होती. त्या वेळपासून लोककलेची सेवा हाच परमधर्म असे समजून हा कलाकार राबला त्याची आता शासनाने दखल घेतली हे बरं झालं.
बोजा घेऊन रोज १४ - १५ कि.मी. पायी प्रवास करायचा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर पुन्हा प्रयोगाची तयारी करायची,आपणच आपला मेकअप करायचा , वस्त्र परिधान करायची आणि थंडीत कुडकुडतच प्रवेशावर प्रवेश करत रहायचे थेट सकाळ पर्यत.पुन्हा तेच " कपाळावर बोजा " . बरं या प्रयोगाची कथा, संवाद वैगरे त्यानीच ठरवलेली, लोकांच्या आग्रहास्तव कोणतेही आख्यान लावायला हि मंडळी केव्हाही तयार. कोणतिही संहिता नसताना ५- ६ तास चालणारे दशावताराचे प्रयोग म्हणजे एक आच्छर्य आहे. ती एक पर्वणीच असते.
बाबी कलिंगण वयाच्या १५ व्या वर्षापासून आजतागायत ७५ व्या वर्षी सुध्दा दशावताराचे प्रयोग करीत आहेत १५ व्या वर्षी २५ पैसे रोजंदारीवर पार्सेकर दशावतारी मंडळात काम करणारे बाबी कलिंगण नंतर खानोलकर, आजगावकर, मामा मोचेमाडकर, नाईक मोचेमाडकर, असा प्रवास करत पुन्हा पार्सेकर कंपनीत आले. नंतर कलेश्वर दशावतारी मंडळ ही कंपनी स्थापन केली. पण बाबी कलिंगण कुठेही असुदे त्याच्या नाटकाचा जो बोर्ड लागातो तो " स्वतः बाबी कलिंगण " अशी जाहिरात असलेलाच, मग नाटकाला तुफान गर्दी होते. प्रत्यक्ष परमेश्वर अवतरणार असे समजून मालवणी जनता जनार्दनाचा ओघ जत्रेच्या ठिकाणी सुरू होतो. " स्वतः बाबी कलिंगण " हा आता मालवणीतील वाक् प्रचार झाला आहे. श्री. कलिंगण यांना यापूर्वी १९९४ मध्ये अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा पुरस्कार मिळाला आहेच. या प्रसंगी पद्मश्री बाबी नालंग यांचीही आठवण येते. या दोन्ही कलावंतानी मच्छींद्र कांबळी प्रमाणेच दशावतार सुध्दा सातासमुद्रापलीकडे नेला. ' देव हेंचा भला करो '.
No comments:
Post a Comment